Friday 3 September 2021

 



जल जीवन मिशन अंतर्गत 442 योजनांची

कामांची निविदा प्रक्रिया  सप्टेंबर अखेरीस पूर्ण करा

                                 -जिल्हाधिकारी

वर्धा, दि 3 सप्टेंबर,(जिमाका):- जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनर्जोडणी व नविन पाणी पुरवठा अशा ४४२ योजनांची अंदाजपत्रके तयार करावयाची असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रके तयार करण्याच्या कामाची गती वाढवावी. सप्टेंबर अखेर योजनांची अंदाजपत्रके प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिलेत.

         जल जीवन मिशन अंतर्गत "जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन बाबत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी

          डॉ. सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे श्री. मदनकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील रहाने, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे श्री. कुळकणी, वरीष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे, विद्युत वितरण कंपनीचे श्री. पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

        जिल्ह्यात प्रती माणसी प्रती दिवस 55 लिटर पाणी देण्यासाठी  425 गावांमध्ये असलेल्या जुन्या योजनांची क्षमता वृद्धी करण्यासाठी 393 योजनांची कामे करायची आहेत. तसेच 68 गावांमध्ये 49 नवीन योजनांची कामे सुरू करण्यासाठी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामास गती देण्यास जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व अंदाजपत्रके एक आठवड्यात तयार करून त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

पाणी पुरवठा योजनांकरिता सौर ऊर्जेवर आधारितनेट मिटरिंगचा अवलंब करण्याचे दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून  मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश दिलेत.

         तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित नविन पाणी पुरवठा योजनेचे कामांकरिता कुशल व अनुभवी कंत्राटदारांकडून सदर काम करून घेण्यासोबतच  केलेल्या  कामाची गुणवत्ता तपासून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांनी  काम पूर्णत्वाचा अहवाल द्यावा अशी सूचना ग्रामीण पाणी पुरवठा

कार्यकारी अभियंता यांनी केली. यासाठी  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांचेकडे सदर कामाचे पर्यवेक्षण शुल्काचा भरणा केल्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणकडून सदर कामावर पर्यवेक्षण करण्यात येईल व काम पूर्णत्वाचा अहवाल सादर करता येईल असे सांगितले. 

                                                   000000

 




‘उमेद’ अभियानातून मिळाला 214 महिलांना रोजगार

अडीच कोटीचा साकारला सोलर प्रकल्प

कवठा झोपडी गावाची यशोगाथा

देवळी, कारंजा व आष्टी तालुक्यातील

सात गावांत स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात      

वर्धा दि.3 (जिमाका) : वर्धा जिल्हा बऱ्याचश्या ऐतिहासिक चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे.  बचतगटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यातही जिल्ह्याने नावलौकिक मिळवलेले आहे. याचा प्रत्यय येतो तो कवठा झोपडी या गावच्या तेजस्वी सोलर एनर्जी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सोलर  स्ट्रीट लाईट निर्मितीच्या प्रकल्पाच्या यशातून. या महिला बचतगटाने सुमारे अडीच कोटीचे स्ट्रीट लाईट निर्मितीचे ध्येय बाळगून जिल्ह्यातील देवळी, कारंजा व आष्टी तालुक्यातील सात गावांत स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे स्ट्रीट लाईट उपकरण एकत्रित करुन बसविण्याचे संपूर्ण काम महिलांव्दारे केल्या जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून 214 महिलांना रोजगार मिळाला असून महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण समाजाला दिसून आले आहे.  

जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विशेष प्रयत्न करुन स्ट्रीट लाईटसाइी निधी उपलब्ध करुन दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे, अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेंडे यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पाच्या महिला पदाधिकारी संगीता प्रकाश वानखेडे, अर्चना बलवीर यांच्या नियोजन व परिश्रमातून हा सोलर उत्पादने निर्माण करणारा प्रकल्प आकारास आला.

या प्रकल्पाच्या संस्थेला जिल्हा नियोजन समिती मार्फत 40 लाख स्ट्रीट लाईट पुरवठा करण्याचे मागणी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 11 लक्ष 70 हजार रुपयाचा निधी संबंधित कंपनीला प्राप्त झाला असून त्यातून 56 सोलर स्ट्रीट लाईट जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील खातखेडा, एकाम्बा, कारंजा तालुक्यातील मेठहिरजी, खैरवाडा तर आष्टी तालुक्यातील ममदापूर, बाम्बडा, बोरखेडी आदी ठिकाणी तेजस्विनी सोलर एनर्जीव्दारे बसविण्यात आले.

कवठा झोपडी या गावी 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून 214 महिलांनी बचत गट स्थापित करुन  तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची को-ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत नोंदणी केली. प्रकल्पाच्या माध्यमातून स्ट्रिट लाईट निर्मितीचे काम सुरु झाले. या प्रकल्पात 214 महिला सहभागी झाल्यात. या सोलर प्रकल्पासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने तांत्रिक मार्गदर्शन दिले. यातील 12 महिलांना राजस्थानच्या डुंगरपूर येथील दुर्गा सोलर एनर्जी येथे प्रशिक्षित करण्यात आले. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईव्दारा गावातच संबंधित महिलांना उमेद अभियानच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण दिले.

तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मागदर्शन व प्रयत्नातून समाजकल्याण विभागाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून हा सोलर प्रकल्प उदयास आला. या प्रकल्पाचे 2 कोटी 62 लक्ष रुपये अंदाजपत्रक असून महिलांना प्रशिक्षित करुन सोलर उत्पादने तयार करण्यात येत आहे. प्रकल्पात काम करणाऱ्या महिलांनी एक हजार लॅम्प बनविले असून दोन लाख रुपयाची विक्री झाली आहे. या कामास उमेद अभियानाचे अधिकारी, व आयआयटी मुंबईने सहकार्य केले.

कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे पूर्णपणे बांधकाम झाले असून पॅनल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर होम लाईट इत्यादी उत्पादने बनविण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी सदर साहित्याची उभारणी सुद्धा करण्यात आली असून जिल्हा नियोजन समिती मार्फत या कंपनीला 40 लाख स्ट्रीट लाईटचा पुरवठा करण्याचे मागणी आदेश प्राप्त झाले आहे. या सोलर उत्पादनांच्या विक्रीतून सुमारे 11 लाख 70 हजार रुपये बचतगटाला मिळाले असून यामुळे गावातील महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे.

0000