Saturday 1 September 2012

केरोसीनवरील थेट अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या बँक खात्‍यात


           
         * 30 सप्‍टेंबर पर्यंत बँकेत खाते उघडा
           * थेट अनुदान योजनेसाठी  वर्धा जिल्‍हयाचा समावेश
            वर्धा,दि.1-शिधापत्रिका धारकांना सबसीडीच्‍या आधारावर मिळणा-या केरोसीनवरील सबसीडी  थेट बँकेच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात येत असल्‍यामुळे केरोसीनकरीता  पात्र असलेल्‍या   सर्व शिधापत्रिका धारकांनी  30 सप्‍टेंबर पर्यंत राष्‍ट्रीयकृत अथवा वाणिज्‍य  बँकेत बचत खाते उघडावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज यांनी केले आहे.
केरोसीन वितरणातील  गैरव्‍यवहार दूर करण्‍यासाठी  उपाययोजने अंतर्गत केरोसीन मिळण्‍यास पात्र असणा-या सर्व शिधापत्रिका धारकांच्‍या थेट बँक खात्‍यात केरोसीनवरील  सबसीडी जमा करण्‍याची  योजना केन्‍द्र शासनाने पुरस्‍कृत  केली आहे.
जिल्‍ह्यात  केरोसीन मिळण्‍यास पात्र असलेल्‍या  2 लक्ष 35 हजार 939 शिधापत्रिका धारकांची संख्‍या असून, सर्व  केरोसीन मिळण्‍यास पात्र असणा-या शिधापत्रिका धारकांना बँकेत बचत खाते उघडणे अनिवार्य आहे.
 केरोसीनवरील थेट अनुदान जमा करण्‍याची  योजना  वर्धा जिल्‍ह्यासह अमरावती, पुणे, नंदूरबार व नाशिक या जिल्‍ह्यामध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात राबविण्‍यात येणार आहे. या योजने अंतर्गत  शिधावस्‍तू  मिळण्‍यास पात्र असणा-या सर्व शिधापत्रिका धारकांना त्‍यांच्‍या नावे राष्‍ट्रीयकृत बचत खाते उघडणे आवश्‍यक आहे. त्‍याशिवाय अनुदानाची रक्‍कम  जमा करणे शक्‍य होणार नाही . बचत खाते असल्‍याबाबतची नोंद संबधित  स्‍वस्‍त धान्‍य दुकानदाराकडे असणे आवश्‍यक आहे.
 केरोसीन करीता पात्र असलेल्‍या   सर्व शिधापत्रिका धारकांनी कुटूंबातील महिला सदस्‍यांच्‍या नावे  बँकेत बचत खाते उघडावे, ज्‍या पुरुष कुटूंबाचे बचत खाते  यापूर्वी  बँकेत असेल त्‍यांनी  पत्‍नीच्‍या नावासह संयुक्‍त खाते म्‍हणून परिवर्तीत करुन घ्‍यावे. ज्‍या शिधापत्रिका धारकांचे बँकेत बचत खाते नसेल त्‍यांनी  30 सप्‍टेंबर पूर्वी  बचत खाते उघडावे. पत्‍नी  हयात नसल्‍यास त्‍यांनी त्‍यांचे बचत खाते  कुटूंबातील वरिष्‍ठ महिला सदस्‍यासह संयुक्‍त खाते उघडावे.
30 सप्‍टेंबर पर्यंत बँकेत खाते उघडणार नाहीत त्‍यांना माहे ऑक्‍टोंबर पासून अनुदानीत केरोसीन मिळणार नाही. पर्यायाने केरोसीनवरील सबसीडी रक्‍कम मिळणार नाही. असेही जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी स्‍पष्‍ट केले आहे.
                                      000000
      

विविध योजनांचा लाभासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडा जिल्‍हाधिका-यांचे जनतेला आवाहन



      *  2 ऑक्‍टोंबर पर्यंत सर्व लाभधारकांचे बँकेत खाते
      *  1382 गावांमध्‍ये बँक खाते उघडण्‍यासाठी विशेष मोहिम
      *  संजय गांधी,श्रावण बाळ, केरोसीन,स्‍कॉलरशीप बँकेमार्फतच
      
          वर्धा,दि.1- शासनाच्‍या विविध योजनांच्‍या  लाभ  तसेच अनुदान यापुढे लाभधारकांच्‍या राष्‍ट्रीयकृत बँकेतील खात्‍यातच  जमा करण्‍यात येणार असल्‍यामुळे जिल्‍ह्यातील सर्व लाभधारकांनी  आपले बँक खाते गावातील राष्‍ट्रीयकृत बँकेत तात्‍काळ सुरु करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी  केले आहे.
          जिल्‍ह्यातील 18 वर्षे  पूर्ण झालेल्‍या सर्व  नागरिकांनी  आपले खाते बँकेत सुरु करण्‍याचे आवाहनही  जिल्‍हाधिका-यांनी  केले आहे. बँकेत खाते उघडण्‍यासाठी  जिल्‍ह्यातील सर्व  राष्‍ट्रीयकृत  व  वाणिज्‍य  बँकांना  सुचना देण्‍यात आल्‍या  आहेत.
          शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ तसेच स्‍कॉलरशीप, केरोसीन अनुदान यापुढे बँकेमार्फतच वितरीत करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असल्‍यामुळे  जिल्‍ह्यातील  सर्व  लाभधारकांनी  बँक खाते 2 ऑक्‍टोंबर पर्यंत उघडण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत सर्व राष्‍ट्रीयकृत बँकांना सुचना देण्‍यात आल्‍या असून, त्‍यानुसार  बँकेत खाते उघडण्‍यासाठी बँकामार्फत विशेष सुविधा सुरु करण्‍यात आली असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी दिली.
        राष्‍ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्‍यासाठी   लाभधारकांचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो , रहिवास प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे), निवडणूक व आधारकार्डच्‍या झेरॉक्‍स आवश्‍यक आहे. राष्‍ट्रीयकृत व वाणीज्‍य बँकेत खाते उघडण्‍यासाठी अंगणवाडी सेविका तसेच आशा  सेविका  प्रत्‍येक गावात मदतनीस म्‍हणून कार्य करणार आहेत. बँकेत खाते उघडण्‍यासाठी जिल्‍ह्यातील सर्व बँकांना सुचना देण्‍यात आल्‍या असून खाते उघडण्‍यासाठी  कुठलीही रक्‍कम जमा करण्‍याची  आवश्‍यकता नसून (शून्‍य बॅलन्‍स ) आधारीत बँकेत खाते उघडण्‍यात येणार आहे.
         शासकीय योजनांचा संपूर्ण लाभ बँकेमार्फतच देण्‍याची  योजना  राज्‍यातील सहा जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणार असून, यामध्‍ये वर्ध्‍यासह  अमरावती, नंदूरबार, पुणे, मुंबई शहर व उपनगर यांचा समावेश आहे. लाभधारकांचे बचत खाते  आधारकार्डाशी  संलग्‍न  राहणार आहे.
                              रविवारी प्रशिक्षण
         जिल्‍ह्यातील सर्व  योजनांच्‍या लाभासाठी  बँकखाते उघडण्‍याबाबत रविवार दिनांक 2 सप्‍टेंबर 2012 रोजी सकाळी 11 वाजता विकासभवन येथे सर्व राष्‍ट्रीयकृत बँकाचे  अधिकारी, सर्व महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी व संबधित  अधिका-यांची  कार्यशाळा  आयोजीत करण्‍यात आली आहे.  या कार्यशाळेमध्‍ये बँकेत खाते उघडण्‍यासंबधी  मार्गदर्शन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.  
                                                0000

Friday 31 August 2012

आजाराला निमंत्रण देणा-या डासाचा प्रतिबंध करा


     वर्धा,दि.31- डासामार्फत पसरणारे आजार हे किटकजन्‍य आजारामध्‍ये अंतर्भुत होतात. यामध्‍ये प्रामुख्‍याने हिवताप, डेंग्‍यूताप, मेंदुज्‍वर, चिकुनगुन्‍या या आजाराचा समावेश होत यावर्शी वातावरणातील बदल, अनियमितता व अपुरी पर्जन्‍यवृष्‍टी यामुळे किटकजन्‍य आजाराचा समावेश होतो. यावर्षी वातावरणातील बदल, अनियमितता व अपुरी पर्जन्‍यवृष्‍टी यामुळे किटकजन्‍य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याचे दिसून येत असल्‍याने जनतेनेही डासाचा प्रार्दुभाव कमी करण्‍यासाठी स्‍वयंस्‍फूर्तीने उपाययोजना कराव्‍यात असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. मिलींद माने यांनी केले आहे.
        मागील वर्षीच्‍या तुलनेत जर हिवतापाचे प्रमाण बघितले तर जानेवारी ते जुलै 2011 या कालावधीत हिवतापाचे एकूण 247 रुग्‍ण आढळून आले होते. यावर्षी जानेवारी ते जुलै 2012 या कालावधीत एकूण 260 रुग्‍ण आढळून आलेले आहेत.
     हिवतापाचा प्रादुर्भाव होण्‍याकरीता पोषक वातावरण, परिसर अस्‍वच्‍छता, स्‍थलांतर, शहरीकरण आदी परिसर अस्‍वच्‍छतेमुळे डासांची पैदास वाएते. शहरीकरणामुळे सगळीकडे नाल्‍या  बांधलेल्‍या आहेत परंतू नालया वाहत्‍या राहील्‍या पाहिजे. ज्‍या ठिकाणी पाणी तुबलेले राहील, तिथे डास उत्‍पत्‍ती स्‍थाने तयार होतात. पाण्‍याच्‍या अनियमित पुरवठ्यामुळे लोक पाणी साठवुन ठेवतात. घरगुती पाण्‍याचे साठे झाकून न ठेवल्‍यामुळे डासांची वाढ होते.
         यावर्षी नागव्‍दार (मध्‍यप्रदेश) येथे यात्रेला गेलेले यात्रेकरु परत आल्‍यानंतर आजारी पडण्‍याचे प्रमाण जास्‍त आहेत. यात्रेवरुन परत आलेला भाविक श्री. विठ्ठल महादेव यंत्रणेकडून संपुर्ण वर्धा जिल्‍ह्यातील गावामध्‍ये नागव्‍दारवरुन परतलेले यात्रेकरु यांचे सर्व्‍हेक्षण करुन 631 लोकांचे रक्‍तनमुने घेण्‍यात आले. त्‍यातील 11 रुग्‍ण हिवताप दुषित आढळले त्‍यांचेवर औषधोपचार करण्‍यात आला. यात्रेवरुन परतलेले यात्रेकरु काविळ सारख्‍या इतर आजारांनी आजारी होते. याबाबत सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषद यांना सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी जनतेनी काळजी घेणे आवश्‍यक आहे.
                   डासामार्फत पसरणा-या आजाराबाबत दक्षता
     रुग्‍णाला थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे,वर्तणुकीत बदल होणे,झाटके येणे व तात्‍काळ बेशुध्‍द पडणे अशी लक्षणे आढळून आल्‍यास,सदरहू रुग्‍णाला त्‍वरीत जवळच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रात अथवा ग्रामीण रुग्‍णालयात किंवा जिल्‍हा सामान्‍य रुगणालयात त्‍वरीत दाखल करावे.
     किटकजन्‍य आजाराचा प्रसार होण्‍याकरीता डास, सॅन्‍डफलॉय (माशी) किटक कारणीभुत आहे. हे किटक घरातील अंधा-या भागात, अडगळीच्‍या जागी भिंतीच्‍या भेगामध्‍ये गुरांच्‍या गोठ्यामध्‍ये आढळतात. तसेच किटकजन्‍य आजाराचे डास साचलेल्‍या  पाण्यामध्‍ये, घरगुती वापराचे पाण्‍याचे भांडे, यात तयार होतात. त्‍यामुळे आपल्‍या घराच्‍या सभोवतालच्‍या परिसरात प्रामुख्‍याने गुरांच्‍या गोठ्यात स्‍वच्‍छता ठेवणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. डासाचा प्रार्दूभाव टाळण्‍यासाठी संडासच्‍या व्‍हेंट पाईपला जाळ्या बसवाव्‍यात. घराजवळील शेणाचे खड्डे , कच-याचे उकिरडे लोक वस्‍तीपासून दूर अंतरावर नाल्‍या गटा-यात पाणी साचू देवू नये, गटारे नाल्‍या वाहाते करावे, तसेच साचलेल्‍या पाण्‍यात क्रुड ऑईल टाकावे.
      पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या साठवणूक करताना घरगुती वापरावयाचे पाण्‍याचे भांडे यामध्‍ये डासांचे अळ्या होवू नये याकरीता भांडे कोरडे करुन घासून पुसून स्‍वच्‍छ करणे व नंतर पाणी भरावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
     किटकजन्‍य आजारापासून बचावाकरीता झोपतांना मच्‍छरदाण्‍याचा वापर करावा.लहान मुलांना झोपतांना शरीराच्‍या जास्‍तीत जास्‍त भाग झाकला जाईल असे कपडे वापरावे व भिंतीपासून दूर झोपण्‍यासाठी व्‍यवस्‍था करावी.
                                            00000      

तीन गुन्‍हेगांरांवर तडीपाराची कार्यवाही


        वर्धा,दि.31- वर्धेचे उपविभागीय दंडाधिकारी हरिष धार्मिक यांनी एका आदेशान्‍वये तीन गुन्‍हेगारांना 2 वर्षाच्‍या कालावधीसाठी वर्धा जिल्‍हा व लगतचे जिल्‍हे यवतमाळ व अमरावती येथून तडीपार करण्‍यात आले आहे.
          दिनांक 27 ऑगस्‍ट 2012 पासून करण्‍यात आलेल्‍या तडीपार गुन्‍हेगारांच्‍या नावामध्‍ये सागरसिंग केसरसिंग बावरी रा. ठाकूर मोहल्‍ला पुलगाव ता. देवळी,आशिष राजपाल गजबे रा. सुभाषनगर, पुलगांव ता. देवळी, रामेश्‍वर विठ्ठलराव हर्षे रा.बरांडा,पुलगाव ता.देवळी असे असून या गुन्‍हेगारांना नमुद केलेल्‍या जिल्‍ह्यात प्रवेश प्रतिबंधीत केले आहे.
                                                       0000

वर्धा जिल्‍ह्यातील पाऊस दि.31 ऑगस्‍ट 2012


  

अ.क्र.
 तालुका
आज पडलेला पाऊस
मि.मी.
एकूण पाऊस मि.मी.     
1
वर्धा
06.0
509.6
2
सेलू
06.0
282.0
3
देवळी
03.2
391.8
4
हिंगणघाट
19.2
710.0
5
समुद्रपूर
-
708.7
6
आर्वी
17.0
644.0
7
आष्‍टी
-
457.0
8
कारंजा
        2.6
515.5
एकूण
        53.8

सरासरी
        6.8
527.5
टक्‍केवारी
  0.7 टक्‍के
49.72 टक्‍के

                                        0000000

सोयाबीन व कापूस पिकावरील किड अळीवर तात्‍काळ उपाययोजना करा - राजेन्‍द्र मुळक


कृषी विभागाच्‍या भिंतीपत्रकाचे प्रकाशन

वर्धा,दि.30 – सोयाबीन व कापूस पिकांवर पाने खाणा-या अळ्यांचा तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे पिकांच्‍या संरक्षणासाठी तात्‍काळ उपाययोजना करा अशा सुचना राज्‍याचे पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांनी आज दिल्‍यात.
      विश्रामगृह येथील सभागृहात कृ‍षी विभागातर्फे शेतक-यांच्‍या मार्गदर्शनासाठी सोयाबीन पीकावरील पाने खाणा-या अळ्यांच्‍या नियंत्रणाबाबत तयार करण्‍यात आलेल्‍या भिंतीपत्रकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
       यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वरराव ढगे, जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
     जिल्‍ह्यात पिकावरील किड रोग सर्व्‍हेक्षण व शेतक-यांना सल्‍ला देण्‍यासाठी क्रापसॅप हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत असून, यासाठी किड नियंत्रक व सर्व्‍हेक्षकांची नियुक्‍त करण्‍यात आली आहे. कापूस, सोयाबीन व तूर पिकावरील किडींबाबत जिल्‍ह्यातील 56 प्रकल्‍पाव्‍दारे सर्व्‍हेक्षण करुन किड रोगाच्‍या नियंत्रणाकरीता शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यात येत असल्‍याची माहितीही  पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
                                        ... 2....




 सोयाबीन व कापूस पिकावरील ... 2....

      जिल्‍ह्यात सोयाबीन पिकावर केसाळ अळी, चक्रभुंगा अळी, उंटअळी तसेच तंबाखूचा पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव काही भागात असल्‍यामुळे शेतक-यांनीही कृषी विभागातर्फे अनुदानावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या औषधाची फवारणी करावी तसेच शेतातील पीक संरक्षीत राहील याची खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन करताना जिल्‍हा व कृ‍षी अधिका-यांनी ज्‍या गावांमध्‍ये किड रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा गावांमध्‍ये भेट देऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावे अशा सुचनाही पालकमंत्री राजेंन्‍द्र मुळक यांनी केल्‍या.
      किड रोगाच्‍या नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात जैवीक किटकनाशकांची तसेच इतर औषधांची उपलब्‍धता करुन देण्‍यात आली असून, शेतक-यांना अनुदानावर औषधे उपलब्‍ध आहेत. तालुका कृषी अधिका-यांकडे मागणी केल्‍यास बिव्‍हेरीया, बॅसीयाना, या जैवीक किटकनाशकांची मागणी तातडीने  नोंदविल्‍यास तात्‍काळ औषधे उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
             एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
    मागील आठवड्यात झालेल्‍या पावसामुळे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील लालनाला व पोथरा या नदीचे पाणी तसेच इतर नाल्‍यांच्‍या पुरामुळे  1 हजार 61 क्षेत्रावरील कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.
     हिंगणघाट तालुक्‍यातील आठ गावातील 591 शेतक-यांच्‍या शेतातील कापूस व सोयाबीन तसेच समुद्रपूर तालुक्‍यातील 8 गावातील 322 बाधीत शेतक-यांच्‍या शेतातील कापूस, सोयाबीन व तूर अशा दोन्‍ही तालुक्‍यातील 913 बाधीत शेतक-यांच्‍या शेतातील 1 हजार 061 हेक्‍टर क्षेत्रातील  50 टक्‍केच्‍या वर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 158 हेक्‍टर क्षेत्रातील 50 टक्‍केच्‍या आंत शेतपिकाचे नुकसान झाले असल्‍याची माहिती यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.
                        000000
          

Wednesday 29 August 2012

बालकांवरील प्रलंबीत प्रकरणांसाठी दर गुरुवारी सुनावणी


वर्धा, दि.29 - वर्धा जिल्‍ह्यातील बालकांवरील प्रलंबीत असलेल्‍या प्रकरणा संदर्भात बालन्‍यायालयाचे कामकाज  दिनांक 1 सप्‍टेंबर पासून शुक्रवार ऐवजी गुरुवारी संपुर्ण दिवस होणार असल्‍याची माहिती बाल न्‍याय मंडळाचे अतिरीक्‍त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस.के. अन्‍सारी यांनी दिली.
      जिल्‍ह्यातील विधीसंघर्षीत बालकांवरील प्रलंबीत असलेल्‍या प्रकरणांचा निपटारा लवकर व्‍हावा यासाठी न्‍यायालयाचे कामकाजात बदल करण्‍यात आला आहे. श्री. संत गजानन महाराज सभागृह,सिंहगड प्‍लॉट  जवळ केळकरवाडी येथील न्‍यायालयाचे कामकाज दर गुरुवारी संपूर्ण दिवस होणार आहे. यापूर्वी दर शुक्रवारी 11 ते 2 या वेळातच बालन्‍यायालयाचे कामकाज होत होते. सर्व पक्षकारांनी व वकीलांनी व विधी संघर्षित बालकांनी बालन्‍यायालयाची कामकाजात झालेल्‍या बदलाची नोंद घ्‍यावी. असे आज बाल न्‍याय मंडळातर्फे दिलेल्‍या प्रसिध्‍दी पत्रकात स्‍पष्‍ट केले आहे.
                          000000

वर्धा जिल्‍ह्यात सरासरी 48.6 टक्‍के पाऊस


   वर्धा, दि. 29- वर्धा जिल्‍ह्यात सरासरी 516.1 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्‍हयात आजपर्यंत 48.6 टक्‍के पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्‍या तुलनेत सरासरी जिल्‍ह्यात    19 टक्‍के पाऊस कमी पडला आहे.
     जिल्‍ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्‍यात 708.7 मि.मी. नोंदविण्‍यात आली असून, जिल्‍हयात सर्वात कमी पावसाची नोंद सेलू तालुक्‍यात 272 मि.मी. पडला आहे. मागील वर्षी सेलू तालुक्‍यात सरासरी 760 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
      तालुकानिहाय पडलेल्‍या  सरासरी पाऊस वर्धा 503.6 मि.मी., सेलू 272 मि.मी., देवळी 384.3 मि.मी., हिंगणघाट 663 मि.मी., समुद्रपूर 708.7 मि.मी., आर्वी 627 मि.मी., आष्‍टी 457 मि.मी. कारंजा 512 मि.मी., जिल्‍ह्यात आतापर्यंत एकूण 4,128.5 मि.मी. म्‍हणजे सरासरी 516.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी एकूण 48.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी 67.5 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्‍ह्यात पडणा-या सरासरी पाऊस 1062.8 मि.मी. असून मागील वर्षीच्‍या तुलनेत 19 टक्‍के पाऊस कमी पडला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      
      जिल्‍ह्यात 18 जून रोजी आर्वी तालुक्‍यात सर्वाधिक 145 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तसेच 31 जुलै रोजी कारंजा तालुक्‍यात 65.4 मि.मी. नोंद या पावसाळ्यात झाली आहे.
                              000000


माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांचे अमुल्‍य योगदान – अप्‍पर जिल्‍हाधिकारी


     वर्धा,दि.29- माहिती व तंत्रज्ञान स्विकारल्‍या शिवाय आपला देश प्रगती करु शकणार नाही अशी भावना ठेवून माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांनी अनेक क्षेत्रात संगणकीय प्रणालीची सुरुवात केली. आज त्‍यांच्‍या दूरदृष्‍टीच्‍या कार्यकृतीमुळे देशाने विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय प्रगती केली असून  त्‍यांचे  योगदान अमुल्‍य  आहे असे भावपूर्ण उदगार अप्‍पर जिलहाधिकारी संजय भागवत यांनी केले.
येथील क्रीडा संकुलात जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांनी आयोजित केलेल्‍या  स्‍व. राजीव गांधी सदभावना पंधरवाडा व हॉकीचे जादूगर मेजर ध्‍यानचंद यांच्‍या जन्‍म  दिना निमित्‍त राष्‍ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्‍यात आला. त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर रमेश कुटे, प्रा.सुरेश बोंगाडे, प्रा. किशोर पोफळी, नेहरु युवा केंद्राचे समनवयक संजय माटे, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक मिलिंद सोनोने, जिल्‍हा महिला व बाल कल्‍याण अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, उपशिक्षणाधिकारी तलंग आदी मान्‍यवर उपस्थित होते.
     आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर देशातील हॉकी या खेळाला नावारुपास आणण्‍याचे महत्‍वपूर्ण कार्य मेजर ध्‍यानचंद यांनी केल्‍याचे सांगून अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत म्‍हणाले की त्‍यांनी हॉकी खेळाला उज्‍वल भविष्‍य निर्माण करण्‍यासोबत अनेक आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय पुरस्‍कार  मिळवून दिले. त्‍यांचे कार्य क्रीडा प्रेमी विसरणार नाही असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍ह्यातील गुणवंत खेळाडूंचा सत्‍कार अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यामध्‍ये 14 वी जागतीक फिना मास्‍टर्स स्विमींग चॅम्पियनशिप इटली युरोप येथे 13 ते 17 जून 2012 मध्‍ये संपन्‍न झालेल्‍या स्‍पर्धेत 10 मीटर ड्रायव्‍हींग हायबोर्ड स्‍पर्धेत कास्‍य पदक मिळविल्‍याबद्दल तसेच 3 कि.मी. सागरी जलतरण ओपन वॉटर स्विमिंगमध्‍ये भारताचे प्रनिधिीत्‍व करणारे गिरीश उपाध्‍याय यांना शाल, श्रीफळ, पुष्‍पगुच्‍छ व पदक देवून सन्‍मानीत करण्‍यता आले. सांगरी जलतरण स्‍पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्‍त केल्‍याबाबत वैभव उईके, बालगटात सागरी जलतरण स्‍पर्धेत 2 कि.मी. सागरी जलतरण पूर्ण करुन प्रोत्‍साहित करण्‍यासाठी सानिका उईके  यांचा पुष्‍पगुच्‍छ देवून सत्‍कार करण्‍यात आला. राष्‍ट्रीय महिला हॉकी क्रीडा स्‍पर्धेत सहभाग घेतल्‍याबाबत आर.एस.बीडकर महाविद्यालय हिंगणघाटची सरीता मालखेडे व विना सावरकर राष्‍ट्रीय स्‍पर्धेत ऑलम्पिक मध्‍ये सहभागी झालया बाबत रक्षा मलिये, शालेय व्‍हॉलीबॉल क्रीडा स्‍पर्धेत सहभागी झालेले मशुरान मो.नईमउद्दीन झैद, यांना, राष्‍ट्रीय शालेय हॅन्‍डबॉल क्रीडा स्‍पर्धेत सहभागी होणारे प्रदिप जांभारे व पुजा पाटणकर, राष्‍ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्‍पर्धेत सहभागी झालेले सौरभ क्षिरसागर यांना प्रत्‍येकी 3 हजार रुपये क्रीडा शिष्‍यवृत्‍तीचा धनादेश मान्‍यवरांचे हस्‍ते देवून गौरविण्‍यात आले.
तत्‍पूर्वी भारताचे माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी व मेजर ध्‍यानचंद यांच्‍या प्रतिमेला मान्‍यवरांनी माल्‍यार्पन करुन अभिवादन केले. यावेळी सदभावना दिना निमित्‍ताने विविध शाळा, महाविद्यालयाचे खेळाडूंनी रॅली काढली. अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत यांनी या रॅलीला हिरवा बावटा दाखवून मार्गस्‍थ केले. तसेच त्‍यांचे हस्‍ते क्रीडा संकुलनामध्‍ये वृक्षारोपन करण्‍यात आले. यावेळी शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी समुहगित सादर केले.
      कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रदिप शेटीये, संचलन ज्‍योती भगत यांनी तर आभार प्रदर्शन पंकज मेश्राम यांनी केले.
                        0000000

Tuesday 28 August 2012

शतकोटी वृक्षारोपन मोहीमेसाठी युवकांचा सहभाग घेणार - शेखर चन्‍ने


* दहावा वृक्ष वाढदिवस उत्‍साहात साजरा
         *  जिल्‍ह्यात 2 कोटी वृक्ष लावण्‍याचा संकल्‍प
         * निसर्ग सेवा समितीच्‍या हरितीकरणाचा गौरव

वर्धा,दि.28- आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर वृक्षारोपण करुन वर्धा शहर परिसराचे  हिरवेपण जपतानाच आय.टी.आय. परिसरातील टेकडीवर वृक्षारोपन करुन सतत दहा वर्षे  वृक्षसंगोपन करतानाच वृक्ष वाढदिवस करण्‍याच्‍या अभिनव संकल्‍पनेमुळेच निसर्ग सेवा  समितीच्‍या वृक्षारोपनाचे महत्‍व अधोरेखित झाले असल्‍याचे प्रतिपादन मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी केले.
शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍ह्यात दोन लाख वृक्ष लावण्‍यात येणार असून, यासाठी स्‍वंयसेवी संस्‍था सोबतच युवकांचेही सहकार्य घेण्‍यात येणार असल्‍याचे श्री. शेखर चन्‍ने यांनी यावेळी सांगितले.
      निसर्ग सेवा समितीतर्फे म्‍हाडा कॉलनी परिसरातील आयटीआय टेकडीवर पाऊनेदोन एकर परिसरात वीस प्रजातीची आठशे वृक्ष लावण्‍यात आली असून वृक्षारोपनाचा दहावा वाढदिवस साजरा करण्‍यात आला त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने बोलत होते.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ.नारायण निकम होते. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, सौ.सुनंदा वानखेडे, हरिष इथापे, बँक ऑफ इंडियाचे नितीश नाईक आदी उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात वृक्षारोपनाची व वृक्षसंवर्धनाची मोहीम राबवितांना वृक्ष संवर्धनाचे महत्‍व जनतेपर्यंत  पोहचविण्‍याची आवश्‍यकता व्‍यक्‍त करताना शेखर चन्‍ने म्‍हणाले की, वृक्षामुळेच मानवी मनाला शांती व आनंद मिळतो त्‍यामुळेच वर्धा शहराच्‍या परिसरात लोकसहभागातून पाच लाख वृक्ष लावण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला आहे. शेतकोटी कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍ह्यात दोन  कोटी झाडे लावण्‍यात येणार असून सरासरी एका व्‍यक्‍तीला वीस  वृक्ष लावायचे आहेत. इच्‍छाशक्‍ती  व अविरत प्रयत्‍नातूनच वृक्षारोपनाची मोहीम यशस्‍वी होणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
वृक्षारोपन व त्‍यांच्‍या संगोपनामुळे सुजनाचा आनंद मिळतो त्‍यामुळे प्रत्‍येकाने वृक्षारोपन करुन त्‍याचे संवर्धन करावे असे आवाहन करताना प्रा. नारायण निकम म्‍हणाले की वर्धा वासीयांना निसर्ग सेवा समितीने वृक्षांचे महतव समजावून दिले. त्‍यामुळेच आज शहराच्‍या विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन झाले आहे.
आयटीआय टेकडी परिसरात दहा वर्षापूर्वी लोकसहभागातून निसर्ग सेवा समितीने 800 वृक्ष लावली होती त्‍यामध्‍ये आवळा, रिठा, पळस, कांचन, कडूनिंब आदी प्रजातींच्‍या वृक्षांचा समावेश होता. जिल्‍हा प्रशासनातर्फे दिलेल्‍या जागेवर लोकसहभागातून संरक्षण  भिंत तयार करुन वृक्ष संगोपन तयार करताना जलसंधारणासारखेही  उपक्रम येथे राबविण्‍यात आले आहे. दहा वर्षे वृक्षांचे संगोपन करुन ही वृक्षवलली  11 व्‍या वर्षात पदार्पन करीत आहे.
यावेळी शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी  श्रमदान करुन वृक्ष संगोपनासाठी आवश्‍यक स्‍वच्‍छतेचे कार्य केले.  दहा वर्षापूर्वी लावण्‍यात आलेल्‍या रिठा या वृक्षाचे पूजन करुन वृक्ष वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्‍यात आला. मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने,अप्पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत तसेच प्रा. नारायण निकम यांच्‍या हस्‍ते यावेळी वृक्षारोपन करण्‍यात आले.
निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकात दहा वर्षापूर्वी आयटीआय परिसरातील टेकडी वृक्षारोपनासाठी समितीला जिल्‍हा प्रशासनातर्फे उपलब्‍ध  करुन देण्‍यात आली होती. अत्‍यंत खडकाळ जागेवरही लोकसहभागातून आठशे वृक्ष लावण्‍यात आली असून, यासाठी दहा ट्रक माती बाहेरून आणण्‍यात आली. तसेच जलसंधारणाचेही कामेही येथे घेण्‍यात आले आहेत. निसर्ग सेवा समितीतर्फे शहरात एक लाख वृक्ष लावून त्‍याचे संगोपन करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन किरण पटेकर यांनी आभार प्रदर्शन श्रीमती शोभाताई बेलखेडे यांनी मानले.
   यावेळी किशोर वानखेडे, सुरेश तागडे, मुकुंद मसराम, प्रा.बेलसरे, सतीश निमगडे, सुनिल सावत, प्रकाश येंडे, संजय पाचघरे, भरत महोदय, सुनिल रहाने, प्रशांत निमसरकार, कु. सिमा दुबे, कार्यकारी अभियंता संजय माटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य, प्राध्‍यापक, विद्यार्थी  आदी निसर्गप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
यावेळी विविध शाळांचे विद्यार्थ्‍यांनी श्रमदान केले. यामध्‍ये एनसीसीचे नरेश बागडे, शिव वैभव अध्‍यापक महाविद्यालयाचे प्रविण भोयर, प्रियदर्शनी महाविद्यालय, आयटीआयचे विलास भगत, लोकविद्यालयाचे प्रा. श्रीराम मेंढे, वाय.डी. देशमुख, श्री. गरड आदींचा समावेश होता.
                                      0000000  
                                                

जलजन्‍य व साथीचे आजार टाळण्‍यासाठी निर्जंतुक केलेल्‍याच पाण्‍याचा वापर करा- डॉ. दिलीप माने


      वर्धा,दि. 28- पावसामुळे नदी नाले तलाव व विहरींना नवीन पाणी आल्‍यामुळे जलजन्‍य आजारासोबतच साथीचे आजार उदभवण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे जनतेनी पिण्‍याचे पाणी निर्जंतु करुनच पिण्‍यासाठी पाणी वापरावे असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.
        पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्‍याचे पाणी निर्जंतकीकरण न झाल्‍यामुळे साथीचे आजाराचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता अधिक असल्‍यामुळे अतिसार, गॅस्‍ट्रो, कावीळ, टायफाईड हे आजार होण्‍याची शक्‍यता राहते. या आजाराच्‍या रुग्‍णांवर योग्‍यवेळी उपचार होणे आवश्‍यक  असते. यासाठी जिल्‍ह्यातील सर्व आरोग्‍य केंद्रात आवश्‍यक औषधी पुरवठा करुन देण्‍यात आला आहे. साथीचे रोग टाळण्‍यासाठी निर्जंतूक केलेले अथवा पाणी उकळूनच प्‍यावे असे आवाहनही जिल्‍हा परिषदेतर्फे जनतेला करण्‍यात आले आहे.
     उघड्यावरचे अन्‍न खाणे, शिळे अन्‍न खाणे, दुषित फळे खाणे, जेवणापुर्वी  व स्‍वयंपाक करण्‍यापूर्वी तसेच शौचावरुन आल्‍यानंतर हात साबणाने स्‍वच्‍छ न धुणे यामुळे देखिल साथीचे आजार पसरण्‍याची शक्‍यता असते. तेव्‍हा वैयक्तिक स्‍वच्‍छतेकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.
      गावातील  अस्‍वच्‍छता , तुंबलेल्‍या नाल्‍या व घाणीचे साम्राज्‍य  व शेणखताचे उकीरडे त्‍यामुळे परिसरात डासाची पैदास मोठ्या प्रमाणात होवून हिवताप व मेंदूज्‍वर इत्‍यादी आजाराची लागण होण्‍याची शक्‍यता असते. या आजारावर नियंत्रण मिळविण्‍याकरीता डास निर्मितीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. त्‍याकरीता गांव स्‍वच्‍छ ठेवणे, गावातील तुंबलेल्‍या नाल्‍या वाहत्‍या करणे, उकीरडे गावाच्‍या बाहेर बनविणे हे फारच महत्‍वाचे आहे. याशिवाय तापाची किंवा इतर साथीचे आजाराची लागण झाल्‍यास नजीकच्‍या आरोग्‍य उपकेंद्रात,प्राथमिक आरोग्‍य केंद्रात, ग्रामीण रुग्‍णालय, उपजिल्‍हा रुग्‍णालय यांचेशी संपर्क साधून योग्‍य निदान व उपचार करुन घ्‍यावे.
      तसेच मागील महिन्‍यात नागव्‍दार येथे यात्रेकरीता गेलेल्‍या यात्रेकरुंना आवाहन करण्‍यात येते की, नजीकच्‍या आरोग्‍य केंद्रात जावून आपल्‍या रक्‍ताची तपासणी करुन घ्‍यावी व प्रतिबंधात्‍मक उपचार करुन घ्‍यावा. तसेच आरोग्‍य कर्मचारी आपले घरी सर्व्‍हेक्षण करण्‍याकरीता आल्‍यास त्‍यांना सहकार्य करुन त्‍यांनी दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. असे आवाहन डॉ. दिलीप माने यांनी केले.
                                                0000000

Monday 27 August 2012

जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत, अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक ठाकूरदास बंग यांना ‘ नागभूषण पुरस्‍कार ’ प्रदान सेवाग्राम आश्रमात भावपूर्ण सोहळा


      वर्धा, दि. 27- नागभूषण फाऊंडेशनतर्फे देण्‍यात येणारा एक लाख रुपयाचा नागभूषण पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत, अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक तसेच सर्वोदयी नेते प्रा. ठाकूरदास बंग यांना सेवाग्रामच्‍या पावनभूमीत ज्‍येष्‍ठ गांधीवाद्यांच्‍या प्रदान करण्‍यात आला. याच समारंभात पुरस्‍काराची रक्‍कम बंग यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानकडे सुपूर्द करीत आपल्‍या आजवरच्‍या त्‍यागमयी जीवनाची पुनश्‍च पावती दिली.
      महात्‍मा गांधीच्‍या चले जाव आंदोलनात सत्‍याग्रही, आचार्य विनोबाजींच्‍या भूदान चळवळीतील त्‍यांचे सहकारी तसेच जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांती आंदोलनातील सूत्रधार अशा देशाच्‍या तीन महत्‍वाच्‍या मन्‍वंतरातील सक्रिय वाक्षीदार राहिलेल्‍या ठाकूरदास बंग यांच्‍या योगदानाचा गौरव म्‍हणून नागभूषण पुरस्‍काराने त्‍यांना गौरविण्‍यात आले.
       व्‍यासपीठावर सर्व सेवा संघाच्‍या अध्‍यक्ष राधाबेन भट्ट, सुमनताई बंग, सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे विश्‍वस्‍त  अॅड. मा.म.गडकरी, बापू कथाकार नारायणभाई देसाई, गांधीविचार परिषदेचे भरत महोदय, नागभूषण फाऊंडेशनचे प्रभाकर मुंडले व वनराईचे विश्‍वसत गिरीश गांधी उपस्थित होते.
      महात्‍मा गांधीच्‍या सूचनेवरुन विदेशातील शिष्‍यवृततीप्रापत शिक्षणास नकार देत स्‍वातंत्र्य लढ्यात उतरणारे बंग हे लढयातही कर्तव्‍य कठोर होते. गो.से. वाणिज्‍य महाविद्यालयात काही काळ नोकरी केलयानंतर त्‍यांनी पुढे पूर्णवेळ देशसेवेस दिला. स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतर भूदान चळवळ व त्‍यानंतर जयप्रकाशींच्‍या संपूर्ण क्रांतीचे अग्रणी कर्णधार असे ठाकूरदास बंग यांचे कार्य राहिले. गौरवमूर्तीच्‍या या अशा विशाल त्‍यागमयी जीवनपटाला विविध वक्‍त्‍यांनी उजाळा दिला.
     राधाबेन भट्ट म्‍हणाल्‍या  की, हा पुरस्‍काराचाच गौरव होय. त्‍यांच्‍या कार्यात सुमनताई बंग यांचे मोठे योगदान राहिले. मा.म.गडकरी यांनी विविध गांधीवादी संस्‍था चालविताना ठाकूरदास बंग यांच्‍या मिळालेल्‍या मार्गदर्शनाचा गौरवपूर्ण उल्‍लेख केला. हयात असणा-या गांधीवाद्यांमध्‍ये आज ते सर्वोच्‍च स्‍थानी आहेत असेही गडकरी म्‍हणाले.
      नागभूषण हा विदर्भातील निःस्‍वार्थ सेवेसाठी केलेल्‍या कार्याचा गौरव म्‍हणून नागपूर त्रिशताब्‍दी सोहळ्याची आठवण म्‍हणून आयोजक संस्‍थेने रोख एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र स्‍वरुपातील नागभूषण पुरस्‍कार ठाकूरदास बंग यांना यावेळी प्रदान केला. 97 वर्षीय बंग यांनी कृतज्ञ भावनेने हा पुरस्‍कार स्‍वीकारताना आपले मनोगत व्‍यक्‍त केले. आजही मला जी स्‍वप्‍ने  पडतात, ती सर्वोदयी समाज अस्तित्‍वात आल्‍याची पुरस्‍कारामागची भावना उदात्‍त आहे. त्‍याचा मी आदर करतो. पुरस्‍काराची रक्‍कम मी याचवेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानच्‍या कार्यासाठी देत आहे. असे उदगार काढून त्‍यांनी प्रतिष्‍ठानचे अॅड. गडकरी यांना रकमेचा धनादेश प्रदान केला.
     सेवाग्राम आश्रम परिसरात दिवसभर संततधार सुरु होती, मात्र त्‍याची तमा न बाळगता कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्‍यवर, आश्रमवासी व जेष्‍ठ सर्वोदयी उपस्थित होते. कुष्‍ठधामचे डॉ. रविशंकर शर्मा, गौरवमूर्तीचे सूपुत्र डॉ. अभय बंग, विजय जावंधिया, नारायणदास जाजू, डॉ. सुहास जाजू, अरुण लेले प्रामुख्‍याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गिरीश गांधी, संचालन डॉ. नारायण निकम व आभार मोहन अग्रवाल यांनी मानले.
                        00000

सर्वसामान्‍यांना योजनांची माहिती अवगत करावी - ना.गो.गाणार


    वर्धा, दि.27- केंद्र व राज्‍य  पुरस्‍कृत योजना अद्यापही सर्व सामान्‍य जनतेपर्यंत पोहचलेल्‍या नाहीत त्‍यामुळे लाभार्भी संबधित योजनेच्‍या लाभापासून वंचित राहत असतात. यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्‍ये जनजागरण करुन येाजनांची प्रभावी अंमलबजावणी  करावी तसेच  सर्वसामान्‍य जनतेला योजनाची अद्यावत माहिती अवगत करावी असे आवाहन आमदार ना.गो.गाणार यांनी केले.
      येथील विश्राम भवनामध्‍ये नुकतीच (दि.25ऑगस्‍ट) जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयेाजित जिल्‍हास्‍तरीय दक्षता  व सनियंत्रण समितीची आढावा सभा संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी  ते अध्‍यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जि.प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, आमदार अशेाक शिंदे, जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, प्रकल्‍प अधिकारी बि.एम.मोहन, सभापती धर्मशिल जगताप, सभापती छायाताई लांडे, सभापती अर्चनाताई तिमांडे, सभापती दिनेश धांदे, सभापती नंदाताई साबळे, अशासकीय सदस्‍यामध्‍ये  विजय जावंधिया व विलास कांबळे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
      सामाजिक दायीत्‍वाचे भान ठेवून अधिका-यांनी सर्वसामान्‍यांच्‍या समस्‍याची सोडवणूक करण्‍याचे आवाहन करुन आमदार गाणार म्‍हणाले की, अधिका-यांनी नागरीकांशी सौजण्‍यपूर्व वागणूक ठेवून योग्‍य  मार्गदर्शन केल्‍यास लाभार्थ्‍यांच्‍या अडचणी दूर होण्‍यास मदत होईल.
     याप्रसंगी प्रकल्‍प अधिकारी मोहन यांनी केंद्रशासित पुरस्‍कृत योजनांवर 24 मार्च 2012 पर्यंतच्‍या खर्चाचा आढावा सादर करताना सांगितले की महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेवर 99.47 टक्‍के, इंदिरा आवास योजनेवर 88.34 टक्‍के , सुवर्णजयंती स्‍वरोजगार योजनेवर 75.33 टक्‍के, इंदिरा आवास योजनेवर 88.34 टक्‍के, पंतप्रधान ग्रामीण सुवर्णजयंती योजनेवर 88.82 टक्‍के खर्च करण्‍यात  आला असल्‍याचे सांगितले. गेल्‍या आर्थिक वर्षामध्‍ये स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजने अंतर्गत बँकेकडे कर्ज मंजूरीसाठी  271 प्रकरणे पाठविण्‍यात आली त्‍यापैकी 237 प्रकरणांना कज्र वितरण करण्‍यात आले. इंदिरा अवास योजने अंतर्गत जिल्‍ह्यामध्‍ये 2 हजार 371 घरकुले मंजूर करण्‍यता आली त्‍यापैकी 1 हजार 763 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 608 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकउून आष्‍टी येथील 8 कामावर 1 कोटी 80 लक्ष 58 हजार रुपये खर्च झालेला असून हरयाली कार्यक्रम अंतर्गत कारंजा, आर्वी व आष्‍टीचे पाणलोटाचे कामे प्रगतीपथावर असून त्‍यावर 6 कोटी 64 लक्ष 24 हजार रुपयापैकी 6 कोटी 17 लक्ष 50 हजार रुपये खर्च झालेले आहेत.
      ग्रामीण पाणी पुरवठा येाजने अंतर्गत जिल्‍ह्यात 44 प्रस्‍तावांना मंजूरी दिली असून 43 कामे पूर्ण झालेली आहे. ग्रामीण स्‍वचछता कार्यक्रमा अंतर्गत फेब्रुवारी 2012 अखेर पर्यंत जिल्‍ह्यात दारिद्र रेषेवरील 56 हजार 557 लाभार्थ्‍यांना व दारिद्र रेषेखालील 55 हजार 280 लाभार्थ्‍यांना सौचालये बांधून देण्‍यात आली असून शाळेतील 1298 व आंगणवाउीचे 855 सोचालये बांधकाम करुन देण्‍यात आले आहे. त्‍यावर 14 कोटी 46 लक्ष 50 हजार रुपये खर्च झाला आहे.
     यावेळी राष्‍ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, पंतप्रधान शेतकरी पॅकेज, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य योजना, सर्व शिक्षा अभियान, शेतकरी कुटूंबातील मुलींच्‍या सामुहिक विविाह शुभमंगलम येाजना, राजीव गांधी ग्रामीण विद्यूतीकरण योजना आदी योजनांची माहिती प्रकल्‍प अधिकारी यांनी दिली.
     या बैठकीचे आभार सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी डॉ. पी.व्‍ही. भालेराव यांनी मानले.
                              0000000