Tuesday 2 October 2018






मॅराथॉन  स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांचे हस्ते  बक्षिस वितरण 

            वर्धा, दि.2, (जिमाका) महात्मा गांधींचे विचार आणि मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 29 सप्टेंबर ते  2 ऑक्टोंबर पर्यंत कार्यांजली उत्सव आयोजित करण्यात आला. या उत्सवाच्या आज शेवटच्या  दिवशी  शांती दौड मॅराथॉन स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले.  मॅराथॉन स्पर्धेतील प्रथम , व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना वित्त , नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम येथे पुरस्कार देऊन सन्मानित केले.
            यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल , जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली उपस्थित होते.
           
       आज सकाळी सकाळी 7.30  वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथून मॅराथॉन स्पर्धेला खासदार रामदास तडस,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली  यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. मॅराथॉन स्पर्धेमध्ये पाच जिल्हयातील 2 हजार 800 स्पर्धक सहभागी झाले असून स्पर्धा खुला पुरुष व महिला, शालेय मुले व मुली व प्रौढ 45 वर्षावरील युवकांसाठी स्पर्धा आयेाजित करण्यात आली. स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली असून प्रत्येक गटातील सहा विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. यामध्ये प्रथम 10 हजार ते 1 हजार , दुस-या गटात 6 हजार ते 1 हजार व तिस-या गटात 4 हजार ते 1 हजार असे सहा बक्षिसे मान्यवराचे हस्ते प्रदान करण्यात आली.
                                   
                                                                                    00000









चरखा हा जगाला शोषणमुक्ती आणि अहिंसेचा संदेश देईल.
                                                        - सुधीर  मुनगंटीवार
Ø सेवाग्राम येथे जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण

    वर्धा दि 2(  जिमाका ):- गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून श्रम, समानता आणि शक्तीची शिकवण संपूर्ण देशाला दिली. देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी चरखा हे त्यावेळी उत्तम माध्यम ठरले. आज त्यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात  आलेला जगातील सर्वात मोठा चरखा हा जगाला भूकमुक्ती, शोषणमुक्ती आणि हिंसा मुक्तीचा संदेश देईल असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सेवाग्राम आश्रमाच्या नवीन सभागृहाच्या आवारात सेवाग्राम विकास आराखड्यातून उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.  खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी  अजय गुल्हाणे, जे जे स्कुल ऑफ आर्ट चे प्रा. विजय सकपाळ, विजय बोनदर, उपअभियंता श्री मंत्री यावेळी उपस्थित होते.
श्री मुनगंटीवार यांनी या ठिकाणी बालकांच्या समवेत सूत कताई करून उपस्थितांना श्रम करण्याची प्रेरणा दिली.
      महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाचे आणि खादी व हस्तकलेचे  प्रतीक म्हणून ओळखला जाणारा चरखा सेवाग्राम येथे उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात मोठा  चरखा आहे.  विशेष म्हणजे हा चरखा मंद गतीने खऱ्या चरख्यासारखा फिरतो.  चरखा हे गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमाचे प्रत्यक्ष स्वरूप आणि प्रतीक होते. या चरख्याच्या माध्यमातूनच त्यांनी स्वदेशी, स्वयंपूर्णता आणि स्वातंत्र्याचे  स्फुलिंग भारतीयांच्या मनात जागविले. हे श्रम, समानता आणि एकतेचे सुद्धा प्रतीक होते.  त्यामुळे त्यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांनी स्वतंत्र भारताला दिलेले हे प्रतीक त्यांना आदरांजली म्हणून सेवाग्राम या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. खादी व हस्तकलेचे प्रतीक असलेला चरखा कलात्मक पद्धतीने मांडण्याची जबाबदारी मुंबईच्या  ज. जी. कला महाविद्यालयाला देण्यात आली होती .  येथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या चरख्याची संकल्पना विकसित करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागला आहे.

     सध्या सर्वात उंच चरखा हा दिल्ली येथील विमानतळावर उभारला असून त्याची उंची 17 फूट,  रुंदी 9 फूट  आणि लांबी 30 फूट आहे. सेवाग्राम येथे उभारण्यात येणारा  चरखा दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरील चरख्यापेक्षा उंच  असणार आहे. सेवाग्राम येथील चरख्याची  उंची 18.5 फूट राहणार असून, 11. 3  फूट रुंद आणि 31 फूट लांब असणार  आहे. हा धातूमध्ये तयार करण्यात आला असून त्यावर ऊन ,वारा पाऊस याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला लाकडाप्रमाणे रंगविण्यात आले आहे.

    या चरख्याच्या प्रत्येक पात्यावर गांधीजींचे विचार लिहिलेले असतील.. खऱ्या चरख्यासारखा हा मंद गतीने फिरणार असून सुबक प्रकाश योजनेमुळे प्रत्येक दिन विशेषानुसार त्याची रंगसंगती बदलेल.
 मुंबई येथील ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय सकपाळ, विजय बोनदर, श्रीकांत खैरनार, 10 विद्यार्थी, 10 तंत्रज्ञ आणि मजुरांच्या साहाय्याने 22 दिवसांमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या संकल्पनेसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि अडारकर असोसिएट्स यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सेवाग्राम येथे भेट देणा-या देश- विदेशातील पर्यटकांसाठी हे निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरेल.
                                                00000








देशाला दिशा देणारा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख निर्माण व्हावी.
                                                           -  सुधीर मुनगंटीवार
   *जिल्हाधिकारी कार्यालय भूमिपूजन व  उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण
   * भूमिपूजनाचा मान महिला कर्मचाऱयांना * वर्धा नगर परिषदच्या विकास कामांचे ई- भूमिपूजन
वर्धा दि 2 जिमाका :- वर्धा हा महात्मा गांधींचा जिल्हा;  सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक, जातीविहिन व धर्मविहिन समाजाचे प्रतीक म्हणून  पुढे यावा . तसेच  महात्मा गांधींचा चरखा हा भूकमुक्त, शोषणमुक्त ,नक्षलमुक्त भारतीय समाजाचे  प्रतीक म्हणून जगाच्या समोर येऊन देशातील 712 जिल्ह्यांना दिशा देणारा जिल्हा  म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा संकल्प आज महात्मा गांधींच्या जयंती निमित्त करावा, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
     नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवनाचे भूमिपूजन, उपविभागीय कार्यालयाचे लोकार्पण आणि वर्धा नगर परिषदमधील विविध विकास कामांचे  भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्री मुनगंटीवार बोलत होते.यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अधीक्षक अभियंता श्रीमती  साखरवाडे,  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगर परिषदच्या विविध विकास कामांचे ई- भूमिपूजन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
      गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांचा विचार जण मना पर्यंत पोहचविण्याचे काम करायला हवे. त्यासाठी राष्ट्रपती भवनासारखी इमारत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिन, दुर्बल, शोषित ,पीडितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करावे, असे श्री मुनगंटीवार म्हणाले.  सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे कार्यालय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री यांनी येथील कर्मचा-यांनी निर्जीव हृदयाने काम करू नये असेही सांगितले. पारदर्शकतेसोबतच माणुसकीची झालर या कार्यालयाला लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम  एक -दीड वर्षात  पूर्ण करावे . वाघाच्या हस्ते या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले असून वाघाच्या गतीने काम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
      देशाच्या आंदोलनाची दिशाभूमी आणि महात्मा गांधीच्या कर्मभूमीने या देशाला कर्म करण्याची प्रेरणा दिली. मात्र सत्यातून सत्तेकडे गेलेला हा विचार पुन्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेतून सत्याकडे आणला आहे.  15 वर्षांपूर्वी केलेल्या घोषणा या शासनाने पूर्ण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सत्याच्या रस्त्यावर चालून बोलू तेच करण्याचा संकल्प त्यांनी केला. 
इमारतीचे भूमिपूजन महिला कर्मचा-यांच्या  हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवन च्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कुसुम वाघ या महिला कर्मचार्याला   भूमीपुजन करण्यास सांगितले. कामाचे श्रेय घेणे आणि मानपान यासाठी रुसवे भूगवे होताना नेहमीच बघतो. मात्र पालकमंत्री यांनी कनिष्ठ वरिष्ठ हा भेद संपवून त्याच कार्यालयात काम करणा-या  महिला कर्मचा-याला भूमीपूजनाचा मान देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
      यावेळी खासदार तडस म्हणाले,  चरख्याच्या माध्यममातून गांधीजींचा श्रम, समानता आणि शांती चा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहचवता येईल. या शासनाच्या काळात 7 राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले. विदर्भाचा विकास या माध्यमातून होईल. प्रधानमत्री आवास योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील घरांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीतील तफावत थांबवून सर्वाना साडेतीन लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी केली.
जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताविकातून इमारतीची वैशिष्ट्ये सांगून ही नवीन इमारत पारदर्शक, गतीने सेवाभाव ठेवून काम करणारी राहील असे सांगितले.
      यावेळी आमदार पंकज भोयर यांनी पालकमंत्री यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास झाला असे सांगून विकासकामांची यादी सांगितली. समाधान शिबिराच्या माध्यमातून 50 हजार लोकांच्या तक्रारी निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली.  यावेळी आमदार समीर कुणावर यांनीही मनोगत व्यक्त केले.
       यावेळी मान्यवरांच्या हस्ते वास्तू विशारद किशोर चिद्दलवार आणि यश सराफ यांचा सत्कार करण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या  चरख्याच्या  प्रतिकृतीची निर्मिती करणारे जे. जे. स्कुल ऑफ आर्ट चे प्राध्यापक विजय सकपाळ आणि विजय बोनदर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बचत गटामार्फत निर्मित पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अतुल रासपायले, आणि आभार अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मानले.
43 कोटी 11 लक्ष 8 हजार रुपये खर्च  करुन बांधण्यात येणा-या जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालयाची इमारत दोन मजली राहणार आहे.  इमारतीचे बांधकाम  10 हजार 281 चौ. मीटरमध्ये करण्यात येणार असून नागपूरच्या मे. विजय कंस्ट्रक्शन कपंनीच्या माध्यमाने इमारतीचे बांधकाम 15 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पर्यावरण पुरक इमारतीचे बांधकाम होणार आहे. यामध्ये सौर उर्जा चलित वातानुकूलित , पर्यावरण घटकाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच भारतीय स्थापत्य शैलीचा पुरेपूर वापर करुन भारतीय राजमुद्रा तथा चिन्हांचा अंतर्भाव असणार आहे. अशा प्रकारची जिल्हाधिकारी कार्यालयाची नविन इमारत असणार आहे.  
            38 कोटी 9 लक्ष 79 हजार रुपये खर्च करुन 1 हजार 712 चौ.मी. क्षेत्रात बांधण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाची इमारत दोन मजली असून तळमजल्यावर तहसिल कार्यालय व पहिल्या मजल्यावर उपविभागीय कार्यालय बांधण्यात आले आहे.
                                                                                    00000











महात्मा गांधी यांच्या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प करावा
n  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
       वर्धा, दि 2 :- महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा व शांतता या बाबतचे  विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी असून या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
            महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती अभियान निमित्त महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राम येथील सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल,जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आश्रमातील विविध विभागांना भेट  दिली. चरख्यावर सूत कताई केली. यानंतर यात्री निवास येथे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील विविध आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या गांधी पॅनोरमा-2018 फील्म फेस्टीवलचे उद्घाटन येथेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि सेवाग्राम डेव्हलपमेंट प्लॅन कमिटी यांचेतर्फे आयोजित सेवाग्राम कार्यांजली उत्सव यामध्ये यशस्वी विविध संघांना पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते पारीतोषीके प्रदान करण्यात आली. चरखागृह, सेवाग्राम रोड येथे नियोजन विभाग व सेवाग्राम विकास आराखडा यांचेतर्फे आयोजित जगातील सर्वांत मोठया चरखा मांडणी शिल्पाचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांचे विचार सर्वांसाठीच सदैव प्रेरणादायी आहे.महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व शांतता या संदेशाचा आपल्या जीवनात अवलंब करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. महात्मा गांधी यांचे शांतता व  अहिंसेबाबतचे  विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन वर्धा येथुन याचा प्रारंभ होत आहे. हे नक्कीच गौरवास्पद असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार प्रत्यक्ष कृती आणि कार्यांतून समाजापर्यंत पोहचविण्यासाठी सेवाग्राम कार्यांजली उत्सवाचे 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले. याअंतर्गंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शांतता दौड, खादी वेशभुषा प्रदर्शन, लघुपट प्रदर्शन तसेच विविध समजाप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सर्वंच कार्यक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला व महात्मा गांधी यांचे विचार  विविध माध्यमातून समाजापर्यंत पोहचविले.
00000