Thursday 21 April 2016

                                महाराजस्‍व अभियानांतर्गत
1 मे रोजी वर्धेत समाधान शिबिर
·        वर्धेकर जनतेने शिबिराचा लाभ घ्‍यावा
·        विविध योजनांचा लाभ देणार
            वर्धा,दि.18-   महाजरास्‍व अभियानांतर्गत विविध विभागाच्‍या योजनेचा लाभ तसेच लाभार्थ्‍यांना प्रमाणपत्राचे वाटप  करण्‍यासाठी 1 मे रोजी न्‍यू इंग्लिश हायस्‍कूलच्‍या प्रांगणात समाधान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
            वर्धा  शहर तसेच तालुक्‍यातील जनतेला शासनाच्‍या विविध योजनांची माहिती  तसेच विविध प्रमाणपत्राचे वाटप समाधान शिबिराच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार आहे. या समाधान शिबिराचा  लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा प्रशासन तसेच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.
           समाधान शिबिरामध्‍ये विविध विभागांनी विविध योजनेंतर्गत लाभाच्‍या योजना यशस्‍वीपणे राबविण्‍यात येऊन व लाभार्थ्‍यांना त्‍यांचे प्रमाणपत्र महाराजस्‍व अभियानांतर्गत समाधान शिबिरात दिले जाणार आहेत. सर्व विभागांतर्फे समाधान शिबिराच्‍या माध्‍यमातून सर्व नागरिकांना समाधान शिबिरांचा लाभ देण्‍यात येणार आहे.
            आमदार डॉ. पंकज भोयर व निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावाडकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत  समाधान शिबिर आयोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीस तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी सपकाळे, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, नायब तहसीलदार श्रीमती पाराजे, श्री. राऊत, श्री.  बर्वे तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, नगर परिषद वर्धा येथील श्री. बागरे इ. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होता.
0000000





विविध योजनांचा शेतक-यांनी लाभ घेऊन विकास साधावा
-         ज्ञानेश्वर भारती
Ø ग्राम उदय ते भारत उदय अभियान
Ø तळेगाव, लोणसावळीमध्ये किसान ग्रामसभांचे आयोजन
              वर्धा, दिनांक 14 - शासनाच्या विविध कल्याणकारी लोकोपयोगी अशा योजना आहेत. त्यांचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.
              सामाजिक समररसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गावांचा विकास तसेच शेतक-यांच्या प्रगतीसाठी ग्रामोदयातून भारत उदय हे अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तळेगाव (टा), लोणसावळी येथे कृषी विभाग, जिल्हा परिषदेमार्फत किसान ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे, सरपंच अतुल तिमांडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम.खळीकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, कृषी अधिकारी श्री.मौजे, कृषी सहायक श्री. मोघे, अंकुश लोहकरे, कृषी पर्यवेक्षक श्री. कापसे, ग्रामसेवक किनीकर, श्री. राऊत उपस्थित होते.
            श्री. खळीकर, श्री. नाडे यांनी अवेळी पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या शेतपिकांचे नुकसान तसेच कृषीमालाच्या बाजारपेठेतील किमतीत चढ-उतार यापासून शेतक-यांना संरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी होवून येत्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेचे संरक्षण कवच घ्यावे, असे आवाहनही उपस्थित शेतक-यांना त्यांनी केले. जमिनीला आवश्यक असणारी घटकद्रव्ये माती परीक्षण करून घेतल्यास समजते. जमिनीला आवश्यक असणारी मुलद्रव्ये योग्य प्रमाणात दिल्यास जमीन कसदार होऊन उत्पन्न वाढीस मदत होते. तसेच पिकांच्या योग्य नियोजनाचाही विचार करावा. सेंद्रिय शेती, बायोगॅस, फळबाग योजना, विशेष घटक योजना, पीक नियोजन, कीड व्यवस्थापन आदींसह शेतीपूरक योजनांची माहिती यावेळी देण्यात आलीतळेगाव, लोणसावळीतील सभेसाठी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

*****
हदय, कर्करोग रुग्‍णांचे विशेष मोफत तपासणी शि‍बिर
·       150 रुग्‍णांना मिळाला लाभ
नागपूर, दिनांक 20 –  -हदयरोग, कर्करोग किडणी तसेच महिलामधील कर्करुग्‍णांच्‍या आजाराची तपासणी व उपचारासाठी आयोजित विशेष तपासणी शिबिरात 170 रुग्‍णांची तपासणी करुन उपचार करण्‍यात आले.
          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 125 व्‍या जयंती निमित्‍त मानेवाडा रोडवरील जवाहर नगर येथे कांबळे हॉस्पिटल व नर्सिंग होमतर्फे विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. सुप्रसिध्‍द -हदयरोग शल्‍य चिकित्‍सक डॉ. ए. टी. कांबळे, पुण्‍याच्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या शस्‍त्रक्रिया विभागाच्‍या डॉ. मयुरी कांबळे व स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्‍पा कांबळे यांनी रुग्‍णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार केला. पूर्व नागपुरातील मागास भागात राहणा-या रुग्‍णांना -दयरोगासारख्‍या उपचारापासून वंचित राहावे लागते अशा रुग्‍णांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. तपासणीनंतर ज्‍या रुग्‍णांना शस्‍त्रक्रिया व इतर उपचाराची आवश्‍यकता आहे. अशा 75 रुग्‍णांचा संपूर्ण उपचार करण्‍यात येणार असल्‍याची माहिती डॉ. ए.टी. कांबळे यांनी दिली.
          मोफत औषधोपचार व तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेविका श्रीमती नयना झाडे व अशोक कारले यांच्‍याहस्‍ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणून शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. नामदेव सास्‍ते होते.
          महाविद्यालयामध्‍ये स्‍तनाच्‍या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून वेळीच उपचार घेणे आवश्‍यक आहे. थॉइराईड, वंध्‍यत्‍व, गर्भपेशीच्‍या आजाराची विशेष तपासणी यावेळी करण्‍यात आली. 30 महिला रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले.  पुरुषांमध्‍ये -हदयरोग ,हरनिया, हायड्रोसिल, लिव्‍हर कॅन्‍सर आदी आजारांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्‍यात आले. 2007 पासून नियमित तपासणी शिबिराचे आयोजन करण्‍यात येत असल्‍याने जेष्‍ठ नागरिक महिलांनी तपासणी शिबिरात सहभाग घेतला.
                                               0000

जिल्‍हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन
          वर्धा, दिनांक 16 - मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्‍य सचिव स्‍वाधीन क्षत्रीय यांनी जिल्‍हयांत पाणी टंचाई नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍याबाबत निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार पाणी टंचाई निवारणार्थ जिल्‍हाधिकारी कार्यालय , वर्धा येथे हेल्पलाईन क्रमांक (07152- 243446) वर पाणी टंचाई नियंत्रण कक्ष स्‍थापण करण्‍यात आलेला आहे. ऑफिस वेळेनंतर व सुटीच्‍या दिवशी नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्‍यात येत आहे.
       पाणी टंचाई बाबत तक्रार, अडचण असल्‍यास हेल्‍पलाईन  क्रमांकावर तक्रारदारांनी नाव, गाव व तक्रारीचे स्‍वरुप आदी माहितीसह तक्रार सादर करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
                                                          000


गावांच्या विकासासह शेतक-यांची प्रगती साधा
-         विलास कांबळे
Ø  ग्रामोदयातून भारत उदय अभियानाचा शुभारंभ
Ø  ग्राम उदय अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
            वर्धा, दिनांक 13सामाजिक सलोखा अभिसरण वृद्धींगत करण्यासाठी, पंचायत राज संस्थेचे बळकटीकरण तसेच शेतक-यांच्या विकासासोबतच गरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्रामोदयातून भारत उदय अभियान महत्तवपूर्ण असे आहे. या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गावांच्या विकासासह शेतक-यांची प्रगती साधण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी केले.
            जिल्हा परिषदेच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्राम उदय से भारत उदय अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अति.मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, गजेंद्र सुरकार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
             जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड गुणवत्ता शिक्षणाच्या बळावर जागतिक किर्ती मिळविली. गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणलेअस्पृश्यता दूर केली. जागतिक किर्तीवंत डॉ. बाबासाहेबांनी जात अस्पृश्यांमध्ये मोडणारी असणारी एकूणच समाजाला मिळणारी वागणूक पाहून त्यांनी अस्पृश्यता उद्धाराचे कार्य केले. सर्वच क्षेत्रात त्यांनी उत्तूंग कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसारच संपूर्ण भारत देश चालतो, हे त्यांचे वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या विचारांवर सर्वांनी चालून सामाजिक सलोखा अभिसरणासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
               जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी अभियानाचा उद्देश सांगून डॉ. बाबासाहेबांनी वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणले. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासांना समानाधिकार दिला. त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. त्यांच्या जयंती दिनापासून सुरूवात झालेल्या ग्राम उदय से भारत उदय या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हास्तरापासून ग्रामपातळीपर्यंत करण्यात आलेले आहे. अभियान यशस्वीतेसाठी सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा असून यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढे यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
              सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र सुरकार यांनी सामाजिक सलोखा अभिसरण या विषयाची मांडणी केली. यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांच्या विचारातून समाजासाठी कार्य केले. ते केवळ दीनदलितांचे उद्धारकर्ते नव्हते तर त्यांनी समस्त भारतीयांचे कल्याण केले आहे. विद्वान अशा या महामानवाने जात धर्मावर कोरडे ओढून सामाजिक अभिसरणाची सुरूवात केली आहे.सामाजिक अभिसरणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे निती. भारतीय संविधान आपणाला नितीवान बनविते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे नैतिकमुल्य जोपासून जात, धर्माच्या पलिकडे विचार करून कृतीतून विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती केल्यासच विकास होईल. जात, धर्माच्या बेड्या तोडून मी केवळ भारतीय आहे ही भावना बाळगली तरच सामाजिक अभिसरण होईल, असेही श्री. सुरकार म्हणाले.
मान्यवरांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर उपस्थितांनी सामाजिक सौहार्द सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. इलमे, सूत्रसंचालन सुरेश हजारे यांनी केले. आभार श्री. रामटेके यांनी मानले.
रॅलीने अभियानाला सुरूवात
ग्राम उदय से भारत उदय अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांच्याहस्ते अभियान रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्हा परिषद ते डॉ. बाबासाहेब पुतळ्यापर्यंत रॅली काढून जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.
*****

ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत
किसान, ग्रामसभांसह विविध कार्यक्रम
                  वर्धा, दिनांक 14 - सामाजिक समररसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गावांचा विकास तसेच शेतक-यांच्या प्रगतीसाठी ग्रामोदयातून भारत उदय हे अभियान संपूर्ण जिल्हयात 24 एप्रिलपर्यंत राबविण्यात येत आहे. सामाजिक सलोखा कार्यक्रमांतर्गत 14 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येऊन सामाजिक सलोख्याच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

ग्राम किसान सभेचे आयोजन
ग्राम किसान सभा या उपक्रमांतर्गत शेतक-यांचा विकास करणे तसेच गरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दिनांक 17 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे ग्रामस्तरावर आयोजन करण्यात येणार आहे, या उपक्रमामध्ये कृषीक्षेत्रातील योजनांची माहिती देणे शेतक-यांशी चर्चा करणे. कृषी क्षेत्रातील योजनांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, फलोत्पादन, मृदा परीक्षण काळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पशुपालन, मत्स्यपालन आदी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 2022 पर्यंत  शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर विचार होणार आहे.
ग्रामसभेची बैठक
           संपूर्ण ग्रामीण विकासासोबतच आमचा गाव आमचा विकास आणि गावाच्या नियोजन प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी दिनांक 21 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत ग्रामसभेच्या बैठकी घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांमध्ये संपूर्ण ग्रामीण विकासाशी संबंधित विषयावर चर्चा करूनच ग्रामविकासाचा आराखडा तयार होणार आहे.
          ग्रामसभेपूर्वी गावांमध्ये प्रभातफेरी सांस्कृतिक खेळ आणि स्वचछता कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात येणार असून ग्रामसभेमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण आवास योजना, सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, अटल पेंशन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओमुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, तसेच स्वास्थ विमा योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
24 एप्रिल पंचायत राज दिन
             पंचायत राज संस्थानचे बळकटीकरण करण्यासाठी 73 वी घटनादुरूस्ती 24 एप्रिल रोजी अमलात आली आहे, त्या अनुषंगाने 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. दिनांक 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून ग्रामसभांचे आयेाजनासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ग्रामसभेस संबोधित करणार असून त्याचे थेट प्रक्षेपण या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सामाजिक न्याय विभागामार्फत रॅली
             वर्धा, दिनांक 14 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त       डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुतळ्यापर्यंत समाज कल्याण विभागामार्फत रॅली काढण्यात आली. रॅलीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार रामदास तडस यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, अति. मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करून झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी
           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
महसूल कर्मचारी संघटनेतर्फे लाडूचे वाटप
           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महसूल कर्मचारी संघटना, पटवारी संघाच्यावतीने लाडूचे वाटप करण्यात आले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांच्याहस्ते तथागत गौतम बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पटवारी संघाचे अध्यक्ष शैलेंद्र देशमुख, यशवंत लडके, बंडू खवास, सुनील ठाकरे, राजू देशमुख, मुरानी लवणकर, विजय झाडे, जीवन बुरांडे, अनिल खडतकर, किशोर पेंदाम, राजू झामरे, श्री. वनकर यांची उपस्थिती होती.

*****