Friday 4 June 2021

 

प.क्र- 408                                                                    दि.4.06.2021

                     म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा

Ø खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

Ø मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

     मुंबई, दि. 4  : - राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

        राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. 

 

खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता.  त्याला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील.

         संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

          म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

वॉर्डमधील अलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च  व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

     व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये

       व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये

अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका),  पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.

ब वर्ग शहरांमध्ये नाशिक,  अमरावती, औरंगाबाद,  भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.

क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

           विशेष म्हणजे म्युकरमायकोसीस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

                                                00000

 




प.क्र- 407                                                                    दि.4.06.2021

सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

       पंढरपूर, दि. 04:-  शेतकऱ्यांचे  जीवनमान उंचवण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास  चालना देणे आवश्यक आहे. यासाठी जगात जास्त दुध देणारी सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारणाण्यासाठी  प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्र, महुद ता.सांगोला येथे भेट देवून पाहणी केली . यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एन.ए.सोनवणे,  प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.बोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्राचे संचालक डॉ.शशांक कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ.एस.एस.भिंगारे, तसेच परिसरातील शेळी, मेंढी पालक उपस्थित होते.

         यावेळी श्री. केदार म्हणाले,  शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उच्च प्रतीच्या शेळया व मेंढयाची पैदास करुन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.  पशुधन निरोगी  रहावे, आजारी  पशुधनाला जागेवरच उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथकासह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचाराची सुविधा दारातच मिळणार आहे.

          मेंढीच्या माडग्याळ जातीचे वजन लवकर वाढत असल्याने  जातीचे पैदास केंद्र उभारण्यासाठी  आवश्यकती कार्यवाही करावी. विमा काढलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाई तात्काळ मिळेल याची दक्षता घ्यावी. अशा सूचनांही  पशुसवंर्धन मंत्री केदार यांनी यावेळी दिल्या. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी  विकास प्रक्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.कांबळे यांनी प्रकल्पातील शेळी, मेंढी पालन, वैद्यकीय सुविधा, चारा आदी सुविधेबाबत माहिती दिली. 

                                                      00000

 प.क्र- 406                                                                    दि.4.06.2021

 

शेतक-यांनी बियाणे व रासायनिक खताच्या तक्रारी आपले सरकार पोर्टलवर नोंदवाव्या

    वर्धा ,दि 4 जून :-जिल्हयात  शेतक-यांकडून  सुरु झालेल्या खरीप हंगामासाठी विविध कंपन्याच्या वेगवेगळया वाणाचे  सोयाबिन  बियाणे व रासायनिक खताची  खरेदी सुरु आहे.  मागील वर्षी सोयाबीन बियाणे उगवणीबाबत  मोठया प्रमाणात जिल्हयात तक्रारी  झालेल्या  होत्या.  पर्यायाने शेतक-याचे नुकसान देखील झाले होते. यावर्षीही शेतक-यांनी खरेदी केलेल्या  सोयाबीन बियाण्याच्या उगवणीच्या तसेच खताच्या खरेदीबाबत शेतक-यांना   काही तक्रारी असल्यास जिल्हयात कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले असल्यामुळे  आपले सरकार  या पोर्टलवर  ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

                                                0000

 प.क्र- 405                                                                    दि.4.06.2021

लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या  शेतक-यांनी बियाण्याची उचल करावी

    वर्धा ,दि 4 जून :- महाडीबीटी  पोर्टलवर  ज्या शेतक-यांनी  प्रमाणित बियाणे वितरणाकरीता   अर्ज सादर केला  आहे. तसेच ज्या शेतक-यांची ऑनलाईन  पध्दतीने  लॉटरी  मध्ये  निवड झाली आहे अशा शेतक-यांनी  सबंधित तालुका  कृषि अधिकारी कार्यालयाकडून परमिट प्राप्त करुन  महाबीज बियाण्याची  पुरवठादार संस्थेच्या वितरकाकडून बियाण्याची  उचल  करुन घ्यावी असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  अनिल इंगळे यांनी केले आहे.

            तसेच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केलेल्या व प्रतिक्षा  यादीत  असलेल्या शेतक-यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून  तूर व सोयाबिन  पिकाच्या लक्षांकानुसार  उपलब्ध  बियाण्याचे परमिट  प्राप्त करुन घ्यावे . याकरीता  अर्जाची प्रत व 7/12 अ सोबत घेऊन जावे.

            प्रमाणित बियाणे वितरणाकरीता  राष्ट्रीय  अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2021-22  योजने अंतर्गत  खरीप हंगामाकरीता तुर पिकाकरिता 10 वर्षाच्या वरील  वाणास 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षाच्या वरील वाणास  5 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान  लागू राहिल. गळीतधान्य अंतर्गत  10 ते 15 वर्षाच्या आतील सोयाबीन बियाण्यास 1 हजार 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान लागू असणार आहे. असे कृषि विभागाने कळविले आहे.

                                                

Wednesday 2 June 2021

 






प.क्र- 400                                                                    दि.2.06.2021

      राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचा माझा पशुपालक माझी जबाबदारी

     या उपक्रमास पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिल्या शुभेच्छा

      मुंबई, दि.२ : राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्यामार्फत माझा पशुपालक माझी जबाबदारी उपक्रमास हा नावीन्यपूर्ण अभियान सुरू केला आहे. या अभियानाचे पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज आँनलाईन आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमा प्रसंगी कौतुक करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

          श्री.केदार म्हणाले कोविड जागतिक महामारी मुळे नागरिकांना बाहेर फिरण्यावर शासनाने वेळोवेळी "गरजेप्रमाणे निर्बंध लावले होते आणि आहेत. अनेक उद्योग व्यवसाय काहीशे ठप्प झालेत किंवा धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक नागरिकांना जास्तीत जास्त वेळ घरात थांबून रहावे लागत आहे. परंतु ह्या परिस्थितीत ऑनलाईन मिटींग्स, मार्गदर्शनपर शिबिरे / व्याख्याने यासारखे उपक्रम अगदी खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचले आणि लोकप्रिय देखिल झाले.

          महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने देखील पशुपालक व पशुवैद्यक यांचेसाठी पशुवैद्यक क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांची अनेक तांत्रिक व्याख्याने पहिल्या लाँकडाऊनच्या कालावधीत आयोजित केली होती. त्यांना प्रतिसाद देखील जोरदार मिळाला होता. सद्य:परिस्थिती पशुपालनक यांचे मेळावे घेण्यावर काही बंधने असल्याने अभियानाची सुरूवात ऑनलाईन व्याख्यान मालिका घेवून करण्यात येणार असल्याची माहिती श्री केदार यांनी दिली.

         आज राज्यात ३०-३५ फेसबुक ग्रुप्स वर ७-८ लक्ष तरून पशुपालक सक्रीय पध्दतीने पशुपालन व्यवसाय त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि त्यातील नवनवीन संधी आणि आव्हाने याबाबत नवनवीन तंत्रज्ञान यावर चर्चा करून ज्ञानाचे आदानप्रदान करताना दिसत आहेत असे श्री केदार यांनी सांगितले.

 

 आजच्या ऑनलाईन प्रशिक्षण अभियान व त्याअनुषंगाने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांस माझे नेहमी सहकार्य राहिल. माझा पशुपालक माझी जबाबदारी" व या महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेचा उपक्रमात नेहमी शासन सोबत असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

                                                                        000

Tuesday 1 June 2021

 

प.क्र- 397                                                                    दि.1.06.2021

                         शेतक-यांनी पीक स्पर्धेत सहभाग नोंदवावा

Ø मुंग व  उडिद पिकासाठी अंतिम मुदत 31 जुलै तर इतर पिकासाठी 31 ऑगस्ट 

     वर्धा, दि 1 जून (जिमाका ):-  पिकांची उत्पादकता  वाढविण्यासाठी  विविध भागातील शेतक-यांकडुन विविध प्रयोग  करण्यात येतात. अशा शेतक-यांना  मिळालेल्या उत्पादकतेबाबत  प्रोत्साहन  देण्यासाठी   व त्यांचे मनोबल वाढवून इतर शेतकाऱ्यांमध्ये  स्पर्धा निर्माण होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेक-यासाठी पीक स्पर्धा  योजना राबविण्यात येत असून  या खरीप हंगाम पीक  स्पर्धेत शेतक-यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

        अधिक उमेदीने  नवनवीन  अद्यावत  तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱयांनी करावा आणि उत्पादनात  वाढ करावी यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्याच्या  उत्पादानात मोलाची भर  पडेल.

            पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत  धरण्यात येईल, खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर,  मुग, उडिद,  सोयाबिन, भुईमुग, सूर्यफुल अशा एकुण 11 पिकाचा  स्पर्धेत  समाविष्ट करण्यात आला आहे. प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या –सर्वसाधारण गटासाठी 10 आर क्षेत्रावर  सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सबंधित पिकाची पीक स्पर्धा  संबधित तालुका कृषि अधिकारी जाहिर करतील.  तालुक्यात पीक कापणी प्रयोग  घ्यावयाची किमान  संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी  गटासाठी 4  राहील.  स्पर्धेत भाग घेणा-या  शेतक-याला एकाच  वेळी  एकापेक्षा  जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिकनिहाय  प्रत्येकी  300 रुपये असणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी  मुग व उडिद पिकासाठी 31 जुलै व  भात, ज्वारी, मका,  नाचणी, तुर, सोयाबीन व भूईमुगासाठी 31 ऑगस्ट असा राहील. स्पर्धेत सहभाग नोंदवू   इच्छिणा-या  स्पर्धकांनी   विहित नमुन्यात  अर्ज भरुन त्यासोबत  ठरवून दिलेले प्रवेश शुल्काची चलन, 7/12 , 8 अ चा उतारा  व जात प्रमाणपत्र  ( केवळ आदिवासी असल्यास ) सादर करावे.

            तालुका स्तरावर प्रथम पुरस्कार 5 हजार रुपये, व्दितीय  3 हजार रुपये  व तृतीय 2 हजार रुपये  जिल्हास्तरावर  प्रथम  10 हजार रुपये, व्दितीय  7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये ,  विभाग स्तरावर  प्रथम  25 हजार रुपये, व्दितीय  20 हजार रुपये व  तृतीय 15 हजार रुपये तर  राज्य स्तरावर  प्रथम  50 हजार रुपये, व्दितीय 40 हजार रुपये व तृतीय 30 हजार रुपये असा असणार आहे. अधिक माहितीसाठी  कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे कृषि विभागाने कळविले आहे.

                                                                  000

प.क्र- 398                                                                    दि.1.06.2021

         नागरिकांना अवैध दारु विक्रीची माहिती असल्यास टोल फ्री क्रमांकावर

                            किंवा   ऑनलाईन तक्रार नोंदवावी

                                                       -राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक

 

         वर्धा, दि 1 (जिमाका ):- जिल्हयातील नागरिकांना  आपल्या परिसरात  होत असलेल्या अवैध, भेसळयुक्त व बनावट दारु विक्रीची माहिती असल्यास त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवावी. यासाठी  गुगल फॉर्मवर https://forms.gle/6ozwfU5u76zah2eG6 या लिंक वर  तसेच राज्य स्तरावरील  18008333333 या टोल फ्री क्रमांकावर,  8422001133 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा  अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क  कार्यालयाच्या  07152-240163 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धामोरकर यांनी  केले आहे.

                                                000

Monday 31 May 2021

 

..क्र- 395                                                                    दि.31.05.2021

जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल

जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

Ø 1 जून ते 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू

Ø वर्धा, हिंगणघाट व पुलगाव नगरपालिका आणि लगतच्या ग्रामपंचायत मध्ये इतर दुकाने ठरलेल्या दिवशी

Ø जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक व इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत

Ø शनिवार, रविवार औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने राहणार बंद

वर्धा, दि 31 मे (जिमाका):-  संपुर्ण वर्धा जिल्हयात कोरोना विषाणुचा सकारात्मक दर 10टक्के पेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड 40टक्के पेक्षा कमी भरलेले असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात  निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश 1 जून सकाळी 7  वाजता पासुन 15 जून सकाळी 7 पर्यंत लागू राहतील.

          वर्धा नगर पालीका व लगतच्या 11 ग्रामपंचायती, पुलगांव नगर पालिका, व लगतच्या 2 ग्रामपंचायती, हिंगणघाट नगर पालीका व लगतच्या 4 ग्रामपंचायत, या क्षेत्रामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तु व सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार  सकाळी  7 ते दुपारी 1वाजेपर्यंत चालु ठेवण्यास परवानगी राहील. तसेच इतर सर्व दुकाने व सेवा सोमवार, मंगळवार, व बुधवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत चालु ठेवण्यास परवानगी राहील. याशिवाय  जिल्हयातील उर्वरीत भागात सर्व अत्यावश्यक तसेच इतर सर्व प्रकारची वस्तु व सेवा यांची दुकाने (फक्त स्वतंत्र / एकल दुकाने, मॉल्स मधील अथवा शॉपिंग सेटर नाही) सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी  7 ते दुपारी 1 या कालावधीत चालु ठेवणेस परवानगी राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

 

        प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानासमोर हॅन्ड वॉश सुविधा किंवा सॅनिटायझर असणे आवश्यक राहील. दुकानाबाहेर ग्राहकांसाठी शारीरिक अंतर राहण्यासाठी खुणा करण्यात याव्या. दुकानदारांनी वेळोवेळी दुकानाचे परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. दुकानात एकावेळी एकाच ग्राहकास प्रवेश राहील.

हॉटेल, शिवभोजन घरपोच सुविधा सुरू

        हॉटेल, रेस्टॉरंट,खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी येथे स्वत: जावुन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबधीत आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

       जिल्हायात ई-कॉमर्स द्वारे अत्यावश्यक वस्तुसह अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंच्या पुरवठयास परवानगी देण्यात आली आहे.

      वैद्यकीय सेवा व इतर आणिबाणीची परिस्थिती वगळता सोमवार ते शुक्रवार दुपारी  2 वाजे नंतर तसेच शनिवार व रविवार( पुर्णत:) सर्व प्रकारच्या हालचालींवर, येण्या जाण्यावर निर्बंध असतील.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकण्यास मनाई

        रस्त्यावरील सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या विक्रीस मनाई (बंदी) असेल. नगरपालीका / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी फेरीवाले, भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांनी न.पा. /स्था.स्व.सं. यांचे द्वारे ठरवून दिलेल्या वॉर्ड / परिसरा मध्येच सदर व्यवसाय फिरुन करावा.(ठरवून दिलेल्या जागे शिवाय इतर ठिकाणी व्यवसाय करु नये)

शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरू

 कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपुर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु राहतील, या व्यतीरिक्त इतर सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये ही 25 % कर्मचारी उपस्थितीसह सुरु राहतील. तथापी कार्यालय प्रमुखाने 25 % पेक्षा जास्त उपस्थिती बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास विनंती केल्यास तशी परवानगी देण्यात येईल.

पेट्रोल पंप

      नागरी व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहतील.

 दुकानांना / आस्थापनांना पुरवठा केला जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतुकीवर कोणतेही निबंध राहणार नाही. मात्र दुकानांना ठरवुन दिलेलया वेळे नंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच या पुर्वी निर्गमीत आदेशा प्रमाणे दंड आकारण्यात येइल.सर्व उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणीअहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता 15 दिवसांकरीता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.

        सदर निर्देशांचे काटेकोर अमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधीत नगर पालिका / नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तहसिलदार यांची राहील.

        आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 नुसार शिक्षेसपात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबधीतावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.

                                                          00000

 

..क्र- 394                                                                    दि.31.05.2021

शेतक-यांनी विक्रीस आणलेल्या मालाच्या प्रतवारी सबंधात

 तक्रार असल्यास  बाजार समितीच्या सचिवाशी संपर्क साधावा

          वर्धा, दि 31 (जिमाका ):-  आधारभुत दराने नाफेडच्या वतीने चना विक्री करण्यासाठी 17 मे पर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या शेतक-यांनी 25 जुन पर्यंत जिल्हयातील 10  केंद्रावर चना विक्री करण्यास आणावा. बाजार समितीत चना विक्रीस आणल्यानंतर   जर शेतक-यांना  त्यांच्या शेतमालाच्या प्रतवारी सबंधात  व पर्यायाने बाजार भावासंबधी  शंका  अथवा तक्रार असल्यास  बाजार समितीच्या सचिवांशी  तसेच सबंधित सहाय्यक निबंधक यांचेशी संपर्क साधुन  शेतमालाची गुणवत्ता तपासुन  घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी  केले आहे.

          जिल्हयातील नोंदणीकृत शेतक-यांनी  अद्यापही चना विकला नाही.  अशा शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह  (ज्या शेतक-यांना एस.एम.एस. प्राप्त झाले आहेत अशा ) 25 जुन पर्यंत  आपला चना  सबंधित तालुक्यातील जवळच्या   नाफेड खरेंदी केंद्रावर  विक्रीस आणावा.

          केंद्र शासनाच्या निर्णयानुसार  जिल्हयातील वर्धा, हिंगणघाट, सेलू व आर्वी बाजार समित्यांचा ई-नाम  मध्ये समावेश करण्यात आलेला असुन  या बाजार  समितीत   शेतमालाची शास्त्रीय  पध्दतीने प्रतवारी , दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा  उभारण्याचे काम प्रगतीपथावर  आहे. या चारही व उर्वरित तीन्ही बाजार समितीचे  आवारात इतर प्रकारचा शेतमाल  विक्रीसाठी आणल्यांनतर  जर एखादया   शेतक-यांना  त्याच्या मालाच्या  प्रतवारी संबधात   शंका असल्यास   बाजार समिती आर्द्रता  मिटरच्या सहाय्याने शेतमालाची आर्द्रता  तसेच गुणवत्ता निकषाची पडताळणी करुन देईल असे,  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी कळविले आहे.

                                                000

Sunday 30 May 2021

 

..क्र- 391                                                                    दि.30.05.2021

सोयाबिन पिकाची उत्पादकता  व गुणवत्ता चांगली

राखण्यासाठी शेतकऱयांनी काळजी घ्यावी

          वर्धा, दि 30 (जिमाका ):-  खरीप हंगाम लवकरच सुरु होत असून  मागील वर्षी सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असतांना  चक्री भुंग्याचा प्रार्दुभाव  दिसून आला. तसेच कापणीचे कालावधीत  सोयाबिन पिक पावसात सापडल्याने  उत्पादनात घट व बियाणाची गुणवत्ता , प्रत खराब झाल्यामुळे  यावर्षी  बियाण्यांचा तुटवडा  पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात सोयाबिन पिकाची उत्पादकता व गुणवत्ता  चांगली  राखण्यासाठी  शेतक-यांनी  सोयाबिन पिकाची पेरणी करतांना  काळजी घ्यावी  असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.

          75 ते 100 मिली मीटर  पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. अवकाळी  पावसाला मोसमी पाऊस समजून  सोयाबिन  पिकाची पेरणी करु नये,  मुख्य मोसमी पावसाला सुरुवात झाल्यांनतर  75 ते 100 मीली मीटर पाऊस  झाल्यावरच पेरणी करावी अन्यथा  उगवण कमी होते. सोयाबिन बियाणे 4 सेमी मीटर पेक्षा जास्त  खोल पेरु नये अन्यथा  उगवण कमी होण्याची शक्यता आहे.  सोयाबिन  पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करावी.  बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास एकरी 22 किलो  बियाणे लागते व एकरी 8 किलो सोयाबिन बियाणाची बचत होते. उगवण चांगली   होते.  तसेच  उत्पादनात वाढ होते. टोकन पध्दतीने  पेरणी करावी.  त्यामुळे एकरी 8 किलो बियाणे लागते  व बियाणात बचत होते. पेरणी करण्यापुर्वी  सोयाबीन बियाणास प्रथम  बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया  करुन नंतर रायझोबिअम व पीएसबी 250  ग्रॅम  प्रत्येकी प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया  करावी. बीजप्रक्रिया करतांना बियाणे जोरात घासू नये. अन्यथा बियाणाचा पापुद्रा पातळ असल्याने डाळ होण्याची शक्यता असते.  पेरणी  करण्यापूर्वी बियाणाची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी.  याप्रमाणे सोयाबीनची पेरणी केल्यास उगवण योग्य प्रमाणात होऊन उत्पन्नात चांगली वाढ होते.

००००००००००

..क्र-392                                                                     दि.30.05.2021

बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व

पुरवठयाबाबत मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी

Ø कृषि मंत्र्याचे निर्देश

Ø कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

         वर्धा,दि.30 (जिमाका):- राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार,  वितरक व विक्रेते यांना  खरीप हंगामात बियाणे, खते, व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठा बाबत  अडचण जाऊ नये यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सुचनेनुसार  कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार,  वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाच्या ई-मेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर  तक्रार करावी, असे आवाहन  कृषि संचालक, दिलीप झेंडे यांनी केले आहे. 

या मोबाईल क्रमांकावर करु शकता तक्रार

नियंत्रण कक्षाचा controlroom.qe.maharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा

8446117500, 8446331750 व 8446221750 या भ्रमणध्वनी क्रमांकावर  तसेच कृषि विभागाच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर  सकाळी 9 ते सायंकाळी  7 वाजेपर्यंत  कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून  शेतक-यांना तक्रार दाखल करता येईल.

          सबंधितांनी भ्रमनध्वनी , टोल फ्री  क्रमांक तसेच ईमेलवर येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमंत, साठेबाजी, व लिकींग बाबत असलेल्या तक्रारी  नोंदवितांना शक्यतो  आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा किंवा  सदर तक्रार को-या कागदावर  लिहून त्याचा फोटा व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारीचे निरसन  करणे सोईचे होईल. व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल तर तोंडी तक्रार नोंदवावी. असे कृषि विभागाने कळविले आहे.

                     00000