Thursday 25 October 2018







जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत
30 हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·         हिंगणघाट येथील रेल्वे उड्डाणपुलाचे, वडनेर ते देवधरी मार्गाचे व केळापूर ते पिंपळखुटी मार्गाच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण
·         वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील विविध रस्तेविकासाच्या कामांचे भूमिपूजन
वर्धा , दि. 25 : देशात व राज्यात रस्ते विकासाची कामे वेगात सुरु असून जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. यामध्ये 500 किलोमीटर रस्ते वर्धा जिल्ह्यातील असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय) यांच्या वतीने हिंगणघाट येथील टाका मैदान येथे वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील रस्तेविकासाच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हिंगणघाट येथील 1.15कि.मी लांबीच्या रेल्वे उड्डाणपूलाचे, 29 कि मी लांबीच्या वडनेर ते देवधरी (रा.म 44) मार्गाचे चौपदरीकरण, 22कि.मी लांबीच्या केळापूर ते पिंपळखुटी मार्गाचे चौपदरीकरण (रा.म 44) या वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदगाव चौक येथील उड्डाणपूल, वर्धा ते हिंगणघाट मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण, सेलडोह सिंदी रेल्वे-सेवाग्राम पवनार मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण, वर्धा- आर्वी मार्गाचे काँक्रेटसह दुपदरीकरण, आर्वी ते तळेगाव मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण व चौपदरीकरण, तळेगाव गोनापुर मार्गाचे काँक्रीटसह दुपदरीकरण या कामांचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचा कार्य अहवाल-डिजिटल विकास पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्याचे समग्र चित्र पालटते आहे. विविध योजनांची कामे जिल्ह्यात व हिंगणघाट येथेही वेगात सुरू आहेत. रस्ते विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे ही बाब हिंगणघाट वासियांसाठी तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंददायी आहे. राज्यात महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. चार वर्षात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. चार वर्षात वीस हजार किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांची कामे झाली. 4 हजार किलोमीटर राज्य महामार्ग व  30 हजार किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गतच्या रस्त्यांची कामे  हाती घेण्यात आली असून  जूनपर्यंत 30 हजार किलोमीटरपर्यंतचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये पाचशे किलोमीटरचे रस्ते वर्धा जिल्ह्यातील आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून रोजगार निर्मितीत वाढ होत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014 पर्यंत राज्यात 50 लाख शौचालये होती. 2015 ते 2018 या  तीन वर्षात 60 लाख शौचालये बांधण्यात आली. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही असा निर्धार असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  जूनपर्यंत साडेदहा लाख कुटुंबांना घरे देण्याचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक संकटावर मात करत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत उभे आहे.  राज्यात यंदा काही भागात पर्जन्यमान कमी झाले. 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत देण्यात येत आहे.  मात्र जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलसंधारणाच्या झालेल्या विविध कामांमुळे शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे आढळून येत आहे. शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली, कर्जमाफी देण्यात आली. तीन वर्षात साडे आठ हजार कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली. विदर्भातील सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील. अमरावती येथील टेक्सटाइल पार्कप्रमाणेच विदर्भात अन्यत्रही टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी  भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. सिंदी येथील ड्राय पोर्ट तसेच समृद्धी महामार्गमुळे विदर्भाचे चित्र पूर्णपणे पालटणार आहे.  गावाच्या व शहराच्या विकासासाठीही भरीव  निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच विदर्भातील नझुल जमिनींच्या संदर्भातील प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, वर्धा येथील विविध विकास कामांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले त्यानुसार कामे सुरू झाली व काही कामे पूर्ण झाली आहेत. देशात रस्ते विकासाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. वर्धा ते तुळजापूर चार पदरी रस्ता होत असून विविध विकासकामे साकारताना ती पारदर्शक व दर्जेदार करण्यात येत आहेत. हिंगणघाट येथील रेल्वे उड्डाणपुलाचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले असून जांब येथे उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  देशात व राज्यात सर्वच क्षेत्रात समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी सिंदी ड्रायपोर्ट उभारण्यात येत आहे. याद्वारे आयात निर्यातीस चालना मिळणार आहे. येथे ब्रॉडगेज रेल्वेचे डबे  बनविण्याचा कारखाना उभारण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्याची सिंचनक्षमता 50 टक्क्यांवर  नेण्याचा मानस असून जलयुक्त शिवार अभियान राज्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. 108 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून याद्वारे सिंचनक्षमता नक्कीच वाढेल. राज्यात ब्रिज कम बंधाऱ्यांची कामेही वेगात सुरू आहेत. अमरावतीप्रमाणेच विदर्भात अन्य ठिकाणीही टेक्सटाईल झोन उभारणारण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही केंद्रीय परिवहन मंत्री श्री. गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले, देशात व राज्यात विविध विकासकामे प्रगतीपथावर असून विदर्भातील जिल्हेही आता विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. नमामी गंगेअंतर्गत होत असलेली कामे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचेही श्री. अहिर यांनी सांगितले.
खासदार रामदास तडस म्हणाले, वर्ध्यासाठी घोषित केलेल्या पॅकेजमधील बहुतांश कामे पूर्ण झाली असून विविध कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामेही वेगात होत असल्याचे श्री. तडस यांनी सांगितले.
आमदार समीर कुणावार म्हणाले, विविध रस्ते विकासांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन हिंगणघाटसाठी सुवर्णक्षण आहे. उड्डाणपुलामुळे नागरिकांसाठी सुविधा होणार असून नवा उड्डाणपूलही प्रस्तावित आहे. रस्ते विकास तसेच विविध विकास कामांसाठी भरीव निधी प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील कामगारांनाही विविध सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे कुणावार यांनी सांगितले.
पशुसंवर्धन व पशुविकास या पुस्तिकेचे विमोचनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमूळे आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण आवश्यक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·        सूपर स्पेशालिटीमुळे गुणात्मक वाढ
·        जनआरोग्य योजनेत मेघे संस्था अव्वल
·        जिल्ह्यात लवकरच आरोग्य शिबीर
·        ग्रामीण आरोग्य सेवेत गुंतवणूकीची संधी
वर्धा, दि. २५ : जगातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा असलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे नागरीकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण झाल्यास ग्रामीण भागातील नागरीकांना चांगल्या दर्जाच्या  आरोग्य  सुविधा मिळतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सावंगी मेघे येथील शालिनीताई मेघे सूपर स्पेशालिटी सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस, आमदार अरुण अडसड, डॉ.पंकज भोयर, समीर कुणावर, सागर मेघे, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू दत्ता मेघे, शालिनीताई मेघे, वेदप्रकाश मिश्रा, वोक्‍हार्ट हॉस्पिटलच्या संचालक डॉ. झाबियाजी कोराकिवाला आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे ५० कोटी नागरीकांना आरोग्य सुविधेचे कवच मिळाले आहे. या योजनेमुळे प्रत्येक पात्र व्यक्ती पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा प्राप्त करून घेण्यास पात्र ठरला आहे. योजनेमुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये देय क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या खासगी संस्थांना ग्रामीण भागात गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आहे. त्यांनी गुंतवणुक केल्यास नागरीकांना दर्जेदार सेवा मिळू शकतील.
राज्यातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून मेघे रुग्णालयाने राज्यात सर्वाधिक उपचार केले आहे. स्टेट ऑफ आर्ट असलेल्या या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सूपर स्पेशालिटी सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सुविधांमध्ये गुणात्मक वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. ग्रामीण भागातील नागरीकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रीया करावी, त्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधी या तीन योजनांच्या माध्यमातून आरोग्य शिबीरास मदत करण्यात येईल.
श्री. गडकरी म्हणाले, देशात आठ लाख डॉक्टरांची गरज आहे. डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार नसल्याने या भागात चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा पूरविण्यासाठी खासगी संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सुविधा सुधाराची गरज आहे. चांगल्या डॉक्टरांनी या भागात सेवा द्यावी. आता कार्पोरेट क्षेत्रही रुग्णालये सुरु करू शकत असल्याने त्यांनी सेवेसाठी ग्रामीण क्षेत्र निवडावे. आरोग्य सेवेत दर्जेदार सुविधेसोबत स्पर्धाही निर्माण होणे गरजेचे आहे. याचा लाभ रुग्णांना मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक भावनेतून कार्य व्हावे. विदर्भात आरोग्य सेवा देण्यात मेघे यांच्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालायचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, दत्ता मेघे, वेदप्रकाश मिश्रा,वोकहार्ट रुग्णालयाच्या संचालक झाबीयाजी कोराकिवाला यांनी मनोगत व्यक्त केले. दत्ता मेघे यांच्या हस्ते मेघे ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ४५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. समीर मेघे यांनी प्रास्ताविक केले. सागर मेघे यांनी आभार मानले.
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. रूग्णालयातील आयसीयू, खासगी रुम, शस्त्रक्रीया कक्ष आदींची पाहणी केली. मुख्यमंत्र्यानी रूग्णांशी भेट घेऊन संवादही साधला.

20 हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी देणार
                                         -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• 28 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
• 80 जागांसाठी वायफाय सुविधा सुरू
         वर्धा दि 25 (जिमाका):- प्रत्येक गावात घरोघरी पिण्याचे  शुद्ध पाणी मिळावे हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. 15 वर्षांपासून रखडलेल्या ग्रामीण पेयजल योजनांसाठी केंद्र  शासनाने 8 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय व  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील 20 हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
         मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पिपरी मेघे व 13 गावे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सावंगी मेघे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे,  दत्ता मेघे, सावंगी मेघे ग्रामपंचायत सरपंच सरिता दौड आदी उपस्थित होते.
        देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यात 60 लाख नवीन शौचालये बांधण्यात आलीत हे सांगताना  मुख्यमंत्री म्हणाले,   हागणदारी मुक्त महाराष्ट्र आणि शुद्ध पाणी पुरवठा  करण्यात शासनाला यश मिळाले. या दोन्ही बाबतीत राज्य  देशात प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी त्यांनी मंत्री बबनराव लोणीकर यांचे अभिनंदन व कौतुक केले.
आमदार पंकज भोयर यांच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.यापुढे आदिवासी बांधवाचे  नागपूर कार्यालयात जाण्याचे कष्ट कमी होतील असेही श्री फडणवीस म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पत पुरवठा करण्यासाठी वर्धा जिल्हा सहकारी बँकेला राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण  करण्याचा निर्णय शासनाने  घेतला आहे. लवकरच बँकेची व्यवस्था सुरळीत सुरू होऊन  सामान्य जनतेच्या हक्काची बँक सेवेत दाखल  होईल असे श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 
         बबनराव लोणीकर यावेळी बोलताना म्हणाले,  पाणी पुरवठा विभाग दुर्लक्षित  होता. 14 - 15 हजार पाणी पुरवठा योजना अपूर्ण होत्या. यासाठी नितीन गडकरी यांचे माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि 5 हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. यातून 5 हजार 600 गावांच्या योजना पूर्ण केल्यात. उर्वरित गावांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरू करून मुख्यमंत्र्यांनी 2 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्यामुळे केंद्र शासनाने 8 हजार कोटी रुपयांच्या आरखडयास मान्यता दिली. तसेच शासनाने जागतिक बँकेचे 1300 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन संपूर्ण राज्यात शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत असे श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
आमदार पंकज भोयर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डिजिटल इंडिया अंतर्गत 80 जागांसाठी वायफाय सुविधेचे  लोकार्पण करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
                                                          00000