Friday 24 November 2017



                     जिल्हयात रोजगार मेळाव्याचे आयोजन
वर्धा ,दि.23 (जिमाका) समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील पी.व्ही.टेक्सटाईल व हैद्राबाद येथील एसआयएसएस सेक्युरिटी कंपनी येथे विविध पदाकरिता पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील समुद्रपूर, आष्टी, आर्वी, हिंगणघाट व वर्धा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  विभागाचे सहाय्यक संचालक ज्ञा.बा. गोस्वामी यांनी केले आहे.
पी.व्ही. टेक्सटाईल्स  लिमिटेड जाम येथे 27 नोव्हेंबर रोजी ट्रेनी मशिन चालक पदासाठी भरती मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे. तसेच एसआयएस सेक्युरिटी कंपनी हैद्राबाद येथे सुरक्षा जवानाची 500 पदे, सुपरवायझर 100 पदे भरण्यात येणार आहे. सुरक्षा जवानासाठी 10 वी उत्तीर्ण, वय 20 ते 37 वर्षे  व उंची 168 सेंमी. , सुपरवायझरकरिता 12 वी उत्तीर्ण,  वय 21 ते 35 वर्ष, उंची 170 सेंमी. असणे आवश्यक आहे. सदर पदे भरण्यासाठी 28 नोव्हेंबर ला आष्टी, 29 नोव्हेंबर ला कारंजा, 30 नोव्हेबर ला आर्वी, 4 डिसेंबरला हिंगणघाट, 6 डिसेंबर ला समुद्रपूर  येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथे व  5 डिसेंबर ला बच्छराज धर्मशाळा , रेल्वे स्टेशन  जवळ वर्धा येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता पर्यंत रोजगार मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे. तरी बेरोजगार युवकांनी या सवुर्ण संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहन श्री. गोस्वामी यांनी केले आहे.


         15 हजार 556 कर्क रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा दिलासा 
  एकूण 26 हजार रुग्णांवर उपचार
  2896 हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया
         वर्धा, दि 23-जिमाका :-  कर्करोगाचे नाव जरी उच्चारले तरी हृदयात धडकी भरते.कारण या आजारावर अजूनही रामबाण उपाय सापडलेला नाही. हा  आजार होण्याची  अनिश्चितता आणि झालेला आजार बरा होण्यासाठी करावी लागणारे त्रासदायक   उपचार यामुळे या आजाराविषयी एक भीतीदायक वातावरण समाजात आहे. या आजारावर होणारा खर्च  लक्षात घेऊनच गरिबांना यासाठी योग्य उपचार मिळावेत म्हणून शासनाने  कर्करोगाला  महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट  केले. याचा लाभ  वर्धा जिल्ह्यातील  15 हजार 556  कर्क रुग्णांना झाला असून यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार माफक दरात मिळवून देण्यासाठी शासन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबवित  आहे. पूर्वी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने राबविण्यात येत होती.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी  1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले, केशरी शिधापत्रिका धारक  कुटुंब आणि आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंब पात्र आहेत. योजनेत पात्र कुटुंबाना 971 आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया  तसेच 121 पाठपुरावा सेवा मोफत दिल्या जातात. एका कुटुंबाला एक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेतून मोफत मिळतात. याचा लाभ अनेक रुग्णांना होत असून यामुळे  दुर्मिळ आणि मोठ्या  आजारांवर गरिबांना उपचार करून घेणे शक्य झाले आहे.
यासाठी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, आणि आर्वी येथील डॉ राणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अंगीकृत केली आहेत. वर्धा जिल्ह्यात अंगीकृत रुग्णालयात आतापर्यंत 26 हजार रुग्णांनी  या योजनेचा लाभ घेतला आहे.  यामध्ये 2 हजार 896 हृदय रुग्णांवर शस्त्रक्रिया, 15 हजार 526 कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार,  14 रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण  तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे.यासाठी शासनाने 96 कोटी 33 लक्ष 46 हजार 773 रुपये उपचारासाठी रुग्णालयाना  दिले आहेत.  यामुळे सामान्य गरीब माणसाला मोफत व चांगले उपचार मिळत आहे.

Wednesday 22 November 2017



शेतकऱ्यांनी पिकावरील किडीवर वेळीच उपाययोजना करावी

वर्धा ,दि.22 (जिमाका) :-सध्यास्थितीत तुर पिक जोमदार असुन कळी, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. परंतु सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता  असल्याने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना कराव्यात  जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कापसे यांनी केले आहे. वर्धा उपविभागात राबविण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप प्रकल्पातर्गंत तुर व हरभरा पिकावरील किड व रोग सर्वेक्षण करून त्या आधारावर शेतकरी बांधवाना पीक संरक्षण सल्ला देण्यात येतो.तुरीवर येणाऱ्या विविध किडीपैकी शेंगा पोखरणारी अळी ही मुख्य किड आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवानी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास (10 ते 20 अळ्या प्रति 10 झाडे ) इमोमेक्टिन बेंझोएट 5 एस.जी. 3 ग्रॅम किंवा क्लोरँनर्ट्रनिलिप्रोल 18.5 एस.बी.2.5मि.ली.प्रति 10 लि.पाण्यात मिसळून फवारणी करावी. यासोबतच कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 8 मि.ली.किंवा थिऑडीकार्ब 75 डब्ल्यु पी.20 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लि.पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी शिफारस डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी केली आहे. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपासीवर जास्त प्रमाणात होत असल्याकारणाने उत्पादनात होणाऱ्या घटीसोबतच हाच प्रादुर्भाव पुढील वर्षी परावर्तित होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवानी उशिरापर्यंत फरदड घेण्याचे टाळावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कापसे यांनी केले आहे.


ग्रंथोत्सव 24 व 25 ला
·         विविध कार्यक्रमांची मेजवानी
·         वाचकांसाठी पुस्तकाची पर्वणी

वर्धा ,दि.22 (जिमाका) :-उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय,आणि  जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय, वर्धा  येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथोत्सवात वाचंकाना पुस्तक खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा ग्रंथालय कार्यालय ते सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय  पर्यंत ग्रंथदिंडी , सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन  कुलपती, कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठ कराड, डॉ.वेदप्रकाश मिश्रा करणार असुन स्वागताध्यक्ष  म्हणुन प्रदिपकुमार बजाज असणार आहेत.उद्घाटन कार्यक्रमाला   प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, विधान परिषद सदस्य अनिल सोले , विधान परिषद सदस्य मितेश भांगडीया , आमदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, आमदार डॉ.पंकज भोयर, जि.प.अध्यक्ष्‍ा नितीन मडावी, न.प.अध्यक्ष अतुल तराळे, शिक्षण सभापती जयश्री गफाट, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित राहतील.दुपारी 3 वाजता ‘प्रभावी वाचन माध्यम’ या विषयावर परिसंवाद असुन यामध्ये प्रा.दि.बा.साबळे व प्रा.डॉ.राजकुमार मून , सचिन सावरकर,सुषमा पाखरे, राज कोंडावार इत्यादी वक्ते विचार मांडतील.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असुन यामध्ये सुनिता कावळे, रंजना दाते आणि प्रा.मीनल रोहणकर यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 1 वाजता ग्रंथाने काय दिले या विषयावर परिसंवाद आणि दुपारी 3 वाजता काव्य  वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी 5 वाजता प्रदीप दाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी  जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, प्रकाश कुत्तरमारे, डॉ.यु.पी.नाल्हे उपस्थित राहतील. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध विषयांवरील पुस्तके रसीकांसाठी उपलब्ध राहणार असुन ग्रंथ प्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. ग्रंथप्रेमीनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा आणि विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथपाल अ.नि.मंडपे यांनी केले आहे.