Friday 5 February 2016

कर्करोग जनजागृती सप्ताहाला सुरूवात
तपासणी शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन
              वर्धा, दि. 5 –  राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा, उपजिल्हा , ग्रामीण रुग्णालयात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. डी. मडावी यांनी केले आहे.
               जागतिक कर्करोग जनजागृती  सप्‍ताहाचे उद्घाटन आज जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, अति. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. एन.बी.राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमात जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी डॉ. गोपाल लांडगे, डॉ. एच.बी. खुबनानी, डॉ. मिना हिवलेकर, डॉ. भावना भोयर व जिल्‍हा रुग्‍णालय येथील कर्मचारी उपस्थित होते. तपासणी शिबिर 11 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
                रुग्‍णालय परिसरात तंबाखूजन्‍य पदार्थाचे सेवन करणार नाही व इतराना करु देणार नाही याची शपथ जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्या उपस्थितीत सर्वांनी घेतली.  कर्करोगाची 147 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच  एकूण व्हीआए तपासणी 27, संशयित गर्भाशय कर्करोग रुग्‍ण 3, संशयित स्‍तन कर्करोग रुग्‍ण 1, संशयित तोंडाचा कर्करोग रुग्‍णाची तपासणी करण्यात आली.
    तपासणी शिबिरामध्ये  कर्करोगाविषयी समुपदेशन, 30 वर्षावरील व्‍यक्‍तीना कर्करोगाविषयी माहिती, कर्करोगाची कारणे, त्‍यामुळे होणा-या गुंतागुंती या बद्दल लोकांना शास्‍त्रीय माहितीच्‍या आधारे मार्गदर्शन करण्‍यात येतआहे.  जिल्‍ह्यातील विविध आरोग्‍य संस्‍थांतर्गत जनजगृती शिबिर, धुम्रपान विरोधी दिनानिमित्त, गरोदर मातांसाठी रक्‍तदाब तपासणी आदी शिबिरे आयोजित करण्‍यात येणार आहे. सदर शिबिरादरम्यान त्‍यांना रक्‍तदाबाविषयी  माहिती देण्‍यात येणार आहे. आरोग्‍यदायक सवयी, आरोग्‍य जीवन जगण्‍याबाबतची माहिती देण्‍यात येणार आहे. परिपूर्ण व आरोग्‍यदायी आहाराविषयी माहिती देण्‍यात येणार आहे. शिबिरादरम्‍यान निश्चित झालेल्‍या रुगणांना मोफत औषधोपचार देण्‍यात येणार आहे. शिबिरादरम्‍यान निश्चित निदान झालेल्‍या रुग्‍णांना गुंतागुंत आढळल्‍यास त्‍यांना योग्‍य त्‍या वैद्यकीय तपसण्‍याकरुन आवश्‍यकता असल्‍यास संदर्भित करण्‍यात येणार आहे.  
          एनसीडी कार्यक्रमांतर्गत जिल्‍हा सामान्‍य रुग्णालयात  रुग्णालयाची मोफत वैद्यकीय तपासणी, वेगवेगळ्या विषयावर मोफत समुपदेशन, रुग्‍णांची निर्मिती क्षमता घडवून आणण्‍यासाठी प्रयत्‍न करणे, गृहभेटीद्वारा रुग्‍णांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणे, संदर्भ सेवा देणे, समुपदेशनाच्‍या माध्‍यमातून त्‍यांना आरोगयदायी पर्याय स्वीकारण्‍यास सूचविणे, काय खावे- किती खावे याचे महत्‍त्‍व समजावून सांगणे, तंबाखू,मद्यपान,अहितकारी,  आहार यांच्‍याविरुद्ध समुदायाला एकत्र आणणे. घरातच असणा-या, बिछान्‍याला खिळलेल्‍या वयस्‍कर व्‍यक्‍तीसांठी दक्षता आणि निगा पुरवण्‍यासाठी स्‍थानिक भेटी, आरोग्‍यदायी अवस्‍थेत वृद्धावस्‍थेशी निगडीत आरोग्‍य शिक्षण, उच्‍च जोखमी असलेल्‍या व्‍यक्तिंना वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे किंवा रुग्‍णालयामध्‍ये पाठविण्‍यासाठी आधार देणे या सुविधा देण्यात येतात, असेही सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी सांगितले. 
                                                              0000000               
              

             
लघु उद्योजकांनी जिल्‍हा पुरस्‍कारासाठी
22 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
       वर्धा दि. 5- महाराष्‍ट्र राज्‍य उद्योग संचालनालयामार्फत लघु उद्योजकांसाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा पुरस्‍कार योजना दरवर्षी राबविण्‍यात येते. सन 2015 या वर्षात वर्धा जिल्‍ह्यात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या उत्‍कृष्‍ट लघु उद्योजकांकरिता ही योजना राबविण्‍यात येत आहे. विहित नमुन्‍यात दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत जिल्‍ह्यातील सर्व लघु उद्योजकांनी अर्ज करावा. विहित नमुन्‍यातील अर्ज जिल्‍हा उद्योग केंद्र, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
      या योजनेचा मुख्‍य उद्देश नवीन लघु उद्योजकांना प्रेरणा व उत्‍साह निर्माण करुन उद्योजकाच्‍या आवश्‍यक गुणाचा विकास करणे हा आहे.  या योजने अंतर्गत जिल्‍हास्‍तरावर दोन पात्र उद्योजकांची निवड करण्‍यात येईल, याकरीता प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
          प्रथम पुरस्‍कार रु. 15 हजार रुपयांच्या नगदी रक्‍कमेसह मानचिन्‍ह, द्वितीय पुरस्‍कार     रु.10 हजार रुपये नगदी रक्‍कमेसह मानचिन्‍ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उद्योजकांना स्‍थायी लघु उद्योग नोंदणी  दिनांक 31 डिंसेबर 2011 किंवा त्‍यापूर्वी मिळाली आहे व ज्‍याचे उत्‍पादन सतत दोन वर्षांपासून चालू आहे, अशांनाच या योजनेचा लाभ देता येईल.
          ज्‍या लघु उद्योजकांना पूर्वी जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळालेला आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदार लघु उद्योजक कोणत्‍याही बँकेचा थकबाकीदार नसावा,असेही कळविण्यात आले आहे.
0000000


प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करण्याचे व्रत अंगीकारा
- रामदास तडस
Ø  इपिलेप्सी शिबिराचे जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उद्घाटन
          वर्धा,दि.4-  वैद्यकीय सेवा देताना सर्वप्रथम रुग्‍णसेवा ही ईश्‍वर सेवा आहे, लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्‍यामुळे रुग्‍णांची सेवा प्रामाणिकपणे करुन हे व्रत अंगीकारावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.  जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत मुंबईच्या इपिलेप्‍सी फाऊंडेशनच्या संयुक्‍त विद्यमाने इपिलेप्‍सी  शिबिर पार पडले. यावेळी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते.
            शिबिराचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्‍याहस्‍ते झाले. कार्यक्रमाला आरोग्‍य विभागाचे सभापती मिलिंद भेंडे, नगराध्‍यक्ष त्रिवेणी कुत्‍तरमारे, आरोग्य विभागाचे नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्‍वाल, जिल्‍हा शल्य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, अस्थिरोग तज्‍ज्ञ डॉ. अनुपम हिवलेकर, विभाग प्रकल्प व्यवस्थापक डॉ. मनीष नंदनवार, एनएचएम व इपिलेप्‍सी फाऊंडेशनचे डॉ. सूर्या उपस्थित होते.
            डॉ. सुर्या यांनी इपिलेप्‍सी विषयी सविस्‍तर माहिती दिली. रुग्‍णांना मिरगी आल्‍यास बुवाबाजी न करता डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्‍याचे आवाहन केले. आरोग्‍य सभापती श्री. भेंडे यांनी इपिलेप्‍सी कॅम्‍प आयोजित केल्‍याबद्दल आरोग्‍य विभागाचे आभार मानले.   डॉ. पुरुषोत्‍तम मडावी यांनी सामान्‍य रुगणालयात असलेल्‍या सर्व विभागाची माहिती दिली. जननी सुरक्षा योजना अर्श आयुष्‍य , एनआरसी ट्रामा केअर युनिट, डायलिसीस युनिट, क्ष किरण विभाग याविषयी देखील त्‍यांनी माहिती दिली. सोबत शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी प्रेरणा प्रकल्‍प राबविण्‍यात येत असून आतापर्यत 3455 शेतक-याना बाह्यरुग्‍ण विभागामध्‍ये तर 41 रुग्‍णांना आंतररुग्‍ण विभागामध्‍ये सेवा देण्‍यात आल्‍याचे प्रास्‍ताविकात सांगितले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरीता रुग्‍णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंद  तसेच एनसीसी कॅडेट, परिचारिका प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थिंनी यांचे सहकार्य लाभले. संचालक मॅसन यांनी केले. आभार डॉ. निवृत्‍ती राठोड यांनी मानले.
                 शिबिरात एकूण 402 रुग्‍णांना मुंबईच्‍या डॉक्‍टरांचा सल्‍ला व उपचार देण्‍यात आला. यामध्‍ये 145 पुरुष, 69 स्‍त्री, 112 लहान मुले, 76 लहान मुलींची तपासणी करण्‍यात आली. 45 जणांची इसीजी व 17 रुग्‍णांचे सीटीस्‍कॅन करण्‍यात आले. या शिबिरात वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती  येथील रुग्‍णांची तपासणी करण्यात आली.
                                                                    000000
>



                                 महात्‍मा फुले महामंडळाकडून कर्जाची
परतफेड करणा-या लाभार्थीचा सत्‍कार

                वर्धा,दि.4-  महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या) वर्धाकडून  व्‍यवसायाकरीता कर्ज घेऊन कर्जाची नियमित परतफेड करणा-या जोत्‍सना उरकुडे रा. हिंगणी ता. सेलू, सविता उरकुडे, रा. हिंगणी ता. सेलू,  प्रिती टेंभरे, रा. दहेगाव (गो.) ता. सेलू  आणि शरद ताकसांडे रा. मु. पो. सेवाग्राम, ता.जि. वर्धा यांचा प्रजासत्‍ताकदिनी जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांच्‍याहस्‍ते पारितोषिक व प्रोत्‍साहन प्रमाणपत्र देऊन सत्‍कार करण्‍यात आला.  
                                                                              0000
पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड आवश्यक
– मोहन गुजरकर
          वर्धा,दि.4 - पर्यावरणावर दिवसेंदिवस ताण वाढल्‍याने पर्यावरणाचा समतोल साधण्‍यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाचे आहे. त्‍यासाठी सर्वांनी स‍हकार्य करण्‍याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी छोट्या, छोट्या उपायांची  मोठी मदत होणार, असे प्रतिपादन जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले.
               जिल्‍हास्‍तरीय वक्‍तृत्‍व,निबंध अणि चित्रकला स्‍पर्धांच्‍या पुरस्‍कार समांरभात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. जिल्‍ह्यातील सर्व प्राथमिक,माध्‍यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्‍ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाविषयीचे जाणीव जागृती व्‍हावी. सामाजिक वनीकरण विभागाच्‍या वृक्ष लागवड,पडित जमीन विकास, जल संवर्धन कार्यक्रमात त्‍यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्‍हास्‍तरीय निबंध,चित्रकला व वकृत्‍व स्‍पर्धांमध्‍ये विजयी ठरलेल्‍या स्‍पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्‍यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवासी येथे आयोजन करण्यात आले होते.
              निबंध स्‍पर्धकांसाठी विद्यार्थ्‍यांचे विद्यालयीन व महाविद्यालयीन असे दोन गट करण्‍यात आले. माध्‍यमिक गटासाठी ‘स्‍वच्‍छता अभियानात माझी भूमिका’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल’ असे विषय ठरवून देण्‍यात आले होते. चित्रकला स्‍पर्धा अंतर्गत प्राथमिक गटासाठी ‘मी पाहिलेला जंगलातील प्राणी’ माध्‍यमिक गटासाठी ‘माझी हरीत शाळा’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘बदलेल्‍या ऋतू चक्राचे परिणाम’ विषय होते. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेकरीता माधमिक गटांना ‘पर्यावरण स्‍नेही जीवनशैली’ आणि म‍हाविद्यालयीन गटासाठी ‘जल प्रदुषणाची समस्‍या व त्‍यावरील उपाय’ विषय देण्‍यात आले होते. निबंध व चित्रकला स्‍पर्धा शाळा,महाविद्यालयीन पातळीवर घेण्‍यात आली.  वक्तृत्व स्‍पर्धा प्रथम तालुका पातळीवर आयोजित करुन प्रत्‍येक गटातील प्रथम व व्दितीय क्रमांकाचे विद्यार्थ्‍यांना जिल्‍हापातळीवर बोलावून त्‍यांची वक्‍तृत्‍व स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली. वक्तृत्व स्‍पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजन व दीप प्रज्‍वलनाने करण्‍यात आली. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक पी.एच.बडगे यांच्याहस्ते करण्‍यात आले. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेकरीता विद्यालयीन गटात 13 व महाविद्यालयीन गटात 8 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्‍येक गटात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी विजेत्‍यांची निवड करण्‍यात आली.
             निबंध लेखनाचे प्रवेशिकांचे परीक्षण सुरेखा दुबे, रितेश निमसडे, चित्रकला स्‍पर्धेतील प्रवेशिकांचे परिक्षण सुनील रहाटे,श्रीमती वैशाली वा. सावंत, राजेंद्र लांजेवार यांनी केले. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेच्‍यावेळी परीक्षक म्‍हणून डॉ.प्रवीण वानखडे व श्रीमती डॉ. सुनिता भोईकर, सुषमा पाखरे यांनी केले.
             कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक पी.एच. बडगे यांनी केले. आभार बी.डी. खडतकर यांनी मानले. के. वाय.तळवेकर, व्‍ही.डी. गभणे, शीतल ए.राठोड, बी.जी.राठोड, बी.बी. फटांगरे, श्रीमती शिला काबंळे, ए.आर. कावळे, ए.बी. वंजारी, मधुकर गायकवाड, रुपचंद चोपडे आदींनी पुढाकार घेतला.
                                                                      000000  

Thursday 4 February 2016

कुष्ठरोग निवारण मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत
कुष्ठरोग जनजागृती रॅलीने मोहिमेची सुरूवात
          वर्धा,दि.3  जिल्‍ह्यात कुष्‍ठरोग निवारण मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्‍यात येत आहे. या कालावधीत वर्धा शहरात कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, नर्सिंग स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांद्वारे गृहभेटीद्वारे संशयित कुष्‍ठरोग शोध मोहीम, ग्रामीण भागात आशा सेविका, आरोग्‍य कर्मचारी व स्‍वयंसेवक यांच्‍यामार्फत संशयित कृष्‍ठरोग शोध  मोहीम राबविण्‍यात येत आहे. तसेच प्रश्‍नमंजुषा, रॅली पथनाट्याद्वारे मोठ्याप्रमाणात जनजागृतीही करण्‍यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सांगितले आहे.
           जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय येथून   सामान्‍य रुग्‍णालय बजाज चौक, सोशालिस्‍ट चौक ते म‍हादेव वॉर्ड, मस्जिद चौकमार्गे राष्‍ट्रीय  निवारण दिन व तालुका कुष्‍ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत कुष्‍ठरोग जनजगृती रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप सहाय्यक संचालक (कुष्‍ठरोग) कार्यालय, वर्धा येथे करण्‍यात आला. रॅलीला आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण, अति. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.निवृत्‍ती राठोड, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, सहाय्यक संचालक डॉ.लक्षदीप पारेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.
               रॅलीत प्रामुख्‍याने अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनुमप हिवलेकर, जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे, साथरोग अधिकारी डॉ. विलास आकरे, साथरोग तज्ज्ञ डॉ.झलके, जिल्‍हा विस्‍तार व माध्‍यम अधिकारी श्री. रहाटे, प्राचार्य इशरत खान, श्रीमती व्‍ही.एस.मने, प्रा. किशोर ढोबळे, प्रा. सुनील तोतडे, प्रा.पुनम येसंबरे, प्रा. पोटदुखे, प्रा. भगत, बाबाराव कनेर, त्रिशरण रंगारी, सिद्धार्थ तेलतुबंडे, स्‍वप्‍नील चव्‍हाण, दीपक कांबळे, रंगराव राठोड, कुणाल डोंगरे व आरोग्‍य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कुष्‍ठरोग रॅलीमध्‍ये शहरातील मौलाना आझाद हायस्‍कूल व कनिष्‍ठ महाविद्याल वर्धा,  मॉडेल हायस्‍कूल, चेतना नर्सिंग स्‍कूल, शासकीय शाळा, कुंभलकर सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांचा सहभाग होता.


                                                       0000000                

                                        उपचाराने होतो क्षयरोग हमखास बरा
                             -         डॉ. निवृत्ती राठोड
          वर्धा, दिनांक 3     क्षयरोग देशातील महत्त्वाची व गंभीर सार्वजनिक आरोग्‍य समस्‍या आहे. क्षयरोगाकरीता सहा ते आठ महिने औषधोपचार घ्‍यावा लागतो. क्षयरुग्‍णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास हा रोग हमखास बरा होतो, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले.
          समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती व्‍हावी या उद्देशाने सुधारीत राष्‍ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्‍हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्षय रोग नियंत्रण अधिकारी डॉ. अजय डवले यांनीही मार्गदर्शन केले.
         अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले,   क्षयरोगामुळे रुग्‍णास कमजोरी येते. त्‍यांचा परिणाम त्‍यांच्‍या मानसिक धैर्य कमी होऊन औषधोपचारात खंड पडण्‍यास होते. औषधोपचारात खंड पडल्यामुळे, कोणत्‍याही औषधाला दाद न देणारा क्षयरोग (एमडीआर) होतो. एड्स व मधुमेह या आजारात रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होत असल्‍याने अशा रुग्‍णांना क्षयरोगाची बाधा होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेतल्यास ते पूर्णपणे रोगमुक्‍त होतील व त्‍यांच्‍या मनोधैर्यात वाढ होईल या करिता आपणा सर्वांच्‍या सामुहिक प्रयत्‍नांची गरज आहे.  क्षयरोगाविषयी जास्‍तीत जास्‍त जनजागृतीचा होणेही गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.  
          संपूर्ण जिल्‍हात क्षयरोगाविषयी शाळा, कॉलेज स्‍तरावर क्षयरोगाविषयावर, घोषवाक्‍य, निबंध स्‍पर्धचे आयोजन करण्‍यात येणार आहे. अशी माहिती, डॉ. अजय डवले यांनी आपले भाषणात व्‍यक्‍त केले.  क्षयरोगाविषयी समाजात असणारे गैरसमज व शासनामार्फत पुरविले जाणारे सुविधा, मोफत निदान व औषधोपचार यांच्‍याविषयी समाजात जनजागृती करण्‍याचा प्रयत्न या माध्‍यमातून करण्‍यात येत असल्याचेही डॉ. डवले यांनी सांगितले.
           सदर कार्यक्रमामध्‍ये जिल्‍हा क्षयरोग कार्यालयाचे जिल्‍हा पी.पी.एम समन्‍वयक जितेंद्र बाखडे यांनीही क्षयरोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. त्‍याचप्रमाणे नर्सिंग स्कूलच्‍या अधिकारी जे. एस. मॅसन व प्राध्‍यापक व्ही.एम.भांबरे, अधिसेविका श्रीमती फुनसे व जिल्‍हा क्षयरोग केंद्राचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या यशस्वीतेसाठी जितेंद्र बाखडे, नितीन जगताप, अमित दुबे, अख्‍तर शेख, संजीव शेळके, संजय सोनटक्‍के यांनी पुढाकार घेतला.
                                                  00000
                                टकळीवर सूतकताईतून विद्यार्थ्यांनी केली
17 मीटर कापडाची निर्मिती
Ø  जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतूक
              वर्धा, दि.3 –  पूर्वी टकळीवर सूतकताई शाळांमध्‍ये शिकविली जात. पण कालांतराने हा प्रकार बंद झाला. पण मगन संग्रहालयाने नव्‍याने ही मोहिम सुरु केली. त्यामुळे स्‍वतः धागा निर्मितीचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. मगन संग्रहालय समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्‍यात येतात. यामध्ये टकळीवर सूतकताई हा विशेष उपक्रम. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्‍यात आलेल्या या उपक्रमातून 17 मीटर कापड्याच्‍या वस्‍तूचे यंदा प्रजास्‍ताक दिनी विक्रीप्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
           जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देत या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
                  चालू वर्षात शहरातील सुशिल हिंमतसिंगका कन्‍या शाळा, आनंद विद्यालय बोरगाव मेघे, विकास विद्यालय, जगजीवनराम  विद्यालय  या शाळांमधील 70 विद्यार्थी व त्‍याचबरोबर जिल्‍ह्यातील नेहरु विद्या मंदिर सालोड, यशंवत विद्यालय येळाकेळी, आदर्श विद्यालय आंजी, विवेक माध्‍यमिक विद्यालय, मांडवा आदी ग्रामीण भागातील 96 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्‍यांनी टकळीवर सूत लावून त्‍यापासून कापड निर्मिती केली. या कापडापासून रुमाल व इतरही वस्‍तू तयार करुन त्‍याची विक्री व प्रदर्शनी वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात प्रजास्‍ताक दिनानिमित्त भरविण्‍यात आले होते. यावेळी टकळीवर सूत कताईचे प्रात्‍यक्षिक उपस्थितांना विद्यार्थी करून दाखवत असल्याने सर्वांचे ते लक्ष वेधून घेत होते.
तीन वर्षापासून हा टकळीवर धागानिर्मिती उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्‍ये 2013 मध्‍ये वर्धा शहरातील 6 शाळांमधील 152 विद्यार्थी सहभागी झाले. होते. ऑगस्‍ट ते डिसेंबर महिन्‍यापर्यंत कताई सुरु होती. यात विद्यार्थ्‍यांनी 7 मीटर कपडा तयार केला होता. तर 2014  या वर्षामध्ये या उपक्रमांतर्गत सहभागी 6 शाळांच्‍या 210 विद्यार्थ्‍यांनी 300 गुंड्या टकळीवरील सूतांनी तयार करुन त्याचे 14 बाय 14 इंचाचे 50 रूमाल तयार केले. या उपक्रमात आतापर्यंत मगन संग्रहालयाकडून 6 हजार पेळू पुरविण्यात आलेले आहेत, त्याचा 17 मीटर कपडा तयार करण्यात आलेला आहे.
                                                             0000000     
     अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
          वर्धा, दिनांक 3 व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणारे विविध अभ्‍यासक्रम माध्‍यमिक शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालयामध्‍ये सुरु करण्‍यास मान्‍यता मिळविण्‍यासाठी इच्‍छुक संस्‍थांकडून नवीन, अधिकच्‍या तुकड्या कायमस्‍वरूपी विना अनुदान तत्वावर सुरु करू इच्छिणा-या शैक्षणिक संस्‍थांकडून सन 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज 15 मार्चपर्यंत सादर करावेत, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.
          संचालनालयांतर्गत राबविण्‍यात येणा-या विविध योजना व त्‍यांतर्गत राबविण्‍यात येणारे अभ्‍यासक्रम तसेच अधिक दोन स्‍तरावरील विज्ञान, कला  वाणिज्‍य या शाखांकरीता शाखानिहाय उपलब्‍ध असलेल्‍या द्विलक्षी व्‍यवसाय अभ्‍यासक्रमाचा तपशील आदी माहिती दर्शविणारी माहिती पुस्तिका व अर्ज संचालनालयाच्या www.dvet.gov.in  या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध असून संबंधित संस्‍थांनी डाउनलोड करुन घ्‍यावा.
            सदरील अर्ज जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे जमा करतेवेळी रु. 500 चा राष्‍ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नागपूर यांचे नावे असलेल्या प्रस्‍तावासोबत जोडावयाचा आहे. प्रस्‍ताव शुल्‍क स्वतंत्र चलानद्वारे शासन जमा करावयाचे आहे. नियमितरित्‍या अर्ज स्वीकारण्‍याचा अंतिम दिनांक 15 मार्च असून विलंब शुल्‍कासह अर्ज दिनांक 31 मार्चपर्यंत स्वीकारले जातील.
             अधिक माहितीकरीता जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांचेशी संपर्क साधावा,असेही या कार्यालयाने कळविले आहे.  
000000

 पोलिस शिपाई भरतीची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
-         अंकित गोयल
          वर्धा, दिनांक 3 जिल्हा पोलिस अधीक्षक, वर्धा यांच्या आस्‍थापनेवरील पोलिस शिपाई यांची रिक्‍त असलेली पदे भरण्‍यासाठी आवेदन पत्र संगणकीय प्रणालीद्वारे भरण्‍यात येणार आहेत. याबद्दलची सविस्‍तर माहिती www.mahapolice.gov.inmahapolice. mahaonline.gov.in संकेतस्‍थळावर उमेदवाराच्‍या माहितीकरिता प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कळविले आहे.  
          उमेदवाराने पोलिस शिपाई/कारागृह शिपाई पदासाठी वेगवेगळे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. कारागृह विभागातील कारागृह शिपाई पदांची भरती प्रक्रिया पोलिस आयुक्‍त, नवी मुंबई, जिल्हा पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, पुणे ग्रामीण, नागपूर ग्रामीण या पोलिस घटकांमार्फत घेण्‍यात येईल.
          जाहिरातीमध्‍ये नमुद केलेल्‍या रिक्‍त पदांच्‍या संख्‍येमध्‍ये बदल होऊ शकतो व त्‍याची माहिती वेळोवेळी संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्‍यात येईल. जाहिरातीतील नमूद केलेल्‍या रिक्‍त पदांची संख्‍या पूर्ण पदे भरण्‍याबाबत शासन आदेशाच्‍या अधीन असेल. पदसंख्‍या कमी झाल्‍यास उमेदवारास निवडीबाबत कोणताही दावा करण्‍याचा हक्‍क राहणार नाही.
          पोलिस शिपाई व कारागृह शिपाई अशा दोन्‍ही पदांसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केल्‍यास दोन्‍ही पदांसाठी लागू परीक्षा शुल्‍क आकारण्‍यात येईल. उमेदवारांनी आवेदन अर्जात अचूक माहिती द्यावी. चुकीची माहिती दिल्‍यास, उमेदवारी कोणत्‍याही टप्‍यावर रद्द होईल,असेही त्यांनी कळविले आहे.
000000
       जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते
सेवाग्राम येथील नाला खोलीकरण, शेततळी कामाचे उद्घाटन
             वर्धा,दि.3 – सेवाग्राम गावातील मागील बाजूस असलेल्या नाला विस्तारीकरण, शेततळी, बांधबंदिस्तीच्या कामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सेवाग्रामच्या सरपंच रोशनाताई जामलेकर, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव श्रीराम जाधव, नई तालिम समितीचे डॉ. सुगन बरंठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, तहसीलदार राहुल सारंग, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक सोहम पंड्या, सुनील कोल्हे, सतीश फत्तेपुरे यांची उपस्थिती होती.
            प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याहस्ते पूजन करून कामाची सुरूवात करण्यात आली. कमलनयन बजाज फाऊंडेशनतर्फे हाती घेण्यात आलेल्या या कामाची सविस्तर माहिती कार्यक्रम व्यवस्थापक महेंद्र फाटे यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिली. यामध्ये त्यांनी या नाला सरळीकरण, खोलीकरण, 2 शेततळी, बांधबंदिस्तीच्या कामातून आजूबाजूच्या शेतीला पाण्याचा उपयोग होईल. पिकांनाही याचा लाभ होईल. तसेच पुरामुळे शेतात येणारे पाणी नाल्याच्या सरळीकरण व खोलीकरणामुळे वाहते होईल. शेतीत पाणी  न शिरल्याने पिकांचे नुकसानही होणार नाही, त्याचा शेतीला लाभ होईल, असे सांगितले. यावेळी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, आश्रमाचे कर्मचारी, पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती.
                                  0000
            शुल्क निर्मितीची ऑनलाईन सुविधा 10 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध
        वर्धा,दि.3 -  कनिष्‍ठ, व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांच्‍या महाविद्यालयांना सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्‍क निर्मित करण्‍याच्या ऑनलाईन प्रणालीची सुविधा 10 फेब्रुवारीपर्यंत उपलब्‍ध करुन दिली आहे. महाविद्यालयांनी मान्‍य शुल्क आपल्‍या लॉगिनमध्‍ये निर्मित करुन अद्ययावत करण्‍यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.  
      तरी महाविद्यालयांनी आपले शुल्क तत्काळ निर्मित करून या कार्यालयाकडून मंजूर करुन घ्यावे. सन 2015-16 मध्‍ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्‍यांचे ऑनलाईन अर्ज प्रवर्गनिहाय समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात तपासणीकरीता उपलब्‍ध करुन द्यावेत. अर्ज तापसणीनंतरच पात्र अर्ज या कार्यालयाचे लॉगिनवर पाठवावेत.त्रूटीतील अर्ज 31 मार्चनंतरच त्रूटीची पूर्तता करुन सादर करावेत. महाविद्यालयांनी डिजीटल स्वाक्षरी तयार करुन तसा अहवालही सादर करावा. त्‍यानंतरच सन 2015-16 वर्षाच्या शिष्‍यवृत्‍तीचे देयक काढण्‍यात येतील, असेही श्री. देशमुख यांनी कळविले आहे.
                                                                    000000
                        राजीव गांधी जीवनदायी योजना शेतक-यांसाठी जीवनदायी
                                                                     – रामदास तडस
Ø  राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजनेंतर्गत आरोग्‍य शिबिर
      वर्धा,दि.3 –  राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजना शेतक-यांसाठी जीवनदायी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्याचे आवाहन केले.
                 राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजनेंतर्गत देवळी ग्रामीण रुग्‍णालयात आरोग्‍य रोग निदान शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून नगराध्यक्ष शोभाताई तडस, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पी.डी.मडावी, अतिरिक्त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिदावात, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्‍हटकर, आचार्य विनोबा भावे  रुग्‍णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्‍युदय मेघे, डॉ. वांदिले, कस्‍तुरबा हॉस्पिटलच्या डॉ. पांडे उपस्थित होते. शिबिरात जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, आचार्य विनोबा भावे रुग्‍णालय, कस्‍तुरबा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून रुग्‍णांची तपासणी व उपचार करण्‍यात आले.
            जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पी.डी. मडावी यांनी सर्व योजना तळागापर्यंत पोहचल्या पाहिजेत व सर्वांना आरोग्‍य सेवा व योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे विचार मांडले. शिबिरामध्‍ये जनरल मेडिसिन, शल्‍य चिकित्‍सा, अस्थि, स्‍त्री, बाल, -हदय रोग या विभागांद्वारे एकूण 350 रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली. या शिबिरात एनसीडी, मानसिक, राष्‍ट्रीय बाल सुरक्षा विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
            शिबिराच्‍या यशस्‍वीतेसाठी जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक डॉ. पी.डी. मडावी,  अति.जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. चव्‍हाण, डॉ. प्रफुल मेश्राम, रितेश गुजरकर, जिल्‍हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल चाफले  यांनी पुढाकार घेतला.
                                                                   00000                       
प्र.प.क्र.82               युवा सप्‍ताहामध्ये विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
          वर्धा, दिनांक 3 –  राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताहात आयोजित  निबंध, वाद विवाद, चित्रकला, गीत गायन, तसेच मैदानी स्‍पर्धा, विविध महाविद्यालयांमध्‍ये घेण्‍यात आल्‍या. यामध्ये विविध कला प्रकार सादर करून विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून युवा सप्ताह साजरा केला . 
           क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्‍हा क्रीडा परिषद व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात राष्‍ट्रीय युवा दिन युवा सप्‍ताहाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्थानी क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय डॉ. मिलिंद सवाई, प्रा.श्री. भेले, प्रोफेसर श्रीमती विटनकर यांची उपस्थिती होती. यावेळी स्‍वामी विवेकानंदांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
            सप्‍ताहांतर्गत निबंध, वाद विवाद, चित्रकला, गीत गायन, तसेच मैदानी स्‍पर्धा, विविध महाविद्यालयांमध्‍ये घेण्‍यात आल्‍या. यामध्ये निबंध स्‍पर्धेत प्रथम क्रमांक हर्षदा सरोदे, द्वितीय क्रमांक सोनू मरकोटे यांनी प्राप्त केला. तर वादविवाद स्‍पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली कांबळे, द्वितीय प्रिया कांबळे, तृतीय प्रियंका होरे यांनी मिळवला. चित्रकला स्‍पर्धेत रेवती गुजरकर, द्वितीय रुतिक बोबडे, तृतीय शुभांगी गाडेकर यांनी क्रमांक पटकावून यश मिळविले. गीतगायन स्‍पर्धेत प्रथम क्रमांक माधवी ढोबळे, द्वितीय प्रांजली कुडकी, तृतीय आरती उईके यांनी क्रमांक पटकाविले आहेत. 100 मी. धावणे स्‍पर्धेत मुलीमध्ये प्रथम बुशरा, द्वितीय शिवाणी समुंदे, तृतीय रांची मोखाडे, मुलांमध्ये प्रथम तेजस कानतोडे, द्वितीय हेमंत वानखेडे, तृतीय दर्शन हस्‍ती यांनी क्रमांक पटकाविले. स्‍पर्धांमध्‍ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍त विजेत्‍यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्‍यात आले.  
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्‍यवस्‍थापक रवी काकडे यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी चारुदत्‍त नाकट यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास क्रीडा अधिकारी श्रीमती चैताली राऊत, क्रीडा अधिकारी घनश्‍याम वरारकर, व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी तसेच डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्‍यापक व कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
0000000
      
             कृषी यंत्र सामुग्री व उपकरण खरेदीसाठी शेतक-यांना अर्थसाहाय्य        
वर्धा,दि. 3 -  राष्‍ट्रीय कृषी विस्‍तार व तत्रंज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतक-यांना अर्थसहाय्य (अनुदान)  देण्‍यात येणार आहे.  इच्‍छुक शेतक-यांनी त्‍यांचे अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह त्वरीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.  
औजारे मागणी अर्ज, 7/12, 8 अ, आधार कार्ड फोटो, ओळख पत्राची स्वसांक्षांकित प्रत, रद्द केलेल्‍या धनादेशाची, बँक पासबुकच्‍या पहिल्‍या पृष्‍ठांची स्‍वस्‍वक्षाकिंत प्रत व महाराष्‍ट्र राज्‍य कृषी उघोग विकास महामंडळाचे कोटेशन जोडणे आवश्‍यक आहे.
कृषि यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रीलर, ट्रॅक्‍टर चलित औजारे आदी, मनुष्‍य ,प्राणी चलीत उपकरणे, पीक संरक्षण उपकरणे आदींसाठी अनुदान उपलब्‍ध आहे. अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, अल्‍प व अत्‍यल्‍प लाभधारक, महिला व इतर लाभार्थी शेतक-यांसाठी कमाल अनुदान मर्यादा निश्चित करण्‍यात आलेली आहे. कमाल अनुदान मर्यादेच्‍या अधिन राहून व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्‍प, अत्‍यल्‍प व महिला लाभधारकांसाठी 50 टक्‍के व इतर लाभार्थींसाठी 40 टक्‍के यापैकी जे अनुदान कमी आहे. ते लाभार्थीस देय राहील. निवड केलेल्‍या लाभधारकांनी पूर्व संमती प्राप्‍त झाल्‍यानंतर खरेदी करावयाच्‍या यंत्र व औजारांची संपूर्ण रक्‍कम विभागीय व्‍यवस्‍थापक महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे जमा करुन यंत्र व औजारांची खरेदी त्‍यांच्‍या पसंतीनुसार करावयाची आहे. खरेदी केलेल्‍या औजारांची तपासणी संयुक्‍त तपासणी पथकाद्वारे करण्‍यात येईल. तपासणीनंतरच लाभाधारकास अनुदान देय राहील,असेही त्यांनी कळविले आहे. तसेच याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध असून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
                                                      000000 
जिल्‍हास्‍तरीय समितीकडून 140 सावकारी कर्जमाफीचे प्रस्‍ताव मंजूर
         वर्धा,दि.4- जिल्‍ह्यामध्‍ये 4 हजार 624 कर्जमाफीचे प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले आहेत. 4 हजार 624 शेतक-यांना 5 कोटी 36 लाख 51 हजार 814 रुपयांची कर्जमाफी देण्‍यात आली आहे. मंगळवार, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जिल्‍ह्यातील सावकारी कर्जमाफीचे 140 प्रस्‍ताव जिल्‍हास्‍तरीय समितीद्वारे मंजूर करून शेतक-यांना 17 लक्ष 39 हजार 814 रुपयांची  कर्जमाफी देण्‍यात आली आहे, असे सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी कळविले आहे. 
          याबाबतची माहिती जिल्‍ह्याच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती प्रसिद्ध करण्‍यात आलेली आहे. जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या सभेसाठी निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर, सहकारी संस्‍थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू, जिल्‍हा विशेष लेखापरीक्षक वर्ग  श्री. चुटके, सहाय्यक निबंधक (प्रशासन) जयंत तलमले, सहाय्यक निबंधक श्री. वनस्‍कर, श्रीमती निनावे, श्री.वडे उपस्थित होते.
        या  संदर्भात जिल्‍ह्यातील काही पात्र शेतक-यांना अद्यापपर्यंत कर्जमाफी लाभ मिळाला नसला त्‍यांनी संबंधित तालुक्‍यातील सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयाशी  संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्‍हा उपनिबंधकांनी केले आहे.
                                                                 0000000        
                                                                
                                                                 
राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजनेंतर्गत
मंगळवारी मोफत आरोग्‍य शिबिर
           वर्धा,दि.4-  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मंगळवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मोफत तपासणी व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
           शिबिरामध्‍ये -हदय रोग, श्‍वसन रोग,बाल रोग, स्त्री रोग, अस्थिव्‍यंग,किडनी, पोटाचे आजार, मधुमेह व रक्‍तदाब या आजारांवर जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा, कस्‍तूरबा हॉस्पिटल, सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्‍णालय, सावंगी मेघे येथील तज्ञ चमूद्वारे मोफत तपासणी व उपचार करण्‍यात येईल. शिबिराचा जास्‍तीत जास्‍त लाभ जनेतने घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पी.डी.मडावी व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण यांनी केली आहे.

                                                                         000000          

Tuesday 2 February 2016

गावासाठी कृती विकास आराखडा तयार करा
                                                                            -  प्रमोदकुमार पवार
Ø माहिती अभियान कार्यशाळेचा समारोप
Ø जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
Ø  उत्‍कृष्‍ट ग्रामपंचायतींच्‍या कार्याचा गौरव
Ø  हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती
Ø
वर्धा,दि.02– गावांचा सर्वांगीन विकास शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातून होतो. सरपंच, ग्रामसेवकांनी या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी एककेंद्राभिमुखतेने त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार यांनी केले 
समुद्रपूर येथे पंचायत समिती सभागृहात जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने ‘योजना आपल्‍या द्वारी’ माहिती अभियान कार्यशाळा 2016 च्‍या समारोप कार्यक्रमाप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक श्रीपाद अपराजित यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती नंदाताई साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेसरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वहाने, गट विकास अधिकारी श्री. लोंढे, हिंगणघाटच्या गट विकास अधिकारी स्वाती इसाये, सर्व पंचायत समिती सदस्‍य यांची उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले, नांदेड जिल्ह्यामध्ये डासमुक्त गाव मोहीम अत्यंत उत्कृष्टपणे तेथील प्रशासन राबवित आहे. त्यामुळे तेथील गावांच्या आरोग्याची समस्या दूर होण्यास मदतच झाली आहे. हिवरे बाजार गावाने आपल्याला आदर्श गावाचे चित्र कृतीतून दाखविले आहे. असाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर दीर्घकालीन योजना राबवून गावातील उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांसह, सरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिका-यांनी  केंद्रासह राज्याच्या योजनांचा लाभ घ्यावा. या योजना एकत्रितपणे गावात राबवून लोकसंख्या, पाणी, आधुनिक शेती, कमी दरात अधिक उत्पादन याचा ध्यास घ्यावा. यासाठी कृती करावी.  गावाचा विकास करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. कौशल्य विकासावर आधारीत उद्योगाची निवड करावी. तसेच गावातील विकासाचा प्राधान्यक्रम ठरवून उत्पन्नवाढीचा विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  जलयुक्त शिवाराच्या कामांतही लोकसहभाग वाढावा या करीता प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले, एककेंद्राभिमुखता संस्कृतीतून विकास साधणे सोपे होते. शासकीय योजनांची गुंफन करून गावाच्या विकासावर प्रत्येकाने भर देणे महत्त्वाचे आहे. दूरदृष्टी ठेवून कार्य केल्यास योजनांचा लाभ दीर्घकाळापर्यंत मिळण्यास मदत होते. आदर्श संकल्पना आपल्या अवतीभोवतीच असतात, ती पाहण्याची, अनुभवण्याची आणि कृती करण्याची गरज आहे. कौशल्य आपल्यात आहे परंतु ते शोधता आले पाहिजे. शेती आहे त्याबरोबरच शेतीला पूरक व्यवसाय निवडून आर्थिकस्थैर्य, स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पद्धतशीरपणे नियोजन करायला हवे. नेमून दिलेल्या कामामध्ये आस्थेने सहभागी होणेही महत्त्वाचेच आहे, त्यासाठी सकारात्मकरित्या व नवदृष्टीने सहनशीलतेने आपली कार्ये पार पाडावीत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्या गावासाठी करून द्यावा व शाश्वत विकास साधण्यावर भर द्यावाअसेही ते म्हणाले.
पंचायत समिती सभापती नंदाताई साबळे यांनीही अभियानाचे कौतूक करून सरपंच आणि ग्रामसेवकांनी शासनाच्या योजनांचा लाभ गावा-गावातील लोकांना करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेसरे यांनी स्वच्छतेचा सर्वांनी संकल्प करून गावागावात शौचालयाची उभारणी करावी. त्याचे महत्त्व सर्वांना पटवून द्यावे, असे सांगितले.
            वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन म्हणाले, माहिती अभियान कार्यशाळेच्‍या माध्‍यमातून अनेक लोककल्‍याणच्‍या योजना लोकांपर्यंत पोहोचण्‍यास मदत होते. विविध ग्रामपंचायती चांगले नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून गावांचा विकास साधत आहेत. उमरी मेघे ग्रामपंचायतीने सातत्‍यपूर्णरित्‍या तीन वर्ष 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्‍यात यश मिळविलेले आहे. जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍यात येत आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवकच गावाचा कायपालट करु शकतात.              पाण्याचे योग्य नियोजन ही भविष्याची गरज असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य पाणी वापराचे नियोजन करणारे एकमेव राज्य असल्याचे सांगितले. तसेच वर्धा पॅटर्न, माथा ते पायथा या संकल्पनेवर जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
               जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी गवळाऊ गायी, त्यांचे संवर्धन, चारा पद्धती यावर सविस्तर माहिती सांगून शेतक-यांनी चारा पद्धतीचा अवलंब करून जनावरांचा चारा स्वत्:च्या शेतात पिकविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. जांगडा यांनी फसल विमा योजना, अटल पेंशन योजना, जनधन योजना आदी बाबींवर यावर प्रकाश टाकला.
                जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती  यांनी  कमी खर्चात शेती करण्याचे आवाहन शेतक-यांना करून याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले. शासनाच्या विविध कल्याणकारी व लोकोपयोगी अशा योजना आहेत. त्यांचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान, एकात्मिक पाणलोट क्षेत्र, महात्मा फुले जलसंधारण आदींसह शेती, शेतीसंबंधीत उपाययोजना, बी-बियाणे आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली. तसेच जलसंवर्धनासाठी सर्वांनी पुढे येऊन पाणी बचतीसाठी योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
            ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वहाने यांनीही प्रत्येकाने नळावर मीटर बसवावे. पाण्याचा सुयोग्य वापर करावा, असे सांगून 24 बाय 7 योजनेचे महत्त्व सांगितलेगटविकास अधिकारी श्रीमती इसाये यांनीही विचार मांडले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सूत्रसंचालन विनेश काकडे यांनी केले. आभार माहिती सहायक श्याम टरके यांनी मानले.
उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या कार्याचा गौरव
हिंगणघाट तालुक्यातील वणी , कौसुर्ला (मो.) आणि समुद्रपूर तालुक्यातील पिंपळगाव आणि गोविंदपूर या ग्रामपंचायतींनी गावामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्याहस्ते स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला  
0000