Wednesday 31 October 2018





       नगर परिषद जनतेच्या सेवेच मंदिर आहे असा भाव निर्माण करा
                                                       - सुधीर मुनगंटीवार
• आर्वी नगर परिषद इमारतीचे
  लोकार्पण
• आर्वी शहराच्या विकासासाठी 25 कोटींचा विशेष निधी


वर्धा ,दि 31:- नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेने  दिलेल्या पदाचा योग्य उपयोग करून नवीन प्रशासकीय इमारतीत दिन, दलित आणि शोषिताच्या समस्या सोडवल्या जातील याकडे लक्ष दयावे. नगर परिषद ही जनतेच्या सेवेच मंदिर आहे असा भाव निर्माण करा, असे प्रतिपादन  वित्त  व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय  इमारतीचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

         यावेळी खासदार रामदास
  तडस, आमदार अनिल सोले, आमदार अमर काळे,  नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे,  मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे,  दादाराव केचे, विजय मुळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा,  मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
           आज शासनाला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाच्या इमारतीचे लोकार्पण करताना आनंद झाल्याचे सांगून श्री मुनगंटीवार म्हणाले, जनतेच्या इच्छा आकांक्षा या इमारतीमध्ये बसलेल्या आधिकारी ,कर्मचा-यांनी पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नगर परिषदेच्या पदाधिका-यांनी डोक्यावर छप्पर नसलेल्या गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देण्याचे काम करावे.
स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोन्ही अत्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या शहरात होत आहे. आर्वी शहराच्या विकासासाठी  25 कोटींचा विशेष नीधी दोन टप्प्यात देण्यात येईल असे सांगून त्यांनी आर्वीकरांनी दिलेल्या प्रेमाची  ही परतफेड असल्याचे सांगितले. महात्मा गांधींच्या भूमीवर वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी  दिलेला  प्रत्येक शब्द पूर्ण करता आल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्वी नगर परिषदेने शाळेतील विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याला  एक दिवसाचा नगराध्यक्ष बनवून नगरपरिषद हे समाजसेवेच मंदिर असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण केली. जनतेची साथ या सर्व विकास प्रक्रियेमध्ये महत्वाची आहे, असेही  श्री मुनगंटीवार याप्रसंगी म्हणाले.
 
         यावेळी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी प्रस्ताविकातून शहरातील विकास कामांची माहिती दिली. 75 वर्षानंतर नवीन इमारत नगर परिषदेला मिळाली आहे असे त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी कंत्राटदार डी के कन्स्ट्रक्शन चे संचालक दिलीप कटियारी, वास्तू विशारद डी एस भैसारे, नगर परिषद अभियंता साकेत राव आणि बाल नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला  नगर परिषद उपाध्यक्ष उषाताई सोनटक्के, सर्व सभापती नगरसेवक उपस्थित होते.
                                                      00000