Monday 31 December 2012

जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम लागू


  
     वर्धा , दि. 31 – वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी एन.नविन सांना यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम (3((1) व 3 कलम जारी केले आहे.
      या कलमाचा अंमल दि. 10 जानेवारी 2013 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                              0000000

महाविद्यालयातील शिष्‍यवृत्‍तीसाठी आधार कार्ड आवश्‍यक


                
    वर्धा, दिनांक 31 – महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांना  शिष्‍यवृततीसाठी  आधार  नोंदणी  तसेच  राष्‍ट्रीयकृत बँकेत  बचत खाते  आवश्‍यक असून, ज्‍या विद्यार्थ्‍यांकडे  आधार क्रमांक  तसेच बचत खाते नाहीत  अशा विद्यार्थ्‍यांच्‍या  खात्‍यात  शिष्‍यवृत्‍ती  जमा करण्‍यात येणार नाही.
      महाविद्यालयातील  शिष्‍यवृत्‍तीसाठी   विद्यार्थ्‍यांनी  आधार नोंदणी केलेली आहे व बँकेचे बचत खाते आहे अशा विद्यार्थ्‍यांची   यादी  समाजकल्‍याण  कार्यालयात उपलब्‍ध  आहे. शिष्‍यवृत्‍ती धारक विद्यार्थ्‍यांच्‍या   यादीमध्‍ये  बचत खाते क्रमांक  व आयएफएससी  कोड नंबर  तपासून  विद्यार्थ्‍यांचे  नाव  व बचत खाते   यांची  महाविद्यालयाचे प्राचार्यानी  तसेच मुख्‍याध्‍यापकांनी   तपासणी करणे  आवश्‍यक आहे. शिष्‍यवृत्‍ती  धारकांनी   महाविद्यालय प्रशासनाकडे  आपला  आधार क्रमांक  व  राष्‍ट्रीयकृत बँकेतील बचत खात्‍याचा क्रमांकाची प्रत्‍यक्ष तपासणी  करावी, असे समाज कल्‍याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त  जया राऊत यांनी सुचित केले आहे.
                                           00000000000

रस्‍ता सुरक्षा अभियानाचे आज उदघाटन


                         
           वर्धा, दिनांक 31 – रस्‍ता  सुरक्षा अभियानाचे उदघाटन जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांच्‍या  हस्‍ते  मंगळवार  दिनांक   1 जानेवारी  रोजी   सकाळी  10.30 वाजता वाहतूक  बजाजनगर चौकातील वाहतूक नियंत्रण शाखेच्‍या  प्रांगणात आयोजित करण्‍यात आले आहे.
         उपप्रादेशिक परिवहन विभाग वर्धा  वाहतूक नियंत्रण शाखा यांच्‍या संयुक्‍त  विद्यमाने 24 व्‍या  रस्‍ता   सुरक्षा अभियानाचे आयोजन  करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाच्‍या  अध्‍यक्षस्‍थानी   जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार राहणार आहेत. रस्‍ता   सुरक्षा अभियाना अंतर्गत सुरक्षीत वाहतूक  तसेच  डि्ंक अॅन्‍ड ड्राइव्‍ह  मोहीम राबविण्‍यात येणार आहे. रस्‍ता  सुरक्षा अभियाना बद्दल वाहन चालकाबद्दल जागृती निर्माण करण्‍यासाठी 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून, यामध्‍ये  वाहनचालकांची  नेत्र तपासणी , स्‍कुल बस चालकांना प्रशिक्षण, रहदारी नियमाविषयी  प्रबोधन, तसेच शालेय विद्यार्थ्‍यांसाठी   विविध  उपक्रम  राबविण्‍यात येणार आहेत.
          रस्‍ता   सुरक्षा अभियान  मोहीमेच्‍या  उदघाटन समारंभास तसेच विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शशीकांत भंडारे यांनी केले आहे.
                                            000000

पालकमंत्री राजेंद्र मुळक आज वर्धेत



              वर्धा दि. 31 वित्‍त व नियोजन व उर्जा राज्‍यमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री राजेंद्र मुळक आज दिनांक 1 जानेवारी 2013 रोजी दुपारी 4.00 वाजता नागपूरहून वर्धा येथील विकास भवन येथे आगमण. दुपारी 4 ते सांय. 5.00 वाजता आधार योजने अंतर्गत विविध लाभार्थ्‍यांच्‍या बँक खात्‍यावर रक्‍कम जमा करण्‍याच्‍या कार्यक्रमांचा शुभारंभ  स्‍थळ विकासभवन वर्धा. सांयकाळी 5 वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
0000

Wednesday 26 December 2012

अन्‍न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख आज शहरात


                वर्धा दि.26- अन्‍न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांचे गुरुवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागपूर येथून आगमण होईल.
          श्री. तुळजाबाई एज्‍युकेशन सोसायटीतर्फे बापुरावजी देशमुख जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आयोजित अखिलभारतीय खो खो स्‍पर्धेच्‍या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील व येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
0000

तारण योजनेअंतर्गत 2 हजार दोनशे शेतक-यांना लाभ 417 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप



           वर्धा दि.26-  कृषी शेतमालाच्‍या बाजार व्‍यवस्‍थापनाचे अचूक नियोजनामुळे तारण योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील 2 हजार दोनशे शेतक-यांना लाभ मिळवून देणे शक्‍य झाले आहे.या योजनेअंतर्गत सोयाबीन करीता 2 कोटी 50 लाख रुपयाचे वाटपही पूर्ण झाले आहे.
          तारण योजनेअंतर्गत जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीन करीता 9 कोटी रुपयाचे लक्षांक ठेवण्‍यात आले होते. तारण योजनेअंतर्गत हिंगणघाट बाजार समितीने 1 कोटी रुपये आर्वी बाजार समितीने 30 लाख, पुलगांव 1 कोटी, सिंदीरेल्‍वे 27 लाख, वर्धा 21 लाख, रुपयाचे वाटप पूर्ण केले आहे. शेतक-यांनी तारण योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्‍यात आले आहे.
          वर्धा जिल्‍ह्यासाठी खरीप हंगामामध्‍ये 452 कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतक-यांना देण्‍याचे उदिष्‍ट ठरविण्‍यात आले होते त्‍यापैकी शेतक-यांना 417 कोटी रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. रब्‍बी हंगामासाठी 2 कोटी 3 लाख रुपयाचे कर्जही शेतक-यांना देण्‍यात आले आहे.
         शेतक-यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी सकारात्‍मक भूमिका घेतल्‍यामुळे पीक कर्जासाठी पात्र असलेल्‍या सर्व शेतक-यांना सहजपणे कर्ज उपलब्‍ध होत आहे.
        शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतक-यांना कृषीमालाच्‍या किंमतीच्‍या 70 टक्‍के कर्ज बँकेमार्फत उपलब्‍ध करुण देण्‍यात येत आहे.या कर्जावर बँकेमार्फत नियमानुसार व्‍याजाची आकारणी  करण्‍यात येत आहे.
                       रब्‍बी हंगामासाठी गव्‍हाचे बियाणे
        रब्‍बी हंगामामध्‍ये शेतक-यांना गव्‍हाचे बियाणे सहज उपलब्‍ध व्‍हावे यासाठी 1 हजार 870 क्विंटल बियाणे महाबिजमार्फत उपलब्‍ध करुण देण्‍यात आले आहे. या बियानांवर 500 रुपये प्रति क्विंटल अनुदानही देण्‍यात आल्‍यामुळे शेतक-यांनी 200 क्विंटल गव्‍हाचे बियाणे उचलले आहे.
          कृषीमालाच्‍या बाजार व्‍यवस्‍थापनाचे अचूक नियोजनाबाबत जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी व समितीचे अध्‍यक्ष भाऊसाहेब ब-हाडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली कृषी विकास अधिकारी आर.के.गायकवाड,पणन अधिकारी के.एस.तुपे, अग्रणी बँकेचे एम.के.देव पुजारी,जिल्‍हा मार्केटिंग अधिकारी शेख बिल्‍लाल, कृषी उद्योग विकास महामंडळाचे जावळकर,महाबिजचे एन.पी.खांडेकर, जिल्‍हा सांखिकी अधिकारी ए.डी.गोतमारे आदि उपस्थित होते.  
000000

रोजगारहमी योजनेमुळे शेतक-यांना दिलासा जिल्‍ह्यात 900 विहीरी पूर्ण



      वर्धा दि.26-  महात्‍मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे केवळ ग्रामीण भागात रोजगाराची हमी मिळवून दिली त्‍यासोबत शेतक-यांना उत्‍पादक कामांनमुळे शेती सुधारणेसह सिंचनासाठी विहीरीचा कार्यक्रमही अत्‍यंत लाभदायक ठरत आहे. वर्धा जिल्‍ह्यात 900 विहिरी पूर्ण करुण शेतक-यांना सिंचनसुविधाही आपल्‍या शेतात निर्माण करणे शक्‍य झाले आहे.
          महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत शेतक-यांच्‍या शेतात विहिर खोदण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात आले असून यावर्षात 900 विहिरी पूर्ण झाल्‍या असून शेतक-यांच्‍या शेतीच्‍या अभिलेखात विहिरींची नोंद घेण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिल्‍या आहे.
          मगरा रोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्‍ध करुण देतांना ग्रामपंचायत स्‍तरावर उत्‍पादक कामे घेतल्‍यास शेती उत्‍पादन वाढीला मदत होऊ शकेल ही संकल्‍पना समोर ठेवून ग्रामपंचायत व ग्रामसभेच्‍या माध्‍यमातून कामांच्‍या नियोजनाला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. वर्धा जिल्‍हा हा कृषि व फलोत्‍पादनामध्‍ये प्रगतीशिल जिल्‍हा म्‍हणून संपूर्ण राज्‍यात ओळखला जातो शेतीवर सिंचनाच्‍या सुविधा उपलब्‍ध झाल्‍यास विविध प्रकारचे पीक तसेच फलोत्‍पादनही या जिल्‍ह्यात शेतक-यांकडून घेतल्‍या जाते.
          जिल्‍ह्यात विविध योजना अंतर्गत शेतात विहिरी खोदण्‍यांचा धडक कार्यक्रम सुरु असून 4 हजार 299 विहिरींना तांत्रिक मान्‍यतासुध्‍दा देण्‍यात आली आहे. त्‍यासोबतच जिल्‍ह्यातील 517 ग्रामपंचायतीमध्‍ये मगरा रोहयो योजनेअंतर्गत विहिरीनाही प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. त्‍यामुळेच 900 विहिरी पूर्ण झाल्‍या आहे. यामध्‍ये वर्धा तालुक्‍यात 270, देवळी 171, समुद्रपूर 122, हिंगणघाट 131, सेलू 56, आष्‍टी 75, कारंजा 52 तर आर्वी तालुक्‍यात 33 विहिरींचा समावेश असल्‍याची माहिती  उपजिल्‍हाधिकारी जगदिश संगितराव यांनी दिली.
00000

Friday 21 December 2012


योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देण्यासाठी 1 जानेवारीपूर्वी बॅंकेत बचत खाते उघडा - अपुर्वा चंद्रा



            वर्धा ,दिनांक 20 : केंद्र व राज्य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ  थेट लाभार्थ्‍यांच्‍या बचत खात्‍यात जमा करण्‍याच्या दृष्‍टीने राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये बचत खाते उघडण्याची विशेष मोहिम राबवून  1 जानेवारीपूर्वी सर्व लाभार्थ्यांचे बचत खाते उघडा, अशा सूचना केंद्रिय मानवसंसाधान विकास विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज दिल्यात.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आयोजित आधार योजनेचा आढावा श्री. अपूर्व चंद्रा यांनी घेतला.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
            शासनाच्‍या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्‍यांपर्यंत  पोहचविण्‍याबाबत जिल्‍हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्या उपक्रमासंदर्भात  जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच आधार कार्डच्या नोंदणी संदर्भात माहिती दिली. बॅकेत खाते उघडण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतींना सर्व ग्रामस्थांना सूचना देण्यात येऊन पंचायत समिती स्‍तरावर बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठी  शिबीर आयोजित करुन 31 डिसेंबरपूर्वी सर्वांचे खाते बॅंकेत उघडा, अशा सूचना यावेळी त्यांना दिल्यात.
            जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाढे,
 उप जिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव, समाजकल्‍याण विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त, शिक्षणाधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍ह्यातील राष्‍ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनाच मिळाव  यासाठी राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये खाते काढण्याची  मोहीम जिल्ह्यात  राबवितांना आधारकार्डाच्या आधारावर  सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी बचत खाते उघडावे, अशी सूचनाही  यावेळी देण्यात  आल्यात.
            आधार नोंदणी व राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते उघडण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने  आणि जिल्‍ह्यातील  राष्ट्रीयकृत बॅकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रिय  सचिव  अपूर्व चंद्रा  यांनी अभिनंदन केले.  वेळेपूर्वी जिल्‍ह्याचे उद्दिष्‍ट पूर्ण होईल, अशी  अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
            ग्रामीण व शहरी भागातील गरीब लाभार्थ्‍यांना केंद्र व राज्‍य पुरस्‍कृत योजनेचा लाभ थेट बचत खात्यात  देण्याच्या उपक्रमामुळे वंचितांना लाभ देण्यास सहाय्य होणार आहे. जनतेनेही या योजनेत सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही  यावेळी  जिल्हाधिकारी एन. नविन सोना यांनी केले.
विद्यार्थ्यांना बॅंकेमार्फत शिष्यवृती
            महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या  सर्व योजनांचा लाभ तसेच शिष्यवृत्ती बॅंकांमार्फतच देण्यात याव्यात , अशा सूचनाही अपूर्व चंद्रा यांनी यावेळी दिल्यात.
प्रास्‍तविक व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्‍हाधिकारी  सुनिल गाढे यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व बॅकेचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                               000 0000

Thursday 20 December 2012


राष्ट्रीयकृत बॅकांनी लाभार्थ्यांची खाती तातडीने उघडावी -आनंद पाटील



            वर्धा ,दिनांक 20 : केंद्र व राज्य पुरस्कृत असलेल्या योजनेतील अनुदान थेट संबंधित लाभार्थ्यांनाच मिळावे  यासाठी राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये खाते काढण्याची  मोहीम जिल्ह्यात  यापूर्वीपासून सुरु होती. वर्धा जिल्हा हा प्रायोगिक तत्वावर  (plot project)  घेतला असून ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही बॅकेत खाते उघडले  नाही अशा लाभार्थ्यांसाठी  युद्धपातळीवर मोहीम राबवून शुन्य रकमेवर बॅकेत खाते उघडण्याचे निर्देश  केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक आनंद पाटील  यांनी बॅकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
            काल विकास  भवनामध्ये बॅंकेच्या अधिकाऱ्यांची व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बॅकेत खाते उघडण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.नविन सोना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, निवासी उपजिल्हाधिकारी गाडे, अग्रणी बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मशानकर व इतर बॅकेचे वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.
            वर्धा जिल्ह्याने अल्पावधीतच खाते उघडण्याचे काम बॅकांनी चांगले केल्याची प्रशंसा करुन संचालक आनंद पाटील म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील गरीबांना न्याय देण्याची अपूर्व अशी संधी वर्धाकरांसाठी चालून आली आहे. त्या संधीचे निश्चितच चांगले परिणाम येत्या चार ते पाच दिवसात दिसून  येतील अशी आशा व्यक्त करुन ते म्हणाले की, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही बॅंकेत खाते उघडले नाही. अश्या  लाभार्थ्यांना भेटून  योजनेचे गांर्भिय सांगून खाते उघडण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात बॅकेत खाते उघडणाचे सुमारे  90 टक्के काम झाले असून अजूनही सुमारे 10 टक्के काम शिल्लक  आहे. हे काम अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी येथील  जिल्हा प्रशासन  संपूर्णपणे सहकार्य करतील . लाभार्थ्यांनी काढलेले बॅंके खात्यामध्ये आधार कार्डक्रमांकाची नोंद घेण्यात यावी. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बनलेले नाही अशा लाभार्थ्यांचे बॅंकेमध्ये  खाते शुन्य रकमेवर उघडण्यात यावे . यावेळी  शिष्यवृत्ती मिळणाऱ्या  विद्यार्थ्यांचे बॅंकखाते तसेच  जननी सुरक्षा  योजना लाभार्थ्यांचे  बँक खाते तातडीने उघडावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.  यावेळी बँक अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करुन गरीब लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
            यावेळी जिल्हाधिकारी सोना यांनी बॅकेत खाते उघडण्यासाठी केलेल्या प्रगतीचे सादरीकरण केले. तसेच आधार कार्डच्या प्रगती विषयी माहिती सांगितली. येत्या चार पाच दिवसांमध्ये बॅकेत खाते उघडण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश  यावेळी दिले.
याप्रसंगी जिल्ह्यातील बॅंकनिहाय आढावा बॅकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी,  जिल्हा शल्य चिकित्सक व महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची माहिती सादर  केली.
यावेळी जिल्ह्यातील सर्व बॅकेचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                               000 0000

Tuesday 18 December 2012

आधार ओळखपत्र वेबसाईटवरुनही घेता येईल महा ई-सेवा केंद्र, सेतूमध्ये सुविधा



   वर्धा दि.18   आधार नोंदणीमध्ये संपूर्ण राज्यात वर्धा जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले असून सुमारे 86 टक्के जनतेची आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. आधार कार्ड नोंदणी झाल्यानंतर पोष्टाव्दारे आधार ओळखपत्रा घरपोच पाठविण्यात येते. परंतू ज्यांना अद्याप ओळखपत्र प्राप्त झाले नाही त्यांना शासनाच्या वेबसाईवरुन आधार पत्राची प्रत उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज दिली.
आधार नोंदणीसाठी विशिष्ठ ओळखपत्र प्राधिकरण तयार करण्यात आले असून स्वतंत्र पोर्टलही सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरुन नोंदणी केलेल्या नागरिकांना आधार ओळखपत्राची प्रत छापून घेता येईल. यासाठी caadhaar.uidai.gov.in  वर लॉगईन  करुन आधार पत्राची प्रत छापता येईल. या विशिष्ठ ओळख प्राधिकरणाकडून डिजिटल स्वाक्षरीही करण्यात आली  असल्यामुळे याचा उपयोग आधार ओळखपत्र म्हणूनही होणार आहे. नियमितपणे पोष्टाव्दारे आधार ओळखपत्र प्राप्त होईपर्यंत वेबसाईटवरुन उपलब्ध झालेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आधार पत्र मिळविण्यासाठी इंटरनेट तसेच प्रिंटरची सुविधा असल्यास महाराष्ट्र शासनाच्या युआयडीएआय च्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. परंतू ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही त्यांना केवळ दोन रुपये भरुन महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र  तसेच संग्राम केंद्रावर आधार पत्राची प्रत उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एन नवीन सोना यांनी दिली.
00000

संत गाडगे बाबा मिशनव्दारे विदर्भातील गरीब रुग्णांसाठी मुंबईत निवारा



·         गरीब रुग्णांना निवास व भोजनाची सुविधा
·        मुंबईत मिशनच्या तीन धर्मशाळांव्दारे विदर्भ व मराठवाड्यातील रुग्णांना निवास  सुविधा

वर्धा, दि. 18   अत्यंत दुर्धर आजारावरील उपचारांसाठी रुग्णासह नातेवाईकांना मुंबईसारख्या महानगरामध्ये निवास व भोजनाची सोय व्हावी, यासाठी संत गाडगे बाबा मिशनव्दारे तीन धर्मशाळा सुरु करण्यात आल्या असून या धर्मशाळेमध्ये कर्करोगासह इतर आजारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था अत्यंत अल्प दरात करुन संत गाडगे बाबांच्या कार्याचा वसा सातत्याने सुरु ठेवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुंबई येथील मफतलाल मोहनलाल धर्मशाळा तसेच संत गाडगे बाबा धर्मशाळा दादर येथे बांधण्यात आली आहे. या सर्व धर्मशाळेचे व्यवस्थापन अमोल एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
विदर्भातून अत्यंत दुर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी बहुतांश रुग्ण मुंबईला जातात. मुंबई येथील निवास व भोजनाची अत्यंत खर्चिक व्यवस्था असल्यामुळे संत गाडगे बाबा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन एकनाथ ठाकूर यांनी धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेतला.
संत गाडगे बाबा यांनी  1956 मध्ये जे.जे. हॉस्पीटलला भेट दिली असता येथील रुग्णांची व्यथा बघून  रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची व्यवस्था तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार मफतलाल मेहता यांनी जागा मिळवून बांधकाम पूर्ण केले. यासाठी लोकवर्गर्णीतून 3 कोटी 80 लाख रुपये गोळा करुन जी. टी. हॉस्पीटलच्या शेजारी  प्रशस्त ईमारत बांधली. त्यासोबतच प्रशासनाकडून दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकनाथ ठाकूर यांनी रुग्णांच्या नातेवाईकासाठी प्रशस्त धर्मशाळा बांधली.
विदर्भ तसेच मराठवाड्यातूनही मुंबईला औषधोपचारासाठी तसेच शस्त्राक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जे.जे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी तिसरी धर्मशाळा बांधली. आज तीनही धर्मशाळा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या सेवेत असून अमोल ठाकूर निस्पृहपणे संत गाडगे बाबा धर्मशाळेचे व्यवस्थापन चालवित आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवास व भोजन उपलब्ध होत असून वाशीम येथील मधुसुदन अग्रवाल यांनीही रुग्णांच्या नातेवाईकासाठी विशेष सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था केली असून मागील तीन वर्षापासून ती अविरतपणे सुरु आहे. प्रवीण वानखडे यांच्यासारखे निस्वार्थ सेवा देणारे गाडगे महाराजांचे भक्तगण रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.
गाडगे बाबा यांनी आयुष्यभर दीन दुबळ्यांची तसेच रुग्णांची सेवा केली. हीच सेवा अखंडपणे सुरु रहावी यासाठी गाडगे महाराज मिशनचा प्रयत्न असून विदर्भातील रुग्णांना दादर, भायखळा व जे.जे. रुग्णालयाच्या परिसरातील धर्मशाळा आपल्या हक्काचे स्थान म्हणून परिचित झाले आहे. लाखो रुग्णांचे नातेवाईक उपचारादरम्यान येथे वास्तव्याला असतात. त्यांची संपूर्ण जबाबदारी संत गाडगे बाबा मिशनव्दारे घेतली जाते.
00000

ग्रामपंचायत निवडणूकी निमित्त आठवडी बाजार बंद



वर्धा, दि. 18   जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूक व चार ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीसाठी रविवार दिनांक 23 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
          ग्रामपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी संबंधित गावात आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सुविधेनुसार आठवडी बाजार मतदानाचा दिवस वगळून भरविण्यासंबंधी सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केली आहे.
00000

Monday 17 December 2012

अनुसूचित जातीच्‍या बेरोजगारासाठी उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन


      वर्धा दि.17- महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्राच्‍या वतीने जिल्‍हा उद्योग केंद्र आणि जिल्‍हा समाजकल्‍याण कार्यालयाच्‍या संयुक्‍त विद्यमाने  उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन  दिनांक 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सेवाग्राम येथील यात्री विहारात आयोजित केले आहे.
         उद्योजकता विकास शिबीरामध्‍ये स्‍वतःचा उद्योग किंवा व्‍यवसाय करण्‍यासाठी इच्‍छुक असणा-या अनुसूचित जातीच्‍या बेरोजगांरासाठी प्रशिक्षण विनामुल्‍य असणार आहे.
लाभार्थ्‍यांसाठी स्‍वतःचा उद्योग किंवा व्‍यवसाय करण्‍यासाठी पूर्व तयारी व मानसिक तयारी सिध्‍दी प्रेरणा प्रशिक्षण,विविध उद्योग किंवा व्‍यवसायाच्‍या संधी उदाः प्‍लास्टिक उद्योग,कृषि उत्‍पन्‍नावर आधारित उद्योग,रासायनिक उद्योग, पशुसंवर्धानावर आधारित,स्‍टेशनरी उद्योग,खाद्य व फळ प्रक्रिया उद्योग,पिण्‍याचे पाणी इत्‍यादि तसेच भांडवल उभारणी व शासनाच्‍या विविध कर्ज योजना, र्मोटिंग,प्रकल्‍प अहवाल,बँकेची कार्यपध्‍दती या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
        प्रशिक्षणासाठी उमेदवार वर्धा जिल्‍ह्याचा रहिवासी असून किमान आठवा वर्ग पास व 19 ते 40 वर्षे वयोगटातील अनुसूचित जातीतील सुशि‍क्षित बेरोजगार असावा. तसेच उद्योगाची प्रखर आवड असावी. प्रशिक्षण निवासी असल्‍यामुळे लाभार्थ्‍यास प्रशिक्षणस्‍थळी रहावे लागेल.
        इच्‍छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी 19 डिसेंबर,2012 पर्यंत उद्योजकता विकास केंद्र,व्‍दारा- जिलहा उद्योग केंद्र,वर्धा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्‍यक्षात संपर्क साधावा किंवा 9850326431,0712-244123 या दूरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक व महाराष्‍ट्र उद्योजकता  विकास केंद्राचे प्रकल्‍प अधिकारी यांनी केले आहे.
00000

वर्धा जिल्‍ह्यात 37 कलम लागू



वर्धा दि.17- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हादंडाधिकारी एन.नविन सोना यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 लागू करण्‍यात आले आहे.
          या कलमाचा अंमल दिनांक 21 डिसेंबर,2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल,असे आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
00000

वर्धा जिल्‍ह्यात 36 कलम लागू



वर्धा दि.17- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहण्‍यासाठी प्र.जिल्‍हा पोलिस अधिक्षक टी.एस.गेडाम  यांनी 21 डिसेंबर,2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36  पोटकलम  अ ते फ पर्यंतचा आदेश जारी केला आहे.
          या आदेशाचा भंग करणा-या विक्‍तीविरुध्‍द मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्‍वये कारवाईस पात्र राहील.
00000

Saturday 15 December 2012

तुषार व ठिंबक सिंचन संच अनुदान रकमेत वाढ


* अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतक-यांसाठी 60 टक्‍के
      * बहुभूधारक शेतक-यांसाठी 50 टक्‍के
      * ऑनलाईन ई-ठिंबक व्‍दारे प्रस्‍ताव सादर करण्‍याची सुविधा               
वर्धा दि.15- राष्‍ट्रीय सूक्ष्‍म सिंचन अभियान सन 2012-13 मध्‍ये तुषार व ठिंबक सिंचन संचाच्या अनुदानासाठीचे शेतक-यांचे प्रस्‍ताव संगणक प्रणालीव्‍दारे (ऑनलाईन ई-ठिबक) www.mahaagri.gov.in या वेबसाईटव्‍दारे  स्वीकारले जातील.
तुषार व ठिंबक सिंचन पध्‍दती पाणी वापरामुळे 50 ते 60 टक्‍के पाण्‍याची बचत होते.सिंचन पद्धतीमुळे लोडशेडींग असतांना देखील कमी वेळेत,अधिक क्षेत्राला एकसमान पाणी देता येते.या पध्‍दतीमुळे विद्राव्‍य खतांचा कार्यक्षम वापर करता येतो.मजुर व वेळेची बचत होते. पिकाची जामाने वाढ होत,पाणी वापर क्षमता वाढविण्‍यासाठी ठिंबक व तुषार  सिंचनाचा वापर करणे गरजेचे आहे.
जिल्‍ह्यास दिलेल्‍या उद्दिष्‍टानुसार ऑनलाईन अर्ज केलेल्‍या शेतकऱ्यांना तालुक्‍यातील  क्रमवारीनुसार तालुका कृषी अधिकारी यांनी संमती दिल्‍यानंतर शेतक-यांच्‍या पसंतीप्रमाणे नोंदणीकृत कंपनीच्‍या वितरकाकडून सूक्ष्‍म सिंचन संच बसविता येईल. संच बसविल्‍यानंतर लाभार्थी शेतक-याला अनुदानासाठीचा प्रस्‍ताव  तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावा लागेल. सदर प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी हे मंडळ कृषी अधिका-यांकडून मोक्‍का तपासणी करुण घेतील. मोक्‍का तपासणी  मंजुरीची नोंद संगणक आज्ञावलीमध्‍ये तालुकास्‍तरावर करण्‍यात येऊन प्रस्‍तावाची छानणी व परिगणना करुन ऑनलाईन प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी हे उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडे सादर करतील.
            उपविभागीय कृषी अधिकारी सदर प्रस्‍तावास त्‍यांच्‍या स्‍तरावर मंजुरी देऊन अनुदान अदा करण्‍यासाठी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे सादर करतील. अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक लाभार्थी शेतक-यासाठी 60 टक्‍के व बहुभूधारक शेतक-यासाठी 50 टक्‍के अनुदान लाभार्थी शेतकऱ्याच्‍या बँक खात्‍यात जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिका-यांमार्फत जमा करण्‍यात येईल.
सन 2012-13 या वर्षामध्‍ये विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमातंर्गत (viidp) या योजनेत सूक्ष्‍म सिंचन हा घटक असून तुषार सिंचन पध्‍दतीसाठी अर्थसहाय्य  2 हेक्‍टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्‍टरी एकूण किंमतीच्‍या 50 टक्‍के (इतर शेतकरी) व एकूण किंमतीच्‍या 75 टक्‍के अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतक-याकरीता वैयक्‍तीक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्‍था या बाबींचा लाभ घेऊ शकतो.
ठिंबक सिंचन पध्‍दतीसाठी अर्थसहाय्य 2 हेक्‍टर क्षेत्रापर्यंत प्रतिहेक्‍टरी एकूण किंमतीच्‍या 50 टक्‍के (इतर शेतकरी) व किंमतीच्‍या 75 टक्‍के अल्‍प व अत्‍यल्‍प,मागास भूधारक शेतकऱ्याकरिता  वैयक्‍तीक शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी सहकारी संस्‍थाही याबाबीचा लाभ घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी आपले गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाडे यांनी केले आहे.
000000

शेतक-यांसाठी रब्‍बी हंगामात राष्‍ट्रीय कृषी विमा योजना



वर्धा दि.15- वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये 2012-13 साठी रब्‍बी हंगामात राष्‍ट्रीय कृषी विमा योजना राबविण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यातील आठही  तालुक्‍यामधील 92 महसूल मंडळे त्‍यासाठी  अधिसूचित करण्‍यात आलेली आहे. महसूल मंडळाची यादी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
  या योजनेत सहभागी होण्‍याची अंतीम मुदत पिकाची पेरणी झाल्‍यापासून एक महिना किंवा जास्‍तीत जास्‍त 31 डिसेंबर,2012 राहील. या योजनेत  कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतील.
  योजनेच्‍या मार्गदर्शक सूचना व प्रपत्र सर्व बँकामध्‍ये उपलब्‍ध आहे. या योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी घ्‍यावा,असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाडे यांनी केले आहे.
                                                           000000       

अपंग लाभार्थ्‍यांनी कल्‍याणकारी योजनेचा लाभ घ्यावा


            
वर्धा दि.15-   जिल्‍हा समाज कल्‍याण विभाग, जिल्‍हा परिषद यांचे मार्फत ग्रामीण भागातील अपंग लाभार्थ्‍यांसाठी अपंग कल्‍याणकारी योजना  राबविण्‍यात येत असून या योजनेचा लाभ जिल्‍ह्यातील अपंग लाभार्थ्‍यांनी घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.
अपंग विवाहीत जोडप्‍यांना प्रोत्‍साहनपर आर्थिक सहाय्य, अपंगाकरिता पिको फॉल शिलाई मशिनसाठी  अर्थसहाय्य, तिनचाकी सायकल, श्रवणयंत्र  आणि अपंगाचे रोगनिदान तथा शस्‍त्रक्रिया इत्‍यादिसाठी अर्थसहाय्य देण्‍यात येते. असून इच्छूक अपंग लाभार्थ्‍यांनी   तालुक्‍याच्‍या पंचायत समितीत 31 डिसेंबर अखेर पर्यंत अर्ज सादर करावेत.  
                                         00000             

Friday 14 December 2012

एक व्‍यक्‍ती एक आधार क्रमांक एक बँक योजना यशस्‍वी करा -जयंत कुमार बॉंठिया



         * निराधारांना आधार मुळे थेट घरपोच रक्‍कम
         * आधार नोंदणीमध्‍ये वर्धा जिल्‍ह्याची आघाडी
         * जिल्‍ह्यात 86 टक्‍के आधारची नोंदणी     
         * योजनांचा लाभ आता थेट बचतखात्‍यात
वर्धा दि.14- आधार नोंदणीमध्‍ये संपूर्ण देशात वर्धा जिल्‍ह्याने उल्‍लेखनिय कार्य केले असून शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्‍यांच्‍या बचत खात्‍यात जमा करणे सुलभ झाले आहे. जिल्‍ह्यात एक व्‍यक्‍ती  एक आधार क्रमांक व एक बँक ही योजना यशस्‍वी करुन गरजू व निराधारांना योजनांचा लाभ थेट बँकेमार्फत पोहचविण्‍यासाठी  सहकार्य करुन जिल्‍ह्यात  ही योजना यशस्‍वी करा अशा सूचना मुख्‍य सचिव जयंत कुमार बॉंठिया यांनी आज येथे दिल्‍यात.
          सेलू येथील तहसिल कार्यालयाच्‍या सभागृहात आधार नोंदणी व त्‍याआधारे विविध 32 योजनांचा लाभ थेट लाभार्थ्‍यांच्‍या बचत खात्‍यात जमा करण्‍याच्‍या प्रक्रियेची माहिती तसेच लाभार्थ्‍यांना थेट बचतखात्‍यात अनुदान जमा करण्‍याच्‍या योजनेची पाहणी  मुख्‍य सचिव श्री.बॉठिया यांनी केली त्‍याप्रसंगी अधिका-यांना मार्गदर्शन करतांना  ते बोलत होते.
          संजय गांधी निराधार योजने अंतर्गत घोराड येथील श्रीमती सुमन माधव भांदककर (वय 65) या निराधार महिलेला बँक ऑफ इंडियाच्‍या बिजनेस अभिकर्त्‍यामार्फत आधार नोंदणी क्रमांकाच्‍या आधारे अनुदान राशिचे वितरण करण्‍यात आले. आधार नोंदणी क्रमांकाव्‍दारे थेट लाभार्थ्‍यांना अनुदान योजनेच्‍या यशस्‍वीतेबद्दल मुख्‍य सचिवांनी जिल्‍हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.
          यावेळी अन्‍न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव डॉ. भगवान सहाय,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, एस.एस. संधु ,आधारचे महासंचालक डॉ.ए.बी.पांडे, जिल्‍ह्याच्‍या संपर्क सचिव व प्रधान सचिव डॉ. श्रीमती मालिनी शंकर,सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभागाचे सचिव आर.डी.शिंदे माहिती व तंत्रज्ञान सचिव  राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्‍त व्‍ही.बी. गोपाल रेड्डी ,जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना, सामाजिक सहाय्य विभागाचे संचालक श्री.गायकवाड, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यावेळी उपस्थित होते.
          आधार नोंदणीमध्‍ये वर्धा जिल्‍ह्यात 86 टक्‍के तर सेलू तालुक्‍यामध्‍ये 90 टक्‍के नागरिकांना आधार नोंदणी क्रमांक देण्‍याचे काम पूर्ण झाले असल्‍यामुळे मुख्‍य सचिवांनी जिल्‍हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन करतांना सांगितले की, जिल्‍ह्यातील सर्व गावे शंभर टक्‍के नोंदणी करुन प्रत्‍येक लाभार्थ्‍यांना आधार नोंदणी व बचत खात्‍यामार्फतच योजनांचा लाभ देण्‍यासाठी बँकांनी सहकार्य करावे. बँकेत बचतखाते उघडतांना आधार ओळखपत्र ग्राह्य धरुन सर्व महिलांचे तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नागरिकांचे बचत खाते उघडावे अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी दिल्‍या. ही योजना यशस्‍वी करण्‍यासाठी बँकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्‍यांनी केले.
          विद्यार्थ्‍यांना यापुढे सर्व शिष्‍यवृत्‍ती अथवा शैक्षणिक अनुदान बँकेमार्फतच देण्‍यात यावे यासाठी प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांना आधार नोंदणी व बचत खाते उघडण्‍यासाठी शाळा व महाविद्यालयामध्‍ये विशेष शिबीर आयोजित करावे अशा सूचनाही यावेळी देण्‍यात आल्‍या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत निराधारांना व अपंगांना त्‍यांच्‍या घरापर्यंत अनुदान राशी पोहचविण्‍यासाठी बिजनेस करसपॉन्‍डन नियुक्‍त करावे अशी सूचनाही त्‍यांनी यावेळी दिली.
         वर्धा जिल्‍हा आधार नोंदणीच्‍या उत्‍कृष्‍ट कार्यामुळे केंद्रशासनाने देशात थेट अनुदान वाटपासाठी पायलट जिल्‍हा म्‍हणून जाहिर केल्‍यामुळे विविध योजनांच्‍या लाभार्थ्‍यांची माहिती डाटाबेसव्‍दारे एकत्र करुण विविध राष्‍ट्रीयकृत बँकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी. तसेच आधार नोंदणी क्रमांकानुसार प्रत्‍येक गावनिहाय लाभार्थ्‍यांना थेट अनुदान प्रक्रिया सुरु करावी अशा सूचनाही यावेळी मुख्‍य सचिवांनी दिल्‍या.
         सामाजिक सहाय्याच्‍या योजनासोबत महात्‍मा गांधी ग्रा‍मीण रोजगार हमी योजना सारर्वजनिक वितरणप्रणालीव्‍दारे केरोसिन तसेच गॅसचे वाटप ई-स्‍कॉलरशिप,योतक-यांना रासायनिक खतांचा पुरवठा तसेच विविध अनुदान वाटपाच्‍या योजनांचाही आढावा यावेळी मुख्‍य सचिव जयंत कुमार बॉंठिया यांनी घेतला.
         प्रारंभी जिलहाधिकारी एन.नवीन सोना यांनी स्‍वागत करुन आधार नोंदणी तसेच लाभार्थ्‍यांना थेट अनुदानवाटपाबाबतच्‍या वर्धा जिल्‍ह्यातील  कार्याची माहिती दिली.
         वर्धा जिल्‍ह्यात 12 लाख 99 हजार 592 लोकसंखेपैकी 10 लाख 54 हजार 743 आधार नोंदणी पूर्ण झाली असून सुमारे 9 लाख 3 हजार 755 व्‍यक्‍तींचे विविध राष्‍ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडण्‍यात आले आहेत.सार्वजनिक वितरण प्रणालीव्‍दारे वितरीत करण्‍यात आलेले रेशन कार्डाचे शंभर टक्‍के संगणकिकरण पूर्ण झाले आहे.
        यावेळी राष्‍ट्रीयकृत बँकांचे वरिष्‍ठ अधिकारी आधार नोंदणी संदर्भातील सर्व प्रमुख अधिकारी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री.गाडे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक,उमेश काळे,सुनिल कोरडे,सेलूचे तहसिलदार गावीत,लिड बँकेचे महाव्‍यवस्‍थापक,व ,सर्व महसूल विभागाचे अधिकारी विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
000000

क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री श्री.पद्माकर वळवी रविवारी वर्धेत


         वर्धा दि.14- राज्‍याचे क्रीडा व युवक कल्‍याण मंत्री श्री. पद्माकर वळवी रविवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता नागपूर येथून शासकीय विश्रामगृह वर्धा  येथे आगमण व राखीव.
मंत्रीमहोदय सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथून नारायणराव चिडाम प्रेरणास्‍थळ,कारला चौक येथे वर्धा जिल्‍हा  संयुक्‍त आदिवासी कृती समितीतर्फे आयोजित विदर्भस्‍तरीय वर-वधु परिचय मेळाव्‍यास उपस्थित राहतील.व 11 वाजता कारला चौक,वर्धा येथून मोटारीने पुलगांव,चांदूररेल्‍वे मार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील.
00000

अनु.जाती,जमाती आयोगाचे सदस्‍य श्री.सी.एल.थूल रविवारी वर्धेत



वर्धा दि.14- महाराष्‍ट्र राज्‍य अनु.जाती,जमाती आयोगाचे सदस्‍य श्री. सी. एल. थूल यांचे दिनांक 16 डिसेंबर रोजी मुंबई येथून विदर्भ एक्‍सप्रेसने सकाळी  7 वाजता विश्राम गृह वर्धा येथे आगमण.
सकाळी 11 ते 4 पर्यंत मागासवर्गीय संस्‍थांनी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात उपस्थिती व सामाजिक न्‍याय विभागातील योजनांची माहिती व  चर्चा व संध्‍याकाळी सोईनुसार मुंबईकडे प्रयाण करतील.
0000

Thursday 13 December 2012

मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया आज वर्धेत आधार शीड बँकेचे उद्घाटन



वर्धा, दि. 13  :   मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांचे शुक्रवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता नागपूर येथून मोटारीने आगमन होईल. त्यानंतर सेवाग्राम आश्रमाला भेट देतील.
सकाळी 10.30 वाजता मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया यांच्याहस्ते आधारशीड बँकचे उद्घाटन होईल. सकाळी 11 वाजता आधार नोंदणीबाबत आढावा घेतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता सेलू येथे आधार योजनेद्वारा एन.एस.ए.पी. लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे वितरण करतील व दुपारी 1.45 वाजता नागपूरसाठी प्रयाण करतील
                                                     * * * * * 

वाळू घाटचा लिलावासाठी ई-टेंडरींग



वर्धा, दि. 13  :  रेतीघाटचा लिलाव ई-निविदाद्वारे करण्यात येणार असून निविदा प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या तंत्राटदारांना वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. निविदा धारकाला http://maharashtra.etenders.in या संकेत स्थळावरुन ऑन लाईन निविदा खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलावासाठी सन 2012-13 करिता दिनांक 31 जुलै 13 पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदाद्वारे शासनाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच wardha.nic.in या संकेतस्थळावरही रेतीघाट लिलावासंबंधीची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ई-निविदेचा नमुना, प्रतिज्ञापत्र, रेतीघाटांची यादी, अटी व शर्ती, 2 हजार रुपयाचा ना परतावा ई-पेमेंट अथवा ऑनलाईन पेमेंटद्वारे खरेदी प्रक्रियेत सहभागी होता येईल. ज्या कंत्राटदाराकडे ई-पेमेंटची सुविधा नाही त्यांनी 31 डिसेंबर रोजी खनिकर्म शाखेत 2 हजार रुपयाचा चालान किंवा डीडीद्वारे जमा केल्यास ऑनलाईन निविदा खरेदी करता येईल.
ई-निविदा प्रक्रियेसंबंधी माहिती करुन देण्यासाठी 15 डिसेंबर रोजी सकाळी 12 ते 2 वाजेपर्यंत विकास भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नविन सोना यांनी दिली.
                                    * * * * * 

रोजगार व स्‍वयंरोजगार अभ्‍यासक्रमासाठी व्‍यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाकडे अर्ज सादर करावे


वर्धा दि.13- महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाच्‍या मार्फत 1136 इतके अभ्‍यासक्रम राबविले जातात.हे अभ्‍यासक्रम चालविण्‍यास सन 2012-14 करिता इच्‍छुक संस्‍थाकडून अर्ज मागविण्‍याची प्रक्रिया सुरु असून इच्‍छुक संस्‍थांनी नियमित शुल्‍कासह 31 डिसेंबर,2012 पर्यंत व विलंब शुल्‍कासह 31 जानेवारी,2013 पर्यंत जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय,वर्धा येथे विहित शुल्‍क व डिपॉझिटसह सादर करणे आवश्‍यक आहे.संबंधित अर्ज व माहिती पुस्तिका मंडळाच्‍या संकेतस्‍थळावर (www.msbve.gov.in) उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे.इच्‍छुक संस्‍थांनी अर्ज संकेतस्‍थळावरुन डाऊनलोड करुन त्‍याची प्रिंट काढून परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्‍यांसोबत आवश्‍यक ते कागदपत्र चलान (अर्ज रक्‍कम व प्रक्रिया शुल्‍क रकमेचे) धनादेश, सहा महिने,एकवर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमासाठी रुपये 1 लक्ष व दोन वर्षाच्‍या कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमासाठी रुपये 2 लक्ष प्रति अभ्‍यासक्रम विहिती कालावधीत जमा करावयाचे आहे.
            मंडळाचे वरील अभ्‍यासक्रम 29 गटात विभागले असून त्‍यापैकी संगणक गटात डाटा एन्‍टी ऑपरेटर,ग्राफीक मिडीया अॅनीमेशन,सी अॅन्‍ड सी अधिक थ्री डी अॅनिमेशन प्राडक्‍शन इत्‍यादि,पॅरामेडीकल गटात-वार्ड असिस्‍टंट,हॉस्‍पीटल रीसेपशन योगा थेपपीस, हॉस्पिटल हाऊस किपींग इत्‍यादि तांत्रीक गट इलेक्‍ट्रानिक्‍स,इलेक्टिक
मेकम्‍निकल,सिवहील,अॅग्रीकल्‍चर,अॅटोमोबाईल, केमीकल इत्‍यादि अतांत्रीक गटात फुड अॅन्‍ड न्‍युट्रेशन, हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरींग टेक्‍नॉलॉजी इत्‍यादि गटात महत्‍वपूर्ण अभ्‍यासक्रम असून प्रत्‍येक गटात काही पूर्ण वेळ तर काही अर्धवेळ अभ्‍यासक्रम आहेत. वरील अभ्‍यासक्रमासंदर्भात अलिकडेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या उच्‍च व तंत्र शिक्षण विभागाने महत्‍वाचे निर्णय घेतलेले आहे.
            एकवर्ष व दोन वर्ष कालावधीच्‍या पूर्ण वेळ अभ्‍यासक्रमांना औ.प्र. संस्‍थामधील संबंधीत अभ्‍यासक्रमाशी नोकरीसाठी पर्यायी शैक्षणिक अर्हता म्‍हणून निश्चित करण्‍यात आली. दोन वर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमांना व 10 वी प्रवेश पात्रता असलेल्‍या पूर्ण वेळ अभ्‍यासक्रमांना  2 स्‍तराची समकक्षता म्‍हणून मान्‍यता देण्‍यात आली आहे.राज्‍यातील उच्‍च माध्‍यमिक मंडळाकडून इयत्‍ता 12(सर्व विद्या शाखा) उत्‍तीर्ण विद्यारूर्थ्‍यांसाठी देण्‍यात येणा-या प्रमाणपत्राशी समतुल्‍य राहील.अधिक माहितीसाठी व्‍यक्‍तीशः जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,वर्धा अथवा दूरध्‍वनी क्र. 243443 यांचेशी संपर्क साधावा.
000000

महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन मंडळाच्‍या चालक क पदाचा निकाल घोषित


         वर्धा दि.13- महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन मंडळाच्‍या चालक क पदाचा निकाल घोषित झाल्‍यानुसार संबंधित उमेदवारांनी विभागीय पातळीवरील प्राथमिक चालक छाननिकरीता दिनांक 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर,2012 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन मंडळ,विभागीय कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र सेवाग्राम रोड येथे उपस्थित रहावे.मुलाखत पत्राबाबत एम.के.सी.एल. या संस्‍थेच्‍या http//msrtc.mkcl.org.संकेत स्‍थळावरुन उपलब्‍ध करुन घेण्‍यात यावे असे विभाग नियंत्रक एम.व्‍ही.देव यांनी कळविले आहे.  
00000

स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून डिसेंबर 2012 चे शिधावस्‍तूचे वाटप


      वर्धा, दि.13- जिल्ह्यातील सर्व कौटुंबिक शिधा पत्रिका धारकांना माहे   डिसेंबर  2012 महिण्याकरीता स्वस्त धान्य दुकानातून शिधा वस्तु वाटपाचे परिणाम पुढील प्रमाणे निश्चीत करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष  धान्य साठा साखरेच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येईल.पाम तेल (खाद्य तेल) प्रतिशिधापत्रिका दरमहा 1 लिटर 45  प्रति लिटर या दराने वितरीत करण्‍यात येईल.
            दारिद्र्य  रेषेखालील लाभार्थी बीपीएल कार्ड धारकांना 20 किलो गहू प्रतीकिलो 5 रु. दराने, तांदूळ 15 किलो, अतिरिक्‍त तांदूळ 5 किलो प्रतीकिलो 6 रु. दराने, साखर प्रत व्यक्ती 500 ग्राम, अतिरिक्‍त प्रति व्‍यक्‍ती 160 ग्रॅम  13.50  रुपये प्रती किलो दराने मिळेल.
 अंत्योदय कार्ड    धारकांना  20 किलो गहू 2 रु. प्रती किलो दराने, 15किलो तांदुळ , अतिरीक्‍त 5 किलो तांदूळ प्रती किलो   3 रु. दराने, प्रती व्यक्ती 500 ग्राम साखर, अतिरिक्‍त प्रति व्‍यक्‍ती 160 ग्रॅम साखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळेल.  
 अन्नपूर्णा कार्ड धारकांना 5 किलो गहू 5 किलो तांदूळ विनामुल्य दराने मिळेल. एपीएल कार्ड    धारकांना 10 किलो गहु 7.20 रुपये दराने, 5 किलो तांदूळ 9.60 रुपये   दराने मिळेल.
            तालुकानिहाय खापरी डेपोतून वितरीत झालेल्या केरोसीनचे किरकोळ विक्री दर प्रत लिटरचे दर कंसाबाहेर दिले असून, बोरखेडी डेपोतून वितरीत होणारे केरोसीनचे दर कंसामध्ये पुढील प्रमाणे दर्शविण्यात आले आहे.
            वर्धा 14.89 (14.82),देवळी 15.15 (15.12), सेलू 15.01 (14.63),आर्वी 15.08(15.03),आष्टी 15.29 (15.33),कारंजा 15.18 (15.30),हिंगणघाट 15.09(14.99),समुद्रपूर 14.83 (14.74) आहे.
            नगर परिषद क्षेत्रामध्‍ये केरोसीन  प्रत व्यक्ती 2 लिटर प्रमाणे जास्तीत जास्त 20 लिटर,  ग्रामीण भागात 2 लिटर प्रमाणे जास्‍तीत जास्‍त 15  लिटर  तसेच 1 सिलेंडर धारकाला 4 लिटर केरोसिनचे उपलब्‍धतेनुसार वाटप करण्‍यात येईल. 2 सिलेंडर धारकांना केरासिन देय नाही.असे  जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                                      00000