Thursday 21 January 2016

 गाव समृद्ध करण्यासाठी सरपंच, लोकप्रतिनिधी महत्त्वाचा दुवा
विवेक इलमे
Ø योजना आपल्या द्वारी माहिती अभियानाचा उपक्रम
Ø उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा गौरव
Ø आर्वी, आष्टी तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधींची उपस्थिती
                  वर्धा, दिनांक 21 - मानवाच्या जन्मापूर्वीपासून ते मृत्यूपर्यंत शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सरपंचांसह ग्रामसेवकांवर असते. सरपंच आणि ग्रामसेवक विकासाची दोन चाके असून त्यांच्यामुळेच गाव अधिक समृद्ध होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांनी केले.  
           आर्वी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने माहिती अभियान कार्यशाळा 2016 चे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख होते. तर जिल्हा परिषद सदस्य गजानन गावंडे, गजानन निकम, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब नांदूरकर, सदस्य वैभव जगताप, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी  डॉ. सतीश राजू, सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सतीश नेमाडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, आत्मा प्रकल्पाचे संचालक दीपक पटेल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, महावितरणचे सहायक अभियंता  आष्टीचे  गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, आर्वीचे प्रवीणकुमार वानखडे यांची उपस्थिती होती.  
          गावांचा विकास सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्नाने होतो. बहुसंख्य तरूण मोठ्या हुद्द्यांवर गावाबाहेर मोठ्या शहरात काम करतात. सरपंच, ग्रामसेवकांनी त्यांच्याशी संपर्कात राहून गावाचा विकास साधून घेणे महत्त्वाचे असते. लोकसहभागातून योजना अधिक यशस्वी होण्यास मदत होते. केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम संसद योजनेसारखीच आता आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्यासाठीही सर्वांनी पुढाकार घ्यावा. ग्रामविकासासह सहकार क्षेत्रावरही भर देण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी  विवेक इलमे यांनी केले.                                                                                     
         ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख म्हणाले, भारत देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालेला आहे. पशुधनही 49 कोटी आहे. परंतु शेतीसोबत शेतक-यांनी जोडधंदा करणे आवश्यक आहे. जलयुक्तशिवार अभियान  शेतक-यांसाठी नवसंजिवनी आहे, त्याचा फायदा प्रत्येकाने घेऊन पाण्याचे सुनियोजन करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शहराकडे जाण्याचा नारा दिला. दोन्ही महामानवांच्या विचारांवर आपण चालणे महत्त्वाचे आहे. खेडीही समृद्ध होऊन शहराचा विकास होणेही आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या फळबाग, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, कृषी आदी लोकोपयोगी, लोककल्याणकारी योजना आहेत. शासन देवदूत आहे. गावातील प्रत्येकाची जबाबदारी गावचा विकास करण्याची आहेआपल्या गावाच्या विकासासाठी शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाचा शाश्वत विकास साधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम.खळीकर यांनीही कृषी योजना शेतक-यांचे कल्याण करणा-या आहेत. महिला विकासाचाही त्यात विचार करण्यात आलेला आहे. बायोगॅस योजना तर शेतक-यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. कोल्हापूर, नगर नंतर सर्वाधिक योजनेचा लाभ हा वर्धा जिल्ह्याने घेतलेला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड 650 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली आहे. मागासवर्गीयांसाठीही विशेष घटक योजना आहेत. या योजनेचा लाभ घेण्याबरोबरच प्रत्येक शेतक-याने आपल्या शेतातील मृदेचे परीक्षणही करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून कृषी आरोग्य पत्रिकेचे महत्त्व विषद केले.
              वरीष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी पाण्याचे योग्य नियोजन ही भविष्याची गरज असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य पाणी वापराचे नियोजन करणारे एकमेव राज्य असल्याचे सांगितले. तसेच वर्धा पॅटर्न, माथा ते पायथा या संकल्पनेवर जलयुक्त शिवार अभियानाची कामे यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
              सेलसुरा येथी कृषी तज्ञ डॉ. सतीश नेमाडे यांनी वर्धा जिल्ह्यातील पीक पद्धती आणि उपाययोजना यावर माहिती सांगून प्रत्येकाने माती परीक्षण अहवाल पाहूनच पिकाला पूरक खतांची मात्रा द्या, असे सांगितले
                जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी गवळाऊ गायी, त्यांचे संवर्धन, चारा पद्धती यावर सविस्तर माहिती सांगून शेतक-यांनी चारा पद्धतीचा अवलंब करून जनावरांचा चारा स्वत्:च्या शेतात पिकविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
             आत्मा प्रकल्पाचे संचालक दीपक पटेल यांनीही शेतीशी निगडित शेतक-यांचे प्रशिक्षण कार्यक्रम, प्रात्यक्षिके यावर मार्गदर्शन केले

           महावितरणचे सहायक अभियंता एन.व्ही. ढोकणे यांनी शेतक-यांसाठी सौर कृषी पंप योजना, योजनेची वैशिष्ट्ये आदींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलेसूत्रसंचालन विनेश काकडे यांनी करून आभारही मानले.

उत्कृष्ट कार्याचा गौरव
       


जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट कार्य करणा-या रसुलाबादच्या सरपंच राजश्री धारगावे, खाजगी नळावर संपूर्णत: गावात मीटर बसविणा-या वाढोन्याचे ग्रामविकास अधिकारी देवरावजी घुगे आणि घनकच-याचे वयवस्थापन करणा-या वडगावचे ग्रामसेवक प्रवीण खोके, सिरसोलीच्या सरंपच कल्पना डोळस यांचा तर फॉडर कॅफेटरिआ तयार करून शेतक-यांना विविध प्रजातींचा जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला, या राज्यातील पहिल्या उपक्रमाबद्दल तालुका पशुधन विकास अधिकारी अनिरूद्ध पाठक, श्री. बंब, बी. बी. जाने, महेबुब शेख यांचाही मान्यवरांच्याहस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला
0000