Thursday 7 December 2017



सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षणाचे 25 राजदूत दिल्ली वारीला
Ø गांधी जिल्ह्याचा अनोखा उपक्रम
      वर्धा दि 7 (जिमाका)  दिवसेंदिवस  मूल्य शिक्षणाचा -हास होत असून त्याचे परिणाम म्हणून आज   समाजात अशांतता, जातीभेद, असहिष्णुता आणि  हिंसा  पहावयास मिळते.  मूल्यसंस्कारांचे बाळकडू लहानपणीच मुलांना मिळावे आणि सुदृढ, समतोल विचारांची  पिढी घडावी  म्हणून गांधी जिल्हा अशी ओळख असलेल्या  वर्धा जिल्ह्याने  यासाठी पुढाकार घेतला आहे.महात्मा गांधींनी दिलेले विचार आणि मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी निवड करण्यात आलेल्या 25 ब्रँड अँबेसिडर  विद्यार्थ्याना आज विमानाने  दिल्ली वारी करण्याची संधी मिळाली.  खासदार रामदास तडस आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विद्यार्थ्यांच्या  गाडीला हिरवी झेंडी दाखवून मुलांना शुभेच्छा दिल्यात.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासून गांधीजींचे  मूल्य रुजवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून  जिल्हा प्रशासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2016 पासून  उडाण प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था  जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गांधी विचार परिषद, आणि नई तालीम सेवाग्राम,  यांचे सहकार्य घेण्यात आले.
 सर्व जिल्हापरिषद,  नागरपालिकां आणि  काही खाजगी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना विविध प्रात्यक्षिक  आणि स्पर्धेच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे धडे देण्यात आले.  यामध्ये विद्यार्थ्याना वैयक्तिक, सामाजिक, आणि राष्ट्रीय मूल्यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.  त्याचबरोबर सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षण  अंतर्गत संस्कारपर्व पुस्तक विद्यार्थ्याना वाटप करण्यात  आले. 

           विद्यार्थ्याना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता,  शांती ,अहिंसा, सहिष्णुता, संवेदनशीलता,  सौजन्य, श्रमप्रतिष्ठा, स्त्री- पुरुष समानता, वक्तशीरपणा,  या दहा मूल्यांवर आधारित शिक्षण व  प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी स्वतः मुख्याध्यापकांचे या विषयांवर उद्बोधन केले. याचबरोबर, विद्यार्थ्यांची वक्तृत्व , निबंध, चित्रकला, काव्य व कलागुणांवर आधारित  स्पर्धा घेण्यात आली. शिवाय गावातील श्रमिक आणि कारागिरांच्या मुलाखती आणि प्रात्यक्षिकाद्वारे त्यांच्या कलेचे आणि श्रमाचे मोल आणि  जाणीव रुजविण्याचे  काम शाळांनी केले. वर्धा, सेलू, आर्वी, आष्टी, देवळी या तालुक्यांमध्ये सायकल यात्रा काढून विद्यार्थ्यानी  पर्यावरण आणि समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शाळेतील  शिक्षकांनी व्यसनमुक्ती आणि  शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका, यावर पालकांचेही उद्बोधन केले. सेवाग्राम येथे चार दिवस बाल आनंद मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्यात.
        वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमात शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तर अशा विविध टप्प्यावर  सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील इयत्ता 5 वी  ते 9 वी पर्यंतचे 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील 25 विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. यात ग्रामीण भागातील जिल्हापरिषद शाळांमाधील 20 विद्यार्थी आहेत.  या 25 विद्यार्थ्याना मूल्य संस्काराचे राजदूत म्हणून दिल्ली वारी करण्याची संधी उडाण प्रकल्पाद्वारे मिळाली आहे.
         या वारीत 4 दिवस विद्यार्थी  गांधीजींचे वास्तव्य असलेली ठिकाणे आणि संस्थाना भेट देतील. तसेच राष्ट्रपती भवन,  संसद भवन, संसदेतील ग्रंथालय, इंडिया गेट आणि दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन माहिती घेतील. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळांमधील5 शिक्षक आणि डाएट च्या प्रा. श्रीमती महाजन सहभागीं झाल्या आहेत.
        आज समाजात  मूल्य रुजवणे आवश्यक  झाले आहे.  त्यासाठी शालेय जीवनातच याचे संस्कार व्हावेत म्हणून महात्मा  गांधीच्या 150 व्या जयंती निमित्ताने  उडाण हा प्रकल्प सुरू केला आहे. गांधी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी आहे की,  गांधीजींनी जी जीवनमूल्ये आपल्याला दिलीत ती पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहचवली पाहिजे.  यावर्षी विविध उपक्रम आणि स्पर्धेच्या माध्यमातून 25 मुले निवडण्यात आलीत. त्यांना मूल्यसंकराचे राजदूत म्हणून आपण संबोधले आहे. यात जिल्हा परिषद शाळेतील गरीब कुटुंबातील मुले आहेत. दिल्ली येथे विमानाने जाऊन ही मुले तेथील महात्मा  गांधींच्या स्मृती स्थळांना भेट देऊन राष्ट्रपती भवन आणि इतर ठिकाणांना भेटी देतील.
 शैलेश नवाल, जिल्हाधिकारी वर्धा


Wednesday 6 December 2017



          शेतक-यांनी मातीचे परीक्षण करून खतांचे नियोजन करावे
                                          - खासदार रामदास तडस
• जिल्ह्यातील 19 हजार शेतक-यांना मृद आरोग्य पत्रिका वितरण
Ø विश्व मृदा दिन साजरा
     वर्धा दि 5 जिमाका :-  मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधानमंत्री स्वतः शेतक-यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे  लक्ष आहे हे अधोरेखीत करते. यापूर्वी कधीही मातीचे परीक्षण करण्यात आले नाही. या शासनाने ही योजना सुरू करून शेतक-यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केलेला यशस्वी प्रयत्न आहे.त्यामुळे शेतक-यांनी मातीचे परीक्षण करून घेऊन शेतीला आवश्यक मूलद्रव्याचा आहार पुरवावा आणि भरघोस पीक घ्यावे,  असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी  केले.
            आज  सेलसुरा येथे कृषी विज्ञान केंद्र,  कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने  विश्व मृदा दिनानिमित्त शेतकरी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी श्री तडस बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे,   जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती,  देवळी नगर परिषद नगराध्यक्ष सुचिता मडावी, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत उंबरकर, उपसंचालक जी.आर. कापसे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तालुका कृषी अधिकारी श्री सांगळे  उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार तडस म्हणाले, शेतक-यांना शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला तर शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने शेतीतून सोन पिकवू शकतो.विदर्भातील सिंचनाचे 30 वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी 700 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. याशिवाय शेतक-यांच्या मातीचे परीक्षण करून 10 कोटी शेतक-यांना आज मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम देशपातळीवर एकाचवेळी राबविण्यात येत आहे.  सध्या जिल्ह्यात बोन्ड अळीचा प्रादुर्भाव 80 ते 85 टक्के क्षेत्रावर झाला आहे. हा प्रश्न येत्या लोकसभा अधिवेशनात मांडू असेही ते यावेळी म्हणाले. शेतक-यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा असे  आवाहनही त्यांनी केले.
         शेतक-यांनी आधुनिक शेतीसोबतच जैविक शेतीची कास धरावी. शेतीला जोडधंदा आणि फवारणी किट चा वापर करावा असे आवाहन कृषी सभापती मुकेश भिसे यांनी केले.
          शासन शेतक-यांना मोफत माती परीक्षण करून देते. यासाठी प्रत्येक परीक्षणाला शासनाला 300 रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतक-यांनी याचा लाभ घेऊन शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे. जमिनीत काय आहे आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे याचे गणित या आरोग्य पत्रिकेत दिलेले असते.शेतक-यांनी त्याप्रमाणे खतांचा वापर करून पीक उत्पादन वाढवावे .  उत्पादन खर्च कमी करणे हे शतक-यांचं धोरण  असल पाहिजे. त्यासाठी  शेतक-यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.  घरगुती बियाणे,  सेंद्रिय व जैविक खते आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन करून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी यावेळी केले.
या मेळाव्यात शेतक-यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. आज जिल्ह्यात एकाचवेळी 19 हजार मृद आरोग्य पत्रिकेचे ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात आले. तसेच प्रगतीशील शेतकरी रुपाली पाटील आणि श्री सुपारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते स्टॉल चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माती परीक्षक अधिकारी रश्मी जोशी,  डॉ रुपेश झाडोदे, डॉ धनराज चौधरी यांनी शेतकऱयांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय शेती करणारे देवळी तालुक्याच्या लोणी गावचे शेतकरी श्री पेठकर यांनीही शेतकऱयांना सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रशांत उंबरकर यांनी तर संचालन प्रा उज्वला शिरसाट यांनी केले.
                                     




चिमुकले निघाले दिल्ली वारीला
वर्धा, दि.5 (जिमाका), ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहयचे त्याच बालवयात वर्धा जिल्हयातील जिल्हा परिषदांच्या शाळेतील चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली  दर्शनासाठी आणि राष्ट्रपती भवनास भेट देण्यास निघाले, हे स्वप्न्‍ नाही तर वास्तव आहे.
महात्मा गांधी यांची 150 वी जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासुन मुल्यसंस्कार रुजवसाठी उडान प्रकल्प जिल्हयात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची प्रेरणा व संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक  विकास संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गांधी विचार परिषद, नई तालीम सेवाग्राम यांच्या सहकार्यातून गेल्या वर्षीपासुन  सार्थक जीवनासाठी मुल्यशिक्षण हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम , उपक्रम, व स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व अभिव्यक्तींला चालना दिली जात आहे. मुलांचा उत्सफुर्त प्रतिसाद व शिक्षकांचे उत्तम मागदर्शन यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.
शाळा, केंद्र, तालुका असे टप्पे पार करुन 21 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय उडाण ही सामान्यज्ञान परीक्षा नई तालीम सेवाग्राम येथे पार पडली . या सामान्य ज्ञान परीक्षेत जिल्हयातील इयत्ता 5 ते 9 पर्यंतचे 350 विद्यार्थी  सहभागी झाले होते.  या सहभागी विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यात आपली चुणुक दाखविली. जिल्हाधिकारी यांनी जाहिर केल्या प्रमाणे स्पर्धेत गुणवत्तेत चमकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमान वारीने दिल्ली दर्शन व राष्ट्रपती भवनास भेट देण्याची संधी प्राप्त झाली आहे. 7 डिसेंबर रोजी विमानात बसण्याचे या बालकांचे स्वप्न  पूर्णत्वास जाणार आहे. दिल्ली येथे गांधीजीचे वास्तव्य  असलेली ठिकाणे, त्यांनी उभ्या केलेल्या  संस्थांना भेट दुऊन  तेथुन गांधी विचारांची प्रेरणा घेतील तसेच या वारीत ते राष्ट्रपती भवनास भेट देतील.   जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिका-यांसह अनेक मान्यवरांनी हया चिमुकल्यांच्या दिल्ली वारीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 7 डिसेंबरला 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातुन या चिमुकल्यांची गाडी रवाना होईल.
                             0000