Friday 13 August 2021

 

आता  शेतक-यांना स्वतःच घेता येणार आपल्या पिकाची नोंद

 

ई -पीक पाहणी अँप लॉन्च

 

     वर्धा, दि 13 (जिमाका):- येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. शेतकऱ्यांना आता स्वतःच मोबाईल अँपच्या माध्यमातून स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद सातबारा मध्ये घेता येणार असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचण्यासोबतच चुकीच्या नोंदीमुळे होणारे नुकसान टळणार आहे.

टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता.  मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत आहे. 

 आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.

 माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा" असे या प्रकल्पाचे बोधवाक्य आहे.

शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.

 

0000

 

 











ब्रेक दि चेन अंतर्गत नवीन आदेश लागू

 

वर्धा, दि 13 (जिमाका):-  ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यात जवळपास सर्व दुकाने आस्थापना सर्व दिवस रात्री 10  वाजे पर्यंत सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.

उपहारगृहे-

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास  मुभा देण्यात येत आहे.उपहारगृहामध्ये प्रवेश करताना , प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापरअनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.

ब) उपहारगृहामध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचेकोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्राआणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृहामध्येकाम करु शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

क) वातानुकूलित उपहारगृह असल्यास , वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.

ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल.

इ) उपहारगृहामध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी

फ) उपहारगृहामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल. उपरोक्तनुसारउपहारगृहे सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृहामधील भोजनासाठीग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 9.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरुठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .

 दुकाने

वर्धा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजता पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण दोन मात्रा पूर्ण  झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

 शॉपिंग मॉल्स

वर्धा जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस

रात्री 10 .वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुरारी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

 

* जिम्नॅशिअम ,योगसेंटर, सलून - स्पा :*

अ) वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलन - स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस

रात्री 10 वाजता पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास

वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील .

 

* इनडोअर स्पोर्टस् :*

इनडोअर स्पोर्टस् असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक

लसीकरणाच्या दोन मात्रा वि दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच , या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील.या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वेश, पैरलल बार ,मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

 

कार्यालय | औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना :

 

अ) सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बैंक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व

व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.

ब) खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेल्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .

क) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचान्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन

करावे.

 

ड) तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

मैदान, उद्यान

            स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळे

अ) खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/लॉन/ मंगलकार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपुर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

ब) खुल्या प्रांगण /लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळयास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तीच्या मर्यादित असेल.

क) बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल.

ड) मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निबंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

इ) तसेच मंगल कार्यालय/हॉटेल/लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बँडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह संस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र

सोबत असणे आवश्यक राहील.

 सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स

सिनेमागृह / नाटयगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे

वर्धा जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास

ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.

सांस्कृतिक कार्यक्रम

            कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा .

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा , रॅली . मोर्चे , इ. वरील निर्बंध कायम राहतील.

वर्धा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ. सर्व निबंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे ,मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी ( लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह ) तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.

 दुकाने / उपहारगृहे | मॉल्स / कार्यालये | औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची वं व्यवस्थापनाची असेल . तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी.

डिस्पेसर व बायोमेडीकल वेस्ट ( वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट ) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल .

 

उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

0000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प.क्र. 600

आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत फ्र‍िडम रन संपन्न्

 

वर्धा,जिमाका 13:-  आझादी का अमृत महोत्सव-India@75 च्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व  क्रीडा मंत्रालय च्या वतीने देशभरात फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजन करण्यात आले होते. प्रथम चरण मध्ये महाराष्ट्रातील 09 जिल्हयात फ्र‍िडम रन‍ चे आयोजनात वर्धा जिल्हयातील बापु कुटी सेवाग्राम आश्रमची निवड करण्यात आली त्यानुषांगाने नेहरू युवा केद्र वर्धा द्वारा हुतात्मा स्मारक चरखा गृह सेवाग्राम ते बापु कुटी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे जिल्हाप्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी हयांच्या सहकार्याने दिंनाक 13 ऑगस्ट 2021 रोजी फ्र‍िडम रनचे आयोजन  स्पोर्ट अशोसिएशन व युवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते हया कार्यक्रमाचे उदघाटन  मा.रामदासजी तडस हयांनी  हिरवी झेंडी दाखवून केले. 

या प्रंसगी हुतात्मा स्मारक सेवाग्राम  येथे मा. रामदासजी तडस हयांच्या हस्ते निसर्ग सेवा समितीच्या सहकार्याने वृ्‌क्ष लावण्यात आले. तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे श्री हांडे हयांनी सामुहिक प्रेरणा गीत व वंदना घेतली.   प्रथम राष्ट्रगीत घेवून दौडला सुरुवात करण्यात आली.  हयावेळी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी, लतिका लेकुरवाळे, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधरजी बेलखोडे, से नि जिल्हा युवा अधिकारी संजय माटे, सतिश इंगोले, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे कुस्ती प्रशिक्षक एस बी. बडगिलवार, श्री प्रविण पेटे, क्रीडा प्रशिक्षक श्रीमती भोंगाडे, एक्सेल इंडियाचे प्रितेश रामटेके आदी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवधन शर्मा जिल्हा युवा अधिकारी हयांनी केले.   समारोप बापु कुटी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान  येथे करण्यात आला येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. टी.आर.एन. प्रभु  हयानी मार्गदर्शन केले.  तर आभार प्रदर्शन श्री अनिल निमगडे हयांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम पर्यवक्षक दयाराम रामटेके,  क्रीडा कार्यालयाचे रवि काकडे , नेहरू युवा केंद्राचे अमोल चावरे,  जयश्री भोयर, दिक्षांत टेंभरे, ऐश्चर्या भोयर व मृणाली बुडे  हयांनी परीश्रम घेतले.  दिनांक 13/08/2021 रोजी  निवडक 75 गांवामध्ये  राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व युवा मंडळाचे माध्यमातून  फिडम रनचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर कार्यक्रम 2 आक्टोबरपर्यंत 744 जिल्हयात होणार आहे अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा हयानी दिली.

 

000000