Saturday 17 November 2012

शिष्‍यवृत्‍तीचे फार्म तपासणीसाठी कॅम्प


वर्धा दि.17- सन 2012 – 13 करीता शिष्‍यवृत्‍ती मंजूर करण्‍यास्‍तव सन 2012 – 13 चे ऑन लाईन फार्म तपासणीकरीता दि. 19.11.2012 पासून तालुका निहाय कॅम्‍प आयोजित करण्‍यात आलेला आहे. सर्व प्राचार्य मुख्‍याध्‍यापक यांना त्‍यांनी आपल्‍या महाविद्यालय , विद्यालयाचे ऑन लाईन फॉर्म ( सर्व मुळ कागदपत्रासह ) विहीत कालावधीत खाली दर्शविलेल्‍या ठिकाणी सादर करुन आपले फॉर्म तपासून घ्‍यावेत. त्‍याशिवाय सन 2012-13 या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्‍यवृत्‍ती मंजूर करता येणार नाही.
          तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे,  वर्धा, सेलु व देवळी तालुक्‍यासाठी सहा. आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालय, सामाजिक न्‍याय भवन वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्‍यासाठी व्‍ही. के. पांडे महाविद्यालय, हिंगणघाट, आर्वी, कारंजा व आष्‍टी तालुक्‍यासाठी पी. आर पाटील पॉलीटेक्‍नीक कॉलेज, तळेगांव (श्‍या.पंत )येथे दि. 19.11.2012 ते 23.11.2012 या कालावधीत फॉर्मची तपासणी होईल असे सहा. आयुक्‍त, समाज कल्‍याण वर्धा कळवितात.
00000

माजी सैनिकांचा भव्‍य मेळावा


              वर्धा दि.17- भगत पॅव्हिलीयन बॉम्‍बे इंजिनीयर ग्रुप व सेंटर खडकी,पूणे येथे रवीवार दि. 25 नोव्‍हेंबर 2012 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत माजी सैनिकांचा भव्‍य  मेळावा आयोजित केला आहे.
वर्धा जिल्‍हयातील माजी सैनिकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                             ०००

Friday 16 November 2012

सर्वसामान्‍य जनतेच्‍या प्रश्‍नांना माध्‍यमांनी प्राधान्‍य द्यावे - एन.नवीन सोना


 राष्‍ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन
                                               जेष्‍ठ पत्रकारांचा गौरव
वर्धा दि.16-  विकास प्रक्रियेमध्‍ये माध्‍यमांची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची असून माध्‍यमांनी सर्वसामान्‍य जनतेमध्‍ये असलेल्‍या  विकासाबद्दलची संकल्‍पना तसेच त्‍यांचे  प्रश्‍न माध्‍यमाव्‍दारे प्रभाविपणे मांडावेत असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी आज व्‍यक्‍त केले.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात राष्‍ट्रीय पत्रकार दिन व स्‍वर्गिय बाळशास्‍त्री जांभेकर जन्‍मशताब्‍दी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी बोलत होते.
जिलहा माहिती कार्यालय व वर्धा जिल्‍ह्यातील पत्रकारांतर्फे संयुक्‍तपणे राष्‍ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी  महात्‍मा गांधी विश्‍व विद्यालयाच्‍या दूरसंचार व प्रसिध्‍दी माध्‍यम विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अनिल के. रॉय ,अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री.मेश्राम प्रामुख्‍याने उपस्थित होते.
माध्‍यमांचे स्‍वातंत्रय या विषयासंदर्भात बोलतांना जिल्‍हाधिकारी एन. नवीन सोना म्‍हणाले की, विकास प्रक्रियेमध्‍ये पत्रकारांची भूमिका व सर्वसामान्‍य जनतेच्‍या प्रश्‍नासंदर्भात असलेली सामाजिक जबाबदारी महत्‍वाची असून माध्‍यम क्ष्‍ेात्रात  होत असलेल्‍या बदलांचा उपयोग प्रभाविपणे पत्रकाराने करावा. प्रशासनातर्फेही  याची निश्चित दखल घेतली जाईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
वर्धा जिल्‍ह्याच्‍या विकासासंदर्भात बोलतांना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले की, विकासाच्‍या विविध मापदंडात जिल्‍ह्याचे स्‍थान कोठे आहे याचा अभ्‍यास करुण शिक्षण,आरोग्‍य, दळणवळण या क्षेत्रात अधिक प्रगतीसाठी माध्‍यमांचेही सहकार्य घेण्‍यात येईल. माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी विकासासंदर्भात प्रशासनाला मार्गदर्शन केल्‍यास त्‍याचे स्‍वागत करण्‍यात येईल. असे स्‍पष्‍ट मत ही  यावेळी एन.नवीन सोना यांनी व्‍यक्‍त केले.
माध्‍यमांचे स्‍वातंत्र्य याविषयी बोलतांना महात्‍मा गांधी हिंदी विश्‍व विद्यालयाचे प्रा. डॉ. अनिल के. रॉय यांनी माध्‍यमासमोरील आव्‍हाने, पत्रकारांना असलेले स्‍वातंत्र्य तसेच जिल्‍हास्‍तरावर पत्रकारिता करतांना येणा-या अडचणी यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन
जेष्‍ठ पत्रकारांचा सत्‍कार
राष्‍ट्रीय पत्रकार दिन व स्‍वर्गिय बाळशास्‍त्री जांभेकर जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त वृत्‍तपत्रक्षेत्रात केलेले प्रदिर्घ सेवेबद्दल जेष्‍ठ पत्रकार विनोदबाबम चोरडीया व प्रकाश कथले यांचा जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांच्‍याहस्‍ते शाल श्रीफळ व पुष्‍पगुच्‍छ देवून गौरव करण्‍यात आला.
जेष्‍ठ पत्रकार विनादबाबू चोरडीया यांनी माध्‍यमांमध्‍ये नवीन तंत्रज्ञानासोबतच बदलत्‍या परिस्थितीत असलेली आव्‍हाने विषद करतांना पत्रकार होण्‍यासाठी असलेली मुक्‍त परिस्थिती आणि पत्रकारांसमोरील आवाहने  याविषयी सविस्‍तर भूमिका यावेळी व्‍यक्‍त केली.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी बाळशास्‍त्री जांभेकर यांच्‍या फोटोस पुष्‍पहार अर्पण करुण अभिवादन केले.
स्‍वागत श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे,मराठी साहित्‍य परिषदेचे अनिल मेघे, संपाद‍क संघाचे दिलीप जैन, व राजू गोरडे,प्रा. राजेंद्र मुंडे आदिंनी प्रमुख पाहुण्‍यांचे स्‍वागत केले. प्रास्‍ताविक जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. यावेळी राष्‍ट्रीय पत्रकार दिनाच्‍या आयोजनाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन मिलींद आवळे यांनी तर आभार  जेष्‍ठ पत्रकार आनंद शुक्‍ला यांनी मानले.
यावेळी सेवाग्राम आश्रम समितीचे अध्‍यक्ष मा.म. गडकरी, वर्धा जिल्‍ह्यातील सर्व पत्रकार, संपादक, ई-माध्‍यमांचे प्रतिनिधी,जिल्‍हा प्रतिनिधी मोठ्यासंखेने उपस्थित होते.  
00000

Thursday 15 November 2012

आज राष्‍ट्रीय पत्राकारिता दिवस जिल्‍हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन


        वर्धा दि.15- प्रेस कॉन्‍सील ऑफ इंडियाने 16 नोव्‍हेंबर हा दिवस राष्‍ट्रीय पत्रकारिता दिन जाहिर केला आहे.या निमित्‍याने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात राष्‍ट्रीय पत्रकारिता दिवस साजरा करण्‍यात येणार आहे.
          जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांच्‍या अध्‍यक्षेखाली शुक्रवार दिनांक 16 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रेस कॉन्‍सील ऑफ इंडियाने माध्‍यमांचे स्‍वातंत्र्य ही थीम यावर्षी दिली आहे. जिल्‍ह्यातील जेष्‍ठ पत्रकारांच्‍या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
          या कार्यक्रमाला उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर व वर्धा  जिल्‍ह्यातील सर्व पत्रकारांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
00000

Monday 12 November 2012

युवकांनी क्रीडा स्‍पर्धामध्‍ये सहभाग घ्‍यावा - राजेंद्र मुळक


                        44 वी राज्‍यस्‍तरीय हॉलीबॉल स्‍पर्धा संपन्‍न
           वर्धा, दिनांक 12 – युवकांनी शैक्षणिक अभ्‍यासक्रम पूर्ण करतानाच शारिरीक व बौध्‍दीक विकासासाठी विविध क्रीडा प्रकारामध्‍ये सहभागी होवून, नैपुन्‍य सिध्‍द करावे, असे प्रतिपादन राज्‍याचे अर्थ व नियोजन राज्‍यमंत्री  तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले.
       महाराष्‍ट्र राज्‍य हॉलीबॉल संघटना व जिल्‍हा हॉलीबॉल संघटना यांच्‍या  मान्‍यते  अंतर्गत  दत्‍ता मेघे आयुविज्ञान संस्‍था सांवगी (मेघे)  आणि एकविरादेवी शिक्षण संस्‍था यांच्‍या वतीने आयोजित राधीकाबाई मेघे स्‍मृतिप्रीत्‍यर्थ 44 वी राज्‍यस्‍तरीय हॉलीबॉल अजिंक्‍यपद स्‍पर्धा वर्धा येथील पोलीस मुख्‍यालयाच्‍या  मैदानावर संपन्‍न झाली.  त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री  श्री. मुळक बोलत होते.  
       मुलींच्‍या गटातील स्‍पर्धेचे अजिंक्‍यपद नागपूर जिल्‍ह्यांनी  तर  मुलांच्‍या  मुलांच्‍या गटामध्‍येसुध्‍दा  नागपूर जिल्‍हा अजिंक्‍य ठरला आहे.  पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांच्‍या हस्‍ते विजयी संघांना चषक देवून, संघाचा गौरव करण्‍यात आला.
          बक्षिस वितरण संघाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी दत्‍ता मेघे आयुर्विज्ञान संस्‍था सांवगी (मेघे)चे  कुलपती  खासदार दत्‍ता मेघे होते. यावेळी  आमदार दादाराव केचे, माजी आमदार सागर मेघे, नगराध्‍यक्ष आकाश शेंडे, जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,        अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत, उपविभागीय अधिकारी  हरीश धार्मिक, राज्‍य हॉलीबॉल संघटनेचे अध्‍यक्ष विजय डांगरे,सचिव बाळासाहेब सुर्यवंशी  उपस्थित होते.
          वर्धा येथील पोलीस मुख्‍यालयाच्‍या मैदानावर 7 नोव्‍हेंबर पासून हॉलीबॉल सामने खेळल्‍या गेले असून, या स्‍पर्धेत महाराष्‍ट्रातील  35 मुलांच्‍या संघानी तर 30 मुलींच्‍या संघानी भाग घेतला होता.
                                                            0000000

Sunday 11 November 2012

कापूस पणन महासंघातर्फे राज्‍यात 109 केंद्रावर शेतक-यांचा कापसाची खरेदी


          
          * धनत्रयोदशीच्‍या मुहर्तावर कापूस  खरेदीचा शुभारंभ
          * किमान आधारभूत 3 हजार 900 रुपये क्विंटल भाव
          * मुहूर्तावर पाच शेतक-यांकडून कापसाची खरेदी
          * शेतक-यांना  तात्‍काळ  कापूस विक्रीचे धनादेश

      वर्धा, दिनांक 11 – धनत्रयोदशीच्‍या  मुहूर्तावर  कापूस पणन महासंघाने  नाफेडच्‍या वतीने  किमान आधारभूत मुल्‍य  3 हजार 900 रुपये क्विंटलने        शेतक-यांकडून  कापसाच्‍या  खरेदीला सुरुवात केली आहे.  कापूस  खरेदीचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील केंद्रावर माधव ज्ञानेश्‍वर झलके (वडगाव )या          शेतक-यांच्‍या  कापसाच्‍या  बैलबंडीचे  वजन  करुन झाला.
        या हंगामातील  कापूस खरेदीचा शुभारंभ विदर्भ  पाटबंधारे विकास महामंडळाचे  उपाध्‍यक्ष  आमदार सुरेश देशमुख यांच्‍या हस्‍ते  झाला. मुहूर्ताच्‍या  पहिल्‍या  शेतक-याला 3 हजार 900 रुपये प्रति क्विंटल  भाव देण्‍यात आला असून, कापसाच्‍या  चुका-याचा  धनादेशही  तात्‍काळ  अदा करण्‍यात आला आहे.
          स्‍वर्गीय बापूरावजी देशमुख  शेतकरी  सहकारी  सुतगिरणीच्‍या परिसरात   नाफेडच्‍या  वतीने  कापूस पणन महासंघाने  कापूस खरेदी केन्‍द्राची सुरुवात केली. यावेळी  आयोजीत  कार्यक्रमास  कापूस पणन महासंघाचे अध्‍यक्ष  डॉ. एन.पी.हिराणी , नाफेडचे  अतिरीक्‍त  व्‍यवस्‍थापकीय संचालक ए.के.डबराल, कापूस पणन महासंघाचे उपाध्‍यक्ष  राजकिशोर मोदी , व्‍यवस्‍थापकीय संचालक डी.जी. फिलीप तसेच  कापूस पणन महासंघाचे  सर्व संचालक उपस्थित होते.




          शेतक-यांची  खाजगी  व्‍यापा-यांकडून  हमी भावापेक्षाही कमी  भावाने कापसाची खरेदी  होऊ नये  व शेतक-यांना  चांगला भाव मिळावा यासाठी    कापूस खरेदी केंद्र सुरु करणे   अत्‍यंत   आवश्‍यक असल्‍याचे सांगताना सुरेश देशमुख म्‍हणाले की, कापसापासून  कापडापर्यंतचा  व्‍यवसाय शेतक-यांच्‍या  मालकीचा व्‍हावा या संकल्‍पनेतून  सहकारी  तत्‍वावर सुतगिरण्‍यांची  सुरुवात झाली असून, सुत गिरणी अधिक सक्षमपणे सुरु रहाव्‍या यासाठी  शेतक-यांचा सहभाग आवश्‍यक असल्‍याचे  मतही त्‍यांनी  यावेळी   व्‍यक्‍त केले.
         पणन महासंघाचे अध्‍यक्ष एन.पी. हिराणी  यांनी   नाफेडच्‍या वतीने  पणन महासंघ  कापूस खरेदी  करणार असून, शेतक-यांना  कापूस खरेदी केल्‍याबरोबर   पैसे देण्‍यात येतील यासाठी  राज्‍य शासनाने 50 कोटी रुपये  महासंघास उपलब्‍ध  करुन  दिले आहे. या आधारे  200 कोटी रुपयाचा निधी  बँकाकडून  गोळा करणे सुलभ  झाले आहे. नाफेडकडे  असलेले  193 कोटी रुपये   तात्‍काळ उपलब्‍ध   करुन दिल्‍यास   शेतक-यांकडून    सर्व कापूस  खरेदी करणे शक्‍य  होणार आहे. कापूस खरेदी केंद्र सुरु करण्‍यास विलंब झाला असला तरी शेतक-यांनी    त्‍यांनी यावेळी    सांगितले.  
      शेतक-यांना   मिळणा-या कापसाच्‍या  किमान आधारभूत   किमतीबद्दल  बोलतांना  श्री. हिराणी म्‍हणाले की,  कापूस  उत्‍पादनासाठी  येणारा खर्च  याचा   ताळमेळ  बसत नसल्‍यामुळे शासनाने शेतक-यांच्‍या  पाठीशी खंबीरपणे उभे राहून   प्रति क्विंटल 6 हजार रुपयापर्यंत  कापसाची खरेदी व्‍हावी  अशी कापूस पणन महासंघाची भूमिका आहे. नाफेडचे अधिकृत प्रतिनिधी म्‍हणून  यावर्षी   150 लक्ष क्विंटल  कापूस खरेदी करण्‍याचे उद्दिष्‍ट असल्‍याचेही   यावेळी  तयांनी सांगितले.  
                             महाकॉट बियाणांचे उत्‍पादन
          महाराष्‍ट्र  राज्‍य सहकारी कापूस  उत्‍पादक  पणन महासंघ   अधिक सक्षम व्‍हावा यासाठी  शेतक-यांशी  संबधीत  पुरक उद्योग  सुरु करण्‍याचा निर्णय  घेण्‍यात आला आहे.  शेतक-यांना  दर्जेदार  बियाणे त्‍याच्‍या  घरापर्यंत  पोहचविण्‍यात  येणार असून, यावर्षी   किमान 5 लक्ष पॉकेट  कापूस बियाणे  निर्माण करण्‍यात येणार आहे यासाठी करारही  करण्‍यात आला असल्‍याची  माहिती   एन.पी.हिराणी यांनी दिली.
       प्रायोगीक तत्‍वावर  महाकॉट या नावाने 11 हजार  कापूस बियाणांचे  पॉकेट  शेतक-यांना देण्‍यात आले होते. यामध्‍ये  किमान 14 क्विंटल कापूस  एका एकरात होईल  असा विश्‍वासही  त्‍यांनी   व्‍यक्‍त केला.
       यावेळी   कापूस उत्‍पादक पणन महासंघाचे  उपाध्‍यक्ष  राजकिशोर  मोदी  यांनी  स्‍वागत करुन  प्रास्‍ताविक  भाषणात कापूस  उत्‍पादन पणन महासंघातर्फे    शेतक-यांच्‍या  हिताच्‍या संरक्षणासाठी  पणन महासंघातर्फे सुरु असलेल्‍या   विविध योजनांची  माहिती दिली.
           प्रारंभी  कापूस  खरेदी च्‍या   शुभारंभा प्रसंगी काटापूजन  व शेतक-यांकडून  प्रत्‍यक्ष  कापूस खरेदीपूर्वी  बैलगाडीचे   पूजन  आमदार सुरेश  देशमुख यांच्‍या  हस्‍ते   झाले.  यावेळी  कापूस  उत्‍पादक शेतकरी माधव ज्ञानेश्‍वर झलके, राजेंद्र विठ्ठल खडसे , संदिप सुरेश देशमुख  या  शेतक-यांचा शाल श्रीफळ देऊन  गौरव करण्‍यात आला.  पाच शेतक-यांनी  बैलबंडीवर आणलेला कापूस  खरेदी करण्‍यात आला.
      आभार प्रदर्शन  कापूस पणन महासंघाचे संचालक वसंतरावजी कार्लेकर यांच्‍या  हस्‍ते  करण्‍यात आले.
          यावेळी  कापूस  पणन महासंघाचे संचालक  प्रसन्‍नाजी पाटील , पंडीतराव जोकड, श्रीमती छायाताई दंडाळे, सुरेश चिंचाळकर, संदिप देशमुख , वर्धा जिल्‍हा  मध्‍यवर्ती बँकेचे अध्‍यक्ष समिर देशमुख , जिल्‍हा दुग्‍ध उत्‍पादक संघाचे अध्‍यक्ष  श्रीधर ठाकरे, जिल्‍हा परिषदेचे  उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे,कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे अध्‍यक्ष शरद देशमुख , ज्ञानेश्‍वर झलके आदी पदाधिकारी,  पणन महासंघाचे अधिकारी  पदाधिकारी, शेतकरी  मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                                                0000000
                               राज्‍यात 109 केन्‍द्र  सुरु करणार
      महाराष्‍ट्र राज्‍य कापूस महासंघातर्फे  राज्‍यातील  झोननिहाय शेतक-यांच्‍या  मागणीनुसार  कापूस खरेदी  केन्‍द्र  सुरु करण्‍यात येणार असून, पणन महासंघाने 109 केन्‍द्र  सुरु करण्‍याचा  निर्णय  घेतला आहे.
    कापूस खरेदीसाठी  नागपूर, अमरावती, यवतमाळ, वणी , अकोला, खामगाव, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी आदी  झोननिहाय कापूस खरेदीला सुरुवात करण्‍यात येणार असल्‍याची  माहिती  व्‍यवस्‍थापकीय संचालक डी.जी.फिलीप यांनी दिली.
      नाफेडतर्फे  राज्‍य  सहकारी कापूस सहकारी पणन महासंघ  केंद्र शासनाच्‍या  निर्धारीत केलेल्‍या  भावाप्रमाणे  एफएक्‍यु प्रतीचा  कापूस  खरेदी करणार आहे. यामध्‍ये  जे 34, एलआरए 5166 , एच4 / एच 6 , बन्‍नी  / ब्रम्‍हा   हा कापूस  धाग्‍याची लांबी , मायक्रोलीअर  व्‍हॅल्‍यु  (तलमता ) , कापसामधील  कमाल आद्रता तपासून  प्रति क्विंटल  निर्धारीत  केलेल्‍या  भावाने खरेदी करण्‍यात येणार आहे.  हमी दर व निकषाबाबतची  माहिती   सर्व खरेदी केंद्रावर उपलब्‍ध   करुन देण्‍यात आली असल्‍याची  माहिती  व्‍यवस्‍थापीकीय संचालक श्री. डि.जी.फीलीप यांनी दिली.
                                                000000