Sunday 11 November 2012

कापूस पणन महासंघातर्फे राज्‍यात 109 केंद्रावर शेतक-यांचा कापसाची खरेदी


          
          * धनत्रयोदशीच्‍या मुहर्तावर कापूस  खरेदीचा शुभारंभ
          * किमान आधारभूत 3 हजार 900 रुपये क्विंटल भाव
          * मुहूर्तावर पाच शेतक-यांकडून कापसाची खरेदी
          * शेतक-यांना  तात्‍काळ  कापूस विक्रीचे धनादेश

      वर्धा, दिनांक 11 – धनत्रयोदशीच्‍या  मुहूर्तावर  कापूस पणन महासंघाने  नाफेडच्‍या वतीने  किमान आधारभूत मुल्‍य  3 हजार 900 रुपये क्विंटलने        शेतक-यांकडून  कापसाच्‍या  खरेदीला सुरुवात केली आहे.  कापूस  खरेदीचा शुभारंभ  सेवाग्राम  येथील केंद्रावर माधव ज्ञानेश्‍वर झलके (वडगाव )या          शेतक-यांच्‍या  कापसाच्‍या  बैलबंडीचे  वजन  करुन झाला.
        या हंगामातील  कापूस खरेदीचा शुभारंभ विदर्भ  पाटबंधारे विकास महामंडळाचे  उपाध्‍यक्ष  आमदार सुरेश देशमुख यांच्‍या हस्‍ते  झाला. मुहूर्ताच्‍या  पहिल्‍या  शेतक-याला 3 हजार 900 रुपये प्रति क्विंटल  भाव देण्‍यात आला असून, कापसाच्‍या  चुका-याचा  धनादेशही  तात्‍काळ  अदा करण्‍यात आला आहे.
          स्‍वर्गीय बापूरावजी देशमुख  शेतकरी  सहकारी  सुतगिरणीच्‍या परिसरात   नाफेडच्‍या  वतीने  कापूस पणन महासंघाने  कापूस खरेदी केन्‍द्राची सुरुवात केली. यावेळी  आयोजीत  कार्यक्रमास  कापूस पणन महासंघाचे अध्‍यक्ष  डॉ. एन.पी.हिराणी , नाफेडचे  अतिरीक्‍त  व्‍यवस्‍थापकीय संचालक ए.के.डबराल, कापूस पणन महासंघाचे उपाध्‍यक्ष  राजकिशोर मोदी , व्‍यवस्‍थापकीय संचालक डी.जी. फिलीप तसेच  कापूस पणन महासंघाचे  सर्व संचालक उपस्थित होते.




          शेतक-यांची  खाजगी  व्‍यापा-यांकडून  हमी भावापेक्षाही कमी  भावाने कापसाची खरेदी  होऊ नये  व शेतक-यांना  चांगला भाव मिळावा यासाठी    कापूस खरेदी केंद्र सुरु करणे   अत्‍यंत   आवश्‍यक असल्‍याचे सांगताना सुरेश देशमुख म्‍हणाले की, कापसापासून  कापडापर्यंतचा  व्‍यवसाय शेतक-यांच्‍या  मालकीचा व्‍हावा या संकल्‍पनेतून  सहकारी  तत्‍वावर सुतगिरण्‍यांची  सुरुवात झाली असून, सुत गिरणी अधिक सक्षमपणे सुरु रहाव्‍या यासाठी  शेतक-यांचा सहभाग आवश्‍यक असल्‍याचे  मतही त्‍यांनी  यावेळी   व्‍यक्‍त केले.
         पणन महासंघाचे अध्‍यक्ष एन.पी. हिराणी  यांनी   नाफेडच्‍या वतीने  पणन महासंघ  कापूस खरेदी  करणार असून, शेतक-यांना  कापूस खरेदी केल्‍याबरोबर   पैसे देण्‍यात येतील यासाठी  राज्‍य शासनाने 50 कोटी रुपये  महासंघास उपलब्‍ध  करुन  दिले आहे. या आधारे  200 कोटी रुपयाचा निधी  बँकाकडून  गोळा करणे सुलभ  झाले आहे. नाफेडकडे  असलेले  193 कोटी रुपये   तात्‍काळ उपलब्‍ध   करुन दिल्‍यास   शेतक-यांकडून    सर्व कापूस  खरेदी करणे शक्‍य  होणार आहे. कापूस खरेदी केंद्र सुरु करण्‍यास विलंब झाला असला तरी शेतक-यांनी    त्‍यांनी यावेळी    सांगितले.  
      शेतक-यांना   मिळणा-या कापसाच्‍या  किमान आधारभूत   किमतीबद्दल  बोलतांना  श्री. हिराणी म्‍हणाले की,  कापूस  उत्‍पादनासाठी  येणारा खर्च  याचा   ताळमेळ  बसत नसल्‍यामुळे शासनाने शेतक-यांच्‍या  पाठीशी खंबीरपणे उभे राहून   प्रति क्विंटल 6 हजार रुपयापर्यंत  कापसाची खरेदी व्‍हावी  अशी कापूस पणन महासंघाची भूमिका आहे. नाफेडचे अधिकृत प्रतिनिधी म्‍हणून  यावर्षी   150 लक्ष क्विंटल  कापूस खरेदी करण्‍याचे उद्दिष्‍ट असल्‍याचेही   यावेळी  तयांनी सांगितले.  
                             महाकॉट बियाणांचे उत्‍पादन
          महाराष्‍ट्र  राज्‍य सहकारी कापूस  उत्‍पादक  पणन महासंघ   अधिक सक्षम व्‍हावा यासाठी  शेतक-यांशी  संबधीत  पुरक उद्योग  सुरु करण्‍याचा निर्णय  घेण्‍यात आला आहे.  शेतक-यांना  दर्जेदार  बियाणे त्‍याच्‍या  घरापर्यंत  पोहचविण्‍यात  येणार असून, यावर्षी   किमान 5 लक्ष पॉकेट  कापूस बियाणे  निर्माण करण्‍यात येणार आहे यासाठी करारही  करण्‍यात आला असल्‍याची  माहिती   एन.पी.हिराणी यांनी दिली.
       प्रायोगीक तत्‍वावर  महाकॉट या नावाने 11 हजार  कापूस बियाणांचे  पॉकेट  शेतक-यांना देण्‍यात आले होते. यामध्‍ये  किमान 14 क्विंटल कापूस  एका एकरात होईल  असा विश्‍वासही  त्‍यांनी   व्‍यक्‍त केला.
       यावेळी   कापूस उत्‍पादक पणन महासंघाचे  उपाध्‍यक्ष  राजकिशोर  मोदी  यांनी  स्‍वागत करुन  प्रास्‍ताविक  भाषणात कापूस  उत्‍पादन पणन महासंघातर्फे    शेतक-यांच्‍या  हिताच्‍या संरक्षणासाठी  पणन महासंघातर्फे सुरु असलेल्‍या   विविध योजनांची  माहिती दिली.
           प्रारंभी  कापूस  खरेदी च्‍या   शुभारंभा प्रसंगी काटापूजन  व शेतक-यांकडून  प्रत्‍यक्ष  कापूस खरेदीपूर्वी  बैलगाडीचे   पूजन  आमदार सुरेश  देशमुख यांच्‍या  हस्‍ते   झाले.  यावेळी  कापूस  उत्‍पादक शेतकरी माधव ज्ञानेश्‍वर झलके, राजेंद्र विठ्ठल खडसे , संदिप सुरेश देशमुख  या  शेतक-यांचा शाल श्रीफळ देऊन  गौरव करण्‍यात आला.  पाच शेतक-यांनी  बैलबंडीवर आणलेला कापूस  खरेदी करण्‍यात आला.
      आभार प्रदर्शन  कापूस पणन महासंघाचे संचालक वसंतरावजी कार्लेकर यांच्‍या  हस्‍ते  करण्‍यात आले.
          यावेळी  कापूस  पणन महासंघाचे संचालक  प्रसन्‍नाजी पाटील , पंडीतराव जोकड, श्रीमती छायाताई दंडाळे, सुरेश चिंचाळकर, संदिप देशमुख , वर्धा जिल्‍हा  मध्‍यवर्ती बँकेचे अध्‍यक्ष समिर देशमुख , जिल्‍हा दुग्‍ध उत्‍पादक संघाचे अध्‍यक्ष  श्रीधर ठाकरे, जिल्‍हा परिषदेचे  उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे,कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे अध्‍यक्ष शरद देशमुख , ज्ञानेश्‍वर झलके आदी पदाधिकारी,  पणन महासंघाचे अधिकारी  पदाधिकारी, शेतकरी  मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                                                0000000
                               राज्‍यात 109 केन्‍द्र  सुरु करणार
      महाराष्‍ट्र राज्‍य कापूस महासंघातर्फे  राज्‍यातील  झोननिहाय शेतक-यांच्‍या  मागणीनुसार  कापूस खरेदी  केन्‍द्र  सुरु करण्‍यात येणार असून, पणन महासंघाने 109 केन्‍द्र  सुरु करण्‍याचा  निर्णय  घेतला आहे.
    कापूस खरेदीसाठी  नागपूर, अमरावती, यवतमाळ, वणी , अकोला, खामगाव, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी आदी  झोननिहाय कापूस खरेदीला सुरुवात करण्‍यात येणार असल्‍याची  माहिती  व्‍यवस्‍थापकीय संचालक डी.जी.फिलीप यांनी दिली.
      नाफेडतर्फे  राज्‍य  सहकारी कापूस सहकारी पणन महासंघ  केंद्र शासनाच्‍या  निर्धारीत केलेल्‍या  भावाप्रमाणे  एफएक्‍यु प्रतीचा  कापूस  खरेदी करणार आहे. यामध्‍ये  जे 34, एलआरए 5166 , एच4 / एच 6 , बन्‍नी  / ब्रम्‍हा   हा कापूस  धाग्‍याची लांबी , मायक्रोलीअर  व्‍हॅल्‍यु  (तलमता ) , कापसामधील  कमाल आद्रता तपासून  प्रति क्विंटल  निर्धारीत  केलेल्‍या  भावाने खरेदी करण्‍यात येणार आहे.  हमी दर व निकषाबाबतची  माहिती   सर्व खरेदी केंद्रावर उपलब्‍ध   करुन देण्‍यात आली असल्‍याची  माहिती  व्‍यवस्‍थापीकीय संचालक श्री. डि.जी.फीलीप यांनी दिली.
                                                000000


No comments:

Post a Comment