Wednesday 28 February 2018



वर्धेत टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू
Ø खासदार रामदास तडस यांचे हस्ते उदघाटन
Ø विदर्भातील पहिले केंद्र वर्धेत.
Ø मुस्लीम बांधवांसाठी जास्त फायदेशीर ठरणार
वर्धा दि २८ :- माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी अत्यंत आवश्यक असणारे पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली याचा मनस्वी आनंद आहे. या पारपत्र केंद्राचा लाभ जिल्ह्यातील परदेशी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसोबतच हज यात्रेसाठी जाणा-या मुस्लीम बांधवाना प्रामुख्याने होणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
मुख्य डाकघर येथे आयोजित पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्राचे उदघाटन श्री तडस यांनी केले . यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला हिंदी विश्व विद्यापिठाचे प्रकुलगुरू  आनंदवर्धन शर्मा, नागपूर विभागाचे महापोस्ट मास्टर मरियम्मा थॉमस,  क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी. एल. गौतम, नगराध्यक्ष अतुल तराळे उपस्थित होते.
ऐतिहासिक दृष्ट्या सबळ असूनही वर्धा जिल्हा विकासात मागे राहतो. मात्र यावेळी पारपत्र सेवा केंद्र मिळविण्यात  वर्धा जिल्ह्याने बाजी मारली आहे. यामुळे पारपत्र मिळविण्यासाठी नागपूरला जाण्यायेण्याचा लोकांचा त्रास कमी होईल.  पारपत्र कार्यालयाच्या अधिकाऱयांनी सतत 5 दिवस  काम करून हे केंद्र सुरू केले यासाठी त्यांनी सी एल गौतम यांचे आभार मानले. याचबरोबर आता प्रत्येक गावात टपाल कार्यालय हे ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या एक खोलीत सुरू करण्यात येईल असेही श्री तडस यांनी  सांगितले.
परदेशात पर्यटन , नोकरी, आणि व्यापार यासाठी आवश्यक असलेले पारपत्र सेवा केंद्र वर्धेत सुरू झाल्यामुळे वर्धेकरांच्या  स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. पारपत्र काढण्यासाठी अनेकदा शासकीय श्रम, दिवस वाया जातात. पण यामुळे त्यामध्ये बचत होईल, असे प्रो आनंदवर्धन शर्मा म्हणाले.
यावेळी बोलताना मारिअम्मा थॉमस यांनी टपाल कार्यालय हे केवळ पत्र पोहचविण्याचे कार्यालय राहिले नसून ते आता जनसेवा केंद्र झाले आहे. लवकरच पोस्ट पेमेंट बँक च्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आम आदमी साठी उपलब्ध होईल. अटल पेन्शन योजना, आधार अपडेशन आणि इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर योजना पोस्ट ऑफिसमध्ये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशात आतापर्यन्त केवळ 80 पारपत्र सेवा केंद्र सुरू होते.त्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागत होता. 24 जून 2017 रोजी विदेश मंत्र्यांनी टपाल कार्यालयासोबत जोडून पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आज देशात टपाल कार्यालयाच्या समन्वयाने 251 केंद्र सुरू होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.  पारपत्र काढण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज पासपोर्ट इंडिया च्या संकेतस्थळावर सादर करावा. त्यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर अपॉइंटमेंट साठी वेळ कळवला जाईल.  अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे आणि पोलीस चारित्र्य पडताळणी सहित फाईल नागपूर कार्यलयाला पाठवली जाईल. नागपूर कार्यालयातून पारपत्र बनून पोस्ट ऑफिसला मिळेल आणि नंतर ते अर्जदाराला पोस्टाने  पाठवण्यात  येईल. यासाठी पारपत्र विभागाचे चार कर्मच-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते कर्मचारी येथील केंद्र सांभाळतील अशी माहिती क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी एल गौतम यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी या पारपत्र सेवा केंद्रासाठी खासदार रामदास तडस यांचे आभार मानले.
                                       




Sunday 25 February 2018



चरखा चलानेमे श्रम है
-         उपराष्ट्रपती
वर्धा दि.25 (जिमाका) :-  चरखा चालविल्याने संपूर्ण शरीराला श्रम होते. शरीरासाठी ही चांगली क्रिया आहे. त्याचबरोबर वस्त्रस्वावलंब होते, असे भावपूर्ण उद्‌गार उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यानंतर काढले.
सेवाग्राम आश्रमात आगमन झाल्यानंतर श्री. नायडू यांनी बापूकुटी, बाकुटी, आदिनिवास, आखरी निवासाला भेटी दिल्या. बाकुटी येथे भेट देऊन त्यांनी अभिप्राय नोंदविला. त्यानंतर आदिनिवासाला भेट दिली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1926 यावर्षी वृक्षारोपण केलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली  ध्यान केले. त्यांनी बापूकुटीमध्ये जाऊन प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर सेवाग्राम आश्रमाच्या वतीने सूत माळ, शाल आणि गीताई ग्रंथ देऊन   श्री. नायडू यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी चरख्यावर सुतकताई केली. सुतकताई केल्यानंतर त्यांनी ‘चरखा चलानेमे श्रम भी है. सॉलीड ॲक्टीव्हीटी है और वस्त्र स्वावलंबन भी है’ असे उत्स्फुर्त उद्‌गार काढले.







उपराष्ट्रपतींच्या हस्ते शस्त्रक्रिया कक्षाचे उद्घाटन
    वर्धा दि.25 (जिमाका) :-  महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत नव्याने बांधण्यात आलेल्या शस्त्रक्रिया कक्ष तसेच स्कील लॅबचे उद्घाटन उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, अधिष्ठाता डॉ. किसन पातोंड, आयुर्विज्ञान संस्थेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.पी.कलंत्री आदी  उपस्थित होते.
          यावेळी उपराष्ट्रपती श्री.नायडू यांनी, डॉक्टर्स येथे निवासी राहतात का, या वैद्यकीय संस्थेत जेनेरीक औषधींचे वाटप तसेच आयुर्वेदिक उपचार केले जातात का, आदी बाबींची विचारणा केली. यावेळी डॉ. कलंत्री यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपराष्ट्रपतींना वैद्यकीय संस्थेबद्दल माहिती दिली. यात स्वस्त दरात देण्यात येणाऱ्या औषधी, माता व बाल आरोग्य केंद्र, शस्त्रक्रिया कक्ष आणि देण्यात येणाऱ्या सुविधा, रुग्णालयाची माहिती सुविधा, ग्रामीण भागात देण्यात  येणाऱ्या वैद्यकीय सेवा, आरोग्य विमा, कर्करोगावरील उपचार आदी बाबींचा समावेश होता.
          यावेळी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग, डॉ. पूनम शिवकुमार,     डॉ. सुचिता तिडके, डॉ. चंद्रशेखर बडोले, डॉ. अजय शुक्ला, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. प्रकाश नागपूरे, डॉ. आश्विनी कलंत्री, डॉ. धीरज भंडारी, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त तापडीया उपस्थित होते.
000000







कुष्ठरोगाच्या समुळ निर्मुलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज
-         उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
Ø  ‘आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठसेवा पुरस्काराचे वितरण
          वर्धा दि 25 :- कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टींना प्राधान्य देऊन कुष्ठरोगाच्या समुळ निर्मूलनासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर दयावा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार-2017 च्या वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. पंकज भोयर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, संस्थेचे अध्यक्ष धिरुभाई मेहता, जे.के. बांठिया, डॉ. बी.एस.गर्ग, पी.एल.तापडिया आणि पुरस्कार प्राप्त डॉ. अतुल शहा व डॉ. एम.डी. गुप्ते  आदी  मान्यवर उपस्थित होते.
          महात्मा गांधी , कस्तुरबा गांधी आणि सुशिला नायर  यांच्या  प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते सुतमाला अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. एम.डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मुलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार -2017 प्रदान करण्यात आला.
          उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी भाषणाची सुरवात मराठीतून करून उपस्थितांची मने जिंकली.  यावेळी श्री. नायडू म्हणाले, मानवसेवा हीच माधव सेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. महात्मा गांधी यांचे विचार आजही सुसंगत ठरतात. ‘खेडयांकडे चला  असा नारा महात्मा गांधी यांनी दिला. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केद्रित करणे गरजेचे आहे. खादी हे स्वावंलबन आणि साधेपणाचे प्रतिक आहे, अशी स्वदेशीबाबतची शिकवण देतांना महात्मा गांधी यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर खादीचे उत्पादन ‘मनरेगा’शी जोडण्याची संकल्पना अंत्यंत उपयुक्त ठरू  शकते. आपल्या प्राचिन परंपराचे,संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. उज्वल भवितव्यासाठी निसर्ग आणि संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही श्री. नायडू यांनी सांगितले.
कुष्ठरोगाबाबत  महात्मा गांधी यांचे विचार मांडतांना श्री. नायडू म्हणाले, नोव्हेंबर १९४७ च्या ‘हरिजन साप्ताहिकात गांधीजींनी लिहिले होते, ‘‘कुष्ठरोग्यांची सेवा ही केवळ उपचारापुरती नाही तर त्यांचे पुनर्वसन करून, त्यांचे नैराश्य दूर करून जगण्याचा आनंद त्यांना घेता यावा यासाठीसुद्धा आहे. अशा रोग्याचे जीवन तुम्ही जर बदलून टाकले तर तुम्ही खेड्यातच नव्हे तर राष्ट्रात परिवर्तन घडवून आणू शकाल.’’ १९४५ मध्ये प्रो. जगदीशन यांनी कस्तुरबा कुष्ठ निलयम या कुष्ठरोग्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यासाठी महात्माजींना निमंत्रित केले असता ते म्हणाले होते,‘‘उद्घाटनासाठी तुम्ही अन्य कुणाला तरी बोलवा पण ते बंद करण्यासाठी मात्र मला बोलवा अशा त-हेने कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था हा त्या समस्येवरचा तोडगा नाही, असेच त्यांनी सुचविले.
१९५० मध्ये  स्थापन झालेल्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊन्डेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी बजावून हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाऊन्डेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार तर केलेच पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले. असे गौरवोद्गार श्री. नायडू यांनी काढले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के इतके होते. २०१२ सालापर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यातून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश संपादन केले असले  तरीही नवी प्रकरणे पुढे येत आहेत. याबाबत त्यांनी  चिंता व्यक्त केली.
छत्तीसगड आणि दादरा-हवेली या केंद्रशासित प्रदेशात दर दहा हजारी दोन आणि चार रोगी हे प्रमाण आजही पहावयास मिळते. ज्या बिहार, महाराष्ट्र आणि प. बंगाल या राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले होते त्या राज्यात अलीकडच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. २०१२-१३ यावर्षी देशातील २०९ जिल्हे कुष्ठरोगाने बाधित होते, या जिल्हयात  लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे आणि रोग्यांना उपचार पुरविणे या गोष्टीला आपण प्राथमिकता द्यायला हवी. रोगापेक्षा एक कलंक म्हणून रोग्याकडे बघितले जाते ही खरी चिंतेची बाब आहे. उपचारासंबधी अनभिज्ञता आणि रोगाविषयी असलेल्या भ्रामक कल्पना याचाच कुष्ठरोग्यांना अधिक त्रास होत असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले.
संपूर्ण जगात दरवर्षी अडीच लाख नवीन प्रकरणे प्रकाशात येतात. समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. हा रोग कलंक आहे ही समजूत दूर करण्याचे प्रयत्न झाले तर रोगी स्वत:चा रोग लपवून ठेवणार नाहीत. २०२० पर्यंत या रोगामुळे व्यंग येणा-यांची संख्या दहा लाखात एक व्यक्ती इतकी कमी करण्याचा संकल्प जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी बहुआयामी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहनही श्री. नायडू यांनी केले.
पुरस्कार विजेते डॉ. एम.डी.गुप्ते मनोगतात म्हणाले, कुष्ठरोग निर्मुलनाच्या क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे योगदान मोठे आहे. कुष्ठरोग निर्मुलनाच्या क्षेत्रात आगामी काळात काम करतांना सुदुर सर्वेक्षण, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर, स्थानिक संबधित संशोधनाचा वापर आणि किफायतशीर सेवा या मुद्दयांवर अधिक भर दयावा लागेल. असेही डॉ. गुप्ते यांनी सांगितले.
डॉ. अतुल शहा म्हणाले, कुष्ठरोग व कुष्ठ  रुग्णांप्रतीचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची अदयापही नितांत आवश्यकता आहे. कुष्ठरोगावरच्या उपचारात सर्वांगीण उपचार पध्दतीवर  भर देण्याची गरज असून कुष्ठरुग्णांसमवेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येऊ नये, असे आवाहनही डॉ. शहा यांनी केले.
अध्यक्ष धिरुभाई मेहता प्रास्ताविकात म्हणाले, कुष्ठरोग निर्मुलनाच्या क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय अनेक वर्षापासुन कार्यरत असून कुष्ठरोग व कुष्ठरुग्णांबाबत समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन संस्था मार्गक्रमण करीत असल्याचेही श्री. मेहता यांनी सांगितले.
जे.के. बांठिया आणि डॉ. बी.एस.गर्ग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. पी.एल.तापडिया यांनी आभार मानले.
00000