Tuesday 14 March 2017

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात बचत गटांच्या वस्तूंसाठी पूरक केंद्र




शेतक-यांचा  माल थेट ग्राहकांच्या दारात
बचत गटांच्या वस्तूंसाठी
   पूरक केंद्र
वर्धा,दि 14:- महिला व शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यात येते.मात्र त्या वस्तुंना पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नाही. अशा  वस्तूंची मागणी वाढावी, लोकांना बचत गटाच्या वस्तूची माहिती व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील  विविधा केंद्रात पूरक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
                  या केंद्रामध्ये  महिला व शेतकरी बचत गटाकडून उत्पादित संत्री,  तूरडाळ, वायगाव हळद, मिरची पावडर,  फिनाईल, साबण, शॅम्पू,  पापड, कुरडया, शेवळ्या,  गुळ, मसाले,  अगरबत्ती,  कागदी पिशव्या,  अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे या सर्व वस्तू दर्जेदार आणि भेसळमुक्त आहेत.  बचत गटाच्या वस्तूंची विक्री वाढावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी  प्रत्‍येक  शासकीय कार्यक्रमात अतिथीना पुष्पगुच्छ देण्याऐवजी बचत गटाच्या उत्पादित वस्तूंनी सजवलेली परडी भेट म्हणून दिली जावी अशा सूचना दिल्यात. त्यामुळे  बचत गटांना अशा कार्यक्रमाकरिता मागणी  मिळत असून त्यामाध्यमातूनही विक्री वाढत आहे.  यामध्‍ये महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा, केम, शेतकरी उत्‍पादक गट यांचा समावेश  असून त्‍यांच्‍या सर्व उत्‍पादित मालाची विक्री करण्‍याकरिता विविधा मध्‍ये जागा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
              नुकत्याच सुरु झालेल्या  या पूरक केंद्रातून आतापर्यन्त 25 हजार  रुपयांची विक्री झाली आहे.  दिवसेंदिवस या उत्पादनांना ग्राहकांचा  चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी एकदा तरी या केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे. हे पूरक केंद्र  सुरु करण्यासाठी केम प्रकल्पाचे समन्वयक निलेश वावरे आणि त्यांच्या सहका-यांनी परिश्रम घेतले.
000000