Tuesday 2 October 2018




चरखा हा जगाला शोषणमुक्ती आणि अहिंसेचा संदेश देईल.
                                                        - सुधीर  मुनगंटीवार
Ø सेवाग्राम येथे जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण

    वर्धा दि 2(  जिमाका ):- गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून श्रम, समानता आणि शक्तीची शिकवण संपूर्ण देशाला दिली. देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी चरखा हे त्यावेळी उत्तम माध्यम ठरले. आज त्यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात  आलेला जगातील सर्वात मोठा चरखा हा जगाला भूकमुक्ती, शोषणमुक्ती आणि हिंसा मुक्तीचा संदेश देईल असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सेवाग्राम आश्रमाच्या नवीन सभागृहाच्या आवारात सेवाग्राम विकास आराखड्यातून उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.  खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी  अजय गुल्हाणे, जे जे स्कुल ऑफ आर्ट चे प्रा. विजय सकपाळ, विजय बोनदर, उपअभियंता श्री मंत्री यावेळी उपस्थित होते.
श्री मुनगंटीवार यांनी या ठिकाणी बालकांच्या समवेत सूत कताई करून उपस्थितांना श्रम करण्याची प्रेरणा दिली.
      महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाचे आणि खादी व हस्तकलेचे  प्रतीक म्हणून ओळखला जाणारा चरखा सेवाग्राम येथे उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात मोठा  चरखा आहे.  विशेष म्हणजे हा चरखा मंद गतीने खऱ्या चरख्यासारखा फिरतो.  चरखा हे गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमाचे प्रत्यक्ष स्वरूप आणि प्रतीक होते. या चरख्याच्या माध्यमातूनच त्यांनी स्वदेशी, स्वयंपूर्णता आणि स्वातंत्र्याचे  स्फुलिंग भारतीयांच्या मनात जागविले. हे श्रम, समानता आणि एकतेचे सुद्धा प्रतीक होते.  त्यामुळे त्यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांनी स्वतंत्र भारताला दिलेले हे प्रतीक त्यांना आदरांजली म्हणून सेवाग्राम या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. खादी व हस्तकलेचे प्रतीक असलेला चरखा कलात्मक पद्धतीने मांडण्याची जबाबदारी मुंबईच्या  ज. जी. कला महाविद्यालयाला देण्यात आली होती .  येथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना या चरख्याची संकल्पना विकसित करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागला आहे.

     सध्या सर्वात उंच चरखा हा दिल्ली येथील विमानतळावर उभारला असून त्याची उंची 17 फूट,  रुंदी 9 फूट  आणि लांबी 30 फूट आहे. सेवाग्राम येथे उभारण्यात येणारा  चरखा दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरील चरख्यापेक्षा उंच  असणार आहे. सेवाग्राम येथील चरख्याची  उंची 18.5 फूट राहणार असून, 11. 3  फूट रुंद आणि 31 फूट लांब असणार  आहे. हा धातूमध्ये तयार करण्यात आला असून त्यावर ऊन ,वारा पाऊस याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला लाकडाप्रमाणे रंगविण्यात आले आहे.

    या चरख्याच्या प्रत्येक पात्यावर गांधीजींचे विचार लिहिलेले असतील.. खऱ्या चरख्यासारखा हा मंद गतीने फिरणार असून सुबक प्रकाश योजनेमुळे प्रत्येक दिन विशेषानुसार त्याची रंगसंगती बदलेल.
 मुंबई येथील ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, अधिव्याख्याता विजय सकपाळ, विजय बोनदर, श्रीकांत खैरनार, 10 विद्यार्थी, 10 तंत्रज्ञ आणि मजुरांच्या साहाय्याने 22 दिवसांमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या संकल्पनेसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि अडारकर असोसिएट्स यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सेवाग्राम येथे भेट देणा-या देश- विदेशातील पर्यटकांसाठी हे निश्चितच आकर्षणाचे केंद्र ठरेल.
                                                00000


No comments:

Post a Comment