Friday 14 December 2018



जिल्ह्यात एकही टँकर लागणार नाही असे नियोजन करा
                                                      - चंद्रकांतदादा पाटील
       - दुष्काळ आढावा बैठक

 
वर्धा दि 14 :-
  दुष्काळात अन्नधान्याची कमतरता अन्नधान्य दुसऱ्या राज्यातून किंवा  विदेशातून आयात करून पूर्ण करता येते. चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी चारा छावण्या  सुरू करता येतात. पण पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाणी आयात करू शकत नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये एकाही गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा  लागू नये यासाठी  पाण्याचे योग्य नियोजन करावे.किरकोळ  नादुरुस्त असलेल्या पाणी पुरवठा योजना दुरुस्त करून सुरू ठेवाव्यात असे निर्देश महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेत.
        आर्वी येथील नगर परिषद सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थतिचा  आढावा घेतला, यावेळी श्री पाटील बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने उपस्थित होते.

         राज्यात कुठेही पाण्यासाठी टँकर लावावा लागू नये यासाठी नियोजन करीत असल्याचे सांगून त्यांनी टँकर मुळे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आणि मिळालेले पाणी लोक शुद्ध करून पित नाहीत. तसेच टँकरमधील भ्रष्टाचार हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जिथे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत तिथे पाण्याचे नियोजन आतापासून करायला पाहिजे. पाऊस उशिरा सुरू झाला तरी पाणी पुरले पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
          दुष्काळी भागात शेतीची कामे लवकर संपली आहेत. त्यामुळे कामासाठी लोकांचे स्थलांतर होऊ नये यासाठी रोहयोची कामे लवकर सुरू करावीत. यामध्ये फळबागलागवड, विहीर आणि प्राथमिक शाळांचे आवार  भिंतीचे काम घेण्यात यावे. चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी गाळपेर जमिनीवर चारा लागवड करण्यात यावी असेही त्यांनी निर्देश दिलेत.

        शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेतक-यांना सुखी करण्यासाठी अधिकाऱयांनी शेतकरी हिताच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या पाहिजेत असेही ते यावेळीम्हणाले. यावर्षी कर्जाची गरज होती पण कर्ज मिळाले नाही किंवा मिळू शकले नाही अशा शेतकऱयांनी त्यांची गरज कशी भागवली याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना सांगितले. यावेळी त्यांनी तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी  गावातील परिस्थितीची माहिती करून घेतली.
        बैठकिच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात आष्टी आणि कारंजा तालुक्यात संपूर्ण मंडळात दुष्काळ आहे तर समुद्रपूर आणि देवळी मधील काही मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यात एकूण 26 मंडळामध्ये दुष्काळ असल्याचे श्री नवाल यांनी सांगितले. पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी केवळ 32 हेक्टर मध्ये रब्बीची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई नसून पुढेही चारा टंचाई भासू नये म्हणून 7 लक्ष 62 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. तसेच यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 लक्ष रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. सद्य स्थितीत एकाही गावात टँकर नाही. मात्र मार्च महिन्यानंतर मागील वर्षी ज्या 4 गावात टँकर लागला होता त्या गावात टँकर लागू शकतो. पण तो लागू नये यासाठी सुद्धा नियोजन केले आहे. शहरी भागात आतापासून पाणी कपात करण्यात येत असून दोन दिवस आड पाणी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोहयोमधून शेल्फवर कामे तयार आहेत. त्यासाठी 154 कोटीचे नियोजन केल्याचे श्री नवाल यांनी सांगितले
      या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर,  जिल्हा परिषद लघुसिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, इतर विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपास्थित होते.
                                                                        00000