Friday 9 December 2011

नगर परिषद क्षेत्रातील खाजगी कंपनीतील मतदाराना स्‍थानिक सुटी जाहिर

 वर्धा, दि.10- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूका 2011 अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यातील नगर परिषदामध्‍ये निवडणूका रविवार दि. 11 डिसेंबर 2011 रोजी नियोजीत आहे. जरी मतदान रविवार सुटीचे दिवशी असले तरी नगरपरिषद क्षेत्रातील खाजगी कंपनीतील कामगार मतदाराना मतदानाचा हक्‍क बजाविता यावा याकरीता ज्‍या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्‍या  क्षेत्रात मतदान होणार आहे. त्‍या क्षेत्रापुरती दि.11 डिसेंबर 2011 रोजी स्‍थानिक सुटी जाहिर करण्‍याबाबतचे निर्देश दिलेले आहे.
     उक्‍त निर्देशानुसार जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी जिल्‍ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांव, देवळी व सिंदी (रेल्‍वे ) या नगरपरिषद क्षेत्रामध्‍ये मतदान रविवार दिनांक 11 डिसेंबर 2011 रोजी स्‍थानिक सुटी जाहिर केली आहे.

मतदार यादी अंतिमरित्‍या प्रसिध्‍द

वर्धा,दि.9-महाराष्‍ट्र विनिर्दीष्‍ट सहकारी संस्‍थेच्‍या समित्‍यावरील निवडणूक संबंधात नियमा प्रमाणे प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन वर्धाच्‍या जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दि. 31 ऑक्‍टोंबर 2011 रोजी सिंदी सहकारी खरेदी विक्री समिती, सिंदी (रे) ता. सेलू जि. वर्धा या सहकारी संस्‍थेची मतदार यादी प्रारुप प्रसिध्‍दी केल्‍यानंतर आज दिनांक 9 डिसेंबर 2011 रोजी  जिल्‍हाधिकारी, वर्धा यांचे कार्यालय, जिल्‍हा  उपनिबंधक सहकारी संस्‍था, वर्धा यांचे कार्यालय,व्‍यवस्‍थापक, सिंदी सहकारी खरेदी विक्री समिती, सिंदी (रे)ता. सेलू जि. वर्धा या  ठिकाणी मतदार यादी अंतिमरित्‍या प्रसिध्‍द करीत आहे.

अर्थसहाय्य मिळण्‍यासाठी आधार कार्ड आवश्‍यक


  
वर्धा,दि.9-राष्‍ट्रीय सामा‍जिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती  वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍ती वेतन योजना राबविण्‍यात येत असून यासाठी आधार कार्ड आवश्‍यक आहे.

     लाभार्थ्‍यांनी आपआपल्‍या तालुक्‍यातील तहसिल कार्यालय (युआयडी) आधारकार्ड काढून डिसेंबर 2011 अखेर पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावे. अन्‍यथा लाभार्थ्‍यांना माहे जानेवारी 2012 पासूनचे अनुदान आधार कार्डचे नोंदणी क्रमांक (EID) सादर करेपर्यंत मिळणार नाही. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.

अन्‍न सुरक्षा मानदे कायद्या अंतर्गत परवाना बंधनकारक


  
वर्धा,दि.9-जिल्‍ह्यातील सर्व अन्न पदार्थ उत्‍पादक, विक्रेते, वितकरक, हॉटेल, रेस्‍टारंट, पानपट्टी धारक, धाबेवाले, कॅटरर, फिरते विक्रेते, दुध विक्रेते, वेवीफुड व फुड सप्‍लीमेंट विक्रेते, मांस व मांस पदार्थ विक्रेते, अस्‍थायी स्‍टॉलधारक, फळ व भाजीपाला विक्रेते, घरगुती खानावळ व उब्‍बेवाले तसेच इतर अन्‍न व्‍यवसाय चालक यांना अन्‍न  सुरक्षा मानद कायद्यान्‍वये परवाने बंधनकारक आहे.
दि. 5 ऑगस्‍ट 2011 पासून संपूर्ण महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये अन्‍न सुरक्षा व मानद कायदा 2006 लागू करण्‍यात आलेला आहे व त्‍याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. यापुर्वीचा अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा कायदा नविन कायद्यात विलीन करण्‍यात आलेला आहे. अन्‍न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत कलम 31 व (2) नुसार सर्व अन्‍न  व्‍यवसाय चालक यांनी परवाना घेणे अथवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. विना परवाना अथवा विना नोंदणी व्‍यवसाय करणे कलम 63 नुसार कायद्याने गुन्‍हा  आहे व त्‍यांच्‍या विरुध्‍द न्‍यायालयीन कार्यवाही होऊ शकते.
     अन्‍न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार ज्‍या अन्‍न व्‍यवसाय चालकाची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा कमी आहे त्‍यांनी फार्म अ व नोंदणी शुल्‍क कार्यालयात भरुन नोंदणी करुन घ्‍यावी तसेच ज्‍या  अन्‍न व्‍यवसाय चालकाची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा जास्‍त आहे त्‍यांनी फार्म ब आवश्‍यक ते कागदपत्रे व योग्‍य ते परवाना शुल्‍क कार्यालयात भरुन परवाना मिळण्‍यासाठी अर्ज करावा. ज्‍या  अन्‍न व्‍यवसाय चालकानी अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत परवाना घेतला असेल व त्‍याची मुदत    दि.31 डिसेंबर 2011 पर्यंत असेल अशा अन्‍न व्‍यावसायीकांनी नुतनीकरणासाठी दि. 31 डिसेंबर 2011 पुर्वी आपल्‍या परवान्‍याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. जर अन्‍न व्‍यावसायीकांनी त्‍यांच्‍या परवान्‍याचे नुतनीकरण दि. 31 डिसेंबर 2011 पर्यंत न केल्‍यास त्‍यांच्‍या  विरुध्‍द विना परवाना व्‍यवसाय गृहीत धरुन कार्यवाही होऊ शकते.
     ज्‍या अन्‍न व्‍यावसायीकांनी अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत परवाना घेतला असेल व त्‍याची मुदत दि. 31 डिसेंबर 2011 नंतर असेल अशा व्‍यावसायीकांनी दि. 4 आगस्‍ट 2012 पूर्वी कार्यालयात रितसर अर्ज करुन नवीन कायद्यानुसार परवान्‍याचे परिवर्तन परवाना अथवा नोंदणी मध्‍ये करुन घेणे बंधनकारक आहे. त्‍याकरीता कोणतेही अतीरिक्‍त परवाना किंवा नोंदणी शुल्‍क आकारले जाणार नाही. जर अन्‍न व्‍यवसाय चालक यांनी दि. 4 आगस्‍ट 2012 पूर्वी अन्‍न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत आपल्‍या जून्‍या परवान्‍याचे परिवर्तन करुन घेतले नाही तर त्‍यांचा व्‍यवसाय विना परवाना गृहीत धरुन त्‍यांचेविरुध्‍द कायदेशिर कार्यवाही करण्‍यात येईल. तरी सर्व अन्‍न व्‍यवसायीकांनी सहायक आयुक्‍त यांचे कार्यालय, अन्‍न व औषध प्रशासन म.रा.सुदामपुरी, आरती चौक वर्धा येथे नुतनीकरणाकरीता अर्ज करावा अथवा प्रशासनातर्फे आयेाजित करण्‍यता येत असलेल्‍या विविध तालुकयातील शिबिरामध्‍ये रितसर अर्ज करावा. अन्‍न व्‍यवसाय चालक यांना परवाना अथवा नोंदणी करण्‍यास कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्‍यास कार्यालयाशी संपर्क साधावा.असे अन्‍न व औषध प्रशासन,वर्धा कळवितात.     

Thursday 8 December 2011

गहू बियाणे व कृषि साहीत्‍य अनुदानावर उपलब्‍ध


   
     वर्धा,दि.8-केन्‍द्र पुरस्‍कृत तृणधान्‍य विकास कार्यक्रमात प्रकल्‍पा अंतर्गत व प्रकल्‍पाबाहेर अनुदानावर पंचायत समिती स्‍तरावरील महाबिजचे ठराविक वितरकामार्फत गहू बियाणे अनुदानावर उपलब्‍ध आहे. जिप्‍सम, एच डी पी ई पाईप, स्‍प्रेपंप, पावर स्‍प्रेपंप व क्विंनॉलफॉस औषधी पंचायत समिती मध्‍ये अनुदानावर उपलब्‍ध आहे. तसेच ऊस लागवड असणा-या     शेतक-याकरीता ट्रॅक्‍टरचलित औजाराचे प्रस्‍ताव पंचायत समिती मध्‍ये घेणे सुरु आहे.
     फोर इन कल्‍टीव्‍हेटर, वखर, डवरा, तणनाशक व पी.एस.बी. अनुदानावर लवकरच पंचायत समिती स्‍तरावर उपलब्‍ध होणार आहे. यासाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषी विस्‍तार अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे जिल्‍हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी आर के गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

कृषि पणन व्‍यवस्‍थेत शासकिय व खाजगी भागीदारी कार्यशाळा


  
     वर्धा,दि.8-जिल्‍हाधिकारी कार्यालय, वर्धा या कार्यालयामार्फत शाश्‍वत विकासासाठी कृषि पणन व्‍यवस्‍थेत शासकीय व खाजगी भागीदारी या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल गणराज येथे नुकतीच (दि.24-11) रोजी आयोजित करण्‍यात आली होती.
कृषि समृध्‍दी या कार्यक्रमाचा खाजगी उद्योजकांना परिचय करुन देणे, शासन विभाग व खाजगी उद्येाजक यांना एकत्रित आणुन शेतक-यांसाठी शाश्‍वत समतोल, शोषनरहित बाजारपेठेची मुख्‍य साखळीची निर्मिती करणे हे या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
     या कार्यशाळेत वर्धा जिल्‍ह्यातील कृषि प्रक्रिया आणि विपणन करणारे प्रमुख उद्येाजक उपस्थित होते. त्‍यात सगुणा पोल्‍ट्री फॉर्म प्रा.लि.मावने इंडस्‍ट्रीज,अंकूर सीड्स, डि.जी.ऑर्चीड, आय.टी.सी.कंपनी, संस्‍कार अॅग्रो इंडस्‍ट्रीज धैर्यशील बाघ जिनिंग आणि प्रेसिंग इ. उपस्थित होते. सोबतच शासकिय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
     या कार्यशाळेचे उदघाटन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी वर्धा संजय भागवत यांच्‍या हस्‍ते झाले. प्रमुख पाहुणे म्‍हणुन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ब-हाटे होते. कृषि समृध्‍दी कार्यक्रमाचे अतिरिक्‍त कार्यक्रम संचालक अमितकुमार नाफडे यांची उपस्थिती होती.कार्यशाळेची सुरुवात जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक प्रसाद संकपाळ यांनी कृषि समृध्‍दी या कार्यक्रमाची माहिती देऊन केली.
     अतिरिक्‍त कार्यक्रम संचालकांनी या कार्यक्रमातुन अपेक्षित खाजगी व शासकीय भागीदारीवर प्रकाश टाकला. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांनी शेतक-यांच्‍या नफ्यात वाढ होण्‍यासाठी शेतकरी आणि उद्योजक आणि शासन यांची भागीदारी कशी महत्‍वाची आहे हे पटवून दिले
कृषि व्‍यवसाय तज्ञ आनंद महाकाळकर यांनी उपस्थित उद्योजकांना मुक्‍त चर्चेसाठी पाचारण केले. उद्योजकांनी आपआपल्‍या उद्योगाबद्दल आणि भागिदारी या विषयांवर मते मांडली. उपस्थित शासकिय अधिकारी यांनी शासकिय योजना आणि भागीदारीची गरज याबद्दल चर्चा केली.

    अतिरिक्‍त कार्यक्रम संचालक कृषि समृध्‍दी यांनी सर्वांचे विचार महत्‍वपूर्ण असल्‍याचे आणि आमचा कार्यक्रम राबविण्‍यात उपयुक्‍त ठरतील असे सांगितले.

    कार्यशाळेचा समारोप प्रसाद संकपाळ यांनी उपसिथतांचे आभार मानून केला. कार्यक्रमाचे संचालन स्‍वाती सगरे, संनियंत्रण व मुलयमापन अधिकारी यांनी केले. कार्यशाळा यशस्‍वी करण्‍यासाठी प्रविण कुंभलकर व शैलेन्‍द्र भैसारे यांनी सहकार्य केले.

निरिक्षकांनी घेतला नगर परिषद निवडणूक कामकाजाचा आढावा

   वर्धा,दि.8-राज्‍य निवडणूक आयोग यांनी जिल्‍ह्यातील सहा नगर परिषदेसाठी जिल्‍हा निरिक्षक म्‍हणून मिलिंद म्‍हैसकर यांची नियुक्‍ती केली. आज त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी, पुलगाव, आर्वी व सिंदी (रे) च्‍या निवडणूकीबाबत मतदानाबाबत कामकाजाचा आढावा जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात संपन्‍न झाला.

     या प्रसंगी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, आचार संहिता कक्ष प्रमुख जे.बी. संगितराव, पोलीस उपअधिक्षक (गृह) नळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा वर्धेचे उपजिल्‍हाधिकारी संजय दैने, हिंगणघाटचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमेश काळे, आर्वीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुनिल कोरडे, पुलगावचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी शैलेश मेश्राम, देवळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा वर्धा उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक व सिंदी (रे) चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी रमन जैन तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

     यावेळी त्‍यांनी निवडणूक निर्णय अधिका-याकडून तपशिलाने मतदारांची संख्‍या, मतदान केंद्र, मतदान यंत्राची सद्याची परिस्थिती, संवेदनशिल मतदान केंद्र तसेच पोलीस विभागाकडून कायदा सुव्‍यवस्‍थेची माहिती जाणून घेतली.

     याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.

Wednesday 7 December 2011

ध्‍वजनिधीच्‍या उद्दिष्टपुर्तीकरीता संकल्‍प करावा - अप्‍पर जिल्‍हाधिकारी


  

वर्धा, दि.7- माजी सैनिकांच्‍या कुटूंबियांसाठी तसेच त्‍यांच्‍यावर अवलंबित करीता घ्‍वज निधीतून अनेक कल्‍याणकारी योजना राबविल्‍या जातात. या योजनांना अधिक गती मिळावी यासाठी समाजातील प्रत्‍येक घटकांनी ध्‍वजनिधीच्‍या उद्दिष्‍टपुर्तते करीता संकल्‍प करुन सढळ हस्‍ते मदत केली पाहीजे. असे आवाहन अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
आज येथील विकास भवनात ध्‍वजदिन 2011 निधी संकलनाचा शुभारंभ  अप्‍पर  जिल्‍हाधिकारी भागवत यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाला त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्‍हा  मुद्रांक अधिकारी सुभाष बुटले, माजी सैनिक कल्‍याण अधिकारी शशिकांत देशपांडे व जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
     गेल्‍या वर्षी ध्‍वजनिधीच्‍या  संकलनाचे उद्दिष्‍ट 126 टक्‍के झाल्‍याचे नमूद करुन भागवत म्‍हणाले की या निधीतून अनेक कल्‍याणकारी योजना राबविल्‍या जातात यामध्‍ये शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे मोठे योगदान असते मात्र सामाजिक दायीत्‍व म्‍हणून समाजातील प्रत्‍येक घटकांनी या ध्‍वज निधीला मदत केली पाहीजे. या निधीच्‍या माध्‍यमातून माजी सैनिकांच्‍या पाल्‍यांचा विवाह, आरोग्‍यावरील खर्च, शालेय शिक्षणाचा खर्च, वसतीगृह खर्च, प्रतीपुर्ती आदी अनेक बाबीवर खर्च करण्‍यता येतो. देशाच्‍या संरक्षणात माजी सैनिकाचे मोठे योगदान असते. त्‍यांच्‍या शौर्यगाथेच्‍या स्‍मृतीला उजाळा देऊन त्‍यांनी विनम्रपणे अभिवादन केला.                                   
     याप्रसंगी बोलतांना माजी सैनिक अधिकारी मेजर देशपांडे म्‍हणाले की घ्‍वजनिधीत शासकीय अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान फार मोठे असून माजी सैनिकांनी व समाजातील प्रत्‍येक  घटकांनी या निधीसाठी मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन केले.
     प्रास्‍ताविक करताना फ्ला. ले. सदाफळ म्‍हणाले की माजी सैनिकांना व तयांच्‍या कुटूंबियाना घ्‍वजनिधीचा वापर करण्‍याबाबत माहिती कळावी यासाठी या दिवसाचे महत्‍व अधिक आहे. शासनाने माजी सैनिकांचे पुर्नवसना सोबतच अनेक कल्‍याणकारी योजना कार्यान्‍वीत केल्‍या असून त्‍यामध्‍ये अंशदायी स्‍वास्‍थ्‍य योजना नव्‍याने कार्यान्वित झाली आहे. माजी सैनिकांच्‍या कल्‍याणकारी योजनेसाठी या वर्षी 14 विविध बाबीवर 5 लक्ष 75 हजार रुपये खर्च झाले असून त्‍यामध्‍ये माजी सैनिकांच्‍या पाल्‍यावर तसेच अवलंबितावर गंभिर आजारासाठी 40 हजार, शालेय शिक्षणासाठी 41 हजार, महाविद्यालयीन शिक्षणासाठी 63 हजार, व्‍यवसायीक शिक्षणासाठी 1 लाख 34 हजार, शिष्‍यवृत्‍तीसाठी 56 हजार या महत्‍वपूर्ण बाबीचा त्‍यामध्‍ये समावेश आहे. यावर्षी 6 माजी सैनिकांना शासकीय नोकरीत सामावून घेण्‍यात आले असून, यावर्षी ध्‍वजनिधी संकलनाचे उद्दिष्‍ट 33 लक्ष रुपये जिल्‍ह्याला देण्‍यात आले आहे. समाजातील घटकांचा ध्‍्वजनिधीसाठी सकारात्‍मक विचार असून आतापर्यंत उत्‍तम प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीसुध्‍दा उद्दीष्‍ट पुर्ततेसाठी  प्रत्‍येकांनी संकल्‍प करावा, असे आवाहन त्‍यांनी केले.
     तत्‍पूर्वी माजी सैनिकांच्‍या पाल्‍यांना शिष्‍यवृत्‍तीचे वाटप व माजी सैनिकांच्‍या विरमातेचा सत्‍कार साळी चोळी देवून मान्‍यवरांनी केला.
या कार्यक्रमाचे संचलन अरुण दंवगे व आभार प्रदर्शन संजय देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने माजी सेनिक व त्‍यांच्‍यावर अवलंबित कुटूंब सहभागी झाले होते.

आठवडी बाजार तेरा डिसेंबर रोजी भरविण्‍यात यावा



     वर्धा,दि.7-जिल्‍हयातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी, सिंदी रेल्‍वे या नगर परिषदांच्‍या निवडणूका  दि. 8 डिसेंबर 2011 ऐवजी दि. 11 डिसेंबर2011 रोजी मतदान घेण्‍याचे निश्चित झाले आहे.
     दि.11 डिसेंबर 2011 रोजी मतदानाचे दिवशी आठवडी बाजार येत असल्‍याने त्‍या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवावयाचे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी हिंगणघाट व  वर्धा यांनी नगर पालिका मतदार क्षेत्रात रविवार दि. 11 डिसेंबर 2011 रोजी मतदानाचे दिवशी येणारा आठवडी बाजाराचा दिवस वगळून मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2011 रोजी भरविण्‍याचे यावे.असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सभा 13 डिसेंबर रोजी



     वर्धा, दि.7- वर्धा जिल्‍ह्यातील पंचायत समिती सभापतीच्‍या पदांची जागा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकाचा मागास वर्गाचा प्रवर्ग (महिलांसह) व सर्वसाधारण महिला करीता शासनाने निश्चित करुन दिलेल्‍या आहेत.
     वर्धा जिल्‍ह्यातील वर्धा,देवळी, सेलू, आर्वी, कारंजा,आष्‍टी, हिंगणघाट व समुद्रपूर या पंचायत समितीच्‍या सभापतीचे पदे आरक्षित करण्‍याबाबतचे सभा अप्‍पर जिल्‍हाधिकारी, वर्धा यांचे अध्‍यक्षतेखाली दि.13 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता विकास भवन वर्धा येथे आयोजित केलेली आहे. तरी सभेला जिल्‍ह्यातील राष्‍ट्रीय व राज्‍य स्‍तरावरील मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांच्‍या प्रत्‍येक प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.

आरक्षण प्रवर्गाची निश्चिती



वर्धा,दि.7- जिल्‍ह्यातील 8 पंचायत समितीचे सभापतीची पदे अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह व सर्वसाधारण महिला यांच्‍यासाठी पुढील प्रमाणे निश्चित करुन दिलेली आहे.
     आरक्षणाचा प्रकारानुसार अनु.जाती करीता एकूण जागा 1 त्‍यापैकी महिलांसाठी 1 , अनु. जमाती करीता एकूण जागा 1 त्‍यापेकी महिलांसाठी निरंक, नागरीकांचा मागासप्रवर्ग एकूण जागा 2 त्‍यापैकी महिलांसाठी 1 , सर्वसाधारण  एकूण जागा 4 त्‍यापैकी
महिलांसाठी 2 अशा आहेत.
     शासनाने सभापती पदासाठी आरक्षणाच्‍या जागा निश्चित करुन दिलेल्‍या आहेत. त्‍यामधून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ची पदे पंचायत समित्‍यांचया लोकसंख्‍येच्‍या टक्‍केवारीच्‍या उतरत्‍या क्रमाने व पुर्वीचे आरक्षण वगळून आरक्षित करावयाची आहेत. नागरिकांच्‍या मागासवर्गाचा प्रवर्ग व नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठीच्‍या  जागा पुर्वीचे आरक्षण वगळून आरखित करावयाच्‍या आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जामातीव नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिलांसह) यांचेसाठी आता आरक्षित होणा-या पंचायत समित्‍या वगळून उर्वरीत पंचायत समित्‍यामधून सर्वसाधारण महिलाकरीता पूर्वीचे आरक्षण विचारात घेवून सोडत चिठ्ठीव्‍दारे आरक्षण निश्चित करण्‍यात येईल.
     आरक्षण करण्‍याताबत अप्‍पर जिलहाधिकारी, वर्धा यांचे अध्‍यक्षतेखाली दि. 13 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता विकास भवन, वर्धा येथे सभा आयेाजित करण्‍यता आली आहे.
     सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.

Monday 5 December 2011

अन्‍न, नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचा दौरा


वर्धा,दि.5- अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांचे दिनांक 6 डिसेंबर 2011 रोजी नागपूर वरुन मोटारिने दूपारी 12.30 वाजता वर्धा येथे आगमन व किशोर माधनकर यांच्‍या मुलीच्‍या विवाह सोहळयास उपस्थिती स्‍थळ शिव वैभव मंगल कार्यालय, वर्धा दूपारी 1.30 वाजता वर्धा नगर परिषद सार्वजनिक निवडणूक संबंधाने आयोजित बैठकिस उपस्थिती व सोयीनूसार नागपूर कडे प्रयाण करतील.