Saturday 1 September 2018

स्पर्धा परीक्षेची तयारी प्रामाणिकपणे करा- नितेश कराळे * लोकराज्य वाचक अभियानाचा थाटात शुभारंभ * अभियानात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्धा, दि 2:- बेरोजगारीच्या वातावरणात नोकरी मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करा किंवा मरा याप्रमाणे अभ्यास केला तर नक्की यश मिळते. असे प्रतिपादन पुणेरी पॅटर्न या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक नितेश कराळे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालाया मार्फत लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयच्या वतीने शासकीय ग्रंथालयाच्या सहकार्याने जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला वक्ते पंकज वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे उपस्थित होत्या. जीवन खूप सुंदर आहे. खूप हुशार विद्यार्थीच जीवनात यशस्वी होतात असे नाही. शालेय जीवनात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे मोठे अधिकारी, नेते झाल्याची उदाहरणें आहेत. परिस्थितीचे भान आल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे झोकून देऊन सर्व शक्तीनिशी प्रयत्न केल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असल्याचे श्री कराळे यांनी सांगितले. अभ्यासक्रम सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजून घेतला तर तो रटाळ वाटत नाही. दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा तुमच्या कल्पना शक्तीला वापर करा. जगात तुमच्यासारखा दुसरा कुणीच नाही याची जाणीव ठेवून तुमचा यशस्वी होण्याचा प्रयत्न निरंतर करत राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पंकज वंजारी मार्गदर्शन करताना म्हणाले, मनुष्याच्या यशाचे श्रेय हे त्याच्या ब्रेन प्रोग्रामिंग वर अवलंबून असते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मुलं जे अनुभवतात, बघतात, शिकतात त्यावरच त्यांचं पुढचं यशापयश अबलंबून असतं. तुमच्या मेंदुला ज्याप्रमाणे आदेश दिले जातात त्याप्रमाणे तो वागत असतो. हे समजावून सांगताना त्यांनी अनेक उदाहरणांचा दाखला दिला. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मेंदूचे प्रोग्रामिंग व्यवस्थित होणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मनीषा सावळे यांनी प्रास्ताविकातून लोकराज्य वाचक अभियानाचे महत्व सांगताना स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य मासिक कसे उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन केले. सर्व महाविद्यालयात असे वाचक मेळावे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रश्न मंजुषा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना लोकराज्य मासिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण वानखेडे यांनी केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, मनोज सोयाम, श्री चिटटवार, श्री धमाने आणि जिल्हा ग्रंथालयाच्या कर्मचा-यांनी यासाठी परिश्रम घेतले . 000000


Wednesday 29 August 2018



महात्मा गांधीचे मुल्य रुजविण्यासाठी  विविध कार्यक्रमाचे आयोजन
Ø जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
Ø ‘रन फॉर पिस मॅराथॉन स्पर्धा

           वर्धा , दि. 28(जिमाका) : महात्मा गांधींचे विचार आणि मूल्य या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विशेषतः  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये  रूजावेत म्हणून गांधी जयंतीच्या पर्वावर जिल्हा प्रशासन विशेष कार्यक्रमाचे आयोजनाचे नियोजन करीत  आहे. यामध्ये महात्मा गांधींनी दिलेल्या स्वदेशी आणि श्रमसंस्काराच्या मूल्यांसोबतच त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा आणि   नई तालिम सारख्या शिक्षण पद्धतीचा समावेश या उपक्रमात असणार आहे. यासाठी आठवडाभर भरगच्च कार्यक्रम राहणार असून 2 ऑक्टोबरला वर्धेकराना  रन फॉर पीस या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
        महात्मा गांधींची 150 वे जयंती वर्षात भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.  यामध्ये 14 वर्ष वास्तव्य केलेल्या वर्धा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधींचा सर्वात अमूल्य देणं म्हणजे त्यांनी दिलेला शांती आणि अहिंसेचा संदेश. आजच्या वातावरणात हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शांती दौड या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 2 ऑक्टोबरला करण्यात येणार. यामध्ये 16 ते 21 वयोगटातील विद्यार्थी आणि खुला गट अशा दोन प्रकारात ही स्पर्धा होईल. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग राहावा यासाठी वयस्क लोकांसाठी स्वदेश फेरी ही चालण्याची स्पर्धा ठेवण्यात येणार आहे.
          मूल्य आणि संस्कार रुजविण्याचे वय हे 14 वर्षापर्यंतच असते. आजकाल शाळांमध्ये पाठ्यक्रमावर जास्त भर दिला जातो मात्र जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य आणि मूल्ये शिकवली जात नाहीत.  महात्मा गांधींनी दिलेला स्वदेशी आणि श्रम संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी चरख्यावर सूत कताई स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळांना चरखा खरेदी करून विद्यार्थ्यांना चरखा चालविण्याचे आणि सूत कताईचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला ही स्पर्धा घेण्यात येईल.
         महात्मा गांधींना समजून घेण्यासाठी  त्यांचे आत्मचरित्र वाचण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी हे वाचावे म्हणून विविध स्पर्धाचे आयोजनही करण्यात येत आहे.  गांधींच्या जीवनावर आधारित वक्तृत्व, नाट्य, नृत्य, गीत गायन, चित्रकला, कविता, आणि लेखन स्पर्धेचा यामध्ये समावेश असणार आहे.
          या संदर्भात विकास भवन येथे झालेल्या बैठकिला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व  शाळांचे मुख्याद्यापक यांना तयार करण्याच्या सूचना दिल्यात. या बैठकिला सहायक जिल्हाधिकारी मनोज जिंदाल उपस्थित होते.
                                      0000

सफाई कर्मचा-यांच्या उन्नतीसाठी शासकिय योजनाचा लाभ मिळवून दयावा
-         दिलीप हाथीबेड
वर्धा , दि. 28 : सफाई कर्मचा-यांच्या सर्वार्गिन उन्नती साठी त्यांच्या साठी असलेल्या शिक्षण, आरोग्य, व रोजगार उपलबध करुन देणा-या योजनाची माहिती संबंधित विभागांनी त्यांच्या परसिरात जाऊन जनजागृती व्दारे दयावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज संबधित विभाग व सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकां-याच्या बैठकित दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कामगाराच्या प्रश्नासंदर्भात विभाग प्रमुख आणि सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांची आढावा  बैठक आयोजित करण्यात आली  होती. यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, सर्व नगर परिषेदेचे मुख्याधिकारी , महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी  व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषदे अंतर्गत श्रमश्राफल्य योजनेमध्ये सफाई कर्मचा-यांना देण्यात येणा-या सदनिकेचे जेवढे मुल्य होत असेल तेवढया मुल्यांचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. वर्धा नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचा-यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे  श्रीमती वाघमळे यांनी सांगितले. तसेच कर्मचा-यांचा आरोग्य विमा काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेने सर्व समावेषक विमा योजना सुरु करावी, अशा सूचना श्री हाथीबेड यांनी केल्या. 
सफाई कर्मचा-यांच्या वस्तीत देण्यात येणा-या मुलभूत सुविधांसाठी नगर परिषदेने दुर्बल घटकांसाठीचा निधी वापरावा. सफाई कर्मचा-यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी सुध्दा हा निधी वापरण्यात यावा. सफाई कर्मचा-यांच्या वेतना संदर्भात त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते पुस्तक कत्राटदाराकडून  कर्मचा-यांना पुरविण्यात यावे. तसेच कत्राटदार भविष्य निवार्ह निधीची कपात करतो किंवा नाही हे तपासावे त्याचबरोबर किमान वेतन नियमाचे पालन करण्यात येते की नाही याची सुध्दा तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंजी मोठी या ग्राम पंचायत मध्ये एकमेव सफाई कर्मचा-याला कामावरुन काढून टाकले अशी तक्रार सदर सफाई कर्मचा-यांनी केल्यावर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले.
सफाई कर्मचा-यांना देण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार करण्यासाठी राष्ट्रीय अनुसुचित जाती  आर्थिक विकास महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच महात्मा फुले विकास महामंडळाच्या योजनांची माहिती सफाई कर्मचा-यांचे  मेळावे शिबिर घेऊन देण्यात यावी. स्वच्छता निरिक्षकांचे पद सरळ सेवेने न भरता 50 जागा पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.