Wednesday 7 March 2018



देवळीला होणार अत्याधुनिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्र
वर्धा दि 7 :-  भारतात रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण मोठे आहे. वाहनचालकाची चूक आणि  अपघाताच्यावेळी  परिस्थिती हाताळण्याचे तंत्राचा अभाव यामुळे 78 टक्के अपघात होत आहेत. म्हणूनच रस्त्यावर व्यक्तीची सुरक्षितता हे ध्येय ठेऊन रस्ते  परिवहन व महामार्ग मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन चालक प्रशिक्षण केंद्र  सुरू करणार आहे. जिल्ह्यात देवळी येथे अत्याधुनिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाली असून लवकरच हे केंद्र  तयार होईल.
या केंद्राध्ये हलके वाहन,  4 चाकी, व 6 चाकी जड वाहन चालकांना  वाहन चालविण्याचे  परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येईल.  तसेच वाहन चालकांना रिफ्रेशर कोर्स सुद्धा  करता येणार आहे. यामध्ये वाहन चालकाची संगणकीकृत  चाचणी घेण्यात येईल. प्रत्यक्ष वाहन चालवतांना मध्येच एखादी व्यक्ती, वाहन, जनावर आल्यास वाहनचालक त्या परिस्थितीला कसा हाताळतो हे सुध्दा या चाचणीत तपासले जाईल. तसेच अपघाताच्या वेळी त्याचे मानसिक, शारीरिक संतुलन याचा सुद्धा अभ्यास केला जाईल.  या चाचण्यांमध्ये अयशस्वी झालेल्या वाहनचालकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल.
या प्रशिक्षण केंद्रातील  अभ्यासक्रम हा 30 दिवसांचा राहणार आहे. यामध्ये  वाहन चालकाची वर्तणूक , व्यवहार आणि ताण व्यवस्थापन , बचावात्मक चालक तंत्र, वाहतुकीचे नियम आणि कायदे,  आणीबाणीची परिस्थिती  हाताळण्याचे तंत्र, वाहन देखभाल व इंधन संवर्धन, प्रदूषण आणि पर्यावरण, अपघात घटना, अपघात कारणाचे विश्लेषण, कुणाचा दोष होता आणि ते कसे टाळता आले असते, वारंवार अपघात घडलेल्या वाहनचालकांसाठी सुरक्षितता यावर प्रशिक्षण इत्यादी बाबींचा समावेश येथील अभ्यासक्रमात राहणार आहे.
वाहनचालकांचे प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी आणि वर्तणूक विश्लेषण चाचणी घेण्यात येईल. या केंद्रात प्रशिक्षणार्थींची राहणे- आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असणार आहे. तसेच वाहनचालकाची चाचणी घेण्यासाठी ट्रॅक सुद्धा असणार आहे.


10 ते 14 मार्च दरम्यान धान्य महोत्सवाचे आयोजन
Ø शेतकरी उत्पादक गट व कंपन्यानी सहभाग नोंदवावा
Ø पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन
 वर्धा, दि 7,(जिमाका), कृषि विभागाच्या  वतीने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री  या संकल्पनेवर आधारित 10 ते 14 मार्च या कालावधीत धान्य महोत्सवाचे   आयोजन करण्यात आले आहे. लोकमहाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कृषि महोत्सवात शेतकरी उत्पादक गटांनी उत्पादीत केलेल्या शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थांना महोत्सवाव्दारे बाजारपेठ तसेच व्यासपीठ मिळून देण्यात येणार आहे. कृषि महोत्सवाचे उदघाटन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते 11 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. शेतकरी  उत्पादक गटांनी तयार केलेला माल महोत्सवात आणावा असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.
महोत्सवात शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या मालाच्या  विक्रीसाठी 250 स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  जिल्हयातील आठही  तालुक्यातील  शेतक-यांनी सहभाग नोंदवावा. महोत्सवात थेट विक्रीतून ग्राहक आणि उतपादक यांना फायदा होणार असल्याने उत्पादक गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी  सहभागासाठी नाव नोंदणी करावी.
शेतक-यांना पर्यायी बाजारपेठ  पर्याय उपलब्ध करणे आवश्यक आहे. हंगामात शेतमालाला वाजवी भाव मिळत नसल्याने शेतक-यांना आर्थिक फायदा होत नाही. ग्राहकांना मात्र चढया भावाने खरेदी करावी लागत असल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो. धान्य महोत्सवात विविध प्रकारच्या डाळी, तांदुळ, गहू, प्रक्रिया पदार्थ, महिला बचत गटांचे घरगुती पदार्थ, नैसर्गिक पध्दतीने उत्पादित शेतमाल, हळद वइतर मसाला , सेंद्रीय पध्दतीने पिकविण्यात आलेले धान्य व भाजीपाला ग्राहकांना योग्य दरात मिळणार आहे.
त्याचप्रमाणे शेतक-यांना येणा-या हंगामातील तांत्रिक मार्गदर्शन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, कृषि पुरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योगाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीकोनातुन महोत्सवात विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच कृषि व संलग्न विभागाचे योजनानिहाय स्टॉल उपलब्ध  होणार आहे. यशस्वी कृषि उद्योग शेतकरी यांचे शेतकरी उत्पादक  कंपनी  नोंदणी प्रक्रिया, यासाठी विशेष मार्गदर्शन होणार आहे.
दि. 11 मार्च रोजी सायंकाळी सांसकृतिक (डान्स स्पर्धा)  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 मार्च  रोजी सायंकाळी 6 वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य रामपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कार्यक्रम, दि. 13 मार्च रोजी सायंकाळी स्टार इन्वेंट यांचा बहारदार गीत गायन कार्यंक्रम होणार आहे.
धान्य महोत्सवात सहभागासाठी शेतकरी, उत्पादक गट व इतर उत्पादक कंपनी यांनी शेतमालाचा तपशिलासह तालुका कृषि अधिकारी किंवा प्रकल्प संचालक, आत्मा या कार्यालयात 9403230730,9403242039  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून  स्टॉल आरक्षण करण्यासाठी नोंदणी करावी असे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
                                       


   31 मार्च पर्यंत जिल्हयातून प्लॉस्टीक हद्दपार करावे
                                                -जिल्हाधिकारी
 वर्धा, दि 6,(जिमाका)  महात्मा गांधीचा जिल्हा म्हणुन या जिल्हयाला वेगळे महत्व आहे. महात्मा गांधीनी अनुसरलेल्या पर्यावरणपुरक आणि निसर्गाला हानीकारक नसलेल्या वस्तूचा उपयोग करण्यावर लोकांनी भर दयावा. शासनाने गुढी पाडव्यापर्यंत प्लॉस्टीकमुक्त राज्य  करण्याचे जाहिर केले आहे. यामध्ये  वर्धा जिल्हयात संपूर्णपणे प्लॉस्टीक बंदी करण्यासाठी व्यापारी, दुकानदार, हॉटेल मालक यांनी स्वत:हून या मोहिमेत सहकार्य करावे, आणि  आर्थिक वर्ष संपतांना जिल्हयातून प्लॉस्टीकही हद्दपार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्हा प्लॉस्टीक मुक्त करण्यासाठी वर्धा शहरातील प्लॉस्टीकचे होलसेल विक्रेते, दुकानदार, हॉटेल मालक आणि  सर्व नगर परिषंदाचे मुख्याधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्लॉस्टीकचा वापर आणि त्याच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
प्लॉस्टीकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरण आणि नदी प्रदुषण मोठया प्रमाणात होत आहे. तसेच प्लॉस्टीक जाळल्यामुळे त्यापासून घातक वायू बाहेर पडतात. कच-यात प्लॉस्टीक मोठया प्रमाणात असल्यामुळे जणावराच्या पोटात प्लॉस्टीक बॅग सापडल्यामुळे त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर प्लॉस्टीक पिशवी किंवा डब्यात  साठवलेल्या अन्न पदार्थाचा उपयोग केल्यास कर्करोगाचा धोका संभवतो.  त्यामुळे प्लॉस्टीक पासुन निसर्गाचे आणि  प्राणीमात्राचे जीवन वाचविण्यासाठी प्लॉस्टीकला नकार दयावा.
दुकान किंवा व्यवसायाचा परवाना रद्द करणे किंवा दंड करणे हा प्रशासनाचा उद्देश नसुन लोकांनी स्वत:हून अविघटनशिल प्लॉस्टीकचा वापर करणे बंद करावे, हा मुख्य उद्देश आहे. कच-याचे विलगीकरण करुन त्याचे खतात रुपांतर करतांना प्लॉस्टीक हा महत्वाचा अडसर ठरत आहे. कच-यातील प्लॉस्टीकमुळे त्याचे खतात रुपांतर होत नाही. त्यामुळे कच-याचा ढीग दिवंसेदिवस वाढत जाणार आहे. ही बाब प्रशासनच नव्हे तर काही दिवसातच लोकांच्या समोर सर्वात मोठे संकट म्हणुन उभे राहील. त्यामुळे कचरा गोळा करणे आणि त्याचे विलगीकरण करणे यासाठी शासनाने कितीही निधी खर्च केला तरी त्याचा पाहिजे तसा फायदा दिसणार नाही. त्यामुळे लोकांनी जागरुक राहून  जाणिवपूवर्क प्लॉस्टीक वापरणे बंद करणे हाच त्यावरचा उपाय ठरेल. असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले,
प्लॉस्टीक पिशवी, चहाचे कप, प्लॉस्टीक पत्रावळी, थर्माकोल या सारख्या सर्व प्रकारच्या प्लॉस्टीक वस्तूना नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहे. याचा अवलंब प्रत्येकाने करावा. व्यापारी दुकानदार, हॉटेल मालक यांनी  ग्राहकांना प्लॉस्टीक पिशव्यामध्ये वस्तू देणे बंद करावे त्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात. तसेच ग्राहकांनी कायम स्वत: सोबत कापडी पिशव्या  ठेवाव्यात. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी होलसेल प्लॉस्टीक विक्रेते यांचे विनंती वरुन जिल्हाधिकारी यांनी 15  मार्च ऐवजी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ दिली. 
हॉटेल व कॅटरींगचा व्यवसाय करणारे यांच्या कडील शिल्लक अन्न पदार्थ घेऊन जाण्यासाठी नगर परिषदेची गाडी रात्री फिरणार आहे. त्याचा भ्रमणध्वनी  क्रमांक सर्वांना देण्यात येईल. सदर अन्न पदार्थ एकत्रित करुन कचरा डेपोमध्ये  बायोगॅस निर्मितीसाठी उपयोगात आणल्या जाईल. ही सेवा  1 एप्रिल पासुन सुरु करण्यात येणार असुन हॉटेल चालक, मंगल कार्यालय यांनी या सेवेचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
                                      0000