Monday 27 July 2020


जिल्ह्यात यंदा विक्रमी 32 लाख 10 हजार क्विंटल कापसाची खरेदी
पालकमंत्र्यांच्या सततच्या पाठपुरावयामुळे शेतकऱ्यांना दिलासा
       वर्धा,दि 27 (जिमाका):- मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा प्रश्‍न उभा ठाकला होता. पण नंतरही  शासनाने कापूस खरेदी करण्यास मान्यता देऊनही कधी खरेदी  केंद्राची कमतरता तर कधी मजुरांची वाणवा अशा समस्यांवर मात केली.  पालकमंत्र्यांनी आठवड्यातून दोनदा जिनिंग-प्रेसिंग मालक, सीसीआयचे प्रतिनिधी, कापूस पणन महासंघ, कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे प्रतिनिधी यांच्याशी सातत्याने बैठका घेत, भर उन्हात दौरे करून वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी पूर्णत्वास नेली.  यावर्षी जिल्ह्यात 1 लक्ष 74 हजार 709  शेतकऱ्यांकडून 32 लक्ष 10 हजार 593 क्विंटल कापसाची कापसाची खरेदी झाली आहे.  कोरोना संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा  दिलासा मिळाला आहे.
            जिल्ह्यात 2019-20 मध्ये 2 लक्ष 34 हजार 997 हेक्टर क्षेत्र  कापसाच्या लागवडीखाली होते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन लॉक डाऊनच्या स्थितीपर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 26 हजार 641 शेतकऱ्यांकडील 23 लक्ष 12 हजार 798  क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मात्र कोविडचे संकट सुरू होताच महाराष्ट्र शासनाला लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये कापूस खरेदीची प्रक्रियाही काही काळ बंद ठेवावी लागली. परंतु शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचा प्रश्न पाहता  राज्य शासनाने दुसऱ्या लॉक डाऊनमध्ये कापूस खरेदीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली .  पण त्यासाठी 50 गाड्यांची मर्यादा ठेवण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणात परराज्यातील मजूर आपापल्या गावी परत गेल्यामुळे कापूस खरेदीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हते. 
        हे प्रश्न समोर येताच पालकमंत्री सुनील केदार यांनी सी सी आय चे  राज्याचे महाप्रबंधक यांच्याशी  फोन वर चर्चा करून त्यांना वर्धा जिल्ह्यातील खरेदी केंद्राची पाहणी करण्यास बोलवले.  स्वतः त्यांच्यासोबत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्ह्याच्या आठही तालुक्यांचा दौरा केला. जिथे -जिथे अडचणी येत होत्या तिथे पालकमंत्री स्वतः जिनिंग-प्रेसिंग मालकांशी, कृषी उत्पन्न बाजार समिती व  पणन महासंघाचे प्रतिनिधी तसेच  जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवत होते. यासाठी 45 डिग्री सेल्सियस तापमानात दौरा असो की रात्री बारा वाजता बैठक असो त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढली.
      अनेक ठिकाणी केवळ 2 खरेदी केंद्र होते तिथे वाढीव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये वर्धा -5 ,हिंगणघाट-  6,   सेलू- 6, समुद्रपूर- 5, देवळी – 6, कारंजा – 3, आर्वी 6,  अशी जिल्ह्यात 37 कापूस खरेदी केंदें सुरू करण्यात आली. केंद्र सुरू झाल्यावरही कापूस गाठी आणि सरकी  ठेवण्यासाठी गोडाऊनच्या उपलब्धतेचा प्रश्न उभा राहिला. यावर एम. आय. डी. सी. मधील खाजगी रिकामे गोडाऊन उपलब्ध करून देण्यात आले. लॉक डाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरातच लॉक झालेला कापूस खरेदी केंद्रात पोहचला होता. पालकमंत्र्यानी सतत दोन महिने केलेल्या पाठपुराव्यामुळे जुन महिना अखेर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या 48 हजार 63 शेतकऱ्यांकडील 8 लक्ष 97 हजार 804 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कोविड-19 च्या पूर्वीचे आणि कोविड-19च्या  नंतर अशी एकूण 1 लक्ष 74 हजार 709 शेतकऱ्यांकडील 32 लक्ष दहा लाख 593 क्विंटल कापसाची खरेदी जिल्ह्यात पूर्ण झाली आहे.  पेरणीच्या तोंडावर कापूस विक्री होऊन शेतकऱ्यांच्या हातात पेरणी करण्यासाठी दोन पैसे देण्याचे महत्वाचे काम याकाळात झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
        पालकमंत्री सुनील केदार -मुळात वर्धा जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. लॉक डाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी विकला जावा यासाठी प्रयत्न केले. कापुस खरेदी जूनच्या अखेरीस संपवणारा वर्धा हा पहिला जिल्हा ठरला. शेतकऱ्यांच्या हातात पेरणीसाठी पैसे मिळाले हे वर्धा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मिळालेले सर्वात मोठे समाधान आहे.
                                                                        0000