Wednesday 11 January 2017



         डिजिटल स्‍वाक्षरीने सात बारा  देणारा वर्धा ठरला राज्‍यात पहिला
        वर्धा,दि.11– सात- बारा मिळण्‍यासाठी तलाठयाकडे खेटे घेणा-या  शेतक-याला  आता घरुनच आपले सरकार वेब पोर्टल किंवा गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई- सेवा केंद्राच्‍या माध्‍यमातून डिजिटल स्‍वाक्षरीचा सात बारा उपलब्‍ध होणार आहे. अशा पध्दतींने शेतक-यांना सातबारा उपलब्‍ध करुन देणारा वर्धा हा राज्‍यातील पहिलाच जिल्‍हा ठरला असून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्‍या व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स व्‍दारे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे अभिनंदन केले आहे.
            आज जिल्‍हाधिकारी यांनी वर्धा तालुक्‍यातील पांढरकवडा येथील सचिन दाते, ज्ञानेश्‍वर दाते, गणेशपूर मधील दिवाकर मुरकुटे आणि मांडवगडच्‍या शंकरराव केळवतकर या शेतक-यांना  डिजिटल स्‍वाक्षरी असलेल्‍या सात बाराचे वितरण केले.
            जिल्‍हाधिकारी यांनी जिल्‍हयाची सुत्रे स्विकारताच शेतक-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यास प्राधान्‍य दिले. तसेच नागरिकांना सर्व आवश्‍यक दाखले आणि प्रमाणपत्र ऑन लाईन उपलब्‍ध करुन देण्‍यावर भर दिला. आज महसुल विभागाच्‍या 51 सेवा, कामगार कल्‍याण विभागाच्‍या 17, गृह विभाग18 आणि भूमी अभिलेख विभागाच्‍या 18 सेवा ऑनलाईन करण्‍यात आल्‍या आहेत. इतर विभागाच्‍याही सर्व सेवा ऑनलाईन करण्‍यासाठी अधिकारी व कमचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
            शेतक-यांना घरबसल्‍या सात बारा मिळावा यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी यांच्‍या वारंवार बैठका घेऊन सुचना दिल्‍या. महाऑनलाईनचे समन्‍वयक प्रतिक उमाटे यांनी सर्व नायब तहसिलदार आणि डेटा बेस अॅडमिनिस्‍ट्रेटर यांचे डिजिटल स्‍वाक्षरी तयार करुन  घेतल्‍या. महाभूलेखच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध असलेला आणि  महसूल विभागाने अद्यावत केलेल्‍या सात बाराची लिंक महाऑनलाईन आणि आपले सरकारच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिली. यासाठी जिल्‍हाधिकारी यांना जमाबंदी आयुक्‍ताची विशेष  परवाणगी घ्‍यावी लागली. 5 जानेवारी 2017 रोजी डिजिटल स्‍वाक्षरीने सात बारा ऑनलाईन उपलब्‍ध करुन देण्‍यास प्रायोगिक तत्‍वावर सुरवात झाली.
            आज मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्‍या व्‍हीडिओ कॉन्‍फरन्‍समध्‍ये डिजिटल स्‍वाक्षरीचा सातबारा उपलब्‍ध करुन देणारा हा पहिला जिल्‍हा असल्‍याचे सांगितले. तसेच जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांना डिजिटल स्‍वाक्षरीचा सातबारा शेतक-यांना वितरीत करण्‍याच्‍या  दिलेल्‍या सुचनेनुसार जिल्‍हाधिकारी यांनी त्‍याचवेळी 4 शेतक-यांना सातबारा चे वितरण केले. यावेळी मुख्‍यमंत्र्यानी  जिल्‍हाधिकारी यांनी केलेल्‍या विशेष कामगिरीसाठी त्‍यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि इतर जिल्‍हयांनी  सुध्‍दा वर्धा जिल्‍हयाप्रमाणे कार्यवाही पूर्ण करुन शेतक-यांना ऑनलाईन सातबारा उपलब्‍ध करुन देण्‍याचे निर्देश दिलेत.