Saturday 2 June 2012

निर्मल कार्यालय अभियान राबविणार - मालीनी शंकर


              
वर्धा,दि.2–संपूर्ण राज्‍यात निर्मल ग्राम ही संकल्‍पना प्रत्‍येक ग्रामीण भागात राबविली जात आहे. जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी शासकीय इमारतीचे बांधकाम शासन करीत असते त्‍यामध्‍ये शौचालय सुध्‍दा अंतर्भूत असतात. या सौचालयाची स्‍वच्‍छता करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येक कार्यालयावर देण्‍यात येणार असून, त्‍यासाठी  निर्मल कार्यालय अभियान राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती पाणी पुरवठा आणि स्‍वच्‍छता  विभागाच्‍या प्रधान सचिव मालीनी शंकर यांनी दिली.
      जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आज विविध विकास कामाची आढावा बेठक संपन्‍न झाली त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जि.प.मुख्‍यकार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, प्रकल्‍प  अधिकारी बि.एम.मोहन, जिल्‍हा  कृषि अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, उपजिल्‍हाधिकारी जे.बि.संगितराव व पाणी पुरवठा विभाग, सिंचन विभाग, न.पा.चे मुख्‍याधिकारी, उपजिल्‍हाधिकारी व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
      ग्रामस्‍थ लोकांनी  मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन निर्मल ग्राम अभियान यशस्‍वी झाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील कार्यालयामध्‍ये निर्मल अभियान राबवून स्‍वच्‍छता निर्माण करण्‍यात येणार असल्‍याचे  सांगून त्‍या म्‍हणाल्‍या की, महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्‍ये जिल्‍ह्यात सुरु असलेली कामे समाधानकारक असून, त्‍यामध्‍ये पांदन रस्‍ते, नाला सरळीकरण, विहीरी, शेततळे व पाणी अडवा पाणी जिरवा आदि कामे अंतर्भूत आहेत. यावेळी त्‍यांनी सिंचनाचे ओलीत क्षेत्र, विद्यूत विभागाने विहीरीवर बसविलेल्‍या  मोटारपंपाला विज जोडणी, खरीप हंगामात घेण्‍यात येणा-या पिकाची माहिती, शेतक-यांना देण्‍यात येणारे कर्ज, ग्रामपंचायतीची पणी पट्टी कराची वसूली, टंचाई परिस्थिती  निवारण करण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या  उपाय योजना, पाण्‍याची स्‍त्रोत बळकटीकरण तसेच पाण्‍याची तपासणी संबधाने आढावा घेवून संबधित अधिका-यांकडून  माहिती जाणून घेतली.
     यावेळी संबधित खातेप्रमुख उपस्थित होते.
                                                              000000

Friday 1 June 2012

नैसर्गिक आपत्‍तीच्‍या काळामध्‍ये समन्‍वय ठेवण्‍यात यावा - जिल्‍हाधिकारी


     वर्धा,दि.1– पावसाळ्यामध्‍ये नदी व नाल्‍यांना पुर येण्‍याची शक्‍यता असते तसेच  धरणामधील पाण्‍याची पातळी वाढल्‍यामुळे अनेक वेळा पाणी सोडल्‍या जाते. परिणामी नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसतो. या काळात संबधित यंत्राणेने दक्षत बाळगण्‍याची गरज असून नैसर्गिक आपत्‍तीच्‍या काळामध्‍ये अधिका-यांनी  समन्‍वय ठेवण्‍याची आवश्‍यकता आहे असे आवाहन जिलहाधिकारी जयश्री भोज यांनी केली.
आज मान्‍सुन पूर्व तयारीची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न  झाली. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने, जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगितराव, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय  अधिकारी उमेश काळे, उपविभागीय अधिकारी  सुनिल कलोडे, तहसिलदार सुषांत बन्‍सोड, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक रत्‍ना रावखंडे, जिलहा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड व इतर संबधित अधिकारी उपस्थित होते.
गाव,तालुका व जिल्‍हासतरावर नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश देवून जिलहाधिकारी भोज म्‍हणाल्‍या की, जिल्‍ह्यातील नदी व नाल्‍या काठावरील गावामध्‍ये पुर परिस्थिती निर्माण  झाल्‍यास ती परिस्थिती नियंत्रीत करण्‍यासाठी बचाव व शोध पथकांची तातडीने स्‍थापना करण्‍यात यावी तसेच त्‍यांना प्रशिक्षण सुध्‍दा देण्‍यात यावे. शहरी भागातील तसेच ग्रामीण क्षेत्रातील नाल्‍यामध्‍ये तुडूंब असलेला घनकचरा तातडीने साफ करुन त्‍याची विल्‍हेवाट सुध्‍दा लावण्‍यात यावी. शहरी  भागातील मोडकळीस आलेलया इमारतीचे तातडीने सवेक्षण करण्‍यात यावे. मंडळ स्‍तरावर बसविण्‍यता आलेले पर्जण्‍यमापक यंत्रे सुस्थित आहेत अथवा नाही याची शहानिशा करावी. पावसाळ्यामध्‍ये तलाठी, ग्रामसेवक, विद्युत  विभागाचे कर्मचारी तसेच कृषि विभागाचे कर्मचारी  यांना मुख्‍यालयात राहण्‍याच्‍या सुचना देण्‍यात याव्‍या. धरणामध्‍ये क्षमतेएवढाच पाणी साचण्‍याची साठवणूक करण्‍यात यावे. अतिरीक्‍त पाणी साठा क्रमाक्रमाने धरणामधून सोडण्‍यात यावे.  त्‍यामुळे नदी काठावरील गावाचे होणा-या  पिकाची वित्‍तीय हानी  नुकसान टाळण्‍यात येईल. पिकाचे नुकसानाचे सर्वेक्षण करताना तलाठी, ग्रामसेवक व कृषी विभागातील कर्मचा-यांनी समन्‍वय  ठेवून अचूक आकडेवारी प्रशासनाला सादर करावी. नैसर्गिक आपत्‍तीच्‍या काळात घडलेल्‍या घटनेची माहिती आपल्‍या वरिष्‍ठांना  देवून ती माहिती प्रशासनाला ताडीने कळवावी.
  पुरपरिस्‍थीती मध्‍ये  येणारी गावे अगोदरच निश्चित करुन त्‍या गावाची   सविस्‍तर माहिती तयार ठेवावी. तसेच अतिवृष्‍टीमुळे होणारे नुकसान तातडीने प्रशासनाला कळवावे. तसेच पुरपरिस्थितीमुळे उदभवणा-या समस्‍येबाबत  मदत पोहचविण्‍याचे कार्य तातडीने करावे.  तसेच संदेश वहन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याची दक्षता घ्‍यावी. पावसाळ्यामध्‍ये रोग प्रतिबंधक उपाय योजण्‍यासाठी आवश्‍यक तो औषधीचा साठा आरोग्‍य केंद्रात उपलब्‍ध करुन वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांना मुख्‍यालयी राहण्‍याच्‍या सुचना देण्‍यात याव्‍यात.
  यावेळी महसूल विभाग, आरोग्‍य विभाग, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
                                                            00000000

जन्‍म —मृत्‍यू नोंदणी एक सामाजिक कर्तव्‍य


विशेष लेख        
           जन्‍म मृत्‍यूची नोंदणी करण्‍यामध्‍ये प्रत्‍येकाचे मोठे हित दडले आहे. प्रत्‍येक नागरीकाला वैयक्‍तीक पुरावे आणि लाभासाठी त्‍याचा सदुपयोग होतो. प्रशासनाला नियेाजन आणि योजनांसाठी उपयुक्‍त माहिती मिळते त्‍यामुळे प्रत्‍येकाने जन्‍म —मृत्‍युची वेळेवर नोंद करणे आवश्‍यक असुन, प्रत्‍येक नागरिकाने एक राष्‍ट्रीय व सामाजिक कर्तव्‍य समजून जन्‍म-मृत्‍यु नोंदणी करावी या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने जन्‍म – मृत्‍यू नोंदणी अधिनियम 1969 या कायद्याची निर्मिती केली. हा अधिनियम देशातील सर्व भागांना लागू करण्‍यता आला आहे. त्‍याची अंमलबजावणी 1970 पासुन देशात सर्वत्र सुरु झाली.
           जन्‍म नोंदणीमुळे जन्‍माचे ठिकाण व पालकाच्‍या नावाचा अधिकृत पुरावा प्राप्‍त होतो. त्‍या आधारे कायद्याप्रमाणे देशाचे नागरिकत्‍व मिळण्‍यास मदत होते. हे प्रमाण पत्र वयाचा दाखला, शाळेत प्रवेश, वाहन चालविण्‍याचा परवाना व विवाहाचे वय आदी महत्‍वपूर्व बाबीसाठी पुरावा म्‍हणुन ग्राह्य धरला जातो.
           जन्‍म  मृत्‍युबाबतचे विहित दर काढणे, आयुर्मान कोष्‍टके तयार करणे, रोगांचा उद्रेक आणि लोकसंख्‍या वाढीचा अंदाज बांधण्‍यास आकडेवारीचा उपयोग होतो. प्राथमिक आरोग्‍य सेवा, सामाजिक सुरक्षा ,कुटुंब कल्‍याण माता बालसंगोपण पोषण, शिक्षण अशा अनेक कार्यक्रमांचे नियेाजन, संनियंत्रण, मुल्‍यमापण करण्‍यास जिवनविषयक आकडेवारीची माहिती बहुमूल्‍य समजली जाते म्‍हणुनच घटनेची नोंद होण्‍यास घटनेची माहिती संबंधीत निबंधकास देणे हे आपले प्रथम कर्तव्‍य आहे.
            जन्‍म , मृत्‍यू व मृत जन्‍माची (उपजत मृत्‍यू) घटना व ठिकाण घरी असल्‍यास कुटुंब प्रमुख किंवा जबाबदार व्‍यक्‍ती, हॉस्‍पीटल, प्रसुतीगृह व खाजगी रुग्‍णालय- संस्‍था प्रमुख, नियुक्‍त केलेली  व्‍यक्‍ती, धर्मशाळा, होस्‍टेल, लॉज, सार्वजनीक बाग इत्‍यादी – संबंधीत संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक , बेवारशी नवजात बालक  किंवा बेवारशी प्रेत या विषयीची माहिती ज्‍यांनी पाहिले असेल अथवा संबंधित पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, चालत्‍या वाहनात (बस,टांगा, बैलगाडी, मोटार गाडी, विमान, जहाज इत्‍यादी बाबत वाहनचालक किंवा वाहन व्‍यवस्‍थापक यांनी माहिती द्यावयाची आहे.
            ग्रामीण भागात ग्राम सेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयात तर शहरी भागात कार्यकारी  आरोग्‍य अधिकारी किंवा आरोग्‍य अधिकारी किंवा महानगर पालिका किंवा वैद्यकीय अधिकारी किंवा म.न.पा. कार्यालय, मुख्‍याधिकारी किंवा आरोग्‍य अधिकारी किंवा नगर परिषद, कार्यकारी अधिकारी, कन्‍टोन्‍मेंट बोर्ड प्रशासक यांना सुचना द्यावयाची  आहे.
           जन्‍म  आणि मृत्‍यु घटना घडल्‍यानंतर त्‍याची माहिती 21 दिवसाच्‍या आत स्‍थानिक निबंधकास द्यावी. ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी किंवा महानगरपालीकेतील कार्यकारी आरोग्‍य अधिकारी किंवा आरोग्‍य अधिकारी व कन्‍टोंनमेंट  बोर्डातील कार्यकारी अधिकारी यांना माहिती द्यावी. विहीत कालावधी नंतर विलंब शुल्‍क भरुन उशिरा नोंदणी करण्‍याची तरतुद आहे.
           जन्‍माची  नोंद बाळाच्‍या नावाशिवाय करता येते. जन्‍माची नोंद झालेली असेल तर बाळाच्‍या नावाची नोंद आई, वडील अथवा पालक घटनेच्‍या  नोंदणीनंतर 12 महिन्‍याचे आत बिनामुल्‍य करु शकतात. त्‍यानंतर 15 वर्षाचे आत विलंब शिल्‍क भरुन नावाची नोंद करता येते. 15 वर्षानंतर नावाची नोंद करता येत नाही.
             नोंदणीचे महत्‍व जन्‍माच्‍या दाखल्‍याचा उपयोग शाळेत प्रवेश घेण्‍यासाठी, नोकरीत प्रवेश करण्‍यासाठी, मतदानाचा हक्‍क मिळविण्‍यासाठी, विमा उतरविण्‍यापुर्वी, वाहन परवाना मिळविण्‍यासाठी, विवाह करण्‍यापुर्वी वय ठरविण्‍यासाठी जन्‍मस्‍थानाचा पुरावा सिध्‍द करण्‍यासाठी, पासपोर्ट मिळविण्‍यासाठी, वयाचा दाखला मिळविण्‍यासाठी, रेशन कार्डावर जादा युनिट वाढवुन मिळ‍ण्‍यासाठी होतो.
          मृत्‍यु नोंदणीचे फायद निवृत्‍ती किंवा विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी, वारसा हक्‍क प्रस्‍तापित करण्‍यासाठी, मृत्‍युच्‍या कारणाचे विश्‍लेषणात्‍मक संशोधन करण्‍यासाठी  व विविध कार्यक्रम राबविण्‍यास उपयोग होतो.
            जन्‍म किंवा मृत्‍युच्‍या घटनेची माहिती संबंधित निबंधक जन्‍म व मृत्‍यु यांचेकडे एक-दोन दिवसात कळविण्‍याची दक्षता घ्‍यावी. 21 दिवसाचे आत जन्‍म किंवा मृत्‍यु घटनेची नोंदणी केल्‍यास  मोफत दाखला मिळु शकतो. बालकांच्‍या नामकरण विधीनंतर लगेचच मुलाच्‍या नावाची नोंद जन्‍म नोंदवहीत नोंदविण्‍यास संबंधित निबंधकास लेखी किंवा तोंडी कळवावे.
समाजातील प्रत्‍येक घटकांनी  आपले कर्तव्‍य बजावून राष्‍ट्रकार्याला व समाजहीताला मोठा हातभार लागेल एवढे मात्र निश्चित.                                                          
             0000000

Thursday 31 May 2012

मत्‍स्‍य संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न


      वर्धा, दि.31 – मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, वर्धा यांचे वतीने आत्‍मा योजनेअंतर्गत दि. 24 मे 2012 रोजी मत्‍स्‍यसंवर्धनकरीत असलेल्‍या व इच्‍छुक शेततळी धारकाचे मत्‍स्‍यसंवर्धनाचे प्रशिक्षण कार्यक्रम स्‍थानिक बच्‍छराज धर्मशाळा, शास्‍त्री चौक, वर्धा येथे संपन्‍न झाला.
      प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन मत्‍स्‍यव्‍यवसाय सहाय्यक आयुक्‍त  सागर रामटेके यांचे उपस्थितीत  कृषि तंत्र अधिकारी ए.जी.कांबळे यांचे अध्‍यक्षतेखाली करण्‍यात आहे.
      याप्रसंगी प्रशिक्षण कार्यक्रमास अतुल वरगंटीवार, शिनखेडे, राजेंद्र बिसने, सहाय्यक मत्‍स्‍यव्‍यवसाय विकास अधिकारी गणेश डाके  उपस्थित राहून मत्‍स्‍य संवर्धकांना मत्‍स्‍यसंवर्धनाकरीता उपयुक्‍त माशांच्‍या जाती, मत्‍स्‍यसंवर्धन तंत्र, मत्‍स्‍यपालन व्‍यवस्‍थापन व झिंगा पालन इत्‍यादी बाबीवर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास जिल्‍ह्यातील शेततळी धारक 50 शेतकरी उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्‍वी करण्‍याकरीता संजय दिवटे, अतुल बींड,  भोयर, चांदेकर  यांनी सहकार्य केले.
                                                            0000000

डी.टी.एड.(डी.एड.) प्रवेशासाठी अर्जविक्री व अर्ज स्विकृतीसाठी मुदतवाढ


वर्धा,दि.31– सन 2012-13 या वर्षासाठी अध्‍यापक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्‍या शासकीय कोट्यातील आवेदन पत्राची विक्री  दि. 17 मे ते 7 जून 2012 पर्यंत वाढविण्‍यात  आली  असून आवेदनपत्र स्विकृती दि. 8 जून 2012 पर्यंत  स्विकारण्‍यात येणार आहे.
   आवेदनपत्राची विक्री व स्विकृती जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था, जिल्‍हा समान्‍य रुग्‍णालयामागे  वर्धा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहील. आवेदनपत्राची विक्री व स्विकृती सुटीच्‍या दिवशी सुध्‍दा सुरु राहील.
     इयत्‍ता 12 वी मध्‍ये किमान 50 टक्‍के गुणांसह उत्‍तीर्ण असलेले खुल्‍या प्रवर्गातील उमेदवार तसेच किमान 45 टक्‍के गुणांसह उत्‍तीर्ण असलेला मागासवर्गीय उमेदवार प्रवेशासाठी पात्र असतील. किमान कौशल्‍यावर आधारित अभ्‍यासक्रम एमसीव्‍हीसी तील कृषी गटातील हार्टीकल्‍चर व क्रॉप सायन्‍स तसेच आरोग्‍य व वैद्यकीय सेवा गटातील क्रेंच अॅन्‍ड प्रिस्‍कुल हे विषय घेऊन 12 वी उत्‍तीर्ण विद्याथी प्रवेशास पात्र असणार आहे. तसेच महाराष्‍ट्राचा अधिवासी असलेला सी.बी.एस.सी. किंवा अय.सी.एस.ई. किंवा नॅशनल ओपन स्‍कुल बोर्ड ची परीक्षा उत्‍तीर्ण विद्यार्थी महाराष्‍ट्र राज्‍याचा अधिवासी असल्‍याचे त्‍या जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हाधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असेल. आवेदनपत्राची माहिती पुस्तिकेसह किंमत खुल्‍या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 200 असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. 100 आहे. मागासवर्गीय उमेदवारांनी आवेदन पत्र विकत घेतांना जात प्रमाणपत्राची प्रत दाखविणे आवश्‍यक राहील. असे प्राचार्य, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था ,वर्धा कळवितात.
                                                          00000