Friday 6 October 2017

खादीच्या उत्पादन व विक्रीला  प्रोत्साहन देणार
-देवेंद्र फडणवीस
·         सेवाग्राम आश्रमातील सामुदायीक प्राथनेत सहभाग
·         सुत कताई करून महात्मा गांधीना विनम्र अभिवादन
·         गांधी फॉर टुमारो प्रकल्पाअंतर्गंत सेवाग्राम आश्रमाचा विकास
वर्धा,दि.2 (जिमाका) खादीच्या  उत्पादनाला मोठया प्रमाणात मागणी आहे. खादीच्या  निर्मित्तीत मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी  राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी  बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रम परिसरात  दिली.
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज गांधी जंयती दिनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल  बापू कुटी येथे सामुदायिक प्राथनेत सहभागी झाले तसेच चरख्यावर सुत कातून गांधीजीना विनम्र अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक तसेच जल स्त्रोत व नदी विकास मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ,उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार,  खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयत मटकर, सचिव डॉ.श्रीराम जाधव, ज्येष्ठ गांधीवादी मा.म.गडकरी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी यावेळी उपस्थित होते.

खादीची मागणी वाढत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हयामध्ये खादी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खादी उत्पादनाच्या माध्यमातून युवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो रोजगारासाठी खादीचे सुलभ तंत्रज्ञान  तसेच खादी पर्यावरण पुरक असल्यामुळे  राज्य खादी  ग्राम उद्योग तसेच राज्यातील खादी ग्रामोद्योग  संस्थांची बैठक घेण्यात येईल त्यानंतर उत्पादनाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Monday 2 October 2017

इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या निर्मितीतून स्थानिक युवकांना रोजगार
- देवेंद्र फडणवीस
* हेरिटेज टुरिझममुळे सेवाग्राम जागतिक नकाशावर
* सिंदी (रेल्वे) ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यातीला संधी
वर्धा, दि. २ : जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून एकाच दिवशी 5 हजार कोटींच्या कामांना सुरूवात होत आहे. चौपदरी रस्ते, ड्रायपोर्टच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगांना चालना मिळणार असून या विकासाला पुरक म्हणून सेवाग्राम विकासाचा 266 कोटींचा आराखडा हाती घेण्यात आला आहे. या सर्व प्रयत्नांमधून इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या निर्मितीमधून स्थानिक युवकांना रोजगार हे एकमेव ध्येय समोर ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
            या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री तथा वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खासदार रामदास तडस, सर्वश्री आमदार समिर कुणावार, डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष  नितीन मडावी, माजी खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, सेवाग्रामच्या सरपंच श्रीमती रोशना जामलेकर, पवनारचे सरपंच राजेश्वर गांडोळे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते. 
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ड्रायपोर्टची निर्मिती हे या परिसराला मिळालेले मोठे वरदान ठरणार आहे. या पोर्टच्या माध्यमातून प्रत्यक्ष पोर्टमध्ये मिळणाऱ्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आणि उद्योजक आपला माल थेट विदेशात पाठवू शकतील. यामुळे आयात-निर्यातीला चालना मिळेल. तसेच यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पांत स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ‘सिंबॉयसीस’च्या माध्यमातून कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात स्थानिक युवकांनाच प्रशिक्षित करून पोर्टमध्ये काम देण्यात येईल.
‘पोर्टलेट’चा विकास हा देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतो. वर्धा आणि जालना येथील ड्रायपोर्ट हे राज्यातील मागास भागाला विकसीत करणारे प्रकल्प आहेत. रस्ते हे आर्थिक सुबत्तता आणतात. त्यामुळे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम विदर्भात होते आहे. कार्गो हब, बुटीबोरी ते वर्धा आणि वर्धा ते यवतमाळ या चारपदरी रस्त्यामुळे या भागातील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने या ड्रायपोर्टपर्यंत सहज आणि जलदरित्या पोहोचतील. देशातील एककर प्रणालीमुळे मालवाहतूक क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येत्या काळात नागपूर हे मालवाहतुकीचे केंद्र होणार आहे.
महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून सेवाग्राम आज जागतिक नकाशावर सर्वांना परिचित आहे. जगातील नामवंत या ठिकाणी येऊन संशोधन करण्यास इच्छुक आहेत. याठिकाणी पर्यटक येऊन गांधीजींच्या विचारापासून प्रेरणा घेतील. गांधीजींची ग्रामविकासाची संकल्पना आजही मार्गदर्शक आहे. याच संकल्पनेतून उभा राहिलेला द रूरल मॉल महिला आणि शेतकरी बचतगटांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. गांधीजींनी या जिल्ह्याला दिलेला वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला असून यातूनही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.  
जलसंधारणाच्या सर्वात जास्त योजना वर्धा जिल्ह्यात सुरू झाल्या आहे. सिंचनाच्या निर्मितीमुळे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. सिंचनाच्या माध्यमातून परिवर्तनाची नांदी शेती आणि उद्योगात येणार आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार असून त्याला स्वातंत्र्याची अनुभूती मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे सिंचन क्षेत्र 40 टक्क्यांवर नेणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सिंचन महत्त्वाचे आहे. राज्याचे 18 टक्के असणारे सिंचन क्षेत्र 40 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
महात्मा गांधींच्या जयंतीदिनी भविष्यातील नवीन भारत निर्माणाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. खादी ग्रामोद्योग ही गांधीजींनी दिलेली देणगी आहे. त्यामुळे येत्या काळात खादीच्या उत्पादनाला व्यावसायिक जोड देण्याची आवश्यकता आहे. जगाच्या पाठीवर आज ज्युट, रेशीम, कापूस, बांबू आणि लिनेन या पाच कच्च्या मालापासून सूत आणि कापड तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. या पाचही धाग्यांचा उपयोग करून वस्त्रनिर्मतिीचा प्रयोग झाल्यास या क्षेत्रातील निर्यातदार होण्याची संधी आपल्याला आहे. रस्ते जोडणी आणि ड्रायपोर्टमुळे शेतमालासह इतरही उत्पादन विदेशात पाठविण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा या परिसरातील नागरीकांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्याला रोजगारयुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्याला पर्यावरणयुक्त, आरोग्ययुक्त, जलयुक्त आणि व्यसनमुक्तीसोबतच रोजगारयुक्त करण्याचा संकल्प केला आहे. महात्मा गांधी यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पुर्तता आज होत आहे. सेवाग्रामच्या 266 कोटी रूपयांच्या विकास आराखड्यातील कामांमधून सेवाग्राम ही जागतिक प्रेरणाभूमी बनेल. तसेच देशाला आणि जगाला दिशादर्शक भूमी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विकासाचे जाळे तयार करणार – राज्यमंत्री मदन येरावार
महात्मा गांधी यांच्या ग्रामविकासाच्या संकल्पनेतून विदर्भ विकासाचा पाया रचला गेला आहे. विदर्भाच्या बहुस्पर्शी विकासातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. या नवीन आयामातून विकासाचे जाळे निर्माण होत मिळत असल्याचे प्रतिपादन श्री. येरावार यांनी केले.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी मनोगत व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी प्रास्ताविकातून ड्रायपोर्टबाबत माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य डी. ओ. तावडे यानी रस्ते प्रकल्प, तर विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी सेवाग्राम विकास आराखडाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या आपल्या योजना पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राजेश बकाने यांनी मान्यवरांचा नागरी सत्कार केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या चित्रफितीही यावेळी दाखविण्यात आल्या.