Monday 27 August 2012

जेष्‍ठ गांधीवादी विचारवंत, अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक ठाकूरदास बंग यांना ‘ नागभूषण पुरस्‍कार ’ प्रदान सेवाग्राम आश्रमात भावपूर्ण सोहळा


      वर्धा, दि. 27- नागभूषण फाऊंडेशनतर्फे देण्‍यात येणारा एक लाख रुपयाचा नागभूषण पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत, अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक तसेच सर्वोदयी नेते प्रा. ठाकूरदास बंग यांना सेवाग्रामच्‍या पावनभूमीत ज्‍येष्‍ठ गांधीवाद्यांच्‍या प्रदान करण्‍यात आला. याच समारंभात पुरस्‍काराची रक्‍कम बंग यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानकडे सुपूर्द करीत आपल्‍या आजवरच्‍या त्‍यागमयी जीवनाची पुनश्‍च पावती दिली.
      महात्‍मा गांधीच्‍या चले जाव आंदोलनात सत्‍याग्रही, आचार्य विनोबाजींच्‍या भूदान चळवळीतील त्‍यांचे सहकारी तसेच जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांती आंदोलनातील सूत्रधार अशा देशाच्‍या तीन महत्‍वाच्‍या मन्‍वंतरातील सक्रिय वाक्षीदार राहिलेल्‍या ठाकूरदास बंग यांच्‍या योगदानाचा गौरव म्‍हणून नागभूषण पुरस्‍काराने त्‍यांना गौरविण्‍यात आले.
       व्‍यासपीठावर सर्व सेवा संघाच्‍या अध्‍यक्ष राधाबेन भट्ट, सुमनताई बंग, सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे विश्‍वस्‍त  अॅड. मा.म.गडकरी, बापू कथाकार नारायणभाई देसाई, गांधीविचार परिषदेचे भरत महोदय, नागभूषण फाऊंडेशनचे प्रभाकर मुंडले व वनराईचे विश्‍वसत गिरीश गांधी उपस्थित होते.
      महात्‍मा गांधीच्‍या सूचनेवरुन विदेशातील शिष्‍यवृततीप्रापत शिक्षणास नकार देत स्‍वातंत्र्य लढ्यात उतरणारे बंग हे लढयातही कर्तव्‍य कठोर होते. गो.से. वाणिज्‍य महाविद्यालयात काही काळ नोकरी केलयानंतर त्‍यांनी पुढे पूर्णवेळ देशसेवेस दिला. स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतर भूदान चळवळ व त्‍यानंतर जयप्रकाशींच्‍या संपूर्ण क्रांतीचे अग्रणी कर्णधार असे ठाकूरदास बंग यांचे कार्य राहिले. गौरवमूर्तीच्‍या या अशा विशाल त्‍यागमयी जीवनपटाला विविध वक्‍त्‍यांनी उजाळा दिला.
     राधाबेन भट्ट म्‍हणाल्‍या  की, हा पुरस्‍काराचाच गौरव होय. त्‍यांच्‍या कार्यात सुमनताई बंग यांचे मोठे योगदान राहिले. मा.म.गडकरी यांनी विविध गांधीवादी संस्‍था चालविताना ठाकूरदास बंग यांच्‍या मिळालेल्‍या मार्गदर्शनाचा गौरवपूर्ण उल्‍लेख केला. हयात असणा-या गांधीवाद्यांमध्‍ये आज ते सर्वोच्‍च स्‍थानी आहेत असेही गडकरी म्‍हणाले.
      नागभूषण हा विदर्भातील निःस्‍वार्थ सेवेसाठी केलेल्‍या कार्याचा गौरव म्‍हणून नागपूर त्रिशताब्‍दी सोहळ्याची आठवण म्‍हणून आयोजक संस्‍थेने रोख एक लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र स्‍वरुपातील नागभूषण पुरस्‍कार ठाकूरदास बंग यांना यावेळी प्रदान केला. 97 वर्षीय बंग यांनी कृतज्ञ भावनेने हा पुरस्‍कार स्‍वीकारताना आपले मनोगत व्‍यक्‍त केले. आजही मला जी स्‍वप्‍ने  पडतात, ती सर्वोदयी समाज अस्तित्‍वात आल्‍याची पुरस्‍कारामागची भावना उदात्‍त आहे. त्‍याचा मी आदर करतो. पुरस्‍काराची रक्‍कम मी याचवेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानच्‍या कार्यासाठी देत आहे. असे उदगार काढून त्‍यांनी प्रतिष्‍ठानचे अॅड. गडकरी यांना रकमेचा धनादेश प्रदान केला.
     सेवाग्राम आश्रम परिसरात दिवसभर संततधार सुरु होती, मात्र त्‍याची तमा न बाळगता कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्‍यवर, आश्रमवासी व जेष्‍ठ सर्वोदयी उपस्थित होते. कुष्‍ठधामचे डॉ. रविशंकर शर्मा, गौरवमूर्तीचे सूपुत्र डॉ. अभय बंग, विजय जावंधिया, नारायणदास जाजू, डॉ. सुहास जाजू, अरुण लेले प्रामुख्‍याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गिरीश गांधी, संचालन डॉ. नारायण निकम व आभार मोहन अग्रवाल यांनी मानले.
                        00000

No comments:

Post a Comment