Monday 18 October 2021

 


रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी - नितीन गडकरी

जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा आढावा

        वर्धा, दि. 18 : वर्धा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या रेल्वे मार्गाची कामे सुरु आहेत. या मार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव रेल्वेने सादर करावेत आणि संबंधित यंत्रणांनी भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

         श्री.गडकरी यांनी विश्राम भवन येथे रेल्वे मार्गांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला खासदार रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.दादाराव केचे, आ.पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार आदी उपस्थित होते.

         जिल्ह्यात वर्धा-नांदेड, वर्धा-बल्लारशहा (3 री लाईन), वर्धा-नागपूर (3 री लाईन), वर्धा-नागपूर (4 थी लाईन) या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनासाठी रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त होणे आवश्यक आहे, सदर प्रस्ताव रेल्वे सादर करावे. त्यानंतर महसूल विभाग, वन विभाग आणि रेल्वेने संयुक्तपणे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे श्री.गडकरी यांनी सांगितले.

          रेल्वेच्या चारही प्रकल्पाच्या भूसंपादनाची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जातील, असे महसूल अधिका-यांनी बैठकीत सांगितले.

0000

 



राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

वर्धा, दि 18 :-( जिमाका) शहरानजीक असलेल्या नागठाणा चौक येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

यावेळी खा. रामदास तडस, आ.पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक संल्लागार बी.डी. ठेंग,  मुख्य प्रबंधक नरेश वडेटवार, परियोजना संचालक प्रशांत पागृत, प्रकल्प अभियंता साहेबराव जुनघरे, वसंतराव नाल्हे, अशोक बनकर आदी उपस्थित होते.

आज लोकार्पण झालेल्या रेल्वे उड्डानपुलाची लांबी 1.63 किमी. इतकी आहे तर या उड्डानपुलाच्या बांधकामासाठी 66 कोटी 20 लाख इतका खर्च झाला आहे. या उड्डानपुलामुळे 7.40 किमीचा सालोड बायपास रहदारीसाठी पुर्णपणे सज्ज झाला आहे. यामुळे वाहनचालकांचा 15 ते 20 मिनिटाचा वेळ वाचणार आहे.

0000000000.

 





प्र.प.क्र -728                                                                                      दि.18.10.2021

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करु

-पालकमंत्री सुनिल केदार

Ø  शेतकरी मेळाव्याचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

Ø  शेतक-यांसाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

वर्धा, दि 18 :-( जिमाका) जिल्हयाची सिंचन क्षमता भरपूर आहे तिचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. येत्या काळात जिल्हयाचे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याकरीता जिल्हयातील शासकीय यंत्रणा व शेतक-यांनी सहकार्य केल्यास सिंचन क्षेत्र वाढविण्याचे मोठे काम आपण करु शकू, असे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आत्माच्यावतीने चरखा सभागृह येथे तीन दिवसीय शाश्वत शेती तंत्राचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे  उद्घाटन पालकमंत्री श्री केदार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आ.रणजित कांबळे, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा वैशाली येरावार, कृषि सभापती माधव चंदनखेडे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. ज्यावेळी स्वातंत्र मिळाले त्यावेळी अन्न धान्याची कमतरता होती. अमेरिकेतून मिलो मागवून भूक भागवावी लागत होती. आता मात्र अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असून निर्यातही करु लागलो आहे. गेल्या काही वर्षात आधुनिक साधने, तंत्रज्ञान नसतांना केवळ परीश्रमाच्या बळावर शेतक-यांनी ही कामगिरी केली आहे.

जिल्हयात सिंचन क्षेत्र वाढल्यास शेतक-यांना त्याचा मोठा फायदा होईल. येत्या काळात यावर काम करायचे आहे. जिल्हा परिषदने आपले सर्व बंधारे पाणी अडविण्यासाठी तयार ठेवले पाहिजे. तलावातील गाळ काढून शेतक-यांच्या शेतात टाकला पाहिजे. यासाठी आतापासूनच नियोजन करा. तलावातील गाळ शेतात टाकल्याने खताची बचत होईल शिवाय सिंचन क्षेत्रही वाढेल असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

शेतकरी मेळावा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मेळाव्यातील चर्चासत्रात शेतक-यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला पाहिजे. जिल्हयात चांगल्या दर्जाची हळद निर्माण होते. या हळदीची निर्यात वाढविण्यासोबतच शेतक-यांना यातून समृध्द कसे करता येईल, यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावे. जिल्हयातील पांदन रस्त्याची कामे मार्गी लावू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करावी असे सांगितले. आ. कांबळे यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळविण्याचे तंत्रज्ञान शेतक-यांनी आत्मसात केले पाहिजे तसेच मजूरी खर्च कमी झाला पाहिजे असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतक-यांना शेतीसाठी चांगला पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून शेती तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे सांगितले.

सुरुवातीस पालकमंत्री व मान्यवरांनी फीत कापून कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन केले व दालनांची पाहणी केली. कृषि विभागाच्या घडिपत्रिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले तर आभार उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर रब्बी हंगामपूर्व नियोजन व पिक लागवड, ग्राम बिजोत्पादन-जवस, गहू, हरबरा, रेशिम उद्योग व्यवसाय संधी या विषयाव चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रास  शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेतकरी मेळाव्यात आज 19 ऑक्टोबर रोजी होणारे चर्चासत्र

सकाळी 11.30 वाजता दुग्धव्यवस्थापन व परसबागेतील कुक्कुटपालन, दुपारी 12.30 वाजता शेळीपालन व व्यवस्थापन, दुपारी 1.30 वाजता मधुमक्षिका पालन योजनेची माहिती व जिल्हयातील व्यवसाय संधी, दुपारी 3.30 वाजता पिकविमा-कृषि पायाभूत सुविधा निधी योजना या विषयांवर व्याख्याने होणार आहे.

                                                            000

Saturday 2 October 2021

 

               गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती व  अहिंसेचे प्रेरक

                                           -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Ø  सेवाग्राम आश्रमात बापूना केले अभिवादन

वर्धा, दि 2 ऑक्टो (जिमाका) :-  महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देत  बापुकुटीत प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगुन जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. आज महात्मा गांधींची जयंतीदिनी सेवाग्राम इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रमप्रतिष्ठानच्या वतीने आश्रमप्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले.यावेळी  जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाचे वतीने राज्यपालांचे स्वागत केले. आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती.

                                                                  0000













 

प्र.प.क्र -686                                                                              दि. 2.10.2021

                        भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मुल्यांचा

                        महात्मा गांधी यांच्या विचारात सारांश

                                                -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

Ø  वर्धेतील राष्ट्रीय परिसंवादात वैश्विक सांप्रदायिकतेवर विचारमंथन

Ø  दीपोत्सव उपक्रमाच्या माध्यमातून नव्या जाणिवांचा जागर

Ø  राज्यपालांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांना भावपूर्ण अभिवादन

वर्धा, दि २ (जिमाका) :- भारतीय समाजात प्रदीर्घ काळापासून सुरु असलेल्या विविधांगी चिंतनाचा तसेच अनेक महान प्रेषितांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा संपूर्ण सारांश महात्मा गांधी यांच्या शिकवणीत आहे. त्यामुळे आज जगात विघटनकारी शक्ती सक्रिय झाल्या असतांना गांधी विचारच सा-या जगाला दिशादर्शक ठरु शकतो. असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज येथे केले. 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या जयंतीनिमित्ताने आज येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे ‘गांधी का दर्शन  : वैश्विक सांप्रदायिकता का समाधान  विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे तसेच दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  विद्यापीठाच्या कस्तुरबा सभागृहात आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह प्रसिध्द अभिनेते नितीश भारद्वाज आणि कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल होते.

            महात्मा गांधी यांच्या विचाराचे औचित्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले, गांधी विचारांचा जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभाव आहे. कारण इथल्या संस्कृतीतील श्रेष्ठ विचारांचे गांधीजी हे समग्र रुप आहे. त्यामुळे गांधी समजून घेणे आज अतिशय महत्वाचे आहे. सत्य आणि अहिंसा ही दोन्ही मुल्ये परस्परपुरक आहेत. याच सत्यावर आधारलेला सत्याग्रह  बापुजींनी सुरु केला. या लढयात अहिंसा हे त्यांचे महत्वाचे शस्त्र होते. त्या माध्यमातून मोठया शक्तीशी त्यांनी संघर्ष केला. स्वत:च्या वैयक्तिक जीवनात त्यांनी या मुल्यांचे निष्ठेने आचरण केले. त्यामुळे त्यांच्या विचारांना कृतीशीलतेचे मोठे अधिष्ठान लाभले आहे.

गांधीजींनी ज्या मुल्यांचा पुरस्कार केला ती त्रिकालाबाधित श्रेष्ठ आहेत, असे सांगतांना राज्यपाल म्हणाले आज विविध समस्यांनी त्रस्त झालेले जग भारताकडे मोठया आशेने पाहत आहे. अशा जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती गांधीजींच्या विचारात आहे. प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा आग्रह हा त्यांच्या  नई तालीम या संकल्पनेचे आधुनिक रुप आहे. विविध मुल्यांचा अंगीकार करणारा भारताचा नागरिक जगासाठी मार्गदर्शक व्हावा हे स्वप्न त्यांनी पाहिले.  या शिकवणीची मुळे ही त्यांच्या संस्कारात आढळतात त्यामुळे पूजा आणि  चर्चा यापलीकडे गांधी विचारांचे जीवनात प्रत्यक्ष आचरण करणे गरजेचे आहे तरच सांप्रदायिकता समाप्त होऊ शकेल. हिंदीच्या प्रचारप्रसारासाठी गांधीजींनी दिलेल्या योगदानाचा यावेळी त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

आत्मविश्वासपूर्ण शिक्षण देण्याऐवजी रोजगाराभिमुख शिक्षण दिल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून श्री नितीश भारव्दाज म्हणाले, भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा लक्षात घेऊन त्याबाबत व्यापक विचारमंथन व्हावे. देशातील विद्यापीठानी याबाबत सकारात्मक प्रयत्न करुन संपूर्ण व्यवस्थेला  विश्वास दयावा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात याबाबत काही कृतीशीलता दर्शविल्यास पुढील 25 वर्षात निश्चितच चित्र बदलेल त्यासाठी अनुकुल अशा जाणिवांचे दीप इथल्या हृदयात प्रज्वलित करावेत. आज आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरु आहेत.

असत्याकडून सत्याकडे होणारा जाणिवांचा प्रवास अधिक व्यापक करण्यासाठी गांधीविचार महत्वाचा असल्याचे सांगतांना कुलगुरु वरखेडी म्हणाले, गांधीजी हे पूर्णत: एक नव्या वर्गाचे प्रतिनिधी होते. महर्षी, देवर्षी आणि राजर्षी या व्यक्तीमहानतेच्या संकल्पनाच्या पारंपारिक चौकटीपलीकडे जाऊन त्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. ते या दृष्टीने महात्मा होते. सांप्रदायिकता ही मानवतेला दानवतेकडे नेते. सत्यांचा एकच एक चेहरा असू शकत  नाही. अनेक चेहरे असू शकतात. असे मानणारे महात्मा गांधी सत्योपासक होते. त्यांच्या नई तालीम मधील विचारांचा नव्या शैक्षणिक धोरणात अंगीकार करण्यात आला आहे.

 विद्यापीठाचा दीपोत्सवाचा उपक्रम हा अग्नीमधील शक्तीला  दीपकाचे विधायक रुप देणारा असून ज्यायोगे इथल्या  अंतरगातील अंधार दूर होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

            विद्यापीठाकडून आयोजित होत असलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरु  रजनीशकुमार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गेल्या वर्षभरात यानिमित्ताने आयोजित परिसंवादाचा असलेल्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत उपाध्याय यांनी केले. तर कुलसचिव कादर नवाज खान यांनी आभार मानले. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. 

                                                          000

 





                       गांधीजींनी रुजवलेला करुणेचा झरा करुणाश्रमच्या रुपात जिवंत

                                                                 -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

वर्धा, दि 2 ऑक्टोबर (जिमाका) महात्मा गांधींनी देशवासीयांमध्ये प्राण्यांप्रती करुणेचा भाव निर्माण केला. याच करुणेचा जिवंत झरा आज वर्धेत करुणाश्रमाच्या रूपाने पहायला  मिळत आहे. हीच बापुना खरी श्रद्धांजली असलयाचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. 

आज राज्यपाल वर्धेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वन्यजीवांची शुश्रूषा करणाऱ्या करुणाश्रम आश्रमाला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आश्रमात प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेवकांचा सत्कार केला तसेच संस्थेला 10 लाखाची मदतही जाहीर केली.

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच गांधीजींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा एकमेव उद्देश नव्हता, असे सांगून ते म्हणाले, देशाचे नागरिक आत्मनिर्भर  व्हावेत यासाठी सुद्धा त्यांनी संस्थांची निर्मिती करून विचारांची पायाभरणी केली. देशाचा विकास होण्यासाठी  देशात शांतीपूर्ण वातावरण असायला पाहिजे या हेतूने महात्मा गांधींनी सर्व आंदोलने अहिंसात्मक पद्धतीने केलीत असेही श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.

आश्रमाचे संचालक आशिष गोस्वामी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  उपवन संरक्षक राकेश सेपट उपस्थित होते.

Wednesday 8 September 2021

 




.प्र..क्र- 643                                                                                                                              दि.8.9.202

                  पीक कर्ज वितरण, शेतकरी आत्महत्या व इतर योजनांचा अध्यक्षांकडून आढावा

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत

                                                       - किशोर तिवारी

Ø  आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा

वर्धा, दि. 8 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांना शेत मालाचा योग्य हमीभाव व बँकांनी पीक कर्जासाठी आगाऊ कागदपत्रे न मागता सुलभतेने पीक कर्जाचे वितरण होणे आवश्यक आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यावर अनेक संकटांचे आभाळ कोसळले असते. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन त्यांना दिलासा द्यावा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना, सुलभरित्या पीक कर्ज अशा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज येथे सांगितले.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्री. तिवारी यांनी शेतकरी आत्महत्या, पीक कर्जाचे वितरण, कोरोना आजार व इतर बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लीड बँकेचे मॅनेजर वैभव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभरित्या पीक कर्जाचे वाटप, आरोग्य सुविधेंचा लाभ, बी बियाण्यांची उपलब्धता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, अत्योंदय योजनेचा लाभ, विविध शासकीय योजनांचा लाभातून उत्पादन वाढीस मदत, कृषी तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन, शेत मालाला हमीभाव, कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांना सुलभरित्या होणे गरजेचे आहे. या गोष्टी त्यांना नियमितपणे सुरळीतरित्या मिळाल्या तर आत्महत्या सारख्या घटना घडणारच नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी शेत मालाला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. पीक कर्ज, कर्जाचे पुर्नगठन बँकानी आगाऊ कागदपत्रांची मागणी न करता सुलभरित्या उपलब्ध करुन द्यावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱी कुटुबांना संजय गांधी निराधार योजना, अत्योंदय योजना यासारख्या अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पीक कर्जाच्या अनुषंगाने श्री. तिवारी यांनी पीक कर्ज वितरणाचे लक्षांक पूर्ण करण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ज्यादा कागदपत्रांचा तगादा न लावता सुलभरित्या कर्ज वितरीत करावे. मुद्रा योजने अंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांना मान्यता द्यावी. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत होते. आदिवासी बांधवांची उपासमार न होता त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी खावटी कर्जाचे लक्षांक पूर्ण करावे. प्रलंबित प्रकरणांचाही येत्या पंधरा दिवसात निपटारा करुन संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. जिल्ह्यास आवश्यकता असणाऱ्या वस्तू भारत सरकारच्या जेम पोर्टलवरुन खरेदी कराव्यात. कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा योजनेचा लाभ द्यावा, विमा कंपनींचे अंकेशन करुन ज्यादा पैसे उकळणाऱ्यांकडून वसूली करण्यात यावी. संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत पीककर्ज वाटप, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजना व आदिवासींना अंत्योदय योजनेचा लाभ, अवैध गौण खनिज माफियांची यादी व त्यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई, शासकीय ठेकेदारांना धमक्या व कामांत अडथळे आणणाऱ्या समाजसेवका विरुध्द प्रशासनाकडून कारवाई, भारत सरकारच्या जेम ई पोर्टलवरुन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी न करता खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या वस्तू, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भेटी, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी भारतीय घटनेच्या कलम 19 व 21 मधील तरतुदीनुसार नागरिकांचे अधिकारी गोठविल्याच्या तक्रारींची समिक्षा व त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात झालेला फायदा, शासनाने कोविड महामारीच्या काळात लावलेले कडक निर्बंध व सलवती, आरोग्य सुविधांचा अभाव, सहकारी मजूर संस्थांचे लेखापरीक्षण, मजूरांची नामावली व त्यांनी केलेल्या कामांचा तपशील आदी संदर्भात श्री. तिवारी यांनी सविस्तर आढावा घेतला.

0000