Thursday 11 October 2012

योजनांच्‍या लाभासाठी आधार कार्ड आवश्‍यक-सुमनेश जोशी


                                  

                   * आधारकार्ड लिंक योजना राज्‍यात वर्धाचा समावेश
                   * बँक खाते आधारकार्डाशी लिंक होणार
                   * वर्धा जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविणार

          वर्धा, दिनांक 11 – शासनाच्‍या  विविध सहाय्याच्‍या योजनांचा लाभ आधारकार्डाशी  संलग्‍न  करुन  राष्‍ट्रीयकृत बँका मार्फतच  लाभार्थ्‍यांना  अर्थसहाय्य देण्‍यासाठी  राष्‍ट्रीयकृत बँकांनी  जिल्‍ह्यातील सर्व लाभार्थ्‍यांचे  बँकेत  खाते उघडावे असे आवाहन  महाराष्‍ट्राचे  सहाय्यक महासंचालक, युआयडी  सुमनेश जोशी यांनी केले.
         जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात वर्धा जिल्‍ह्यात आधारकार्ड नोंदणी व त्‍यानुसार  विविध बँकांशी  आधार नोंदणी नुसार  विविध योजनांच्‍या  लाभांचे वितरण याबाबतचा आढावा श्री. सुमनेश जोशी यांनी  घेतला.  त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज, युआयडीचे उपसंचालक सुर्यकृष्‍ण मुर्ती , अप्‍पर जिल्‍हाधिकारी    संजय भागवत , युआयडीचे  विठ्ठलदास प्रभू  तसेच  राष्‍ट्रीयकृत  बँकांचे वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक, निवासी उपजिल्‍हाधिकारी  श्री. गाडे  आदि  यावेळी उपस्थित होते.
          वर्धा जिल्‍ह्यात  12 लक्ष 99 हजार 592 लोकसंख्‍या  असून त्‍यापैकी 10 लक्ष 54 हजार 743  आधार नोंदणी  झाली आहे. राज्‍यात  आधारकार्ड नोंदणी मध्‍ये  वर्धा जिल्‍ह्याने उत्‍कृष्‍ट  अंमलबजावणी  केल्‍यामुळे  विविध योजनांचा  लाभ आधारशी संलग्‍न  करुन  अंमलबजावणी  करण्‍यासाठी  प्रायोगिक स्‍तरावर वर्धा जिल्‍ह्याची  निवड झाली आहे. जिल्‍ह्यातील  विशेष सहाय्य  योजनांच्‍या लाभार्थ्‍यांना  यापुढे बँकेमार्फतच व  आधारकार्ड क्रमांकाच्‍या आधारावरच  योजनेचा लाभ  त्‍यांच्‍या गावापर्यंत पोहचविण्‍यासाठी  सर्व लाभार्थ्‍यांचे  बँकेत खाते उघडून  आधारशी संलग्‍न करुन  योजनांचा लाभ देण्‍यात यावा अशी सुचनाही  यावेळी सुमनेश जोशी यांनी केली.
        सेलू तालुका आधार लिंक बँक खात्‍यासोबत  संलग्‍न  करुन लाभार्थ्‍यांना  लाभ देण्‍यासाठी  प्रायोगीक तत्‍वावर निवडण्‍यात आला असून, संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्‍यांना यापुढे आधार कार्डांचा वापर अनिवार्य राहणार आहे.
          महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत मजुरांना  पोस्‍टातर्फे तसेच राष्‍ट्रीयकृत बँकातर्फे मजूरीचे वाटप करण्‍यात येत असून, यापुढे संपूर्ण  मजूरी  आधार कार्डाशी संलग्‍न बँकेमधूनच वितरीत करण्‍यात येईल. यासाठी जिल्‍ह्यातील 400 गावांची माहिती संकलीत करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यात  2 लक्ष 40 हजार शिधापत्रीका धारकांनाही  बँकेमार्फतच अनुदानाची राशी  देण्‍यासाठी विशेष अभियान राबविण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी दिली.
       यावेळी तालुकानिहाय आधारकार्डाची नोंदणी , राष्‍ट्रीयकृत बँकेत असलेले खाते, ज्‍या लाभार्थ्‍यांकडे बँकेचे खाते नाही त्‍यांना त्‍वरीत  खाते उघडून  आधार सोबत जोडण्‍याबाबतचा विशेष कार्यक्रम येत्‍या  29 ते 30 ऑक्‍टोंबर रोजी प्रत्‍येक  गावात विशेष शिबीर घेवून राबविण्‍यात येईल. यासाठी ग्रामपंचायत स्‍तरावर तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक   व बँकेचे प्रतीनिधीही उपस्थित राहून ग्रामस्‍थांकडून आधार नोंदणी क्रमांक बँकेशी  संलग्‍न करतील तसेच नवीन बँक खाते सुध्‍दा उघडतील अशी माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री  भोज यांनी दिली.
          जिल्‍ह्यात 70 टक्‍के  लोकांकडे आधार कार्ड असून शेतक-यांनाही  किसान कार्ड आधार कार्डच्‍या  आधारे वितरीत करण्‍यात येईल व  त्‍यानुसार  शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ  बँकेमार्फतच देण्‍यात येईल. अशी माहितीही यावेळी देण्‍यात आली.
       जिल्‍ह्यातील  सर्व 18 वर्षावरील नागरीकांचे बँकेत खाते  उघडण्‍याबाबत  राष्‍ट्रीयकृत बँकांनी विशेष मोहीम राबवावी यासाठी प्रशासनाकडूनही संपूर्ण सहकार्य देण्‍यात येईल तसेच ज्‍या नागरीकाकडे बँक खाते आहे ते आधारशी जोडण्‍याचीही मोहीम राबवावी. अशी  सुचनाही यावेळी  करण्‍यात आली.
      यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांनी स्‍वागत करुन जिल्‍ह्यातील आधार नोंदणी बाबतची माहिती दिली.
          बैठकीस जिल्‍ह्यातील राष्‍ट्रीयकृत बँकांचे वरिष्‍ठ अधिकारी,उपविभागीय महसूल अधिकारी, तहसिलदार, तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.                                 000000000