Saturday 31 December 2011

माहिती व जनसंपर्क महासंचालक पदी पी.टी.नलावडे


             मुंबई दि. 31:  भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागात सह सचिव पदावर कार्यरत असलेल्या पी.टी.नलावडे यांची  माहिती जनसंपर्क महासंचालक या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
            सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आज नियुक्तीचे हे आदेश निर्गमित करण्यात आले.
            याव्यतिरिक्त झालेल्या नियुक्त्या अशा आहेत. अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद याठिकाणी कार्यरत असलेल्या आर.एन.शिनगारे यांची नियुक्ती  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर येथे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नाशिक येथील डी.आर.बन्सोड यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे, गोंदियाचे जिल्हाधिकारी ए.के.झाडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई येथे, वाशिम चे जिल्हाधिकारी यु.एस.राठोड यांची नियुक्ती महासंचालक, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती येथे तर ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त पी.डी.करवंदे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय  संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी रत्नागिरी एम.बी.गायकवाड यांची नियुक्ती संचालक, माहिती व तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई येथे पदोन्नतीने करण्यात आली आहे, (अधिकालिक वेतनश्रेणीत पद उन्नत करुन)  नियोजन विभागाच्या सहसचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांची  संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग महसूल वन विभाग  पदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

अपघात अश्रुंचे कारण, सुरक्षा सुखाचे कोंदण रस्‍ते सुरक्षा पंधरवड्याचे आज वर्धेत उदघाटन


      वर्धा,दि.31- दरवर्षीप्रमाणे 1 ते 15 जानेवारी दरम्‍यानच्‍या कालावधीत रस्‍ता सुरक्षा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून, याचे उदघाटन उद्या दि. 1 जानेवारी 2012 रोजी सकाळी 10 वाजता बजाज चौक येथे वाहतूक नियंत्रण शाखेच्‍या मैदानात होत आहे.
     23 वा रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहाचे उदघाटन के.आर.बजाज उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व  अविनाश कुमार पोलीस अधिक्षक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तसेच विजय खोराटे मुख्‍याधिकारी नगर परिषद , लक्ष्‍मीनाराण सोनवणे शिक्षणाधिकारी यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होणार आहे.
     उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी ही माहिती दिली. हे पंधरवड्याचे 23 वे वर्ष आहे. अॅक्‍सीडेन्‍ट ब्रिंग टिअर्स सेफ्टी ब्रिंग्‍ज चिअर अर्थात अपघात अश्रुंचे कारण, सुरक्षा सुखाचे कोंदण असे या वेळेचे ब्रीदवाक्‍य आहे.
     या पंधवड्यातील कार्यक्रम असे राहणार आहेत.
    दि. 1 जानेवारी 2012 रेाजी रस्‍ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन, दि. 2 जानेवारी रोजी वाहनांना व बैलगाडयांना रिफ्लेक्‍टर टेप लावणे, दि.3 जानेवारी रोजी वाहन चालकांची नेत्र तपासणी, 4 जानेवारी रोजी मोटार वाहन चालक, स्‍कूलबस चालक प्रशिक्षण व पार्कींग व रहदारी नियमाविषयी प्रबोधन, दि. 5 जानेवारी  विद्यार्थ्‍यांचे रस्‍ता सुरक्षा विषयी वत्‍कृत्‍व, चित्रकला व निबंध स्‍पर्धा, दि. 6 जानेवारी रोजी वाहन चालक व पोलीस कर्मचारी यांचेकरीता धोकादायक रसायन हाताळणी संबंधी प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण,दि.7 जानेवारी टोलनाक्‍यावर माहिती पुस्‍तीकेचे वाटप तसेच सिनेमा केबलवर स्‍लाईड शो, दि. 8 जानेवारी 2012 रोजी सार्वजनिक बांधकाम  विभागासोबत ब्‍लॅकस्‍पॉटची दुरुस्‍ती करणे व तुटलेले दुभाजक दुरुस्‍ती करणे, दि. 9 जानेवारी टि.व्‍ही.चॅनल, रेडिओवर परिसंवाद कार्यक्रम तसेच सिनेमा टॉकिजमध्‍ये स्‍लाईड शो दाखविणे, दि. 10 जानेवारी आर.एस.पी. रॅली ऑडीओ, व्हिडीओ प्रदर्शन व विद्यार्थ्‍यांना वाहतुक नियमांची माहिती व प्रशिक्षण, दि.11 जानेवारी  चौका-चौकात झेब्राक्रॉसींग पादचारी व जनतेला माहिती देणे तसेच चौकात बोर्ड लावणे, दि. 12 जानेवारी  पत्रके वाटप व चालकाची जनजागृती,    दि. 13 जानेवारी वाहन चालक, पेालीस व वाहतुक कर्मचारी यांना प्रथमोपचार प्रशिक्षण मार्गदर्शक डॉ. मोहन अडयाळकर, दि. 14 जानेवारी रस्‍ता सुरक्षा अभियान संबंधी सेमिनार,आणि दि. 15 जानेवारी 2012 रोजी समारोप कार्यक्रम होईल.

सोमवार 2 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


    वर्धा, दि.31 – सोमवार दि. 2 जानेवारी 2012 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय वर्धा येथे नेहमी प्रमाणे महिन्‍याच्‍या पहिल्‍या सोमवारी होणारा लोकशाही दिन होईल. मागील महिन्‍यात नगरपालिका /नगर परिषद निवडणूक आदर्श आचारसंहिता असल्‍याने लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला होता.
      आचारसंहिता आता संपली आहे त्‍यामुळे सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता लोकशाही दिन होईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्‍यावी, असे जिल्‍हाधिकारी कार्यालयाव्‍दारे कळविण्‍यात  आले आहे.

ग्रामबिजोत्‍पादनांत सहभागी शेतक-याची कार्यशाळा


   वर्धा,दि.31-विकास भवन वर्धा येथे नुकतेच (दि.22 डिसे.) विविध योजने अंतर्गत राबविण्‍यांत येणा-या ग्रामविजोत्‍पादन कार्यक्रमात भाग घेणा-या शेतक-यांची कार्यशाळा जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यांत आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्‍याकरीता कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथील डॉ. नेमाडे, जिल्‍हा बिज प्रमाणिकरण यंत्रणा वर्धा चे गावंडे उपस्थित होते

      प्रथम गावंडे यांनी बियाणे कायदा 1966 नुसार ग्रामबिजोत्‍पादनाच्‍या सर्व कायदेशीर बाबी समजावुन सांगीतल्‍या व ग्रामबिजोत्‍पादक शेतक-यांनी कार्यक्रमात भाग घेण्‍यासाठी काय कार्य करावयास पाहिजे याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. डॉ. नेमाडे यांनी ग्रामबिजोत्‍पादन घेताना शेतक-यांनी कोणकोणत्‍या तांत्रिक बाबी लक्षात घ्‍यावयास पाहिजे यावर सविस्‍तर मार्गदर्शन केले.

      भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेवटी कृषि विभागामार्फत ग्रामबिजोत्‍पादक    शेतक-यांना रुपये 1000 प्रति क्विंटल बियाणे उत्‍पादनावर अनुदान देत असल्‍याचे व सन 2011-12 मध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर कडधान्‍य पिकाचे ग्रामबिजोत्‍पादन अंतर्गत उत्‍पादन झालेल्‍या  बियाण्‍याला बियाणे शेतक-यांना विक्री केल्‍यानंतर प्रति क्विंटल रुपये 1200 विक्री अनुदान देण्‍यात येणार असल्‍याचे विषद केले. तसेच जिल्‍ह्यात ग्रामबिजोत्‍पादना अंतर्गत कार्यरत पाच गटांना बियाणे प्रक्रीया युनिट 50 टक्‍के अनुदानावर देण्‍याचे नियेाजन असल्‍याचे सांगीतले.

     कार्यशाळेला 80 ग्रामबिजोत्‍पादक व 50 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत 27 शेतक-यांना ग्रामबिजोत्‍पादनासाठी रुपये 95 लक्ष 8 हजार रुपयाचे वाटप करण्‍यात आले. कार्यशाळेत सन 2010-11 वर्षात  हरबरा पिकाचे ग्रामबिजोत्‍पादन कार्यक्रमात भाग घेतलेल्‍या शेतक-यांना अनुदानाचे धनादेशाचे वाटप भाऊसाहेब ब-हाटे यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यशाळेचे संचालन धर्माधिकारी यांनी केले.

Friday 30 December 2011

योजनांची माहिती देणारे चित्ररुपी भिंतीपत्रकाचे उदघाटन जिल्‍हाधिका-यांचे हस्‍ते संपन्‍न


     वर्धा, दि.30- कृषि विभागामार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची आढावा बैठक  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजित करण्‍यात आले. सदर बैठकीचे औचित्‍य साधून कृषि विभागामार्फत समुह व गट शेतीसाठी   शेतक-यांना होणारे फायदे व विविध योजनांची  माहिती देणारे चित्रारुपी पोष्‍टर तयार करण्‍यात  आले. या पोष्‍टरचे उदघाटन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी नुकतेच केले.    
     सामुहिक शेती करण्‍यासाठी पुढील प्रमाणे असून त्‍यामध्‍ये गटामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी सभासद स्‍वतः शेतकरी असावा. गटाची नोंदणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कार्यालयात आत्‍मा संस्‍थेकडे रु. 500 भरुन करावी लागेल. गटामध्‍ये साधारण 10 ते 15 सभासद असावे. शेतकरी गट हा एकच शेती विषयक कार्यक्रम घेणारा असावा. गटातील शेतकरी एकाच गावातील व एकाच आर्थिक स्‍तरावरचे असावे. गटाचे नावे बँकेत स्‍वतंत्रा खाते उघडावे लागेल. त्‍यात दर महिण्‍यात होणारी बचत जमा करावी लागेल व  गटाचे नियमित बैठका घेणे बंधनकारक राहील.
     सामुहीक शेतीचे शेतक-यांसाठी फायदे पुढील प्रमाणे असून त्‍यामध्‍ये  गटात शासनाचया योजनांचा लाभ प्राधान्‍याने धेता येईल. गटातील सदस्‍यांना  शेतीसाठी लागणा-या बि, बियाणे, खते, औषधी, इत्‍यादी स्‍वस्‍त दारात उपलब्‍ध होवू शकतील. गटातील सदस्‍यांनी शेतमालाचे संघटीतरीत्‍या  विक्री केल्‍यास मालाला चांगला भाव मिळेल. गटाच्‍या माध्‍यमातून कृषि मालावर प्रक्रीया केल्‍यास शेतमालाचे मुल्‍य  वाढ होवून शेतक-यांना जास्‍तीचा नफा मिळेल. गटातील सदस्‍या कडून दरमहा बचत केल्‍यामुळे गटाजवळ निधी उपलब्‍ध राहील व त्‍या निधीतून गटातील सदस्‍यांना व तातडीच्‍या कामासाठी तात्‍काळ कर्ज मिळू शकेल.

     राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत पॉवर ऑपररेड मशीनमध्‍ये रोटावेटर खरेदीच्‍या 50 टक्‍के अनुदान 60 हजार रुपये चा चेक नंदकिशोर तोटे यांना जिल्‍हाधिकारी यांचे हस्‍ते देण्‍यात आला. कृषि विभागामार्फत राबविल्‍या जाणा-या आत्‍मा,राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान, पाणलोट प्रकल्‍प, आय.आर.डी.एफ प्रकल्‍पाचा अध्‍यक्षाच्‍या व सदस्‍याच्‍या समवेत आढावा घेण्‍यात आला व विविध घटकाच्‍या बाबीवर चर्चा करण्‍यात आली. असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कळवितात.

मुलां-मुलिंमध्‍ये भेदाभेद करु नका - डॉ. थोरात

     वर्धा,दि.30-अनेक क्षेत्रांत मुलिंनी नेत्रपदक शिखरे पदक्रांत केली असून मुलिंना मुलासारखे समान अधिकार शासनाने प्रदान केले आहे. अद्यापही प्रसवपूर्व स्त्रिभ्रृन हत्‍येचे प्रमाण वाढलेले असून दर हजारी मुलींचे प्रमाण घटत होत आहे. ही बाब समाजासाठी चिंतेची असून ती दूर करण्‍यासाठी प्रसवपूर्व निदान तंत्राच्‍या गैर प्रकाराला आळा घालून मुलांमुलिंमध्‍ये भेदाभेद करु नका असे आवाहन आरोग्‍य विभागाच्‍या माजी उपसंचालक डॉ. पुष्‍पा थोरात यांनी केले.

      जिल्‍हा समान्‍य रुग्‍णालयाच्‍या सभागृहांत प्रसवपूर्व निदान तंत्र व गर्भधारण पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र या विषयी समुचित प्राधिकरण संबधित अधिका-यांसाठी कार्यशाळा संपन्‍न झाली त्‍याप्रंसगी त्‍या बोलत होत्‍या.
     यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक रत्‍ना रावखंडे, नागपूरचे डॉ. शिवकुमार चव्‍हाण , अतिरीक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सोमलकर व डॉ. शर्मा मंचावर उपस्थित होते.
     ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात मुलांच्‍या प्रमाणात वाढ झाली असल्‍याचे सांगून डॉ. थोरात म्‍हणाले की गेल्‍या काही वर्षात अनेक भागामध्‍ये प्रसवपूर्व निदान करणा-या केंद्राची वाढ झाली असून त्‍यातील काही केंद्रे गर्भ चिकित्‍सा करण्‍यासाठी निदान तंत्राचा गैरवापर करतात. त्‍यामुळे मुलिंच्‍या प्रमाणात घट होताना दिसत आहे. वास्‍तविक गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्‍हा समजण्‍यात येतो. अशा प्रवृत्‍ती टाळण्‍यासाठी स्‍वंयंसेवी संस्‍थे सोबत आता समुचित प्राधिका-यांना व संबधित अधिका-यांना प्रसवपूर्व निदान केंद्राची तपासणी करण्‍याचे अधिकार दिले आहे यामध्‍ये दोषींवर गुन्‍हा  नोंदवून कार्यवाही सुध्‍दा होऊ शकते. यावेळी त्‍यांनी विस्‍ताराने  नियमनाचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
     यावेळी बोलताना डॉ. चव्‍हाण म्‍हणाले की विकृत स्‍वरुपाचे बाळ, मतीमंद व इतर असाध्‍य आजाराचे बाळ जन्‍माला येऊ नये यासाठी प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर या चांगल्‍या कामासाइी होऊ शकतो. मात्र अलिकडे स्त्रिभृण हत्‍यासाठी या तंत्राचा गैरवापर होत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात समाजस्‍वास्‍थावर विपरीत परिणाम होऊ शकते असेही ते म्‍हणाले.
    प्रास्‍ताविक करताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. रावखंडे म्‍हणाले की 2001 च्‍या जनगननेनुसार महाराष्‍ट्रात दर हजारी पुरुषांमागे 922 असे सित्रायांचे प्रमाण आहे. तर जिल्‍ह्यामध्‍ये 928 व 2011 च्‍या जनगणने प्रमाणे स्त्रियांचे प्रमाण 916 असे घटते प्रमाण  आहे. यावेळी त्‍यांनी पी.एन.डी.टी. कायदा व नियमाच्‍या तरतूदी, संस्‍थाची नोंदणी, डॉक्‍टर व केंद्रधारकावर बंधने, नियंत्रण व पर्यवेक्षण कार्यप्रणाली, लोक जागृतीचे कार्य, समुचित जिल्‍हा व तालुका पातळीवरील प्राधिकरणाचे अधिकार, कायद्यातील तरतुदींचा भंग केल्‍यास गुन्‍ह्याचे स्‍वरुप, गर्भधारणापूर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र अधिनियिम 2003 च्‍या तरतूदी व दक्षता पथकाची माहिती तपशिलाने त्‍यांनी यावेळी दिली.
     कार्यशाळेचे संचलन डॉ. शर्मा यांनी व आभार डॉ. रवि धकाते यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.  

शेती भावाचे अंदाजपत्रका विषयी कार्यशाळा


     वर्धा, दि. 30- विकास भवन वर्धा येथे दि. 22 डिसेंबर 2011 रोजी कृषि अर्थशास्‍त्र  व सांख्यिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांचे संयुक्‍त विद्यमाने जिल्‍ह्यात कार्यरत जिल्‍हा कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांकरीता शेतक-यांना शेती भावाचे अंदाजबाबत जागृती या विषयावर कार्यशाळा आयेाजीत केली होती.
     कार्यशाळेत डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्‍यापक ए.एस.टिंगरे यांनी पिकाचे पेरणीपूर्वी व पिकाचे काढणीपूर्वी  प्रत्‍येक शेत मालाचे भावाचा अंदाज कसा काढण्‍यात येतो याबाबत सविस्‍तर माहिती दिली व काढलेल्‍या  अंदाजीत भावाची माहिती विद्यापीठामार्फत सर्व दैनिक वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करत असल्‍याचे सांगीतले. विद्यापीठामार्फत जाहीर होणारे पुढील 5-6 महिन्‍याचे अंदाजीत भाव काढण्‍याचे काम मागील 4 वर्षापासून सुरु असून विद्यापीठाने वर्तविलेले अंदाजे भाव व प्रत्‍यक्ष त्‍या -त्‍या महिन्‍यात  असलेले बाजारभाव जवळपास 90 टक्‍के बरोबर येत असल्‍यामुळे विद्यापीठाकडून जाहीर होणारे पूर्व अंदाजीत भावाचे भरवशावर शेतक-यांनी शेतमाल केव्‍हा विकावा म्‍हणजे मालाला जास्‍तीत जास्‍त भाव मिळेल याची माहिती कृषि विभागामार्फत शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात यावे असे आवाहन केले.
     या कार्यशाळेत जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे यांनी सांगितले की विद्यापिठाने प्रत्‍येक अंदाजाचे वेळी शेतकी विभागचे ई-मेल वर माहिती टाकल्‍यास विभगामार्फत अंदाजीत भाव शेतक-यापर्यंत पोहचविण्‍याचे काम कृषि विभागामार्फत करण्‍यात येईल.
     कार्यशाळेला कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday 29 December 2011

विहिरी वर पंप बसविण्‍याच्‍या योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन


    वर्धा,दि.28- कृषि विभाग जिल्‍हा परिषद वर्धा मार्फत अनु.जाती व नवबौध्‍द शेतक-यांचे शासकीय योजने अंतर्गत तसेच खाजगी सिंचन विहीरीवर विद्युत कनेक्‍शन व विद्युत पंप 100% अनुदानावर वाटपाच्‍या  योजनेस मंजुरी मिळाली असुन, सदर योजना मार्च 2012 पर्यत पुर्ण करावयाचे आहे. त्‍या करिता अनुदानाची मर्यादा रु 50,000/- आहे.
या योजने करिता पात्र लाभार्थी निवडीचा प्राधान्‍य क्रमानूसार रोजगार हमी योजना अंतर्गत जवाहर विहिरी, रोजगार हमी योजना म.ग्रा.रो.ह.यो. तसेच अनु.जाती/नवबौध्‍द शेतक-यांना विहिर पुर्ण बांधुन देण्‍यात आलेली आहे व विहिरीस पुरेशे पाणी आहे. असे लाभार्थी (ज्‍यात महिला लाभार्थींना प्रथम प्राधान्‍य) कृषि विभागामार्फत अनु.जाती उपयोजना अंतर्गत बांधुन दिलेल्‍या विहिरी. अनुसूचित जातीच्‍या खाजगी मालकीची विहिरी. विदर्भ विभागातील शेतकरी पॅकेज अंतर्गत बांधण्‍यात आलेल्‍या विहिरी यांचा समावेश आहे.
 योजनेचा लाभ घेवु इच्‍छीणा-या शेतक-यांनी तालुक्‍यातील पंचायत समितीच्‍या कृषि विभागाशी संपर्क साधावा व आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता करुन घ्‍यावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी केले आहे.

वर्धेत तीन दिवसीय ग्रंथोत्‍सवाचे आयोजन


वर्धा,दि.28-महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ आणि जिल्‍हा माहिती कार्यालय वर्धा याचे वतीने दिनांक 12, 13, 14 जानेवारी 2012 रोजी ग्रंथोत्‍सवाचे आयोजन होणार आहे.
     या ग्रंथोत्‍सवात नामांकिंत कवि व लेखक सहभागी होणार असून, ग्रंथोत्‍सवाची समिती नुकतीच स्‍थापन करण्‍यात आली आहे. या समिती चे अध्‍यक्ष जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर असून, सचिव म्‍हणून जिल्‍हा ग्रंथपाल सुरज मडावी राहणार आहे. या समितीचे समन्‍वयक म्‍हणून मिलींद आवळे यांची नियुक्‍ती करण्‍यांत आली आहे.
आयोजन समितीचे सदस्‍य म्‍हणून प्रगतीशिल लेखक संघाचे अध्‍यक्ष राजेद्र मुंडे, विदर्भ साहित्‍य संघ शाखा वर्धाचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, वर्धा जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे, यशवंतराव दाते स्‍मृती संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रदिप दाते समन्‍वय संस्‍थेचे प्रा. शेख हाशम, साहित्‍यीक डॉ. प्रविण वानखेडे, साहित्‍यीक प्रा.नवनीत देशमुख, साहित्‍यीक डॉ. किशोर सानप, महात्‍मा गांधी विद्यालय वर्धेचे प्राचार्य पद्माकर बाविस्‍कर, कस्‍तुरबा कला महाविद्यालयाच्‍या प्राचार्य स्मिता वानखेडे
नियंत्रित सदस्‍य म्‍हणून निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले व जि.प.चे शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीकांत सोनवणे यांचा या समितीमध्‍ये समावेश करण्‍यांत आला आहे. असे जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर कळवितात.

Tuesday 27 December 2011

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) आणि (3) कलम लागू



   वर्धा, दि.27- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 लागू केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 10 जानेवारी 2012 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                          00000

संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानावर आतापावेतो 64 टक्‍के खर्च - शेखर चन्‍ने


    वर्धा,दि.27-जिल्‍ह्यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्‍यात येत असून, या अभियानावर आतापर्यंत 64.27 टक्‍के खर्च करण्‍यात आला असल्‍याची माहिती जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
     जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या कक्षामध्‍ये संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान कार्यक्रम आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प  अधिकारी बी.एम.मोहन, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी विपूल जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.

     संपूर्ण स्‍वच्छता अभियाना अंतर्गत केंद्र शासनाने वर्धा जिल्‍ह्याकरीता एकूण 22 कोटी 70 लक्ष 99 हजार रुपयाच्‍या प्रकल्‍पास मंजूरी प्रदान केली होती त्‍यापैकी 15 कोटी 18 लक्ष रुपये आतापावेतो प्राप्‍त झाले आहे. 14 कोटी 39 लक्ष 34 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला असून, या खर्चामध्‍ये वैयक्तिक शौचालय, शालेय स्‍वच्‍छता गृह, आंगणवाडी स्‍वच्‍छता गृह, सार्वजनिक स्‍वच्‍छता गृह, घनकचरा व द्रव्‍य व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन / विक्री केंद्र, प्रशासकीय व इतर अनुशांगिक खर्चाचा समावेश आहे. या खर्चाची टक्‍केवारी 64.27 आहे. असे यावेळी सांगण्‍यात आले.

     या आढावा बैठकीत संपूर्ण जिल्‍ह्यात जनजागृती अभियाना अंतर्गत 47 लक्ष 55 हजार रुपयांच्‍या खर्चाला मंजूरी, संगणक खरेदीला मंजूरी, वाहन भाडे तत्‍वावर घेण्‍यास मंजूरी, एल.सी.डी. प्रोजेक्‍टरच्‍या दुरुस्‍तीला मंजूरी प्रदान केली.

     याप्रसंगी संपूर्ण स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत कार्यकरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday 26 December 2011

2012-13 या वित्‍तीय वर्षासाठी 118 कोटी 33 लक्ष रुपयाच्‍या प्रारुप आराखड्यास मंजूरी- राजेंद्र मुळक


     वर्धा,दि.26- येथील विकास भवन येथे जिल्‍हा नियोजन समितीची बैठक संपन्‍न झाली. यावेळी 2012-13 या वित्‍तीय वर्षासाठी  कमाल आर्थिक मर्यादेत राहून, जिल्‍हा नियोजन समितीने 118 कोटी 33 लक्ष रुपये खर्चाच्‍या आराखड्यास मंजूरी प्रदान करण्‍यात आली असल्‍याची माहिती वित्‍त व नियोजन तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
     यावेळी मंचावर खासदार दत्‍ताजी मेघे, पाणी पुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार अशोक शिंदे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने उपस्थित होते.
     जिल्‍हा वार्षीक योजनेच्‍या आराखड्याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री मुळक म्‍हणाले की 2012-13 च्‍या पुढील वित्‍तीय वर्षासाठी 118 कोटी 33 लक्ष     16 हजार रुपये खर्चाच्‍या आराखड्यास  मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये सर्वसाधारण योजने मध्‍ये 69 कोटी 12 लक्ष आदिवासी उपयोजने मध्‍ये 20 कोटी 50 लक्ष 16 हजार व अनुसूचित उपयोजनेमध्‍ये 28 कोटी 71 लक्ष रुपयाचा समावेश आहे. सर्वसाधारण योजनेमध्‍ये अंमलबजावणी करणा-या अधिका-यांनी 107 कोटी 57 लक्ष 46 हजार, आदिवासी उपयोजनेसाठी 34 कोटी 10 लक्ष 24 हजार व अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 27 कोटी 71 लक्ष रुपयाची मागणी केली होती. त्‍यापैकी वरील प्रमाणे कमाल आर्थिक मर्यादेत राहून यातील अतिरीक्‍त मागणी 52 कोटी 72 लक्ष 56 हजाराची नोंद करण्‍यात आली आहे. असल्‍याने ही मागणी राज्‍य स्‍तरावरील बैठकीत आवश्‍यक त्‍या कारणासह चर्चा करण्‍यात येईल.
     सर्वसाधारण योजने अंतर्गत कृषि व संलग्‍न  सेवेसाठी प्रस्‍तावित अनुदान  9 कोटी 63 लक्ष 30 हजार असून कमाल आर्थिक मर्यादेत 8 कोटी 20 लक्ष 80 हजार मंजूरीसाठी पात्र ठरविण्‍यात आले. अरिीक्‍त मागणी 1 कोटी 42 लक्ष 50 हजार आहे. ग्रामीण विकास कार्यक्रमा अंतर्गत 17 कोटी 38 लक्ष 36 हजार रक्‍कम प्रस्‍तावित केली असून कमाल आर्थिक मर्यादेत 11 कोटी 88 लक्ष  36 हजाराला मंजूरी प्रदान करण्‍यात आली. उर्वरीत 5 कोटी 50 लक्ष रुपयाची अतिरीक्‍त मागणी प्रस्‍तावित आहे. पाटबंधारे या शिर्षकाअंतर्गत 7 कोटी 45 लक्ष 30 हजार प्रस्‍तावित करण्‍यात आले असून, कमाल मर्यादेनुसार 3 कोटी 47 लक्ष 80 हजार रकमेला
मंजूरी प्रदान करण्‍यात आली तर 3 कोटी 97 लक्ष 50 हजार रुपयाची अतिरीक्‍त मागणी करण्‍यात आली आहे. विद्यूत विकास वितरण कार्यक्रमा अंतर्गत अंमलबजावणी अधिका-यांनी    5 कोटीची मागणी केली असून, कमाल मर्यादे अंतर्गत 2 कोटीची मागणी मंजूर करण्‍यात आली. उर्वरीत 3 कोटीची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यता आली आहे. उद्योग विकासा अंतर्गत 50 लक्ष रुपयांची मागणी करण्‍यात आली असून कमाल मर्यादेत 45 लक्ष रुपये मंजूर करण्‍यात आले. उर्वरीत 5 लक्ष रुपयाची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली. वाहतूक व दळणवळणासाठी 25 कोटी 75 लक्ष रुपये प्रस्‍तावित करण्‍यता आले त्‍यापेकी कमाल आर्थिक मर्यादे अंतर्गत 14 कोटी 62 लक्ष 66 हजार रुपये मंजूर करण्‍यात आले असून, 11 कोटी 12 लक्ष 34 हजार रुपये अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आली आहे. सर्वसाधारण आर्थिक सेवा योजने अंतर्गत 7 कोटी 52 लक्ष 59 हजार रुपये प्रस्‍तावित करण्‍यात आले  त्‍यापैकी 7 कोटी 22 लक्ष 95 हजार रुपये  नियतव्‍यय मंजूर करण्‍यता आला असून, 29 लक्ष 56 हजाराची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आहे. सामाजिक व सामुहिक सेवा अंतर्गत 34 कोटी 32 लक्ष 99 हजार रुपये प्रस्‍तावित करण्‍यात आले होते. त्‍यापैकी  21 कोटी 24 लक्ष 43 हजार रुपयाला मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून, विकास कामावर एकूण  12 कोटी 95 लक्ष 56 हजाराची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आहे.
जिल्‍ह्यातील विकास कामांची प्रगती समाधानकारक असून, चालू वर्षामध्‍ये आतापर्यंत सर्वसाधारण योजनेवर 27 कोटी 69 लक्ष 26 हजार रुपये , अनुसूचित जाती उपयोजनेवर 4 कोटी 32 लक्ष 57 हजार व आदिवासवी उपाययोजनेवर     8 कोटी 41 लक्ष 90 हजार रुपये खर्च झालेला असून, 64 प्रतिशत खर्च झालेला आहे.
पुढील आर्थिक वर्षामध्‍ये नाविण्‍यपूर्ण योजना प्रस्‍तावित असून यामध्‍ये  तिर्थक्षेत्राचा विकास, नविन आरोग्‍य केंद्राचा समावेश आहे. यावेळी खर्चाच्‍या पूर्नविनीयोजनाला मंजूरी प्रदान करण्‍यता आली. यावेळी 2011-12 मध्‍ये झालेल्‍या आतापावेतो खर्चाचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.
यावेळी खासदार दत्‍ताजी मेघे, राज्‍यमंत्री  रणजित कांबळे व इतर जिल्‍हा नियोजन समितीच्‍या सदस्‍यांनी चर्चेत भाग घेवून समसयांचे निराकरण केले . तसेच त्‍यांनी उपयुक्‍त सुचना सभागृहात सादर केल्‍या.
यावेळी जिल्‍हा नियेाजन समितीचे सदस्‍य, विभाग प्रमुख मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.