Friday 5 December 2014

वर्धा न्यूजलाईन:                 जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सव उत्‍स...

वर्धा न्यूजलाईन:                 जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सव उत्‍स...:                  जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सव उत्‍साहात संपन्‍न           वर्धा दि 4- क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व्‍दारा जिल्‍...

Thursday 4 December 2014

                जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सव उत्‍साहात संपन्‍न

          वर्धा दि 4- क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व्‍दारा जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय , वर्धा यांच्‍या वतीने जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सवाचे आयोजन जिल्‍हा क्रीडा संकुल, सभागृह वर्धा येथे नुकतेच करण्‍यात  आले. या महोत्‍सवाचे उदघाटन जिल्‍हा क्रीडा अधिकारी श्री. सुभाष रेवतकर व संगीत तज्ञ श्री सुरेशजी चौधरी यांचे हस्‍ते दिपप्रज्‍वलन करुन करण्‍यात आले.
          महोत्‍सवामध्‍ये लोकनृत्‍य, लोकगित , एकांकीका, शास्‍त्रीय गायन, शास्‍त्रीय वाद्य(सितार, बासरी, वीणा , तबला, मृदंग, हार्मोनियम, गिटार ) शास्‍त्रीय नृत्‍य वक्‍तृत्‍व ईत्‍यादी बाबीचा समावेश असुन, जवळपास 70 युवक युवतींनी महोत्‍सवात सहभाग नोंदविला. स्‍पर्धेची सुरुवात शास्‍त्रीय वाद्य तबला या बाबीने करण्‍यात आली असुन, प्रथम क्रमांक अविनाश कोल्‍हे यांनी तर व्दितीय क्रमांक अभिषेक चारी यांनी प्राप्‍त केला. तसेच हार्मोनियम या प्रकारात किशोर काळे यांनी प्रथम क्रमांक प्राप्‍त केला. शास्‍त्रीय गायन या प्रकारात मेघा मेंढे यांनी प्रथम तर नंदा नांदुरकर यांनी व्दितीय क्रमांक प्राप्‍त केला. शास्‍त्रीय नृत्‍य या प्रकारात कु. गोरले पोहाने हिने प्राविण्‍य प्राप्‍त केले. वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत शिवाजी चौधरी यांनी प्रथम तर व्दितीय क्रमांक श्रृतिका ठाकुर व तृतिय क्रमांक रुपेश रेंघे यांनी मिळविला . लोकगित या सांघीक प्रकारात लोकधारा मंच , वर्धा चा संघ विजयी झाला असुन, व्दितीय क्रमांक अनिकेत समाजकार्य  महाविद्यालय, वर्धा हा संघ आहे. तसेच एकांकीके मध्‍ये केशरीमल कन्‍या शाळा , वर्धा चा संघ प्रथम क्रमांकावर असुन व्दितीय क्रमांक डिवाईन कल्‍चर अन्‍ड सोसायटी , वर्धा  यांनी प्राप्‍त केला.
        सदर स्‍पर्धेतुन प्रथम क्रमांक प्राप्‍त करणारे स्‍पर्धेक नागपूर येथे होणा-या विभागिय युवा महोत्‍सवात सहभागी होण्‍याकरीता पात्र ठरले आहे. उपरोक्‍त स्‍पर्धेचे परीक्षण संगीत तज्ञ श्री. सुरेशजी चौधरी ,श्री. जिवन बांगडे , श्री. दिलीप झाडे, श्री. शैलेश देशमुख व श्री. ज्‍योती भगत यांनी केले असुन कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी श्री. चारुदत्‍त  नाटक यांनी केले. या महोत्‍सवाचे यशस्‍वी आयोजन क्रीडा अधिकारी श्री. घनश्‍याम वरारकर यांनी केले. असुन या आयोजनाकरीता संकुल व्‍यवस्‍थापक श्री. रविंद्र काकडे, क्रीडा मार्गदर्शक श्री. विजय ढोबळे , श्री. हेमंत वडस्‍कर, श्री. रहाटे , श्री. विजु बिसने यांनी परीश्रम घेतले,                
                                           0000000
  क्रीडा स्‍पर्धेत स्‍पीडबॉल या नविन खेळाचा समावेश
वर्धा दि.4- सर्व शैक्षणीक संस्‍था, शाळा, कनिष्‍ठ  महाविद्यालय तसेच संघटनांनी महाराष्‍ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय , पुणे यांचे परीपत्रकानुसार सन 2014-15या सत्रात शालेय क्रीडा स्‍पर्धेत स्‍पीडबॉल या नविन खेळांचा समावेश करण्‍यात आला असुन, या खेळासाठी  19 वर्षे  वयोगटातील मुला-मुलींच्‍या जिल्‍हास्‍तरावर  स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.  19 वर्षे वयोगटातील स्‍पर्धेत सहभाग घेणा-या शैक्षणिक संस्‍थांनी  आपला  प्रवेश दि. 7डिसेंबर 2014 पर्यंत जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा येथे निश्चित करावा व या स्‍पर्धेच्‍या आयोजनाच्‍या तारखेबाबत जिल्‍हा संघटनेकडुन माहीती करुन घेवुन स्‍पर्धेच्‍या ठिकाणी  आपला संघ उपस्थित ठेवावा.
     तसेच स्‍पीडबॉल या नविन खेळाच्‍या स्‍पर्धेचे आयोजन व नियोजन जिल्‍हा संघटनेने करावयाचे असल्‍याने सबंधीत खेळाच्‍या जिल्‍हा संघटनेने जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधुन, आपल्‍या   स्‍पर्धेचे आयोजन करण्‍याबाबचे नियोजन करावे, असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी श्री. सुभाष रेवतकर यांनी कळविले आहे.
                                                          000000






                    शिक्षण पात्रता परिक्षा 2014 बाबत
वर्धा,दि. 3 -  महाराष्‍ट्र राज्‍य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत घेण्‍यात येणारी शिक्षण पात्रता परिक्षा दिनांक 14 डिसेंबर 2014 रोजी आयोजित करण्‍यात आलेली आहे. या परिक्षेस प्रविष्‍ठ होणा-या परीक्षार्थिंना प्रवेशपत्रे (Hall Ticket)दिनांक 26 नोव्‍हेंबर 2014 पासुन परीक्षा परीषदेच्‍या www.mahatet.in या संकेस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.. परीक्षार्थिनी प्रवेशपत्राच्‍या (Hall Ticket)सर्व पृष्‍ठांच्‍या प्रती प्रिंट करुन घेण्‍याबाबत परीक्षार्थिंनी नोंद घेण्‍याबाबतचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.
                                                        000000
 प्र.प.क्र.768                    
               माजी सैनिकांसाठी सैनिक दरबाराचे आयोजन
वर्धा दि.4- शासकीय स्‍तरावर प्रलंबीत असलेल्‍या सैनिकांच्‍या वैयक्‍तीक समस्‍यांचा निपटारा करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी  वर्धा यांचे अध्‍यक्षतेखाली दि. 1 डिसेंबर 2014 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात माजी सैनिकांचे  सैनिक  दरबार आयोजन करण्‍यात आले आहे.  यावेळी जिल्‍हयातुन  एकुण  13 माजी सैनिक व विधवांचे तक्रारी अर्ज प्राप्‍त झाले होते. त्‍यापैकी उपस्थित 12 अर्जावर सुनावणी करण्‍यात आली व ज्‍या अर्जामध्‍ये काही त्रुटी आढळुन आल्‍या त्‍यांना संबधीत विभागाकडे पुनश्‍चः नविन अर्ज करण्‍यास  सांगण्‍यात आले. यावेळी  8 अर्जदारांचे अर्जाबाबत संबधीतांना  पुढील कार्यवाहीबाबत  निर्देश देण्‍यात आले.
 याप्रसंगी जे माजी सैनिक दरबारात अर्ज सादर करु शकले नाहीत त्‍यांनी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालया मार्फत आपल्‍या तक्रारी बाबतचा पाठपुरावा करावा, असेही जिल्‍हाधिकारी  यांनी सांगितले.
         यावेळी  निवासी उपजिल्‍हाधिकारी  श्री. सुनिल गाढे , निवासी उपजिल्‍हाधिकारी , उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर,  जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी श्री. धनजंय सदाफळे तसेच  सतेंद्रकुमार चवरे , महेन्‍द्र फुलझेले  उपस्थित होते
                                                     000000







Tuesday 25 November 2014


                    राष्‍ट्रपतींच्‍या आगमनासाठी वर्धा नगरी सज्‍ज      
      
Ø  राष्‍ट्रपतींच्‍या वर्धा दौ-याची तयारी पूर्ण
Ø  विभागीय आयुक्‍तांनी घेतला आढावा
Ø  सेवाग्राम आश्रमात राष्‍ट्रपती करणार वृक्षारोपण
Ø आश्रम प्रतिष्‍ठानतर्फे राष्‍ट्रपतींचे स्‍वागत
Ø बजाजवाडीला भेट

वर्धा,दि.25 – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या वर्धा येथील कार्यक्रमाप्रसंगी अचूक नियोजन करुन  संपूर्ण कार्यक्रम यशस्‍वी करा अशा सुचना विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार यांनी आज दिल्‍यात. वर्धा शहरातील सर्व रस्‍ते तसेच सेवाग्राम परिसरही संपूर्ण स्‍वच्‍छ राहील यासाठी नगर परिषदेने तात्‍काळ  उपाययोजना कराव्‍यात असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
राष्‍ट्रपती  यांच्‍या  वर्धा येथील आगमण तसेच विविध कार्यक्रमाच्‍या  नियोजना संदर्भात व सुरक्षेसंदर्भातील आढावा विभागीय आयुक्‍त अनुपकुमार तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुरक्षा जयजितसिंग, राज्‍य गुप्‍तवार्ता विभागाचे उप आयुक्‍त रंजन शर्मा,जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्‍कर, मुख्‍य कार्यपालन अधिकारी  उदय चौधरी, शिक्षा मंडळाचे अधिकारी  संजय भार्गव, आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयंत मटकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी  संजय गाढे आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता आगमन होत असून, हेलीपॅडवर स्‍वागतासह कार्यक्रमस्‍थळी  जाण्‍याची व्‍यवस्‍था तसेच सुरक्षा व्‍यवस्‍था  आणि स्‍वागतासाठी  निमंत्रीतांची यादी  याबाबत विभागीय  आयुक्‍त  अनुपकुमार यांनी आढावा घेतला. राष्‍ट्रपती  बजाजवाडीला भेट देणार असून बजाजवाडी  येथील  ऐतिहासीक असलेले जमनालालजी बजाज या वास्‍तुला स्‍वातंत्र्य आंदोलनातील विविध महनीय व्‍यक्‍तींनी  भेट  दिली आहे. येथे  पंडित जवाहरलाल नेहरु  तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍यासाठी  विशेष खोल्‍या  आहेत. तसेच कमलनयन बजाज, डॉ. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्‍लभभाई  पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, श्रीमती इंदिरा गांधी, आचार्य कृपलानी  यांचे दुर्मिळ  छायाचित्र या वास्‍तुत लावण्‍यात आले आहेत.
1938 मध्‍ये  कॉंग्रेस अध्‍यक्ष  सुभाषचंद्र बोस यांचे स्‍वागताप्रसंगी सरदार वल्‍लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु, आचार्य कृपलानी यांचे दुर्मिळ छायाचित्र या वास्‍तुत असून राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी येथे भेट देणार आहेत. राष्‍ट्रपतींच्‍या  भेटीप्रसंगी करण्‍यात आलेल्‍या  व्‍यवस्‍थेचा आढावा घेवून विभागीय आयुक्‍त  अनुपकुमार यांनी घेतला. त्‍यानंतर   विज्ञान केंद्र  येथेही राष्‍ट्रपती  भेट देणार आहेत.
 शिक्षा मंडळाचा शतकमहोत्‍सवी  समारंभ जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या प्रांगणात आयोजीत करण्‍यात आला आहे. येथे उभारण्‍यात आलेला भव्‍य सभा मंडप व सुरक्षेसंदर्भात करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था निमंत्रितांसाठी तसेच राष्‍ट्रपती  यांच्‍या  कार्यक्रमानिमीत्‍त दिल्‍लीहून येणा-या वरिष्‍ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्‍या  आसन व्‍यवस्‍थेचाही  आढावा त्‍यांनी घेतला. राष्‍ट्रपती  यांच्‍या आगमणाप्रसंगी  प्रोटोकॉलनुसार करावयाच्‍या  सुविधा  तसेच वाहतूक, दूरध्‍वनी, आवश्‍यक सुरक्षा  आदी व्‍यवस्‍थेबाबतही  माहिती देण्‍यात आली.
                                    सेवाग्राम आश्रमाला भेट
            राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  सेवाग्राम येथील महात्‍मा  गांधी यांच्‍या आश्रमाला भेट देणार असून आदि निवास, बापू कुटी तसेच परिसरातील पाहणी करुन महात्‍मा  गांधी  यांच्‍या दैनंदिन वापरातील वस्‍तुंची  पाहणी करणार आहेत. तसेच प्रार्थनेतही  सहभागी होणार आहेत. आश्रम परिसरात राष्‍ट्रपतींच्‍या  हस्‍ते  वृक्षारोपण करण्‍यात येवून  जिल्‍हा प्रशासनातर्फे  तयार करण्‍यात आलेल्‍या  सेवाग्राम विकास आराखड्याची  माहिती  राष्‍ट्रपतींना देण्‍यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्‍या  प्रयत्‍नांबाबतही  येथे जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना सादरीकरण करणार आहेत.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयंत मटकर तसेच सर्व पदाधिकारी राष्‍ट्रपतींचे  सुतमाला घेवून स्‍वागत  करतील व पुस्‍तकांची  भेट  देतील. यावेळी  राज्‍यपाल  सी. विद्यासागर राव, मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केन्‍द्रीय  भुपृष्‍ठ  वाहतूक मंत्री  नितीन गडकरी आदी राष्‍ट्रपतींच्‍या  समवेत उपस्थित  राहणार आहेत.
जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना व जिल्‍हा  पोलीस अधिक्षक अनिल पारस्‍कर यांनी राष्‍ट्रपतींच्‍या दौ-यानिमीत्‍त  प्रशासकीय  तसेच सुरक्षा व्‍यवस्‍थेसंबंधात केलेल्‍या  व्‍यवस्‍थेसंदर्भात  यावेळी  माहिती दिली.
सेवाग्राम आश्रम अभ्‍यागतांसाठी  बंद
            राष्‍ट्रपती  प्रणव मुखर्जी  बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी  सेवाग्राम आश्रमाला भेट देणार असून सुरक्षेच्‍या  दृष्‍टीने  सेवाग्राम आश्रम सकाळी  10 ते सायंकाळ पर्यंत अभ्‍यागतांसाठी  बंद राहील. परंतू  सकाळची प्रार्थना व त्‍यानंतर आश्रम परिसर अभ्‍यागतांना पाहता येईल. राष्‍ट्रपती महोदयांच्‍या आगमणाप्रसंगी केवळ सुरक्षेच्‍या कारणास्‍तव व अभ्‍यागतांना त्रास होवू नये म्‍हणून  बंद राहणार असल्‍याची  माहिती  आश्रम प्रतिष्‍ठाणचे  अध्‍यक्ष जयंत मटकर यांनी  यावेळी दिली.
                                                                00000000



                                               
                    राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बुधवारी आगमण

                                    शिक्षा मंडळाचा शताब्‍दी समारोह
                             सेवाग्राम आश्रमाला भेट

वर्धा, दि. 24 – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता  विशेष हेलीकॉप्‍टरने नागपूर येथून आगमण होत आहे.
राष्‍ट्रपती  दुपारी 14.30 वाजता बजाजवाडी येथे भेट देणार असून दुपारी 2.45 वाजता बजाज सायन्‍स सेंटर येथे आयोजीत प्रदर्शनाला भेट देवून पाहणी करणार आहेत. दुपारी 3.05 मिनीटानी जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या प्रांगणावर आयोजीत वर्धा शिक्षण मंडळाच्‍या शताब्‍दी समारोह कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी 4.10 वाजता सेवाग्राम आश्रमाकडे प्रयाण करतील. दुपारी 4.10 ते 4.25 पर्यंत सेवाग्राम आश्रमाला भेट देतील तसेच सामुहिक प्रार्थनेत सहभागी होतील. राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते वृक्षारोपण झाल्‍यानंतर  सेवाग्राम विकास आराखड्याची पाहणी करतील. दुपारी 4.25 वाजता सेवाग्राम आश्रम येथून हेलीपॅडकडे प्रयाण करतील व दुपारी 4.45 वाजता येथून विशेष हेलीकॉप्‍टरने नागपूरसाठी प्रयाण करतील.
                                                00000000
                           मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे
        बुधवारी आगमण
        वर्धा, दिनांक 24 – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे बुधवार दिनांक 26 नोव्‍हेंबर रोजी  नागपूर येथून दुपारी  2.15 वाजता विशेष हेलीकॉप्‍टरने आगमण होईल.
          राष्‍ट्रपती  यांच्‍या  वर्धा येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता बजाजवाडी येथे आगमण होईल. दुपारी 3.20 वाजता  बजाजवाडी येथून मा. राष्‍ट्रपती यांच्‍यासमवेत जी.एस.कॉमर्स कॉलेज येथील शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी  समारोहास उपस्थित राहतील. दुपारी 4.15 वाजता सेवाग्राम आश्रम येथे भेट देतील व दुपारी 4.45 वाजता भारतीय हवाईदलाच्‍या विशेष हेलीकॉप्‍टरने राष्‍ट्रपती  महोदयांच्‍या  सोबत नागपूरसाठी प्रयाण करतील.
                                              0000000
                                     केन्‍द्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री
                         नितीन गडकरी यांचे आगमण
          वर्धा,दि. 24 – केन्‍द्रीय भुपृष्‍ठ  परिवहन मंत्री   नितीन गडकरी यांचे दुपारी 2.15 वाजता विशेष हेलीकॉप्‍टरने वर्धा येथे आगमण होत आहे. दुपारी  3 वाजता शिक्षा मंडळाच्‍या शताब्‍दी समारोहास उपस्थित राहतील. दुपारी  4.20 वाजता येथून हेलीकॉप्‍टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

                                                  00000000

Thursday 20 November 2014

मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे आपल्याला माहित असायलाच हवं........
वर्तमान पत्राचे पान उघडल्यावर रोज काही ना काही मुलांच्या सोबत घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला वाचायला मिळतंय....आता तर... आपण हे सर्व दूरदर्शन वर लाईव पाहायला सुद्धा शिकलो आहोत...कधी मुलींची छेडछाड, कधी अपहरण कधी बलात्कार...तर कधी छोट्या अर्भकांना बेवारस सोडून देणं तर कधी मुलांच्या हक्कांविषयी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभ्यासपूर्ण केस स्टडीज...आणि कधी कधी तर एखादा आशेचा किरण ज्यात सर्वस्वी मुलांच्या संरक्षणाचा विचार करीत घेत असलेल्या भूमिकांचा वेध.....हे सर्व आपल्याला वाचायला आणि बघायला मिळत आहे. मुळातच आपल्या सर्वांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कसं विकसित करतो आहोत यावर बऱ्याचशा गोष्टी निर्भर आहेत.  आपण मोठी माणसे मुलांना काय समजतो ?  मुळात आपण मुलांना संरक्षित करण्यात आपली भूमिका स्पष्ट नसेल तर या आणि अशा प्रकारच्या शोषणाची मुलं बळी पडतात.  मुलांनी शोषणाचे बळी ठरू नये यासाठी जबाबदारी असते ती आपण सर्व मोठ्यांची ! मात्र मोठेच जर शोषण करीत असतील तर.....? तरीसुद्धा वेग वेगळ्या माध्यमातून मुलांचं संरक्षण करणाऱ्या व्यवस्थांची मदत घेत आपण मुलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा.
आजघडीला बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २००० आणि संशोधन २००६ नुसार यातील कलम २ (ट) नुसार मुलं म्हणजे वयाची १८ वर्षे पेक्षा कमी वयाची व्यक्ती असा केलाय याचा अर्थ मुल म्हणजे १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्व मोठ्यांनी पार पडायला हवी.
मुलांचं सर्व-प्रथम संरक्षण करणं ही जबाबदारी कुटुंबाची.  पण सगळ्याच कुटुंबात मुल सुरक्षित राहातच असं आम्हाला म्हणायचे नाही...तरी सुद्धा सर्वच कुटुंबात मुलं असुरक्षित असतात असं नाही.ज्या कुटुंबात मुलं सुरक्षित नाही त्या कुटुंबातून मुल शासकीय व्यवस्थेकडे सुरक्षिततेसाठी सोपवता येते.  म्हणजेच कुटूंब सक्षम  नसेल तर संरक्षणाची जबाबदारी शासनाची.  यासाठी मुलांच्या दृष्टीकोनातून सर्वांगाने मुलांच्या विकासाची भूमिका निभावणाऱ्या शासकीय यंत्रणांची मदत घेता येते आणि जेंव्हा या दोन्ही यंत्रणा संरक्षणासाठी सक्षम नसतील तेंव्हा सर्वस्वी जबाबदारी ‘समाजाची’ ठरते.  यासाठीच समाजमन तयार करणे आणि मुलांच्या सुरक्षितते साठी भूमिका जास्त संवेदनशीलपणे निभावणे गरजेचं आहे.
हे सर्व आताच सांगण्याची गरज का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे....बाल हक्कांची संहिता सर्व राष्ट्रांनी स्विकारून या वर्षी २५ वर्षे होत आहेत. २० नोव्हेंबर १९८९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने मुलांच्या अधिकाराविषयीच्या संहितेला मान्यता दिली होती. म्हणूनच २० नोव्हेंबर हा दिवस खऱ्या अर्थाने मुलांच्या अधिकाराचा दिवस ओळखला जातो.
मुलांच्या अधिकारांविषयी महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे, म्हणूनच सर्वच्या सर्व जिल्ह्यात मुलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी विविध यंत्रणा उपलब्ध आहेत.  या यंत्रणा समजून घेऊन या यंत्रणांच्या सहकार्याने आपल्याला काय उपाय योजता येतील याची माहिती आपल्या प्रत्येक संवेदनशील नागरिकांना माहित होणं आवश्यक आहे.  यासाठी आपल्या जिल्ह्यात ‘बाल कल्याण समिती’ ज्या मध्ये ५ सदस्यांचा समावेश असतो. ही समिती जिल्ह्यातील सर्व काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांबाबत मुलांच्या हिताचे निर्णय घेणारी यंत्रणा आहे.या समितीला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे अधिकार आहेत.  या समितीचे आपल्या जिल्ह्यातील सदस्य कोण आहेत.  त्यांच्यासमोर आपल्या जिल्ह्यातील बळीत, दुर्लक्षित, मोठ्या माणसांच्या शोषणाचे बळी ठरलेल्या सर्व मुलांच्या केसेस कलम ३२ (बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम ) नुसार कुणीही घेऊन जाऊ शकतो. या बाल कल्याण समितीने आठवड्यातून किमान ३ वेळा नियोजित वेळेत आणि दिवशी आपली कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मग शोध घ्या आपल्या जिल्ह्यात मुलांच्या संरक्षणासाठी  एव्हढी मोठी यंत्रणा कार्य करतेय कशी ? बाल कल्याण समिती चांगले काम करत असल्यास त्यांना सोबत करा, आणि करत नसल्यास त्यांना कामाला कसं लावता येईल हे पहा....! यंत्रणा माहित नाही म्हणून मुलांना असुरक्षित वातावरणात ढकलण्याचा किंवा ठेवण्याचा आपल्याला काहीएक अधिकार नाही. आणि हो...ही यंत्रणा आपल्या जिल्ह्याच्या बालगृहात / निरीक्षण गृहात बसत असते हे लक्षात असू द्यात....म्हणजे काम करणे सोप्पं होईल.
बाल कल्याण समितीच्या सोबतच आपल्या जिल्ह्यात बाल न्याय मंडळ कार्यरत आहे का ते पहाच ! या बाल न्याय मंडळाकडे गुन्ह्याचं कृत्य केलेल्या विधि संघर्ष ग्रस्त मुलांना पोलिस उभं करतात.  या बाल न्याय मंडळात ३ सदस्य असतात.  हे तीनही सदस्य खंडपीठ म्हणून विधि संघर्ष ग्रस्त मुलांसाठी निर्णय घेतात. विधि संघर्ष ग्रस्त मुलांना खरं तर कलम १२ नुसार पोलिस, पोलिस ठाण्यातच जामीन देऊ शकतात. या मुलांना संरक्षित करणं तेवढच महत्वाचे आहे.
याच सोबत आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ बाल मजुरी निर्मुलन कृती दल’ स्थापण्यात आले आहे का ? याची माहिती घ्या, असल्यास या कृती दलाचे कोण सदस्य आहेत त्यांची नाव जवळ ठेवा. जेणेकरून जिल्ह्यात बालमजुरी निर्मुलनासाठी आपला कृतीशील सहभाग राहील हे आवश्यक.. यासाठी की  मुलांची पिळवणुकीतून आणि आर्थिक शोषणातून मुक्तता करणं ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.  या कृती दलात आपणही सहभागी होऊ शकता हे लक्षात असू द्यात...

आपल्या जिल्ह्यात ‘विशेष बाल पोलिस पथक’ आणि जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘बाल कल्याण अधिकारी’ यांची नियुक्ती झालेली आहे का. याचीही खातरजमा आपण करून घ्यायला हवी. नियुक्ती झाली असल्यास या यंत्रणांची मदत घ्यायला हवी. नियुक्ती झाली नसल्यास यासाठी संबंधितांकडे आग्रह धरावयास हवा. आपल्या जिल्ह्यात ‘जिल्हा बाल संरक्षण कक्ष’ ज्या मार्फत मुलांच्या संरक्षणाची यंत्रणा आपल्याला सदैव मदत करण्यास उपलब्ध आहे. या किमान गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात या केवळ त्वरित उपलब्ध यंत्रणेविषयी आपण माहिती घेतली या यंत्रणांची मदत घेत नक्कीच आपण मुलांच्या सुरक्षिततेबद्दल प्राधान्य देऊ शकतो...न्हवे,,,,ते आपण द्यायला हवं...नाहीतर मुलांची पीढी आपल्याला कधीही माफ करणार नाही....तेंव्हा आताच ही माहिती करून घेत कामाला लागूयात.....