Thursday 4 July 2019




'माझी कन्या भाग्यश्री' चा 482 मुलींना लाभ
1 कोटी 20 लक्ष रुपये मुलींच्या नावे मुदती ठेव
        वर्धा ,दि 4 जुलै (जिमाका ) लिंग निवडीस प्रतिबंध करून  मुलीचा जन्मदर वाढविणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री'  ही योजना समाजातील सर्व घटकांसाठी सुरू केली. 1 ऑगस्ट 2017 पासून या योजनेची नव्याने अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात दोन वर्षात 482 मुलींना  योजनेचा लाभ मिळाला आहे.
          राज्यातील सरासरी लिंग गुणोत्तर प्रमाण कमी झाले होते. बीड सारख्या जिल्ह्यात हे प्रमाण 1000 मुलांमागे 850 मुलीं पेक्षा  ही कमी होते.  भविष्यातील ही धोक्याची घंटा बघता राज्यशासनाने मुलींचा जन्मदर वाढावा, स्त्री भ्रूण हत्या थांबाव्यात, मुलीच्या जन्माचा उत्सव व्हावा आणि जन्मलेल्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मुलीच्या पालकांना मदत आणि प्रोत्साहन म्हणून माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली. 2017 पूर्वी ही योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलींसाठी राबविण्यात येत होती.  मात्र या योजनेची व्याप्ती वाढवून,  यामध्ये बदल करून,  कुटुंबाचे उत्पन्न साडे सात लाख रूपये असणाऱ्या समाजातील सर्व घटकांसाठी योजना लागू करण्यात आली.  . यामध्ये  खासकरुन 1 ऑगस्ट 2017 ला आणि त्यानंतर जन्मलेल्या  एक किंवा दोन मुलीसाठी या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्य या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरते.


         लाभाचे स्वरूप:-  एका मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या  दाम्पत्याच्या मुलीच्या नावे 50 हजार रुपये  बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात. यामध्ये दर सहा वर्षांनी व्याजाची रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी काढता येते.मुलगी 18 वर्षाची झाल्यावर आणि इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मुलीला मूळ मुद्दल आणि त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम देण्यात येते. यासाठी 18 वर्षापर्यंत मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास दोन्ही मुली पात्र ठरतात. 1 ऑगस्ट 2017 नुतर दोन  मुलींना जन्म झाला. असल्यास आणि कुंटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दोन मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये मुदती ठेव योजनेत गुंतविण्यात येतात.  

         सदर योजनेनंतर्गत जिल्ह्यात 482 लाभार्थ्यांना 1 कोटी 20 लक्ष 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.  मुदती ठेव चे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये वर्धा 159, सेलू  55, समुद्रपूर 37, हिंगणघाट 54,  आर्वी 55, देवळी 48, आष्टी 48 आणि कारंजा 26 मुलींच्या नावे या योजनेतून बँकेत मुदती ठेव ठेवण्यात आली आहे. 
           ही योजना 7 लक्ष 50 हजारपर्यंत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या समाजाच्या सर्व घटकातील मुलींसाठी लागू आहे. तसेच बालगृहातील अनाथ मुलींनासुद्धा या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. दत्तक घेणाऱ्या पालकांना योजनेच्या अटी प्रमाणे ही योजना लागू आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या,  केवळ एक किंवा दोन मुली असणाऱ्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
 
 ज्योती कडू

बालविकास प्रकल्प अधिकारी
नागरी प्रकल्प वर्धा

Monday 1 July 2019


                      आनंदी जगण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक
                                                          - विवेक भिमनवार

Ø 87 लक्ष वृक्ष लागवडीचे आज जंगलापूर येथे उदघाटन
          वर्धा, दि 1 जिमाका:-  वनक्षेत्र जास्त असणाऱ्या देशांमध्ये  हॅपिनेस इंडेक्स  अर्थात आनंदी असण्याचे प्रमाण अधिक  आढळून आले आहे.  त्यामुळे आपल्या देशाचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी  प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.
          33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत  जंगलापूर  येथे वनमहोत्सव उदघाटन कार्यक्रम वृक्ष लागवडीने पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासें, पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, उपवन संरक्षक सुनील शर्मा,
  जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे , तहसीलदार सोनवणे , नगराध्यक्ष शारदा माहुरे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, गटविकास अधिकारी श्रीमती कोल्हे, विभागीय वनाधिकारी डी एन जोशी,  शैलेंद्र दफतरी,  केळझरच्या सरपंच श्रीमती लोणकर, प्रा.वैभवी उघडे, मुरलीधर बेलखोडे, आशिष गोस्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
        लोकांच्या सहभागामुळे  50 कोटी वृक्ष लागवडीचा  कार्यक्रम यशस्वी झाला आहे. काही वर्षांपूर्वी  ग्लोबल वार्मिंग हा विषय केवळ चर्चासत्राचा होता. पण  हा विषय इतक्या लवकर प्रत्यक्षात अनुभवावा लागेल  असे वाटले नव्हते. ग्लोबल वार्मिंगमुळे प्रत्येक वर्षी आपण नैसर्गिक  आपत्तीला सामोरे जातोय. यावर्षीचा उन्हाळा हा खूप तीव्र आणि दीर्घ स्वरूपाचा होता. महाराष्ट्रात  ज्या गावांमध्ये वनक्षेत्र कमी आहे तिथेच पाण्याचे टँकर लागले होते.  त्यामुळे वनक्षेत्र जास्त असेल तर पाणी सुद्धा जास्त राहील.  राज्यात 33 टक्के वन पाहिजे, मात्र ते केवळ 20 टक्के आहे. जेव्हा ते 33 टक्के होईल तेव्हा दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग सारख्या  समस्या राहणार नाहीत.  त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 10 झाडे तरी लावावीत.  फिलिपाईन्स या देशाने 10 झाडे प्रत्येक विद्यार्थ्याने लावली तरच त्यांना पदवी प्रमाणपत्र दिल जात. आपल्याकडे ही शक्ती करण्याची गरज पडू नये. सक्ती पेक्षा स्वतःहून केलेलं कोणतंही काम चांगलं आणि कायमस्वरूपी होतं. आजच्या ग्लोबल वार्मिंगला थोपवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. आपल्या  जिल्ह्याला 87 लाख 52 हजार च उद्दिष्ट आहे आपण सर्व मिळून हे उद्दिष्ट  पूर्ण करू अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
        पृथ्वीवर जगण्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे ते म्हणजे पाणी आणि ऑक्सिजन. या दोन्ही बाबी झाडांमुळे आपल्याला मिळतात. ही पृथ्वी पुढील पिढीसाठी जगण्यायोग्य राहावी  यासाठी आता आपण काळजी घेतली पाहिजे. आज भूजल पातळी 80 फुटावरून 600 फुटापर्यंत खाली गेली आहे. पुढच्या 30 वर्षात काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही. हे थांबवायचं असेल तर प्रत्येकाने झाड लावून ते जगवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक बसवराज तेली  यांनी केले.

          सचिन ओंबासे यावेळी बोलताना म्हणाले,  87 लाखांपैकी 20 लाख वृक्ष लागवडीचा लक्ष्यांक  जिल्हा परिषदेकडे  आहे. लोकांचा सहभाग वाढविल्याशिवाय शासकीय योजना यशस्वी होत नाही असे जेव्हा दिसून आले तेव्हा जलयुक्त शिवार, स्वछता अभियान यासारख्या कार्यक्रमात शासनाने लोकसहभाग मिळविला आणि त्या योजना यशस्वी झाल्यात.  वृक्ष लागवड सुद्धा आज लोकचळवळ झाली आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने एक वृक्ष लावून त्याच संगोपन करायचं आहे असे सांगितले.
      याप्रसंगी प्रा वैभवी उघडे, विनोद लाखे, आणि शैलेंद्र दफटरी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना सुनील शर्मा यांनी ग्लोबल वार्मिंग नियंत्रित करण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे सांगितले.
वृक्ष लागवड ही बाल संगोपणासारखी करावी. यावेळी वन विभागासोबतच वेगवेगळ्या
49 विभागांना  उद्दिष्ट दिले आहे . वर्धा जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार मोठं खूप चांगला आहे. वनविभागाच्या वतीने जनतेसाठी रोपे आपल्या दारी उपक्रम यावर्षी सुद्धा राबविण्यात येत आहे. या ठिकाणी लोकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
      यावेळी महाबळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदीप पेटारे, तर आभार डी एन जोशी यांनी मानले.