Monday 21 November 2016



आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी
-         ज. स. सहारिया
        वर्धा – लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांप्रमाणेच नगरपरिषद निवडणूका महत्‍वाच्‍या असून ही निवडणूक निष्‍पक्ष, मुक्‍त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्‍य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांनी दिलेत.
          27 नोव्‍हेंबर रोजी होत असलेल्‍या नगर परिषद निवडणूकाच्‍या तयारी संदर्भात वर्धा आणि चंदपूर जिल्‍ह्याची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्‍याचे पोलिस महासंचालक सतिश माथुर, राज्‍य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्‍ने, विशेष पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, चंदपूरचे जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल, पोलिस अधिक्षक अंकित गोयल,  चंदपूरचे पोलिस अधिक्षक संदीप दिवान उपस्थित होते.
          निवडणूक आयोग हा स्‍वतंत्रपणे काम करीत असून निवडणूक आयोगासोबत काम करत असतांना अधिका-यांनी कोणाच्‍याही दबावात किंवा पक्षपातीपणे निर्णय घेऊन काम करु नये. दारुबंदी असणा-या या दोन्‍ही जिल्‍हांमध्‍ये दारुचा वापर होणार नाही यासाठी पोलिस विभागाने विशेष काळजी घ्‍यावी. त्‍याचबरोबर निवडणूकीमध्‍ये पैशाचा गैर वापर होणार नाही यासाठी बारकाईने तपासणी करावी, असे निर्देश श्री सहारिया यांनी यावेळी दिलेत.  प्रचार सभेसाठी सर्व राजकीय पक्षांना मैदान समान तत्‍वावर वाटप करण्‍यात यावे. निवडणूकीसाठी नेमण्‍यात आलेल्‍या पोलिस कर्मचा-यांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा यासाठी टपाल मतपत्रीका  वेळेत उपलब्‍ध करुन द्यावेत यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष लक्ष घालावे.  
          25 नोव्‍हेबर पर्यंत मतदार स्‍लीपचे वाटप करण्‍यात यावे. मतदानाच्‍या दिवशी स्‍लीपचे वाटप करण्‍याची वेळ येणार नाही, यासाठी आजपासूनच नियोजन करावे, असेही ते म्‍हणाले.  पेड न्‍युज संदर्भात उमेदवाराना वेळेत नोटीस देण्‍यात यावी. 24 आणि 26 नोव्‍हेंबरला राज्‍य निवडणूक आयोगा मार्फत मतदारांना मतदान करण्‍यासाठी जनजागृती करणारे एस. एम. एस पाठविण्‍यात येणार आहे. त्‍याच पध्‍दतीने जिल्‍हात मतदार जागृतीसाठी कार्यक्रम करावेत, असे श्री सहारिया म्‍हणाले.
          उमेदवारांनी 30 दिवसाच्‍या आत निवडणूकीचा खर्च सादर करणे आवश्‍यक आहे. यासाठी उमेदवाराने स्‍वतः केलेला खर्च, त्‍याच्‍या राज्‍यकीय पक्षाने केलेला खर्च आणि नातेवाईक, मित्र-मंडळी आणि सामाजिक संस्‍थांनी केलेला खर्च गृहित धरावा. 30 दिवसाच्‍या आत खर्च सादर न करणा-या उमेदवारांना अपात्र ठरविण्‍यात यावे  आणि राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्‍यात यावी, असे निर्देश राज्‍य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांनी दिले.
          तत्‍पूर्वी  जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी निवडणूकीसाठी करण्‍यात आलेल्‍या तयारी संदर्भात माहिती दिली. जिल्‍ह्यात एकूण 345 मतदार केंद्र असून 6 नगर परिषदेच्‍या अध्‍यक्ष पदासाठी एकूण 55 उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्‍य पदासाठी 814 उमेदवार असल्‍याचे सांगितले. मतदार केंद्राध्‍यक्ष आणि निवडणूक कर्मचारी यांचे प्रशिक्षण झाले आहे. स्‍टॅटीक सर्व्हिलॅस टीम गठीत करण्‍यात आली आहे.  मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्‍यासाठी स्‍टॉग रुमची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन सर्व मतदान केंद्राची तपासणी करण्‍यात आली आहे. मतदान केंद्रावर पाणी, प्रसाधन गृह, विज आणि अपंग मतदारांसाठी रॅम्‍पची व्‍यवस्‍था उपलब्‍ध असल्‍याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली. आचारसंहितेची प्रभावी अमलबजावणी सुरु असून आतापर्यत दोन गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहे. तसेच भरारी पथके तयार करण्‍यात आले असून सर्व ठिकाणी तपासणी करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यानी यावेळी सांगितले.
          यावेळी चंद्रपूर जिल्‍ह्याची माहिती जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिली. या बैठकीला वर्धा चंद्रपूर जिल्‍ह्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नगर परिषद मुख्‍य अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.  
000000