Monday 27 August 2012

सार्वजनिक उत्‍सवासाठी वर्गणी गोळा करताना परवानगी आवश्‍यक


       वर्धा, दि. 27- सार्वजनिक गणेश उत्‍सव, दुर्गा उत्‍सव, शारदा उत्‍सव साजरा करण्‍याकरीता वर्गणी गोळा करण्‍यासाठी मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियमा अंतर्गत  परवानगी आवश्‍यक असल्‍याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त पी.पी.शर्मा यांनी दिली.
     सार्वजनिक उत्‍सव आयोजनासाठी वर्गणी गोळा करण्‍यासाठी आवश्‍यक परवानगी साठीचा अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त यांच्‍या कार्यालयात उपलब्‍ध असून, अर्जाची किंमत तीन रुपये आहे. सार्वजनिक मंडळानी  मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार परवानगी घ्‍यावी, असे आवाहनही सहाय्यक धर्मदाय आयुक्‍त पी.पी.शर्मा यांनी केले आहे.
       अर्जासोबत मंडळाचा ठराव ज्‍यामध्‍ये मंडळाचे नाव ठरविणे, मंडळाचे कार्यकारी मंडळ ठरविणे, ज्‍या ठिकाणी मुर्तीची स्‍थापना करावयाची आहे ती जागा ठरविणे या बाबतचा उल्‍लेख असावा. मागील वर्षाचा हिशोब, ज्‍या जागेवर मुर्तीची स्‍थापना करावयाची आहे त्‍या जागेच्‍या मालकाचे मुर्ती स्‍थापनेसाठी व उत्‍सव साजरा करण्‍याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक जागेत उत्‍सव साजरा करणा-या मंडळांकरीता ग्राम पंचायत किंवा नगर परिषद यांचे ना हरकत प्रमाणपत्र,प्रतिज्ञापत्र , हद्दीतील सक्षम पोलीस स्‍टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे. कार्यालयाने कुठल्‍याही त्रयस्‍त इसमास या कामासाठी नेमलेले नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. 
                           00000   

No comments:

Post a Comment