Thursday 21 April 2016

राज्यातील पहिला चारा निर्मिती केंद्र अल्लीपुरात
·        तीन एकरात 27 चारा प्रजातींची लागवड
·        20 टन चारा निर्मितीचे उद्दीष्ट
·        प्रात्यक्षिक बागेत चा-याची लागवड
          वर्धा, दिनांक 12 – पशुधनाच्या संवर्धन संगोपनासाठी चारा उपलब्ध होत नसल्यामुळे शेतक-यांना सहज सुलभपणे चारा उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या चा-याच्या प्रजाती निर्माण करण्यासाठी अल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या तीन एकर परिसरात राज्यातील पहिले चारा बाग निर्मिती केंद्र सुरू झाले आहे.
           चारा बाग निर्मिती केंद्रात नेपिअर, गिनी मगनी, हायब्रिड नेपिअर आदी चा-यांच्या प्रजातीची प्रत्यक्ष लागवड करून चारा निर्मिती केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सुरवातीला प्रात्यक्षिक चारा बागेत तीन लक्ष चारा ठोंबे निर्माण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून पावसाळ्यामध्ये संपूर्ण परिसरात 12 लक्ष चा-याची ठोंबे निर्माण करून शेतक-यांना शासकीय दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या चारा बागेत दरवर्षी 20 मेट्रिक टन चारा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा पशुधन संवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी सांगितले.
             अल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या तीन एकर परिसरात चारा निर्मितीतून केंद्राचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ ढगे, अति. मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समिती सदस्य वंदनाताई फटिंग, अल्लीपूरच्या सरपंच मंदाताई परसोडे, अशोक सुपारे, शंकरलाल खत्री, गजानन ढगे, राजू आंबटकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. एस.एम. खळीकर आदी उपस्थित होते.
               चारा निर्मिती उद्यानासाठी जिल्हा नियेाजन मंडळातर्फे 80 हजार रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 8 तालुक्यात चारा निर्मिती उद्यान विकसित करण्यात येणार आहेअल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात चारा निर्मिती केंद्र विकसित करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे अधिकारी कर्मचा-यांनी पुढाकार घेतला असून डॉ. अमित लोहकरे यांनी जागेच्या विकासासोबतच पाण्याची उपलब्धता तसेच चारा प्रजातीच्या लागवडीसाठी नियोजन करून प्रत्यक्ष चारा निर्मिती केंद्र सुरू केल्याबद्दल अति.मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. लोहकरे यांचा गौरव केला.
             या चाराबागेत प्रात्यक्षिक बागेसह 27 प्रकारच्या गवताच्या जाती विकसीत करण्यात येणार आहेत. शेतक-यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील शेतक-यांना लागवडीसाठी चारा शासकीय दरात प्राधान्याने उपलब्ध केल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतक-यांच्या मागणीनुसार चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी सांगितले.
             दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या संवर्धनासाठी चा-याची अत्यंत आवश्यकता आहे. चारा निर्मिती केंद्रामुळे शेतक-यांना चा-याच्या विविध प्रजाती आपल्या तालुक्यातच उपलब्ध होणार आहेत. पशुधन संगोपनासोबतच दूध उत्पादनासाठी हिरव्या चा-याचे महत्त्व असल्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी सांगितले.
          नांदपूर येथील फॉडर कॅफेटेरिआ या संकल्पनेला राज्य शासनाने मान्यता दिल्यामुळे चारा निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवावा, यासाठी शासन निर्णय काढण्यात आला असून जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात चारा निर्मिती केंद्र उभारण्यात येत असल्याचे अति.मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नाना ढगे, गजानन ढगे, मंदाताई परसोडे, वंदनाताई फटिंग यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप थूल यांनी तर आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ. लोहकरे केले. कार्यक्रमासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.आर वानखेडे, डॉ. प्रमोद भोयर, डॉ. अनिरूद्ध पाठक, डॉ. सुजित तापस, डॉ.संजय खोपडे, डॉ. राजेंद्र निखाते तसेच प्रभाकर मख, प्रसन्नकुमार बंब, अनिल हाडके, संजय थुटे, भालचंद्र जाने, उमेश गावंडे, श्रीमती दुधाने, गीतांजली राठोड, हेमलता नितोने, कुमारी डफ, राहुल तलोडे, सुभाष थोरात, सुनील येसनकर, अनिल दरणे, श्री. पाटणकर आदी अधिकारी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment