Wednesday 6 January 2016

सामाजिक बांधिलकी स्वीकारत पत्रकारिता करा
-   रामदास तडस
Ø  पत्रकार दिन उत्साहात साजरा
Ø  चौथा स्तंभ पुरस्काराचे वितरण
Ø  पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना आदरांजली
   वर्धा, दिनांक 6 -   लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभातून जनजीवनातील प्रत्येक बाबींची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहचते, ती केवळ संवेदनशील अशा पत्रकारांमुळे. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारत पत्रकारिता करावी. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
दादाजी धुनिवाले मठ  येथील सभागृहात श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मराठी पत्रकार दिन आणि चौथा स्तंभ पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू विनय देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पत्रकार राजेंद्र मुंढे यांची उपस्थिती होती.
खासदार रामदास तडस म्हणाले, पत्रकारांच्या लेखणीचे कौतुक वाटते. अचूक माहितीपूर्ण अशा आशयातून दिवसभरातील घटनांचा अचूक पद्धतीने योग्य शब्दात मांडणी करून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य अथक परिश्रमातून पत्रकार करत असतात. घटनेची सखोल माहिती बहुअंगाने लोकांसमोर ठेऊन जनसामान्यांचा कौल घडविण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून होते. यासाठी जे पत्रकार अहोरात्रपणे समाजासाठी  झटतात त्यांच्या कार्याचा गौरव व्हायलाच हवा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी आपली लेखणी आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा गौरव माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. हा ठप्पा पुसून काढण्यासाठी पत्रकारांसह सर्वांनी समोर येणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सेवाग्राम विकास आराखड्याची संकल्पना मांडणा-या श्रीकांत बारहाते यांनी या आराखड्याला पूर्णत्वास नेण्यासाठी साथ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


जिल्हा माहिती अनिल गडेकर यांनी युवकांनी पत्रकारिता क्षेत्रात येण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत तो पाठविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालन करून पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंतिम स्वरूपात लवकरच येईल, असे सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पत्रकारांनी पुढे यायला हवे,असेही सांगितले.
      माजी कुलगरू डॉ. विनायक देशपांडे यांनी समाजकार्यकर्ते आणि पत्रकारांनी अविरतपणे संवेदनशील राहून सातत्याने कार्य करत राहावे. त्यांच्या सारख्या संवेदनशीलतेमुळे जागृत समाज निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. देवस्थान ट्रस्टचे सुनील बुरांडे यांनीही यावेळी दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.  
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह मानपत्र रोख पाच हजार रूपये देऊन समाजकार्यकर्ते श्रीकांत बारहाते, नाट्य कलावंत, दिग्दर्शक हरीष इथापे यांचा मान्यवरांच्याहस्ते चौथा स्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय प्रभावी कामगिरी, लेखन केल्याबद्दल लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशमुख पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रवीण होनाडे यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांनीही यावेळी विचार मांडले
 कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद इंगोले यांनी केले. तर आभारही त्यांनीच मानले. पठाणकोट येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी उपस्थितांसह मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
सत्कारमूर्तींचे मनोगत
समाजकार्यकर्ते श्रीकांत बारहाते यांनी वर्धा शहर हे केवळ शहर नाही. या शहराला, जिल्ह्याला महात्मा गांधीजींच्या रुपातून मोठा इतिहास लाभला आहे. पं. नेहरू, मौलाना आझाद, सरहद्द गांधी, पटेल आदी राष्ट्रीय नेत्यांचा पदस्पर्श या भूमिला झालेला आहे. मध्यभारतातील अत्यंत महत्त्वाचे असे हे शहर आहे. या शहरावर जगाचे लक्ष आहे. त्यामुळे येथील पत्रकारांवर मोठ्याप्रमाणात जबाबदारी आहे, त्यांनी ती संवेदनशीलपणे पार पाडलेली आहेच, परंतु यापुढेही त्यांनी समाजजागृतीसाठी नेहमीच पुढे राहावे, असे सत्काराप्रसंगी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून वर्धा शहरात उत्तम दर्जाचे सांस्कृतिक नाट्य सभागृह उभारण्याची जबाबदारी पार पाडावी. शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब झाली असल्याचे नाट्य कलावंत हरीष इथापे यांनी सांगितले.   
000000