वर्धा जिल्हा


असा आहे वर्धा जिल्हा

1.      ऐतिहासिक वैशिष्टे:-
अनेक वर्षापूर्वी वर्धा हा स्वतंत्र जिल्हा नव्हता. जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग नागपूर जिल्ह्यात तर दक्षिणेकडील भाग हा चंद्रपूर जिल्ह्यात होता. ब्रिटीशांच्या राजवटीत राज्यकारभाराच्या सोयीसाठी सुमारे 1862 मध्ये वर्धा जिल्हा अस्तित्वात आला व सन 1866 साली वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय पुलगाव जवळ कवठा येथे होते. वर्धा नदीच्या काठावर हा भूभाग येतो म्हणून वर्धा हे नाव पडले.
सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम व पवनार येथील ' सर्वोदय जनक ' विनोबाजींचा परमधाम आश्रम यामुळे वर्धा जिल्हा जागतिक कीर्तीचा झालेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेली आष्टी तालुक्याची स्वातंत्र्यक्रांती ही वर्धा जिल्ह्याची अस्मिता आहे.

2.      भौगोलिक रचना:-
वर्धा जिल्हा हा उत्तर अक्षांश 20 अंश -18 अंश ते 21 अंश – 21 अंश आणि पूर्व रेखांश 78 अंश- 33 अंश ते 79 अंश 15 अंश चे दरम्यान आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेस व नैऋतेस यवतमाळ, पुर्वेस व आग्नेयेस चंद्रपुर, उत्तरेस व इशान्येस नागपूर आणि पश्चिमेला अमरावती ह्या जिल्ह्याच्या सीमा भिडलेल्या आहेत. अमरावती व यवतमाळ ह्या जिल्ह्याच्या सीमा व वर्धा जिल्ह्याच्या सीमा वर्धा नदीने निश्चित केल्या आहेत.

3.      क्षेत्र व प्रशासकीय विभाग:-
वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 6309 चौ.से.मी. म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2 टक्के एवढे आहे. प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून या जिल्ह्याची वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तीन महसुल विभागात विभागणी करण्यात आली होती. परंतु 1 मे 2001 पासून महाराष्ट्रातील उर्वरीत विभागाप्रमाणे पंचायत समितीचे क्षेत्र ही एक तहसिल समजून वर्धा जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात आली त्या पुनर्रचनेप्रमाणे आजमितीस या जिल्ह्याची 1) आष्टी 2) कारंजा 3) आर्वी 4) सेलू 5) वर्धा 6) देवळी 7) हिंगणघाट 8) समुद्रपूर या आठ तालुक्यात विभागणी करण्यात आली तसेच त्यात 6 शहरे व 1 सेंसस टाऊन, 1004 वस्ती असलेली गांवे व 378 ओसाड गांवे आहेत. ग्रामीण विकासासाठी एक जिल्हा परिषद व तीचे अंतर्गत आठ पंचायत समित्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच जिल्ह्यात सहा नगरपालिका आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय वर्धा असून विभागीय मुख्यालय नागपूर आहे व ते वर्धेपासून 79 कि.मी. अंतरावर आहे.

4.      नैसर्गिक रचना:-
या जिल्ह्याच्या उत्तरे कडील उंचवटयाचा प्रदेश हा सातपुडा पर्वताच्या दक्षिण विखुरला असून त्यामध्ये आष्टी, कारंजा व आर्वी या तालुक्याचा परिसर येतो. जिल्ह्याचा उर्वरीत भाग मात्र वर्धा व वेणा या दोन नद्यांच्या खो-यात समाविष्ट होतो.

5.      भूगर्भीय रचना:-
या जिल्ह्यातील बहुतेक क्षेत्रामध्ये दख्खन प्रस्तर लाव्हाचा समावेश आहे. हे लाव्हा या क्षेत्रामध्ये एकुण 400 मीटर जाडीचे आहेत. ही बाब, जिल्ह्याच्या ईशान्य भागातील निम्नतम भाग आणि उच्चतम भाग यांच्यातील समुद्रसपाटीपासूनच्या किमान उंचीतील फरकावरुन निदर्शनास येते. वहा मध्ये आढळून येणारे गाळाचे संस्तर आणि लाल प्रस्तर यामुळे प्रत्येक वाह एक दुस-या पासून अलग ओळखणे व त्यांची विभागणी करणे शक्य झाले आहे.
प्रास्तरपूर्व गाळ साचण्याची क्रिया घडून येते. त्या उंचसखल भूप्रदेशामध्ये त्याच्या पुर्वेकडील व दक्षिणेकडील क्षेत्रातील परिणाम स्वरुप सानिध्यामुळे हे वाह पसरलेले दिसतात. अलिकडील अपवाद हे मुख्यत्वे करुन वर्धा व उपनदया वेणा, यशोदा, धाम आणि पोथरा यांच्या काठावर अरुंद पट्टयात आढळून येतात. यामुळे मुख्यत: गाळ, वाळू, माती आणि रेव यांचा समावेश आहे. वाळू व गाळ केवळ नद्यांच्या पात्रात आढळतात तर माती आणि रेव हे काठावर आढळतात. सेलू व पोहणा यांच्या लगतच्या भागात अलिकडे बाउन्डर आढळून येतात.

6.      नद्या:-
वर्धा नदी ही या जिल्ह्यातील महत्वाची नदी असून ती मुलताई येथे सातपुडा पर्वतातून उगम पासून या जिल्ह्याच्या उत्तर व पश्चिम सिमेवरुन वाहते. या नदीच्या यशोदा, वेणा व बाकली या मुख्य उपनद्या आहेत. दुसरी महत्वाची नदी वेणा ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तहसिल मधुन वाहत येवुन सावंगी या गावा जवळ वर्धा नदीला मिळते. तसेच बोर व धाम ह्या नद्या आर्वी तालुक्यातमधुन उगम पावुन समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे वेणा नदीला मिळतात. यशोदा नदी आर्वी तहसिलात उगम पावते व ती देवळी तहसिलमधून वाहत जावुन पुढे वर्धा नदीला मिळते. पावसाळयामध्ये या नद्यांमध्ये पुरामुळे तीरावरील गांवाना धोका असला तरी ह्या नद्या उन्हाळयात मात्र कोरडया असतात.

7.      हवामान आणि पर्जन्यमान:-
या जिल्ह्यातील उन्हाळा व हिवाळा दोन्ही तीव्र असतात. एकाच दिवशी तापमानात बराच चढ-उतार होण्याचे प्रसंग अनेकदा येतात. वर्धा जिल्ह्यामध्ये बहुतांशी पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यात पडतो. या जिल्ह्याचे 2009 मधील सरासरी पर्जन्यमान ११०० मि.मी. आहे.

8.      जमीन व तिचे प्रकार:-
या जिल्ह्यात जमीन मुख्यत: चार प्रकारची आढळून येते. उदा काळी-1, काळी-2, मुरमाड खरडी व बरडी यांची सुध्दा मुख्यत: उथळ मध्यम व खोल अशा भागात विभागणी करता येते. समुद्रपूर तालुक्याचा पूर्वेकडील भाग, सेलू तालुक्याचा उत्तर किनारा आणि कारंजा व आष्टी तालुकयात उथळ प्रकारची जमीन आढळते.
तसेच हिंगणघाट व आर्वी तालुक्याचे पश्चिमेकडील काही भागात मध्यम प्रकारची जमीन आढळून येते. वर्धा व वेण नद्यांच्या काठावर सर्वत्र गाळाचे, पण काळया जमीनीचे थर साचलेले असून ते कपाशीच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मुरमाड-1 व मुरमाड-2 या मृदाचे क्षेत्र जिल्ह्याच्या एकूण लागवडी खालील क्षेत्रापैकी 74 टक्के व खरडी, बरडी व रेताळ ही 16 टक्के आहे. जमिनीतील पाण्याचा प्रवाह वायव्य दिशेकडून ईशान्य दिशेकडे आहे. जिल्ह्यात ज्वारी, गहू, कापूस, तुर, जवस, तीळ, इ.पीके घेण्यात येतात. यात ज्वारीचे पीक मुख्य समजले जाते.