Friday 21 December 2012


योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देण्यासाठी 1 जानेवारीपूर्वी बॅंकेत बचत खाते उघडा - अपुर्वा चंद्रा



            वर्धा ,दिनांक 20 : केंद्र व राज्य शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ  थेट लाभार्थ्‍यांच्‍या बचत खात्‍यात जमा करण्‍याच्या दृष्‍टीने राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये बचत खाते उघडण्याची विशेष मोहिम राबवून  1 जानेवारीपूर्वी सर्व लाभार्थ्यांचे बचत खाते उघडा, अशा सूचना केंद्रिय मानवसंसाधान विकास विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज दिल्यात.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  आयोजित आधार योजनेचा आढावा श्री. अपूर्व चंद्रा यांनी घेतला.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
            शासनाच्‍या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्‍यांपर्यंत  पोहचविण्‍याबाबत जिल्‍हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्या उपक्रमासंदर्भात  जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच आधार कार्डच्या नोंदणी संदर्भात माहिती दिली. बॅकेत खाते उघडण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतींना सर्व ग्रामस्थांना सूचना देण्यात येऊन पंचायत समिती स्‍तरावर बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठी  शिबीर आयोजित करुन 31 डिसेंबरपूर्वी सर्वांचे खाते बॅंकेत उघडा, अशा सूचना यावेळी त्यांना दिल्यात.
            जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाढे,
 उप जिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव, समाजकल्‍याण विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त, शिक्षणाधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍ह्यातील राष्‍ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनाच मिळाव  यासाठी राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये खाते काढण्याची  मोहीम जिल्ह्यात  राबवितांना आधारकार्डाच्या आधारावर  सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी बचत खाते उघडावे, अशी सूचनाही  यावेळी देण्यात  आल्यात.
            आधार नोंदणी व राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते उघडण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने  आणि जिल्‍ह्यातील  राष्ट्रीयकृत बॅकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रिय  सचिव  अपूर्व चंद्रा  यांनी अभिनंदन केले.  वेळेपूर्वी जिल्‍ह्याचे उद्दिष्‍ट पूर्ण होईल, अशी  अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
            ग्रामीण व शहरी भागातील गरीब लाभार्थ्‍यांना केंद्र व राज्‍य पुरस्‍कृत योजनेचा लाभ थेट बचत खात्यात  देण्याच्या उपक्रमामुळे वंचितांना लाभ देण्यास सहाय्य होणार आहे. जनतेनेही या योजनेत सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही  यावेळी  जिल्हाधिकारी एन. नविन सोना यांनी केले.
विद्यार्थ्यांना बॅंकेमार्फत शिष्यवृती
            महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या  सर्व योजनांचा लाभ तसेच शिष्यवृत्ती बॅंकांमार्फतच देण्यात याव्यात , अशा सूचनाही अपूर्व चंद्रा यांनी यावेळी दिल्यात.
प्रास्‍तविक व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्‍हाधिकारी  सुनिल गाढे यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व बॅकेचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                               000 0000

Thursday 20 December 2012


राष्ट्रीयकृत बॅकांनी लाभार्थ्यांची खाती तातडीने उघडावी -आनंद पाटील



            वर्धा ,दिनांक 20 : केंद्र व राज्य पुरस्कृत असलेल्या योजनेतील अनुदान थेट संबंधित लाभार्थ्यांनाच मिळावे  यासाठी राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये खाते काढण्याची  मोहीम जिल्ह्यात  यापूर्वीपासून सुरु होती. वर्धा जिल्हा हा प्रायोगिक तत्वावर  (plot project)  घेतला असून ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही बॅकेत खाते उघडले  नाही अशा लाभार्थ्यांसाठी  युद्धपातळीवर मोहीम राबवून शुन्य रकमेवर बॅकेत खाते उघडण्याचे निर्देश  केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक आनंद पाटील  यांनी बॅकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
            काल विकास  भवनामध्ये बॅंकेच्या अधिकाऱ्यांची व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बॅकेत खाते उघडण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.नविन सोना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, निवासी उपजिल्हाधिकारी गाडे, अग्रणी बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मशानकर व इतर बॅकेचे वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.
            वर्धा जिल्ह्याने अल्पावधीतच खाते उघडण्याचे काम बॅकांनी चांगले केल्याची प्रशंसा करुन संचालक आनंद पाटील म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील गरीबांना न्याय देण्याची अपूर्व अशी संधी वर्धाकरांसाठी चालून आली आहे. त्या संधीचे निश्चितच चांगले परिणाम येत्या चार ते पाच दिवसात दिसून  येतील अशी आशा व्यक्त करुन ते म्हणाले की, बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ज्या लाभार्थ्यांचे अद्यापही बॅंकेत खाते उघडले नाही. अश्या  लाभार्थ्यांना भेटून  योजनेचे गांर्भिय सांगून खाते उघडण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात बॅकेत खाते उघडणाचे सुमारे  90 टक्के काम झाले असून अजूनही सुमारे 10 टक्के काम शिल्लक  आहे. हे काम अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी येथील  जिल्हा प्रशासन  संपूर्णपणे सहकार्य करतील . लाभार्थ्यांनी काढलेले बॅंके खात्यामध्ये आधार कार्डक्रमांकाची नोंद घेण्यात यावी. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बनलेले नाही अशा लाभार्थ्यांचे बॅंकेमध्ये  खाते शुन्य रकमेवर उघडण्यात यावे . यावेळी  शिष्यवृत्ती मिळणाऱ्या  विद्यार्थ्यांचे बॅंकखाते तसेच  जननी सुरक्षा  योजना लाभार्थ्यांचे  बँक खाते तातडीने उघडावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.  यावेळी बँक अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करुन गरीब लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
            यावेळी जिल्हाधिकारी सोना यांनी बॅकेत खाते उघडण्यासाठी केलेल्या प्रगतीचे सादरीकरण केले. तसेच आधार कार्डच्या प्रगती विषयी माहिती सांगितली. येत्या चार पाच दिवसांमध्ये बॅकेत खाते उघडण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश  यावेळी दिले.
याप्रसंगी जिल्ह्यातील बॅंकनिहाय आढावा बॅकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी,  जिल्हा शल्य चिकित्सक व महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची माहिती सादर  केली.
यावेळी जिल्ह्यातील सर्व बॅकेचे अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                               000 0000

Tuesday 18 December 2012

आधार ओळखपत्र वेबसाईटवरुनही घेता येईल महा ई-सेवा केंद्र, सेतूमध्ये सुविधा



   वर्धा दि.18   आधार नोंदणीमध्ये संपूर्ण राज्यात वर्धा जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले असून सुमारे 86 टक्के जनतेची आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. आधार कार्ड नोंदणी झाल्यानंतर पोष्टाव्दारे आधार ओळखपत्रा घरपोच पाठविण्यात येते. परंतू ज्यांना अद्याप ओळखपत्र प्राप्त झाले नाही त्यांना शासनाच्या वेबसाईवरुन आधार पत्राची प्रत उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज दिली.
आधार नोंदणीसाठी विशिष्ठ ओळखपत्र प्राधिकरण तयार करण्यात आले असून स्वतंत्र पोर्टलही सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरुन नोंदणी केलेल्या नागरिकांना आधार ओळखपत्राची प्रत छापून घेता येईल. यासाठी caadhaar.uidai.gov.in  वर लॉगईन  करुन आधार पत्राची प्रत छापता येईल. या विशिष्ठ ओळख प्राधिकरणाकडून डिजिटल स्वाक्षरीही करण्यात आली  असल्यामुळे याचा उपयोग आधार ओळखपत्र म्हणूनही होणार आहे. नियमितपणे पोष्टाव्दारे आधार ओळखपत्र प्राप्त होईपर्यंत वेबसाईटवरुन उपलब्ध झालेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आधार पत्र मिळविण्यासाठी इंटरनेट तसेच प्रिंटरची सुविधा असल्यास महाराष्ट्र शासनाच्या युआयडीएआय च्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. परंतू ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही त्यांना केवळ दोन रुपये भरुन महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र  तसेच संग्राम केंद्रावर आधार पत्राची प्रत उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एन नवीन सोना यांनी दिली.
00000

संत गाडगे बाबा मिशनव्दारे विदर्भातील गरीब रुग्णांसाठी मुंबईत निवारा



·         गरीब रुग्णांना निवास व भोजनाची सुविधा
·        मुंबईत मिशनच्या तीन धर्मशाळांव्दारे विदर्भ व मराठवाड्यातील रुग्णांना निवास  सुविधा

वर्धा, दि. 18   अत्यंत दुर्धर आजारावरील उपचारांसाठी रुग्णासह नातेवाईकांना मुंबईसारख्या महानगरामध्ये निवास व भोजनाची सोय व्हावी, यासाठी संत गाडगे बाबा मिशनव्दारे तीन धर्मशाळा सुरु करण्यात आल्या असून या धर्मशाळेमध्ये कर्करोगासह इतर आजारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था अत्यंत अल्प दरात करुन संत गाडगे बाबांच्या कार्याचा वसा सातत्याने सुरु ठेवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुंबई येथील मफतलाल मोहनलाल धर्मशाळा तसेच संत गाडगे बाबा धर्मशाळा दादर येथे बांधण्यात आली आहे. या सर्व धर्मशाळेचे व्यवस्थापन अमोल एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
विदर्भातून अत्यंत दुर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी बहुतांश रुग्ण मुंबईला जातात. मुंबई येथील निवास व भोजनाची अत्यंत खर्चिक व्यवस्था असल्यामुळे संत गाडगे बाबा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन एकनाथ ठाकूर यांनी धर्मशाळा बांधण्याचा निर्णय घेतला.
संत गाडगे बाबा यांनी  1956 मध्ये जे.जे. हॉस्पीटलला भेट दिली असता येथील रुग्णांची व्यथा बघून  रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची व्यवस्था तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार मफतलाल मेहता यांनी जागा मिळवून बांधकाम पूर्ण केले. यासाठी लोकवर्गर्णीतून 3 कोटी 80 लाख रुपये गोळा करुन जी. टी. हॉस्पीटलच्या शेजारी  प्रशस्त ईमारत बांधली. त्यासोबतच प्रशासनाकडून दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकनाथ ठाकूर यांनी रुग्णांच्या नातेवाईकासाठी प्रशस्त धर्मशाळा बांधली.
विदर्भ तसेच मराठवाड्यातूनही मुंबईला औषधोपचारासाठी तसेच शस्त्राक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जे.जे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी तिसरी धर्मशाळा बांधली. आज तीनही धर्मशाळा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या सेवेत असून अमोल ठाकूर निस्पृहपणे संत गाडगे बाबा धर्मशाळेचे व्यवस्थापन चालवित आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवास व भोजन उपलब्ध होत असून वाशीम येथील मधुसुदन अग्रवाल यांनीही रुग्णांच्या नातेवाईकासाठी विशेष सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था केली असून मागील तीन वर्षापासून ती अविरतपणे सुरु आहे. प्रवीण वानखडे यांच्यासारखे निस्वार्थ सेवा देणारे गाडगे महाराजांचे भक्तगण रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.
गाडगे बाबा यांनी आयुष्यभर दीन दुबळ्यांची तसेच रुग्णांची सेवा केली. हीच सेवा अखंडपणे सुरु रहावी यासाठी गाडगे महाराज मिशनचा प्रयत्न असून विदर्भातील रुग्णांना दादर, भायखळा व जे.जे. रुग्णालयाच्या परिसरातील धर्मशाळा आपल्या हक्काचे स्थान म्हणून परिचित झाले आहे. लाखो रुग्णांचे नातेवाईक उपचारादरम्यान येथे वास्तव्याला असतात. त्यांची संपूर्ण जबाबदारी संत गाडगे बाबा मिशनव्दारे घेतली जाते.
00000

ग्रामपंचायत निवडणूकी निमित्त आठवडी बाजार बंद



वर्धा, दि. 18   जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूक व चार ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीसाठी रविवार दिनांक 23 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
          ग्रामपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी संबंधित गावात आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सुविधेनुसार आठवडी बाजार मतदानाचा दिवस वगळून भरविण्यासंबंधी सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केली आहे.
00000

Monday 17 December 2012

अनुसूचित जातीच्‍या बेरोजगारासाठी उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन


      वर्धा दि.17- महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्राच्‍या वतीने जिल्‍हा उद्योग केंद्र आणि जिल्‍हा समाजकल्‍याण कार्यालयाच्‍या संयुक्‍त विद्यमाने  उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन  दिनांक 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सेवाग्राम येथील यात्री विहारात आयोजित केले आहे.
         उद्योजकता विकास शिबीरामध्‍ये स्‍वतःचा उद्योग किंवा व्‍यवसाय करण्‍यासाठी इच्‍छुक असणा-या अनुसूचित जातीच्‍या बेरोजगांरासाठी प्रशिक्षण विनामुल्‍य असणार आहे.
लाभार्थ्‍यांसाठी स्‍वतःचा उद्योग किंवा व्‍यवसाय करण्‍यासाठी पूर्व तयारी व मानसिक तयारी सिध्‍दी प्रेरणा प्रशिक्षण,विविध उद्योग किंवा व्‍यवसायाच्‍या संधी उदाः प्‍लास्टिक उद्योग,कृषि उत्‍पन्‍नावर आधारित उद्योग,रासायनिक उद्योग, पशुसंवर्धानावर आधारित,स्‍टेशनरी उद्योग,खाद्य व फळ प्रक्रिया उद्योग,पिण्‍याचे पाणी इत्‍यादि तसेच भांडवल उभारणी व शासनाच्‍या विविध कर्ज योजना, र्मोटिंग,प्रकल्‍प अहवाल,बँकेची कार्यपध्‍दती या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
        प्रशिक्षणासाठी उमेदवार वर्धा जिल्‍ह्याचा रहिवासी असून किमान आठवा वर्ग पास व 19 ते 40 वर्षे वयोगटातील अनुसूचित जातीतील सुशि‍क्षित बेरोजगार असावा. तसेच उद्योगाची प्रखर आवड असावी. प्रशिक्षण निवासी असल्‍यामुळे लाभार्थ्‍यास प्रशिक्षणस्‍थळी रहावे लागेल.
        इच्‍छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी 19 डिसेंबर,2012 पर्यंत उद्योजकता विकास केंद्र,व्‍दारा- जिलहा उद्योग केंद्र,वर्धा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्‍यक्षात संपर्क साधावा किंवा 9850326431,0712-244123 या दूरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक व महाराष्‍ट्र उद्योजकता  विकास केंद्राचे प्रकल्‍प अधिकारी यांनी केले आहे.
00000

वर्धा जिल्‍ह्यात 37 कलम लागू



वर्धा दि.17- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हादंडाधिकारी एन.नविन सोना यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 लागू करण्‍यात आले आहे.
          या कलमाचा अंमल दिनांक 21 डिसेंबर,2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल,असे आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
00000

वर्धा जिल्‍ह्यात 36 कलम लागू



वर्धा दि.17- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहण्‍यासाठी प्र.जिल्‍हा पोलिस अधिक्षक टी.एस.गेडाम  यांनी 21 डिसेंबर,2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36  पोटकलम  अ ते फ पर्यंतचा आदेश जारी केला आहे.
          या आदेशाचा भंग करणा-या विक्‍तीविरुध्‍द मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्‍वये कारवाईस पात्र राहील.
00000