Saturday 21 January 2012

दिवाणी न्‍यायालयांच्‍या आर्थिक अधिकार क्षेत्रात वाढ


     वर्धा,दि.21- मुंबई दिवाणी न्‍यायालये अधिनियम 1869 मध्‍ये महाराष्‍ट्र शासन राजपत्र 30 डिसेंबर 2011 नुसार सुधारणा करण्‍यात येवून दिवाणी न्‍यायालयांच्‍या दाव्‍यांच्‍या संदर्भातील अधिकार क्षेत्रात वाढ करण्‍यात आलेली आहे.
     सदर सुधारीत अधिनियमाची अंमलबजावणी 16 जानेवारी 2012 पासून संपूर्ण राज्‍यात केली जात आहे. सुधारीत अधिनियमा नुसार दिवाणी न्‍यायालय (कनिष्‍ठ स्‍तर)येथे एक लाखा पर्यंतच्‍या चालणा-या दाव्‍याची आर्थिक अधिकार क्षेत्राची वाढ पाच लाख रुपयापर्यंत वाढविण्‍यात आलेली आहे. त्‍याचप्रमाणे जिल्‍हा न्‍यायालयात चालणा-या दिवाणी दाव्‍याच्‍या अपीलांची आर्थिक अधिकार क्षेत्रात वाए करण्‍यता येवून ते दोन लाखावरुन दहा लाख रुपया पर्यंत करण्‍यात आलेली आहे. व ज्‍या दिवाणी न्‍यायाधीश, कनिष्‍ठ स्‍तर यांचेकडे चालणा-या प्रकरणाची वाद विषयाची रक्‍कम एक लाख रकमे पर्यंत असेल त्‍यांना पाच लाख रुपया पर्यंत दाव्‍याची आर्थिक मर्यादा राहील. ज्‍यांची दहा वर्षापेक्षा कमी नोकरी नसेल आणि ज्‍यांचया बाबतीत उच्‍च न्‍यायालयांनी विशेश शिफारस केली असेल अशा कोणत्‍याही दिवाणी न्‍यायाधीश, कनिष्‍ठ स्‍तर श्रेणीच्‍या न्‍यायालयांना आर्थिक अधिकर क्षेत्र एक लाख पननास हजार ऐवजी सात लाख पन्‍नास  हजार रुपया पर्यंत आर्थिक अधिकार क्षेत्राची मर्यादा राहील.
    ज्‍या दाव्‍यांच्‍या वाद विषयाची रक्‍कम पाच लाख रुपयापर्यंत आहे असे दावे दिवाणी न्‍यायालय, वरिष्‍ठ स्‍तर येथून दिवाणी न्‍यायालय, कनिष्‍ठ स्‍तर ह्यांचेकडे वग्र करावे लागणार आहे.
    या आधी जिल्‍हा नयायालयामध्‍ये दोन लाख रुपया पर्यंतची अपील चालविण्‍यात येत होती व त्‍यावरील अपील हे उच्‍च न्‍यायालयात दाखल करावे लागत होते. परंतू आता नविन अधिनियमानुसार जिल्‍हा न्‍यायालय हे 10 लाख रुपयापर्यंत अपील चालवू शकतील. असे प्रबंधक, जिलहा व सत्र न्‍यायालय, वर्धा कळवितात.

भविष्‍य निवार्ह निधीची माहिती वेबसाईटवर


    वर्धा, दि.21- सर्व राज्‍य शासकीय कर्मचा-यांच्‍या सन 2010-11 या वर्षाच्‍या भविष्‍य निर्वाह निधीच्‍या पावत्‍या प्रधान लेखाकार कार्यालयातर्फे वेबसाईटवर अपलोड करण्‍यात आल्‍या आहेत.
      कर्मचारी किंवा आहरण व संवितरण अधिकारी वर्गणीदाराचा जन्‍मदिनांक, GPF Series   आणि खाते क्रमांक नोंदवून भविष्‍य निर्वाह निधी खात्‍याबाबतची माहिती वेबसाईटवर पाहू शकतात.
     ही माहिती पुढील वर्षाच्‍या जमा रकमा अपलोड होईपर्यंत संपूर्ण वर्षभर पाहता येईल. सक्षम प्राधिका-यांनी वर्गणीदारास भविष्‍य निर्वाह निधी खात्‍यातून अग्रिम मंजूर करताना कर्मचा-यांच्‍या वैयक्तिक खात्‍यातील जमा रक्‍कम पाहता येईल. जर एखाद्या कर्मचा-यास भविष्‍य निर्वाह निधीची वार्षिक स्‍लीप प्राप्‍त झाली नसेल तर, अशा कर्मचा-यास वरील वेबसाईटवरुन त्‍याची प्रत घेण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे.
     http://agmaha.cag.gov.in  या  वेबसाईटवर उपरोक्‍त माहिती उपलब्‍ध असून सर्व आहरण व संवितरण अधिकारी व सर्व वर्गणीदारांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा.
              सदर शासन परिपत्रक महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर  उपलब्‍ध  करण्‍यात आला असून त्‍याचा संगणक सांकेतांक 20111130153621001 असा आहे. हा शासन निर्णय सामान्‍य प्रशासन विभागाचे उपसचिव पां.जो. जाधवयांच्‍या स्‍वाक्षरीने निर्गमित झाला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून २०१२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच विभाजनांमुळे व नव्याने अस्तित्त्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : ५/१/२०१२ (गुरुवार)

मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम १९५९ मधील नियम ७ पोट नियम १ अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियम (२) नुसार नमुना अ अ मधील निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक : १६/१/२०१२ (सोमवार)

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना-अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) : २४/१/२०१२ (मंगळवार) ते ३०/१/२०१२ (सोमवार) पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) : ३१/१/२०१२ (मंगळवार) सकाळी ११ पासून

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) : २/२/२०१२ (गुरुवार), सकाळी ११ ते दुपारी ३

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ : २/२/२०१२ (गुरुवार) दुपारी ३ नंतर

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक : १४/२/२०१२ (मंगळवार), सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत

मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील. : १५/२/२०१२ (बुधवार)

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक : १७/२/२०१२ (शुक्रवार)

Friday 20 January 2012

वाहनांची वाढ आणि विकासाला खीळ .. !


वाढलेली वाहनसंख्‍या पर्यावरणाचे संकट निर्माण करणारी नसून, त्‍याचा परिणाम अपघातांमधील प्राणहानी व वित्‍तहानी पर्यंत वाढलाय. पार्किंग आणि अपू-या रस्‍त्‍यांची समस्‍या निर्माण झालेली आपणास दिसते. यासोबत इंधनापोटी मोठया प्रमाणावर विदेशी चलन खर्च करावे लागते. या सर्वांचा एकत्रित परिणाम विकास प्रक्रियेवर होत असल्‍याने याबाबत जागरुक होण्‍याची वेळ आता आली आहे.
               -प्रशांत दैठणकर


    गेल्‍या 2 दशकांमध्‍ये वाहन संख्‍या वाढल्‍याने विविध समस्‍यांची एक साखळीच समोर आली आहे. यात जितका मोठा धोका पर्यावरणाला आहे तितकाच मानवी आयुष्‍याला आहे. वाहनांमुळे होणारे अपघात त्‍यात होणारी प्राणहानी तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी वित्‍तहानी यासोबत जागेच्‍या टंचाईची अर्थात पार्कींगची समस्‍या देखील या वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने निर्माण झाली आहे.

वाहन संख्‍येत होणारी ही वाढ इतकी प्रचंड आहे की, त्‍यामुळे जागा कमी पडायला लागली आहे. कधी काळी मोकळे-मोकळे असणारे रस्‍ते आता मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण करुन चार व सहापदरी केले तरी अल्‍पावधीत ते रस्‍ते देखील वाहतुकीने ओव्‍हर-फ्लो होत असल्‍याचं चित्र आहे.

रस्‍त्‍यांवर होणारे पार्कींग ही शहरी भागातली मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनांसाठी पार्किंग हवे म्‍हणून घरांच्‍या बांधकामाची पध्‍दत बदलून गेली. याचा परिणाम मुलांना खेळायला देखील जागा न मिळणे, पादचा-यांना रस्‍त्‍यावरुनच चालावे लागणे आदी प्रकार दिसत आहेत. अपरिहार्य व्‍यवस्‍था म्‍हणून आता महानगरांमधून खास पार्कींगसाठी इमारती बांधण्‍याची वेळ आली आहे.

वाढलेल्‍या वाहन संख्‍येचा आणखी एक तोटा म्‍हणजे वाहतुकीची होणारी कोंडी वाहनांच्‍या गर्दीत आपलेच वाहन पुढे दामटण्‍याचा प्रयत्‍न प्रत्‍येकजण करताना दिसतो. महानगरात सिग्‍नलवर संथपणे रांगणा-या कारच्‍या रांगांचे चित्र नवे नाही. 2008 साली चीन ऑलिम्पिकच्‍या वेळी वाहनांच्‍या कोंडीमुळे हजारो वाहन धारकांना तब्‍बल 28 तासांपर्यंत वाहनात अडकून रहावे लागले होते. या प्रकारे लाखो-करोडे मनुष्‍य तास केवळ वाहतुकीच्‍या कोंडीमुळे आपल्‍याही देशात वाया जाताना दिसतात.


वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने आणखी वाढ झाली ती रस्‍त्‍यांवर होणा-या अपघातांमध्‍ये गेल्‍या वर्षभरात रस्‍ते अपघातात दीड लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आणि दरवर्षी ही संख्‍या वाढतेय. सोबत जे अपघातात जखमी होतात आणि अपंग होतात त्‍यांचे आयुष्‍य देखील उर्वरित काळ संकटच बनलेले दिसते. वाहनांच्‍या अपघातात प्राणहानी सोबतच मोठ्या प्रमाणावर वित्‍त हानी देखील होते. ही वाहने अपघातात नष्‍ट झाल्‍याने देखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो.

     भारतात वाढलेल्‍या वाहनसंख्‍येचा परिणाम विदेशी मुद्रेवर देखील झालेला आहे. आपण जे क्रूड तेल वापरतो त्‍या तेलाच्‍या बाबतीत आपला देश स्‍वयंपूर्ण नाही. यामुळे मुल्‍यवान विदेशी मुद्रा खर्च करुन आपण ते खरेदी करीत असतो. लोकसंख्‍या वाढीइतकीच वाहन संख्‍या वाढीची ही समस्‍या गंभीर आहे.

    छोट्या गावांमध्‍ये आणि नगरांमध्‍ये वाहनवृध्‍दीचा ताण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांवर झालेला आहे. अपुरे रस्‍ते ही समस्‍या तर आहेच सोबतच वाहनाचे अवागमन वाढलयाने जून्‍या पध्‍दतीच्‍या पध्‍दतीच्‍या रस्‍तयांवर प्रचंड खड्डे पडलेले दिसतात. या रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीपायी इतर सुविधांचा पैसा खर्च होतो परिणामी विकासाची गती कमी होवुन जाते.

     रस्‍त्‍यांची भारवहन क्षमता आणि एकूणच उपलब्‍धता यामुळे आता रस्‍त्‍यांवरुन जाण्‍यासाठी टोल देण्‍याची पाळी ही याच वाढलेल्‍या वाहन संख्‍येमुळेच आलीय. याला कितपत चालना द्यायची की यावर नियंत्रण हवे यावर चर्चा होणे ही आता काळाची गरज झाली आहे.

- प्रशांत दैठणकर

साद ही वसुंधरेची .. !

बाजारपेठ आणि खुली अर्थव्‍यवस्‍था आल्‍यानंतर भौतिकवाद व स्‍वामित्‍वाच्‍या भावनेतून गेल्‍या दशकात वाहन संख्‍या प्रचंड वाढली. परिणामी प्रदूषण आणि पर्यावरण अशी संकटांची मालिका उभी राहिली. या समस्‍येतून अनेक समस्‍यांची रांगच आता समोर आली आहे. याबाबत हा आढावा.
      -प्रशांत दैठणकर

      गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्रदूषणाचे वाढते प्रमाण आपल्‍यासाठी चिंतेचा विषय बनलाय. दिसवसेंदिवस जगाची लोकसंख्‍या वाढत आहे. या लोकसंख्‍येच्‍या गरजेनुसार ज्‍यावेळी संसाधनांचा वापर सुरु झाला त्‍याचवेळी पर्यावरणाची हानी आणि प्रदूषणात वाढ अशी दुहेरी समस्‍या निर्माण झाली. यात सर्वच प्रकारच्‍या प्रदूषणाचा आपल्‍या सर्वांच्‍या जगण्‍यावर होत असून, पर्यावरणाची हानी देखील प्रचंड अशीच आहे.

सध्‍या शहरांमधून ध्‍वनी आणि वायू प्रदूषणाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. बाजारपेठ अर्थव्‍यवस्‍था आपण स्‍वीकारली त्‍यानंतर त्‍याच्‍या दुष्‍परिणामांपैकी एक अर्थात मूबलक पैसा. या मूबलक पैसा आणि विक्रीच्‍या स्‍पर्धेत वाहन कंपन्‍यांनी मानवी मनातील स्‍वामित्‍वाच्‍या भावनेला साद घाल आपली उत्‍पादनं विकली. त्‍यात माझं स्‍वतःचं, व्‍यक्‍तीगत वाहन घेण्‍याची हौस आणि त्‍याच प्रमाणात होणारा आर्थिक पुरवठा यामुळे वाहन संख्‍येत गेल्‍या 15-20 वर्षांमध्‍ये झपाट्याने वाढ झाली.

या वाढत्‍या वाहनसंख्‍येच्‍या समस्‍येने एका नव्‍याच समस्‍यांच्‍या मालिकेला जन्‍म दिला. यात पहिले पेट्रोल आणि डिझेल यांचे मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. ज्‍याचा दरवाढ होण्‍यावर तर परिणाम झालाच सोबतच महागाई वाढण्‍यास ही दरवाढ कारणीभूत ठरली. याचा सर्वच भारतीयांच्‍या जीवनावर परिणाम झालेला दिसतो.

दुस-या बाजूला या वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने पर्यावरणाचे संकट निर्माण केले. पेट्रोल-डिझेल हे जीवाश्‍य इंधन आहे. त्‍याचे साठे संपण्‍याचा धोका वाढला. इंधन वहन करुन नेणारी जहाज समुद्रात कलंडून समुद्री जीवसृष्‍टी आणि समुद्री पर्यावरण यालाही धोका सुरु झाला.

या वाहन संख्‍येचा आणखी आणि सर्वात मोठा तोटा अर्थातच प्रदूषण. वाहने ध्‍वनी तसेच वायू प्रदूषणात भर पाडत आहे. वाहनातून इंधनाचे ज्‍वलन होवून जे घातक वायू बाहेर पडतात त्‍यात कार्बन मोनोक्‍साईड मानवी शरीराला हानीकारक आहे. याने श्‍वसन संबंधित विकारांमध्‍ये गेलया दशकात वाढ झाली. त्‍यासोबत आपणाला ध्‍वनी प्रदूषणाचा त्रास देखील खूप वाढलेला जाणवतो. हमरस्‍त्‍यालगत घर असणे पूर्वी मानाचं होतं पण या प्रदुषणामुळे ते ताणाचं बनलय.


आपणास ध्‍वनीप्रदूषणाचा व वायूप्रदूषणाचा जितका त्रास होतो. त्‍याही पेक्षा अधिक त्रास नव्‍या पिढीला, लहान बालकांना आणि रुग्‍ण व्‍यक्‍तींना होतो . वाहनातून वायू उत्‍सर्जन किती असावा याची मानकं शासनानं ठरवली पण त्‍याला न जुमानण्‍याची वृत्‍ती सर्वांच्‍या ठायी आहे परिणामी ही समस्‍या वाढतच आहे.

सततच्‍या वाहतूकीने शहरी भागात ऑक्‍सीजनचे प्रमाण घटलेले आहे. याचा परिणाम रोग प्रतिकारशक्‍ती कमी होण्‍यावर देखील होतो. पर्यावरणाच्‍या नावाने एखादा दिवस नो व्‍हेईकल डे करणा-या मंडळींना या समस्‍येचे गांभीर्य जाणून अधिक सजगपणे कृती करावी लागेल ही धरा, वसुंधरा सुंदर राखायला इतकं आपण करायलाच हवं.
                                                  प्रशांत दैठणकर

25 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस

वर्धा,दि.20- भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2012 हा दिवस राष्‍ट्रीय मतदार दिवस म्‍हणून साजरा करण्‍याचे निश्‍चीत केले आहे. त्‍यानुसार येत्‍या 25 जानेवारीला प्रत्‍येक मतदान केंद्राच्‍या ठिकाणी राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे.

सदर कार्यक्रम मध्‍यवर्ती मतदान केंद्राच्‍या ठिकाणी किंवा परिसरातील शाळा, महाविद्यालय, समाज मंदीर, सार्वजनिक सभागृह आदीमध्‍ये आयोजित केला जाणार आहे. त्‍यात नव्‍याने नोंदणी झालेले सर्व नवीन मतदार, त्‍यांचे पालक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, कार्यकर्ते, स्‍थानिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, प्राध्‍यापक, शिक्षक व कर्मचारी, त्‍या भागातील नागरीक यांना निमंत्रित केले जाणार आहे.


यात नव्‍याने नोंदणी करण्‍यात आलेल्‍या मतदारांना आमंत्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्व उपस्थित नवीन मतदारांना प्रतिज्ञा दिली जाणार आहे. नवीन मतदारांना याच कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र व बिल्‍ले वाटप केले जाणार आहे. मतदार नाव नोंदणी व मतदान याविषयी उपस्थित मान्‍यवरांव्‍दारे मार्गदर्शन केले जाणार आहे. मतदारांना मतदार यादीचे भाग या ठिकाणी दाखविले जातील.

 जनजागृतीकरीता महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्‍ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी, स्‍वयंसेवी संस्‍था आदींची प्रभातफेरी, दौड, सायकल रॅली अशा कार्यक्रमाचे आयोजन आठवडाभर केले जाणार आहे. पथनाट्य, लोककला, लोकनृत्‍य इत्‍यादी कार्यक्रमाव्‍दारे ही मोहीम यशस्‍वी करण्‍याचे प्रयत्‍न शासन व निवडणूक विभागाव्‍दारे सुरु झाले आहे.
 स्‍वातंत्र्यानंतर दुस-यांदा प्रत्येक मतदान केंद्रावर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करुन मतदारांना व नवीन मतदारांना लोकशाही प्रक्रियेतील त्‍यांच्‍या सहभागाबद्दल, जबाबदारीची जाणीव करुन देण्‍याचा हा प्रयत्‍न राहणार आहे. असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी, वर्धा कळवितात.

प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरु करणेसाठी इच्‍छुक पंजीबध्‍द संस्‍थांकडून अर्ज आमंत्रित


   वर्धा,दि.20–शैक्षणिक वर्श 2012-13 करीता महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परीक्षा मंडाळामार्फत संगणक, पॅरा-मेडीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्टि्कल, मेकॅनिकल, सिव्हिल, अॅग्रीकल्‍चर, ऑटोमोबाईल, केमिकल, इन्‍स्‍टुमेंटेशन, आहार, टेक्‍सटाईल, भाषा, खेळ, सौंदर्यशास्‍त्र, मुद्रण, चर्मकला (लेदर), वाणिज्‍य, हस्‍तकला, अपारेल, कला, मासमेडीया, टुरिझाम, हॉस्‍पीटॅलिटी, जेम अॅण्‍ड ज्‍वेलरी, एव्‍हीएशन, म्‍युझीक, परफॉर्मींग आर्ट तसेच इतर गटातील 6 महिने, 1 व 2 वर्ष कालावधीचे एकूण 1090 अभ्‍यासक्रमामधील प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरु करणेसाठी अर्ज मागविण्‍यात येत आहेत. तरी इच्‍छुक  संस्‍थांनी खालील नमूद कालावधीत अर्ज करावा.
     विलंब शुल्‍कासह अर्ज विक्री स्विकृती दि. 1 जानेवारी 2012 ते 31 जानेवारी 2012 पर्यंत राहील. अर्जासहित माहितीपुस्तिका, अभ्‍यासक्रमाची यादी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे मिळेल. माहिती पुस्तिकेची किंमत रुपये 500 आहे. अर्ज व माहिती पुस्तिका मंडळाचे संकेत स्‍थळावर  www.msbve.gov.in  आहे. इच्‍छूक संस्‍था सदरचा अर्ज व माहिती पुस्तिका संकेत स्‍थळावरुन डाऊनलोड करु शकता. तथापि सदरचा अर्ज जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे जमा करताना रु. 500 इतकी रक्‍कम दिलेल्‍या लेखाशिर्षामध्‍ये कोषागारात भरल्‍याची चलन प्रत अर्जासेाबत जमा करावी लागेल.
    संबंधित इच्‍छूक संस्‍थांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा अपूर्ण अर्ज स्विकृत केला जाणार नाही, याची नोंद घ्‍यावी. मुंबई साव्रजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 अथवा संस्‍था नोंदणी अधिनियम 1860 नुसार नोंदणी प्रमाण, चलन (प्रक्रिया शुल्‍काबाबत) प्रत, बँक बॅलन्‍स प्रमाणपत्रा, एमओयु, करारपत्र, संमतीपत्र, संस्‍था ठराव प्रत, जागेसंबंधी जागा भाउेची असल्‍यास आवश्‍यक ती भाड्याचे जागेची करारपत्र (दुरूयम निबंधकाकडे नोंदणीकृत) प्रत अथवा जागा संस्‍थेच्‍या मालकीची असल्‍यास संस्‍थेच्‍या नावाने असलेला 7/12,8अ,प्रापर्टी कार्ड चा अद्ययावत उतारा अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे.अधिक माहितीसाठी  जिल्‍हा व्‍यवसाय विभाग व प्रशिक्षण अधिकारी,वर्धा यांचेशी संपर्क साधावा.

वाहन चालविण्‍याच्‍या अनुज्ञप्‍तीतील निवासाचा पुरावा ग्राह्य धरु नये


     वर्धा, दि.20- परिवहन विभागाकडून देण्‍यात येणारी वाहन चालविण्‍याची अनुज्ञप्‍ती ही त्‍या अनुज्ञप्‍ती धारकास केवळ वाहन चालविण्‍यास सक्षम असल्‍याचे प्रमाणपत्र असते. वाहन चालकांनी वाहन चालवितांना अनुज्ञप्‍ती जवळ बाळगणे आणि सक्षम अधिका-यांनी मागितल्‍यावरुन ती तपासणीसाठी सादर करणे आवश्‍यक आहे. मात्र वाहन चालविण्‍याची अनुज्ञपती मात्र ही त्‍या व्‍यक्‍तीचा किंवा कुटूंबाचा निवासाचा पुरावा इतर कोणत्‍याही पुराव्‍यासाठी ग्राह्य धरण्‍यात येऊ नये. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी कळविले आहे.

हिंगणघाट येथे पर्यावरण पुरक बुध्‍दीबळ स्‍पर्धेचे आयोजन


     वर्धा, दि. 20- पर्यावरण पुरक खेळाडूवृत्‍ती  वाढीस लागण्‍यासाठी णाडे लावा व झाडे जगवा हा संदेश युवकांमध्‍ये जोपासला जावा  यासाठी हिंगणघाटच्‍या निसर्ग वेध मित्र मंडळांनी पर्यावरण पुरक बुध्‍दीबळ स्‍पर्धेचे आयोजन 22 जानेवारी 2012 रोजी श्रीमती शोभाताई झोटींग महिला कनिष्‍ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे करण्‍यात येणार आहे.

     भारतीय गणराज्‍य दिनाचे औचित्‍य साधून हा कार्यक्रम घेण्‍यात येत आहे. पर्यावरण पुरक बुध्‍दीबळ स्‍पर्धेची सुरुवात सकाळी 8 वाजता पासून सुरु होणार आहे. यासाठी स्‍पर्धकांनी शक्‍यतो स्‍वतःचे चेसबोर्ड आणावीत. या स्‍पर्धेचा बक्षिस वितरणाचा काय्रक्रम 26 जानेवारी 2012 रोजी होईल. स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी सहयोग निधी एकतीस रुपये आहे.

    बुध्‍दीबळ खेळाडूंनी अधिक माहितीसाठी हिंगणघाट येथील विदर्भ वेध मित्र मंडळाचे अध्‍यक्ष अड. सागर एस.हेमके यांच्‍याशी संपर्क साधावा.

Thursday 19 January 2012

मुलींना द्या आत्मसंरक्षणाचे शिक्षण.. !



  महिलांची व मुलींची छेडछाड करणारे अनेक चिडीमार समाजात वावरताना दिसतात. मुलींना समाजात सुरक्षितपणानं रहायला समाज सुसंस्कृत होणं जितकं गरजेचं आहे तितकीच सिध्दता महिलांनीही करुन आत्मसंरक्षण शिकलं पाहिजे.                                                -प्रशांत दैठणकर
    
     आपण वर्तमानपत्र उघडल्यावर रोज महिलांवर अत्याचार आणि मुलीची छेडछाड झाल्याच्या बातम्या वाचतो अद्यापही समाज पूर्णपणे सुसंस्कृत झालेला नाही गुन्हेगारी वृत्तीने फिरणा-या संकटांमुळे महिला व मुलींना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो. यात बदल व्हावा यासाठी समाज या नात्याने आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच समाज सुधारेल या अपेक्षेवर न राहता महिला व मुलींनी आत्मसंरक्षण तंत्र शिकलेच पाहिजे.
     आपण आपल्या संरक्षणासाठी सज्ज राहणं खूपच चांगलं अनेक प्रकारात भितीपोटी मुली बोलत नाहीत. शाळेतील विद्यर्थी किंवा शाळेतून जाताना-येताना कुणी त्रास देत असेल तर ते मुलींनी पालकांना जरुर सांगावे. समस्या निर्माण झाल्यावर त्वरित उपाय योजना केल्यास पुढे मोठी होणारे संकट आपण टाळू शकतो.
     अनेक ठिकाणी शाळांमधून शिक्षक मुलीची छेड काढतात अशा घटना घडल्या आहेत. आपण आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला तरच पाल्य अशा गोष्टी आपणास सांगतील याची जाणीव आपण ठेवावी.
     वयात येणा-या अर्थात किशोरवयीन मुलींना अनेक समस्यांना एका वेळी सामोरं जावं लागतं. या काळात ज्युदो, कराटे, किंवा ताइक्वोंदो अशापैकी एक मार्शल आर्ट शिकविल्यास त्यांना स्वत:चे रक्षण करता येईल या प्रकारच्या आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण आपण जबाबदारीने जरुर द्यावे. शाळांनीही अशा प्राकरचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
     महिलांनी सुरक्षेसाठी आपल्या पर्स मध्ये काळया मि-यांची पावडर ठेवण्याची पध्दत पाश्चात देशात आहे. अशा पावडरचे स्प्रे बाजारात उपलब्ध असतात बहुतप्रसंगी संकटात या स्प्रेचा वापर होतो असं अनेकदा सिध्द झालेलं असल्याने तसा सुरक्षेचा उपाय जरुर करावा.
     महिलांवर केवळ छेडखानी अर्थात चिडीमारीसाठी हल्ला होतो असे नाही. झटपट श्रीमंत होण्याच्या नादापायी दागिने पळविणारे गुन्हेगार देखील हल्ला करतात. सार्वजनिक ठिकाणी आपल्या सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करु नका असा कितीही सल्ला दिला तरी महिलावर्गाला दागिन्यांची आवड असते त्यामुळे मोठया प्रमाणावर चेन स्नॅचिंग चे प्रकार हल्ली घडताना दिसतात तो दागिना महत्वाचा की आपण महत्वाचे याचाही विचार महिलांनी जरुर करावा.
     मोठं महानगर असो अथवा छोटं खेडं, प्रत्येक ठिकाणी ही समस्या कायम दिसते. त्यामुळे मुली व महिलांनी आत्मसंरक्षण जरुर जरुर शिकावं
   -प्रशांत दैठणकर

हक्क मतदानाचा अन् कर्तव्य नोंदणीचे.. !

नविन मतदार नोंदणीसाठी जनजागृती व्हावी या करिता निवडणूक आयोगातर्फे 25 जानेवारी रोजी मतदार दिवस निश्चित करण्यात आला आहे त्याबाबतचा हा खास लेख
                                                  -प्रशांत दैठणकर

     भारतीय संविधानाने भारतात जन्मलेल्या आणि वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा मुलभूत अधिकारी दिला आहे. 120 कोटी लोकसंख्येचा आपला देश जगातली सर्वात मोठी लोकशाही चालविणारा देश आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांच राज्य अशी लोकशाहीची संकल्पना आहे. त्यात सर्वाधिक महत्वाचा ठरतो तो मतदार. या मतदारांनीच आपला देश कोणी चालवायचा याचा निर्णय घ्यायचा असतो आणि लोकप्रतिनिधी निवड ही मतदार म्हणून तुम्ही-आम्ही करायची असते.
     भारतीय संविधानानुसार जो मूळ रचना आहे त्यानुसार थेट लोकांमधून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी संसदेत जातात. संसदेत लोकप्रतिनिधींची दोन सभागृहे आहे. यात लोकांनी मतदानाने निवडून द्यायचे सभागृह हे लोकसभा असून राज्यांमधील लोकांतर्फे निवडलेल्या प्रतिनिधींनी निवडलेले सदस्य राज्यसभेत बसतात ही संसद हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. लोकांच्या समस्या इथं मांडल्या जातात व यात कायदे करणे तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करणे आदी कामकाज होते.
     यापैकी लोकसभेत 547 प्रतिनिधी असतात या संख्येच्या निम्म्याहून अधिक सदस्य ज्या राजकीय पक्षाचे असतात त्या पक्षाने आपला नेता पंतप्रधान म्हणून निवडायचा असतो. हा पंतप्रधान मग मंत्रीमंडळाची निवड करतो. या व्यवस्थेला आपण सत्ताधारी म्हणतो.
     संसदेतर्फे करण्यात आलेल्या कायद्यांवर आधारित न्याय निवाडा करण्याचे काम न्याय पालिका करते. सर्वात ज्येष्ठ असे सर्वोच्च न्यायालया त्याच्या अधिपत्याखाली उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये अशी व्यवस्था असणारी न्यायपालिका हा लोकशाहीचा दुसरा स्तंभ होय.
     देशाचे शत्रू देशांपासून रक्षण तसेच अंतर्गत सुरक्षा आणि प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अशी जबाबदारी संरक्षण दलांची असते ही संरक्षण दले हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ होय. समुद्री सैन्य अर्थात नौदल, हवाई दल आणि जमीनीवर लष्कर अशी तीन अंगे या संरक्षण दलांमध्ये आहेत.
     या सर्व तीन स्तंभाची जबाबदारी राष्ट्रप्रमुख या नात्याने राष्ट्रपतीवंर असते. लोकप्रतिनिधी निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती भारत निवडणूक आयोगातर्फे होते ही स्वायत्त यंत्रणा असून याच्या कामावर सरकारचे नियंत्रण अथवा हस्तक्षेप होत नाही.
     निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली की भारतातील सर्व भारतीय शासकीय कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. ज्या पध्दतीने राज्यात आमदार निवडले जातात जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यामध्येही निवडणूका होतात. नगरपालिका, महानगरपालिका यांचेही प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात.
     लोकशाहीत सर्वच टप्प्यांवर या सर्वांमुळेच मतदार महत्वाचा आहे हे जाणून वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्वांनी मतदानाच्या हक्कासाठी मतदार म्हणून नोंदणीचे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे.
- प्रशांत दैठणकर       

हत्तीरोग दूर राखणंच चांगलं.. !

डासांमुळे प्रसार होतो अशा रोगांपैकी एक रोग म्हणजे हत्तीरोग होय. या रोगांमुळे प्राण जात नसले तरी मोठया प्रमाणावर विद्रुपता येत असते. जगातील 12 कोटींहून अधिक जणांना हा रोग झालेला आहे. हत्तीरोग दूरीकरण मोहिमे अंतर्गत जानेवारीच्या तिस-या आठवडयात राज्याच्या 17 जिल्ह्यांमध्ये एक दिवसाच्या सामुहिक औषधोपचार दिवस आयोजित करण्यात येतो याबाबत हा खास लेख
 -प्रशांत दैठणकर


डासांमुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार होतात. डास हे रक्त शोषून घेतात. त्यांच्या दंशाच्यावेळी त्यांच्या पोकळ दंशिकेमुळे रागांचे विषाणू थेट रक्तात शिरत असल्यामुळे डासांना दूर ठेवणे गरजेचे आहे. डास ज्या आजारांचा प्रसार करतात मलेरिया अर्थात हिवतापाचे प्रमाण अधिक आहे. या खेरीज डेंग्यू सारखा घातक आजार देखील डासांमुळे होतो. हे दोन्ही आजार प्राणघातक ठरु शकतात. तुलनेत कमी तीव्रतेचा पण शरीराला बेढव करणारा हत्ती रोगासारखा आजारही डासांमुळे पसरतो.
     अगदी पाचव्या शतकापासून हत्तीरोग झाल्याच्या नोंदी आपणास सापडतील या रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होत असतो. जगात हत्तीरोगाची तब्बल 12 कोटीहून अधिक जणांना लागण झाली आहे. साठलेले, तुंबलेले पाणी तसेच ढुबके यातून या क्युलेक्स डासांची संख्या वाढत असते.
     पाय खूप मोठया प्रमाणात सुजणे, वारंवार ताप येणे, पुरळ, खाज आणि अंडवृध्दी ही या हत्तीरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराने मोठया प्रमाणात विकृती येते त्यामुळे याचा प्रतिबंध करण्यासाठी हत्तीरोग दूरीकरण मोहिमेत आपल्याला देण्यात येणा-या औषधी सर्वच नागरिकांनी घेणे आवश्यक ठरते.
     या अंतर्गत राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवडयात सामुदायिक औषधी दिन आयोजित करण्यात येत असतो यात रोगाची गांभीर्य लक्षात घेऊन या मोहिमेत लहान मोठया सर्वानीच या औषधीचे सेवन करायचे आहे. यात जंत साफ करणारी एक अल्बेन्डाझोलची गोळी आणि डिईसीच्या गोळया सर्वांना दिल्या जातात या गोळया घेतल्यानंतर हत्तीरोगाप्रती प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण होते.
     आपण प्रतिबंधात्मक उपाय केल्यास या रोगातून येणारे शरिरीक व्यंग आपणास टाळता येईल त्याच सोबत पुढे उपचारांवर वेळ आणि खर्च वाचवता येईल. या खेरिज डासांपासून होणारे आजार टाळण्यासाठी आपण सातत्याने परिसर स्वच्छतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे.
- प्रशांत दैठणकर

Tuesday 17 January 2012

जाती वैधता प्रमाणपत्र निवडणूक कार्यालयातून प्राप्‍त करावेत


   वर्धा,दि.17-राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या राखीव प्रभागातुन निवडणूक लढवु इच्छिणा-या मागासवर्गीय उमेदवा-यांच्‍या जाती दावा पडताळणी बाबत लिखीत प्रस्‍ताव सादर केलेला वर्धा जिल्‍ह्यातील उमेदवारांपैकी, ज्‍यांचे प्रस्‍ताव जात पडताळणी समितीने मंजूर केलेले आहे. त्‍यांनी जाती वैद्यता प्रमाणपत्र हे सार्वजनिक निवडणूक विभाग, प्रशासकीय इमारत, जिल्‍हाधिकारी परिसर, वर्धा येथुन प्राप्‍त करावेत.
    तसेच ज्‍या उमेदवारांचे अर्जात त्रृटी आहेत त्‍यांना पत्राव्‍दारे तसेच दुरध्‍वनीव्‍दारे कळविण्‍यात आलेले आहेत. अशा उमेदवारांनी त्रृट्यांची पुर्तता तात्‍काळ करणेकामी आवश्‍यक त्‍या प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्राच्‍या साक्षांकीत प्रतीसह सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण, तथा सदस्‍य सचिव, जिल्‍हानिहाय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, वर्धा यांच्‍या कार्यालयात तात्‍काळ सादर करावेत. जेणेकरुन जाती वैधता प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करणे जिल्‍हानिहाय समितीला सोयीचे होईल. असे आवाहन जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे. असे सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण, वर्धा कळवितात.
                                0000000

Monday 16 January 2012

रस्‍ता सुरक्षा पंधरवाड्याचा समारोप थाटात संपन्‍न


   वर्धा, दि.16-1 जानेवारी पासून ते 15 जानेवारी 2012 या कालावधीत रस्‍ता सुरक्षा मोहीम पंधरवडा समापनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात येथील पोलीस स्‍टेशन  प्रांगणात संपन्‍न झाला.
     याप्रसंगी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण, एस.टी.चे वाहतूक नियंत्रक पंचभाई व उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलताना पंचभाई म्‍हणाले की, रस्‍ता  सुरक्षा मोहीम ही समाजाच्‍या कल्‍याणकारी कार्यासाठी मोलाची ठरते. आपल्‍या देशामध्‍ये लोकसंख्‍या बरोबर वाहनाची संख्‍या वाढत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. अपघात होऊ नये यासाठी शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांना व समाजातील प्रत्‍येक घटकांना वाहतूकीचे नियम सांगितले. वाहतुकीच्‍या नियमांचे प्रत्‍येकांनी अंगिकार केल्‍यास अपघाताचे प्रमाण कमी होऊन कौटुंबिक वातावरण सुध्‍दा सुदृढ राहण्‍यास मदत होते. खाजगी प्रवासी वाहने हे सुरक्षिततेची हमी देत नाही तर एस.टी.महामंडळ प्रवाशांना संपूर्ण सुरक्षा देत असल्‍यामुळे प्रवाशांचा ओघ आता एस.टी. महामंडळाकडे वळला आहे असेही ते म्‍हणाले.
      प्रास्‍ताविक करताना चवहान म्‍हणाले की रस्‍ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अनेक लोकाभिमुख अनेक उपक्रम घेण्‍यात आले. त्‍यामध्‍ये विद्यार्थ्‍यांची वत्‍कृत्‍व स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, वाहन धारकांना हेल्‍मेट बंधनकारक करणे, पोष्‍टर काढणे आदींचा समावेश करण्‍यात आला. मानवीय चुकामुळे 70 टक्‍के अपघात होत असतात यासाठी पादचा-यांनी रहदारीचे नियमा सोबत रस्‍ता सुरक्षा विषयीचे नियम आत्‍मसात केले पाहीजे असे आवाहन याप्रसंगी त्‍यांनी केले.
     याप्रसंगी चित्रकला स्‍पर्धकांना पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांचे हस्‍ते स्‍मृती चिन्‍हांचे वितरण करण्‍यात आले.
     या कार्यक्रमाचे आभार शशिकांत भंडारे यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्‍येने प्रतिष्‍ठीत नागरीक, विद्यार्थी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                               00000000

ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रम थाटात संपन्‍न


     वर्धा, दि.16- ग्रंथोत्‍सवाचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या थाटात येथील न्‍यु इंग्‍लीश हायस्‍कुलच्‍या  प्रांगणात  (दि.14 रोजी) नुकताच संपन्‍न झाला. याप्रसंगी अध्‍यक्षस्‍थानी  विदर्भ साहित्‍य संघ वर्धा जिल्‍ह्याचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रा. हाशम शेख, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित होते.
     
   तीन दिवशीय ग्रंथोत्‍सवाला मोठ्या प्रमाणावर वर्धेकरांनी प्रतिसाद दिला असल्‍याचे सांगून संजय इंगळे तिगावकर म्‍हणाले की, बाल मनावर वाचन साहित्‍य रुजविणे ही काळाची गरजेचे आहे. साहित्‍य  ते कोणत्‍याही स्‍वरुपाचे असो त्‍यापासून समाजाने दूर राहू नये. साहित्‍यामुळे प्रत्‍येकाच्‍या ज्ञानामोलाची भर पडते, साहित्‍यातूनच चांगला माणूस घडत असतो असेही त्‍यांनी सांगितले.
    प्रास्‍ताविक करताना जिल्‍हा माहिती अधिकारी दैठणकर म्‍हणाले की ग्रंथोत्‍सवामुळे प्रत्‍येकांना ग्रंथ प्रदर्शनीला भेट देता आले. तसेच नवनविन साहित्‍यीकांचे ग्रंथ तसेच दूर्मिळ पुस्‍तकांची  खरेदी करता आली. वाचन संस्‍कृती टिकावी हा गंथोत्‍सवामागील हेतू होता. या निमित्‍ताने झालेले कवि संमेलन, कथाकथन, बाल साहित्‍य संमेलन निश्चित ज्ञानात भर पाडणारी होती असेही ते म्‍हणाले.
     या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे यांनी तर आभार प्रदर्शन मनिष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने श्रोते उपस्थित होते. 
                        000000 

ग्रंथोत्‍सवातून बाल साहित्‍याचा कला अविष्‍कार


    वर्धा,दि.16- न्‍यु इंग्‍लीश शाळेच्‍या प्रांगणात (दि. 14 रोजी) नुकताच ग्रंथोत्‍सव अंतर्गत बाल साहित्‍याच्‍या कला अविष्‍कारांनी चालणा मिळाली. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्‍यांनी बाल साहित्‍य कार्यक्रमात सहभागी होऊन एक आगळा वेगळा ठसा उमटविला. राजकारण, समाजकारण, अर्थ व सांस्‍कृतिक कलेला जोड देवून अनेक विद्यार्थ्‍यांनी आपण उद्याचे उदयन्‍मुख साहित्‍यीक आहोत याचा परिचय मोठ्या  धैर्याने करुन त्‍यांनी कविता, नाटीका, कथा व गझलचे श्रोत्‍यांपुढे सादरीकरण केले.

     यावेळी सुशिलचंद्र आलेख, प्रभाकर पाटील, संजय इंगळे तिगांवकर व शेख हाशम, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित  होते.    
      याप्रसंगी सुशील हिंम्‍मतसिंगका माध्‍यमिक विद्यालयातील विद्यार्थी शोभवी उदय, इंद्रायणी गावंडे, अपूर्वा औझोकर, आदिती फाये, संघमित्रा पवार, प्रेरणा ढाले, वृषाली अवचट, मोनिका खिल्‍लारे, चैताली ठाकरे ,आकांक्षा राखुंउे, चेतन महंतारे, किशोर तमगिरे, व्‍यंकटेश टेकाडे, शंतनू घुमडे व मुकूल नगराळे . राष्‍ट्र संत तुकडोजी महाराज विद्यालयातील विद्यार्थी सुयोग अवचित, हर्षल कावळे, हर्षल बुरंगी, नेहाल चामटकर, सम्‍यक लोहकरे, मयुर सोनटक्‍के व आकाश उजवणे. साने गुरुजी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पूर्वा गव्‍हाने व अबोली निर्मल, वनश्री कात्रोजवार व जानवी साबळे . स्‍व. जिजामाता सबाने पूर्व माध्‍यमिक विद्यालयाचे अश्‍वीती नाखले, प्रणाली हलगे व प्रतिक कुरवटकर यांचा समावेश होता.
     युवा साहित्‍य संमेलनामध्‍ये मंगेश शेंडे, रेखा जुगनाके, संदिप चिचाटे, चेतन परळीकर, संजय भगत यांनी सामाजिक आशयावर कथा व कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्‍ध केले.
     या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे व आभार प्रदर्शन मनाष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
                               00000