Saturday 29 September 2012

राष्‍ट्रीय सॉफ्टबॉल स्‍पर्धेकरीता महाराष्‍ट्राचा संघ जाहीर


राज्‍यस्‍तरीय  स्‍पर्धामध्‍ये कोल्‍हापूर विभाग विजयी
     वर्धा, दिनांक 29 – राष्‍ट्रीय सॉफ्टबॉल स्‍पर्धेकरीता  घेण्‍यात आलेल्‍या  राज्‍यस्‍तरीय  स्‍पर्धांमधून  मुलींच्‍या   तीन संघाची  निवड   क्रीडा व युवा संचालनालयाचे  विभागीय उपसंचाक  डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी आज जाहीर केली आहे.
       मध्‍यप्रदेशातील इंदोर येथे  17 वर्षे  मुलींच्‍या  राष्‍ट्रीय स्‍पर्धा होणार असून तसेच 14 वर्षे मुलींसाठी जळगाव व 19 वर्षे मुलींसाठी छत्‍तीसगड राज्‍यातील कोरबा येथे  राष्‍ट्रीय स्‍पर्धाचे  आयोजन करण्‍यात आले असून,  या स्‍पर्धांसाठी  महाराष्‍ट़ाच्‍या  सॉफ्ट  बॉल  संघाची निवड करण्‍यात आली आहे.  
      वर्धा येथे  राज्‍यातील   आठ विभागातून 840 विद्यार्थ्‍यांची   राष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये सहभाग घेतला होता.  या स्‍पर्धेमध्‍ये   14 वर्षाखालील मुलींमध्‍ये  कोल्‍हापूर विभाग विजयी ठरला असून, नाशिक विभागाची  चमू  उपविजयी ठरली आहे. 17 वर्षाआतील  मुलींमध्‍ये कोल्‍हापूर विभागाची चमू विजयी  तर अमरावती विभागाची चमू उपविजयी ठरली आहे. 19 वर्षे आतील  कोल्‍हापूर विभाग विजयी तर अमरावती  विभाग उपविजयी  ठरली आहे.   विजयी स्‍पर्धकांना जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्‍या हस्‍ते  पारितोषीकाचे वितरण करण्‍यात आले.  
                  महाराष्‍ट्राचा संघ जाहीर
      राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी  विभागीय स्‍पर्धांमध्‍ये   उत्‍कृष्‍ट  कामगिरी करणा-या  खेळाडूमधून  तीन संघ निवडण्‍यात आले असून, महाराष्‍ट्राचे संघ जाहीर करण्‍यात आले.
          14 वर्षे मुली -   प्रणिता कुंभार, सुप्रिया पाखरे, सोनाली सदामते, भक्‍ती पाटील (कोल्‍हापूर विभाग), कु. मानसी दोडगेकर, पुजा पाटील, शिवाणी देशमुख, अर्पिता देशपांडे, भावेशा महाजन   (नाशिक विभाग), कु. वैष्‍णवी वढणे, रंजना लवाटे  ( पुणे विभाग), कु. आंचल शहा, समिक्षा माहूलकर  (नागपूर विभाग), समृध्‍दी सरतापे (अमरावती विभाग).
           17 वर्षे मुली -   सरीता कांबळे, प्रियंका पाटील , मनिषा सोनुले , शिवाणी शिंदे ( कोल्‍हापूर विभाग), तेजस उवसकर , प्रिया काळमेघ, अंकीता मोगल (अमरावती विभाग), रविना गायकी, काजल शेट्टी, काजल मोनल, श्रृती गावंडे ( नाशिक विभाग),  रविना चोपडे (नागपूर विभाग), मृदुल देसाई ( मुंबई) , रेश्‍मा पुणेकर (पुणे विभाग).
         19 वर्षे मुली  - सुष्मिता पाटील, रसिका शिरगावे , कोजोल वाडेकर, माधुरी दांगट ( कोल्‍हापूर विभाग), ईश्‍वरी गोतमारे, जुही मलेश्‍वर , प्रतिक्षा तायलकर, रेणूका टिपले, आरती देशमुख   ( अमरावती विभाग), ऐश्‍वर्या बढे, स्‍वाती पाटील ( नाशिक विभाग), दिक्षा शिवगोर ( औरंगाबाद विभाग), मयुरी टेंभूर्णे ,मोनीका नानेकर ( नागपूर विभाग) , ऋषाली कुभार (पुणे विभाग), प्रियंका पवार (मुंबई विभाग).
          राष्‍ट्रीय स्‍पर्धेसाठी  निवड समिती सदस्‍य म्‍हणून  प्राध्‍यापक एस.व्‍ही.ठावरी, ए.एस.बिराज, दर्शना पंडीत, किशोर चौधरी, मृदुला महाजन, अभिजीत इंगोले, विश्‍वास गायकर,  स्‍वप्‍नील चांदेकर आणि प्रवीण राऊत यांनी काम पाहीले.
          सॉफ्ट बॉलच्‍या राष्‍ट्रीय  स्‍पर्धा  वर्धा जिल्‍हा क्रिडा परीषद , महाराष्‍ट्र राज्‍य  सॉफ्ट बॉल संघटना व वर्धा जिल्‍हा सॉफ्ट बॉल संघटनेच्‍या सहकार्याने आयेाजीत करण्‍यात आल्‍या असल्‍याची माहिती  जिल्‍हा क्रिडा अधिकारी  प्रदिप शेटीये यांनी दिली.
                                                000000

सिंदी रेल्‍वे नगर परिषद पोट निवडणूक 21 ऑक्‍टोंबर रोजी मतदान - जयश्री भोज




                
वर्धा, दि. 29 – नगर परिषद सिंदी रेल्‍वे  येथील  प्रभाग क्रमांक 3 ब च्‍या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम  जाहीर झाला असून, सोमवार दिनांक  1 ऑक्‍टोंबर पासून नामनिर्देशन पत्र  स्विकारण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिली.
       पोटनिवडणूकीसाठी   निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी  हरिष धार्मीक यांची नियुक्‍ती  करण्‍यात आली असून,  दिनांक 21 ऑक्‍टोंबर  रोजी  सकाळी  7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज  जारी करण्‍यात आलेल्‍या  निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे देणे व स्विकारणे   सोमवार दिनांक 1 ऑक्‍टोंबर ते दिनांक 6 ऑक्‍टोंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. दिनांक 2 ऑक्‍टोंबर रोजी सार्वजनिक सुटी असल्‍यामुळे या दिवशी  नामनिर्देशन पत्रे स्विकारली जाणार नाहीत.
       नामनिर्देशनपत्रे शनिवार दिनांक 6 ऑक्‍टोंबर  रोजी दुपारी  3 वाजेपर्यंत  सादर करण्‍याची  शेवटची तारीख राहील.  नगर परिषद कार्यालयात  नामनिर्देशनपत्रे स्विकारण्‍यात येणार असून, सोमवार दिनांक 8 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी  होईल. तसेच वैधरित्‍या  नामनिर्देशीत झालेल्‍या उमेदवारांची  यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
      उमेदवारी  अर्ज शनिवार दिनांक  13 ऑक्‍टोंबर रोजी  दुपारी  3 वाजेपर्यंत मागे घेण्‍याची  वेळ आहे. तसेच सोमवार दिनांक 15 ऑक्‍टोंबर  रोजी निवडणूक चिन्‍हाचे वितरण तसेच अंतीमरित्‍या निवडणूक लढविणा-या  उमेदवारांची यादी प्रसिध्‍दी करण्‍यात येईल व  रविवार दिनांक 21 ऑक्‍टोंबर रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेण्‍यात येईल. त्‍यानंतर   मतमोजणी करण्‍यात येईल. असेही जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज यांनी कळविले आहे.
                                                000000

जिल्‍ह्यात 37 कलम लागू


वर्धा, दि. 29 – शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍ह्यात दि. 13 ऑक्‍टोंबर पर्यंत मुंबई  पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  जिल्‍हादंडाधिकारी  तथा जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी  आज दिली.
         जिल्‍ह्यात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी,   यासाठी  आजपासून ते दिनांक  13  ऑक्‍टोंबरच्‍या मध्‍यरात्री पर्यंत  संपूर्ण जिल्‍ह्यात कलम 37  लागू राहणार असून, या कायद्याचा   भंग करणा-या व्‍यक्‍ती  विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असेही आज जारी केलेल्‍या  आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.
                                              0000 

सोमवारचा लोकशाही दिन रद्द


                          
                           वर्धा,29 : राज्‍य निवडणूक आयोगाने  ग्रामपंचायत सार्वत्रिक  निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या कालावधीत आचारसंहिता  लागू करण्‍यात आली असल्‍यामुळे सोमवार दिनांक 1 ऑक्‍टोंबर रोजी आयोजीत  करण्‍यात आलेला जिल्‍हा लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
                                              0000

Thursday 27 September 2012

सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत नोंदणी झालेल्‍या सर्व अपंग विद्यार्थ्‍यांना वैद्यकीय प्रमाणपत्र -संजय भागवत


        

* जिल्‍ह्यात 5 हजार 681 विद्यार्थ्‍यांचा समावेश
* विशेष शिबीर  आयोजीत करुन प्रमाणपत्र देणार

          वर्धा, दि. 27- शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या आरोग्‍य तपासणीमध्‍ये  नोंदणी झालेल्‍या जिल्‍ह्यातील 6 ते 18 वयोगटातील  सुमारे  5 हजार 681  विद्यार्थ्‍यांना  वैद्यकीय प्रमाणपत्र देण्‍यासाठी  तालुका तसेच जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामध्‍ये  विशेष शिबीराचे आयोजन करुन  सर्वांना  प्रमाणपत्र देण्‍याच्‍या सुचना अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत   यांनी  आज दिल्‍यात.
      जिल्‍हाधिकारी  कार्यालयाचे सभागृहात  जिल्‍हास्‍तरीय  अपंग कल्‍याण समितीची बैठक अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी   मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
         विद्यार्थ्‍यांमध्‍ये  असलेल्‍या  अपंगत्‍वाबाबत  वैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी  करुन   त्‍यानुसार   त्‍यांना प्रमाणपत्र देण्‍यासाठी विशेष शिबीर आयोजीत करावे, अशा सुचना करताना अपंग असलेल्‍या  विद्यार्थ्‍यांना  व सर्वसामान्‍य अपंगांना सायकलीचे वाटप , श्रवण यंत्र, अस्थिव्‍यंग  साहित्‍य तसेच लोव्हिजन साहित्‍यामध्‍ये मोठ्या अक्षरातील पुस्‍तके, दोन मॅग्‍नीफायर , बुकसिफ मॅग्‍नीफायर , वाचन करण्‍यासाठी असलेल्‍या सुविधा  आदी पुरविण्‍यात याव्‍यात  यासाठी  विशेष मोहीम राबवावी अशी सुचनाही संजय भागवत यांनी केली.
          शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या  तपासणी मध्‍ये  144 अस्थिव्‍यंग विद्यार्थ्‍यांपैकी 73 ट्रायसिकलचे  वाटप करण्‍यात आले असून, 77 श्रवणयंत्र साहित्‍य, 245 अस्थिव्‍यंग साहित्‍य तसेच 249 लोव्हिजन साहित्‍य वितरीत करण्‍यात आल्‍याचे यावेळी बैठकीत सांगण्‍यात आले.
           अपंग व्‍यक्‍ती –समान संधी , हक्‍काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 व अपंग कल्‍याण  कृती आराखडा 2001  तसेच  राष्‍ट्रीय विश्‍वस्‍त अधिनियम 1999 ची  प्रभावी  अंमलबजावानी करण्‍यासाठी  जिल्‍हा‍स्‍तरावर अपंग कल्‍याण समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  त्‍यानुसार अपंगांना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्‍त झालेल्‍या  व होणा-या  आवश्‍यक सुविधा अपंगांना स्‍वयंरोजगारासाठी  बिजभांडवल  योजने अंतर्गत कर्ज प्रकरणांची मंजूरी   व अपंगाचे  सर्व्‍हेक्षण , मुळातच अपंगत्‍व  येवू नये याकरीता  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आदींबाबत यावेळी  चर्चा करण्‍यात आली.
                           अपंग कल्‍याणासाठी   तीन टक्‍के निधी
          अपंग कल्‍याणाच्‍या  विविध योजना राबविण्‍यासाठी  वर्धा जिल्‍हा  परिषदेने  शेष फंडामधून तीन टक्‍के   निधी   14 लक्ष  90 हजार रुपये   उपलब्‍ध   करुन दिला आहे. या अंतर्गत    अपंग विवाहीत जोडप्‍यांना   प्रोत्‍साहन व आर्थिक सहाय्यासाठी तीन लक्ष रुपये , अपंगांना व्‍यवसायासाठी   पिकोफॉल शिलाई  मशीन , तीन चाकी  सायकल,  श्रवण यंत्रे यासाठी   प्रत्‍येकी    तीन लक्ष रुपये तसेच   रोगनिदान व शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी   3 लक्ष 90 हजार रुपयाचा निधी राखून ठेवण्‍यात आला असल्‍याची माहिती  समाज कल्‍याण अधिकारी श्रीमती  जया राऊत यांनी दिली.
         यावेळी   जिल्‍हास्‍तरीय अपंग कल्‍याण समितीचे सदस्‍य अमोल विजय चव्‍हाण , मधुकर टोनपे, दिनकर अंबुलकर, छाया अंबोरे, डॉ. एस.जी. निमगडे, डॉ. शबाना मोकाशी, जिल्‍हा समन्‍वयक अधिकारी  प्रविन गौतम , कमलेश पिसाळकर, जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे  आदी  विभागाचे  प्रतिनीधी तसेच अपंग पुनर्वसन केन्‍द्र, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार माहिती केन्‍द्र, अशासकीय सदस्‍य , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सहाय्यक सल्‍लागार  आदी बैठकीला उपस्थित होते.
                                                0000
       


जमिनीचे भोगवाटपदार परावर्तीत करण्‍यासाठी विशेष मोहीम - जयश्री भोज


 जिल्‍ह्यात 1 लक्ष 56 हजार 150 भोगवाटपदार
वर्धा, दिनांक 27- जिल्‍ह्यातील भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या जमिनीचे विक्री हस्‍तांतरण करतेवेळी   शेतक-यांना  मानसिक त्रास किंवा अडचण निर्माण होऊ नये म्‍हणून  भोगवाटपदार वर्ग दोन मधून एक मध्‍ये  परावर्तीत करण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येत असल्‍याची  माहिती जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज यांनी दिली.
शेतक-यांना  भुस्‍वामी भोगवाटपदार वर्ग एक मध्‍ये  परावर्तीत करण्‍यासाठी जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविण्‍यात येत असून, 1 लक्ष  56 हजार 150 भोगवाटपदार वर्ग दोन च्‍या शेतकरी खातेदारांपैकी  53 हजार 742  खातेदारांनीच विशेष मोहीमे अंतर्गत अर्ज  सादर केले आहेत. भूस्‍वामी  शेतक-यांनी या विशेष मोहीमेत सहभागी होवून, संबंधीत   उपविभागीय अधिकारी  यांचेकडे  भोगवाटपदार परावर्तीत करण्‍यासाठी अर्ज करावे, असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी  श्रीमती  जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍ह्यातील भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट  असलेल्‍या जमिनींची विक्री, हस्‍तांतरण , दस्‍तनोंदणी  करण्‍यापूर्वी  जमिनी  शासकीय वाटपातील आहे किंवा कसे याबाबत तपासणी होणे आवश्‍यक आहे. भोगवाटपदार वर्ग दोन मध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या जमिनीची विक्री, हस्‍तांतरण करतेवेळेस उपविभागीय महसूल अधिकारी हे सक्षम अधिकारी असल्‍याने त्‍यांचे ना हरकत प्रमाणपत्र, परवानगी असल्‍याशिवाय  दुय्यम  निबंधक यांचेकडे दसताऐवजाची नोंद होणार नसल्‍याने जिल्‍ह्यातील  खातेदार शेतक-यांना मानसीक त्रास किंवा अडचण निर्माण होऊ नये म्‍हणून   जिल्‍ह्यात विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे.  या मोहीमेचा लाभ  सर्व शेतकरी खातेदारांनी घ्‍यावा, असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                00000000

गणेश विसर्जन काळात शांतता व सुव्‍यवस्‍था राखा- अविनाश कुमार


                                          134 कलम लागू
       वर्धा, दि. 27 – जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवसथा कायम राखण्‍यासाठी  सर्व जनतेनी  सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार  यांनी  केले आहे.
          घरघुती तसेच सार्वजनिक गणतीचे विर्सजन, त्‍यानंतर शहरी व ग्रामीण भागात 3 ऑक्‍टोंबर पासून हडपक्‍या  गणपतीचा उत्‍सव व माध्‍यमिक शालांत परीक्षेच्‍या काळात कायदा व सुव्‍यवस्‍था कायम राहावी म्‍हणून  दिनांक 29 सप्‍टेंबर ते 13 ऑक्‍टोंबर पर्यंतच्‍या कालावधीत मुबई पोलीस अधिनियम 1951 चे  36 अन्‍वये अ आदेश जारी  करण्‍यात आला आहे.
          या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 134 अन्‍वये कार्यवाहीस पात्र राहतील.जिल्‍ह्यात या कालावधीत जाहीर सभा, निदर्शने, मोर्चे, शोभायात्रा आदिंसाठी पोलीस स्‍टेशन अधिकारी यांचेकडून परवानगी घेतलयाशिवाय  आयोजन करण्‍यात येवू नये तसेच शांततेला व सुव्‍यवस्‍थेला बाधा आणणा-या घोषणा देऊ नये असेही जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी  जाहीर केलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे.
                                              0000 

अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख रविवारी हिंगणघाटमध्‍ये




वर्धा, दि. 27- राज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख रविवार दिनांक 30 सप्‍टेंबर रोजी  हिंगणघाट तालुक्‍यात असून सकाळी 11 वाजता रिंगडोह (हिंगणघाट) येथे आगमन होईल.
       दुपारी 12 वाजता रिंगडोह येथून हिंगणघाट कडे प्रयाण करतील. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे अभ्‍यागतासाठी  राखीव राहील. दुपारी 1 वाजता कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती येथे शालेय विद्यार्थ्‍यांना लॅपटॉप वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून, दुपारी 3 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                0000

Wednesday 26 September 2012

शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांमधे महाराष्‍ट्राचा लौकीक वाढवा - ज्ञानेश्‍वर ढगे



          * राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांना सुरुवात
          * राज्‍यातील 768 खेळाडूंचा समावेश
          * राष्‍ट्रीय संघासाठी चमूची निवड

       वर्धा, दि. 26 – सॉफ्ट बॉल स्‍पर्धामध्‍ये  उत्‍कृष्‍ट  कामगीरी  करुन महाराष्‍ट्राचा  लौकीक  वाढवा असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे  उदघाटन समारंभा प्रसंगी  व्‍यक्‍त केले.
          क्रिडा व युवक सेवा संचानालनालय तसेच जिल्‍हा क्रिडा परिषद, वर्धा मार्फत जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या क्रिडांगणावर राज्‍यस्‍तरीय शालेय  सॉफ्ट बॉल स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आल्‍या असून, या स्‍पर्धेसाठी  अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे , कोल्‍हापूर व लातूर या आठ विभागातून  768  शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत.  
          राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धेचे   उदघाटन नगराध्‍यक्ष आकाश शेंडे यांच्‍या हस्‍ते झाले तर अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे उपस्थित होते.
          वर्धा येथे प्रथमच राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येत असून  1 ऑक्‍टोंबर पर्यंत चालणा-या या स्‍पर्धांमध्‍ये  14 , 17  व 19 वर्षातील मुला मुलींचे संघ स्‍पर्धांमध्‍ये सहभागी  झाले आहेत. या स्‍पर्धामधून   इंदोर येथे होणा-या राष्‍ट्रीय स्‍पर्धांसाठी महाराष्‍ट्राची चमू निवडण्‍यात येणारआहे.  उदघाटनाचा पहिला सामना कोल्‍हापूर विरुध्‍द  नाशिक या संघा दरम्‍यान  खेळल्‍या गेला.
          स्‍पर्धाचे उदघाटन  राष्‍ट्रीय पारीतोषिक प्राप्‍त खेळाडूंनी  मशाल ज्‍योत  क्रिडांगणावर  आणली व प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते क्रिडा ज्‍योत  पेटविण्‍यात आली.  त्‍यानंतर  सर्व खेळाडूंना  स्‍पर्धामध्‍ये   खेळाडू वृत्‍तीने   सहभागी  होण्‍याबाबत  शपथ देण्‍यात आली.  
          यावेळी  नगराध्‍यक्ष  आकाश शेंडे यांनी  खेळाडूंना  मार्गदर्शन करुन स्‍पर्धांच्‍या   उदघाटनाची  घोषणा केली. क्रिडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांनी  प्रास्‍ताविकात राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धाच्‍या आयोजनाची तसेच  स्‍पर्धेच्‍या  नियोजनाबाबत  माहिती दिली.
       महाराष्‍ट्र राज्‍य  सॉफट बॉल संघटना तसेच  वर्धा जिल्‍हा सॉफ्ट बॉल संघटना व विदर्भातील तज्ञ  पंच , अधिकारी  यांचे तांत्रिक सहकार्य या स्‍पर्धासाठी घेण्‍यात येत आहेत. स्‍पर्धांमध्‍ये  राष्‍ट्रीय निवड चाचणी करीता 240 खेळाडू  96 संघ व्‍यवस्‍थापक, 40  पंच व क्रिडा मार्गदर्शक तसेच निवड समिती सदस्‍य  स्‍पर्धांमध्‍ये सहभागी झाले आहेत.
      यावेळी  क्रिडा क्षेत्राचे जीवनगौरव पुरस्‍कार प्राप्‍त सुभाष पीसे, वर्धा शिक्षण मंडळाचे प्रधान मंत्री संजय भार्गव, वर्धा जिल्‍हा सॉफ्ट बॉल संघटनेचे अध्‍यक्ष सुरेश भोंगाडे, प्राचार्य डॉ. अब्‍दुल बारी , प्राचार्य डॉ. ओम महोदय, शिवछत्रपती राज्‍य क्रिडा  पुरस्‍कार  प्राप्‍त प्राध्‍यापक श्रीमती नंदीनी  बोंगाडे, प्रा. किशोर पोफळी, सुधाकर टावरी , नेहरु युवा केन्‍द्राचे विभागीय संघटक संजय माटे, रामराव किटे  आदी क्रिडा प्रेमी  खेळाडू   मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे संचलन श्रीमती सुजाता जोशी यांनी तर आभार जिल्‍हा क्रिडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी मानले.
                                                00000

सहा ग्रामपंचायतीच्‍या निवडणूका 21 ऑक्‍टोंबरला -जयश्री भोज


                                 आचारसंहिता लागू
    वर्धा, दि. 26- सेलू  तालुक्‍यातील   आलगाव  व कारंजा तालुक्‍यातील बोरगाव (गोंडी), सुसुंद, चोपन , बेलगाव  व धर्ती  या सहा  ग्रामपंचायतीच्‍या निवउणूका  जाहीर  झाल्‍या असून, निवडणूका 21 ऑक्‍टोंबर रोजी  असल्‍यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात  आचार संहिता लागू  असल्‍याचे  माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
         राज्‍य निवडणूक आयोगाने  वर्धा जिल्‍ह्यात नोव्‍हेंबर 2012 या कालावधीत  मुदतीत संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या  निवडणूका जाहीर केल्‍या असून, सेलू तालुक्‍यातील  आलगाव व कारंजा तालुक्‍यातील  पाच ग्रामपंचायतींच्‍या  निवडणूकांचा यामध्‍ये  समावेश आहे. त्‍यामुळे  संबधीत  ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक कार्यक्रम झाल्‍या पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे. आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही  याची सर्वांनी दक्षता घ्‍यावी , असे आवाहनही जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                0000

Tuesday 25 September 2012

राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे आज उदघाटन


      वर्धा, दि. 25 – राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे उदघाटन  उद्या बुधवार दिनांक 26 सप्‍टेंबर रोजी दुपारी 3 वाजता  जी.एस.कॉमर्स कॉलेज व जे.बी. सायन्‍स कॉलेज वर्धा चे प्रांगणावर आयोजीत करण्‍यात आला आहे. 
         या स्‍पर्धांसाठी राज्‍यातील अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्‍हापूर  व लातूर या आठ विभागातून  768 खेळाडू  तसेच निवड चाचणीकरीता  240 खेळाडू , 96 संघ व्‍यवस्‍थापक , 40 पंच व क्रिडा मार्गदर्शक, निवडसमिती सदस्‍य सहभागी होणार आहेत.
         राज्‍यक्रिडा संचालनालयातर्फे राज्‍यस्‍तरीय सॉफ्ट बॉल स्‍पर्धाच्‍या आयोजनाची तयारी वर्धा जिल्‍ह्यावर सोपविली असून, स्‍पर्धेत  सहभागी होणा-या सर्व खेळाडूंची निवास व  भोजन व्‍यवस्‍था  करण्‍यात आली आहे. 26 ते 28 सप्‍टेंबर या कालावधीत 14, 17 व 19 वर्षे मुलींच्‍या स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले असून, दि. 29 सप्‍टेंबर ते 1 ऑक्‍टोंबर पर्यंत 14, 17 व 19 वर्षे मुलांच्‍या स्‍पर्धाचे आयेाजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती  जिल्‍हा क्रिडा अधिकारी  श्री. शेट्ये यांनी दिली आहे.
                                                000
         

29 युवती झाल्‍या स्‍वंयसिध्‍दा स्‍टार स्‍वंयरोजगार प्रशिक्षणाची यशस्‍वीता


       वर्धा, दिनांक – ग्रामीण भागातील  सुशिक्षित बेरोजगार  युवक व युवतींना स्‍वंय रोजगाराचे  प्रशिक्षण देऊन  त्‍यांना  रोजगाराच्‍या  संधी उपलब्‍ध  करुन देण्‍याच्‍या  महत्‍वकांक्षी  उपक्रमामुळे 29 युवतींनी तीन आठवड्याचे टेलरींग आणि ड्रेस डिझायनिंगचे  प्रशिक्षण घेऊन स्‍वःताचा व्‍यवसाय करण्‍यासाठी  सज्‍ज  झाल्‍या.
       जिल्‍हा अग्रणी  बँक असलेल्‍या  बँक ऑफ इंडिया, राष्‍ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक तसेच रोजगार व स्‍वंयरोजगार विभागा मार्फत  बेरोजगार  युवक व युवतींना  व्‍यवसायाभिमुख  प्रशिक्षण देऊन  त्‍यांना स्‍वंयरोजगारासाठी   प्रोत्‍साहीत  करण्‍यात येते.
      बँक ऑफ इंडिया च्‍या  स्‍टार स्‍वंयरोजगार  योजनेच्‍या प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये दोन ते चार आठवड्याचे  प्रशिक्षण  आयोजीत करुन  युवकांना  स्‍वंयरोजगारासाठी  मुलभूत  प्रशिक्षण  दिल्‍या जाते. यासाठी  निवास व भोजनाची व्‍यवस्‍था मोफत असून प्रशिक्षणासाठी कोणतेही  शुल्‍क आकारल्‍या  जात नाही. ग्रामीण भागातील 29  युवतींचे  टेलरींग व फॅशन ड्रेस डिझाईनचे प्रशिक्षण पूर्ण  झाले असून , प्रशिक्षणानंतर व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी  या तरुणी  सज्‍ज  झाल्‍या आहेत. विविध बँकातर्फे स्‍वंय रोजगारासाठी अर्थसहाय्यासाठी सुध्‍दा ही संस्‍था  सहाय्य  करणार आहे.
          तीन आठवड्याच्‍या टेलरींग व ड्रेस डिझायनिंग  प्रशिक्षणाचा समारोप राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्‍या जिल्‍हा विकास प्रबंधक  डॉ. स्‍नेहल  बन्‍सोड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्‍यात आला होता.यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, स्‍टार  स्‍वंयरोजगार प्रशिक्षण संस्‍थेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र काळे, विपनन अधिकारी मुरलीधर बेलखोडे  उपस्थित होते.
           प्रशिक्षण यशस्‍वीपणे  पूर्ण झाले असून, आम्‍ही  स्‍वःताचा व्‍यवसाय सुरु करुन आमच्‍या गावातील  इतर भगीनींना रोजगार उपलब्‍ध  करुन देणार असल्‍याची ग्‍वाही यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांनी   दिली. त्‍यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्‍याचे प्रमाणपत्रही यावेळी देण्‍यात आले. तज्ञ मार्गदर्शक असलेल्‍या  श्रीमती शिल्‍पा सायरे यांनी  प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीकडून विविध प्रकारचे  विशेषता महिलांसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या विविध तंयार कापडांचे  प्रदर्शनही यावेळी  लावण्‍यात आले होते.   
      सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी स्‍टार प्रशिक्षण संस्‍थेतर्फे 23 विषयांचे प्रशिक्षण मोफत देण्‍यात येत असून, प्रशिक्षणाचा संपूर्ण  खर्च नाबार्ड, बँक ऑफ इंडिया यांच्‍या मार्फत करण्‍यात येत असून,  राज्‍यातील  स्‍वंयरोजगार प्रशिक्षणाची  एकमेव संस्‍था आहे.  या संस्‍थेतर्फे यावर्षी  सात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आले असून, 187 युवकांना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्‍याची माहिती प्रभारी अधिकारी नरेंद्र काळे यांनी दिली.                                       
00000

Monday 24 September 2012

आयुष निदान व उपचाराचा 1694 रुग्‍णांना लाभ ग्रामीण आरोग्‍य अभियानाचा अभिनव उपक्रम


      वर्धा, दि. 24 –  स्‍वःताच्‍या  आरोग्‍याबद्दल आपण कायमच दुर्लक्ष करीत असतो.  आणि  आयुष्‍याच्‍या  उत्‍तरार्धात  अनेक व्‍याधींनी  ग्रासले जातो. आरोग्‍य निरोगी रहावे,  यासाठी   राष्‍ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत  ग्रामीण जनतेसाठी  मोफत  आयुष निदान व उपचार शिबीर  आयोजीत करण्‍यात आले होते.  या शिबीरामध्‍ये 1694 रुग्‍णांनी  आरोग्‍य तपासणी करुन  घेतली.
          वर्धा जिल्‍ह्यातील  ग्रामीण व  गरीब रुग्‍णांसाठी  जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात  आयुष निदान व उपचार  शिबीरा अंतर्गत  भारतीय विविध चिकित्‍सा पध्‍दतीने  रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये आर्युर्वेदिक चिकित्‍सा पध्‍दतीने 703 रुग्‍णांवर  मोफत चिकित्‍सा , होमीओपॅथीक 508 तर युनानी पध्‍दतीने  483 रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली. आरोग्‍य तपासणीमध्‍ये ज्‍या रुग्‍णांना  विशेषोपचाराची  आवश्‍यकता आहे त्‍यांना तज्ञ डॉक्‍टरांकडे  विशेष तपासणीसाठी   पाठविण्‍यात आले.  तसेच शस्‍त्रक्रिया व इतर वैद्यकीय  उपचारासाठी  तज्ञ डॉक्‍टरांचे  मार्गदर्शनही देण्‍यात आले.
            राष्‍ट्रीय अभियान कार्यक्रम वर्धा अंतर्गत जिल्‍हा प्रशिक्षण केन्‍द्र व सामान्‍य रुग्‍णालयातर्फे  आयोजित करण्‍यात आलेल्‍या  मोफत आरोग्‍य निदान तपासणी शिबीराचे उदघाटन  विदर्भ पाटबंधारे  विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष  आमदार सुरेश देशमुख यांच्‍या हस्‍ते  दिप प्रज्‍वलनाने झाले.
     यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे , नगराध्‍यक्ष  आकाश शेंडे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने   उपस्थित होते.
     भारतीय  चिकित्‍सा पध्‍दतीचा  प्रचार व प्रसार सामान्‍य  जनतेकडून  होण्‍याच्‍या दृष्‍टीने आर्युर्वेदीक योग , निसर्गोपचार, होमीपॅथीक, युनानी चिकित्‍सा पध्‍दतीच्‍या तज्ञ डॉक्‍टरामार्फत  रुग्‍णांची तपासणी करुन  योग, प्राणायम, प्रात्‍याक्षिक , पंचकर्म, जलयीका, रक्‍तमोशन, इलाजबील , तदबीर या पध्‍दतीने  रुग्‍णांवर चिकित्‍सा करुन मोफत औषधोपचार करण्‍यात आला.
       रोगनिदान शिबीरासाठी तज्ञ  म्‍हणून आयुर्वेदीक  विभागाचे डॉ. अर्चना गुंफेवार, डॉ. रेणू राठी, डॉ. सोनाली चलाख, डॉ. सुभाषचंद्र वाष्‍णव , होमीपॅथीक विभागाचे डॉ. अनिल लोणारे, डॉ. किशोर फाले, युनानी विभागाचे डॉ. वाफिक, योग व निसर्गोपचार तज्ञ श्री. वांगे यांनी  रुग्‍णांची तपासणी  केली.
      निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. हे.रा. धामट, तसेच जिल्‍ह्यातील  आरोग्‍य विभागातील तज्ञ डॉक्‍टरांनी  शिबीर आयोजनासाठी   विशेष सहकार्य केले.
          प्रास्‍ताविक डॉ. अनुपमा जनईकर यांनी  तर संचलन डॉ. अश्विनी डोने व डॉ. नखाते यांनी केले. यावेळी रुग्‍णांना मोफत औषधे  वितरीत करण्‍यात आले. 

जलसंवर्धन व पर्यावरण 2 ऑक्‍टोंबर रोजी जिल्‍हास्‍तरीय चित्रकला स्‍पर्धा


      वर्धा, दि. 24- पाणलोट चळवळ विकास कार्यक्रमा अंतर्गत  2 ऑक्‍टोबर रोजी प्राथमिक व माध्‍यमिक विद्यार्थ्‍यांसाठी जिल्‍हास्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्राथमिक गटासाठी  माझे गाव माझी शेती व माध्‍यमिक गटासाठी  समस्‍या वाढत्‍या पाणी टंचाईच्‍या या विषयावर चित्रकला स्‍पर्धा होणार आहे.
     राज्‍य शासनाच्‍या  कृषी विभागातर्फे या स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले असून, मृद व जलसंधारण  व नैर्सर्गिक साधन संपत्‍तीचे जतन व पर्यावरण या विषयाबद्दल  विद्यार्थ्‍यांना  जिज्ञासा निर्माण व्‍हावी  तसेच  पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्‍यांचा सहभाग वाढावा यासाठी या स्‍पर्धांचे आयेाजन करण्‍यात आले आहे.  
        जिल्‍हास्‍तरीय  चित्रकला स्‍पर्धेसाठी स्‍पर्धकांना शासनातर्फे   ड्राईंग शिट पुरविण्‍यात येईल. पेन्‍सील, रंग व इतर आवश्‍यक साहित्‍य स्‍पर्धकांना  स्‍वःता  आणायचे असून, स्‍पर्धा  2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 9 वाजता लोकविद्यालय , बॅचलर रोड, आर्वी नाका , वर्धा रोड येथे  आयोजित करण्‍यात आले आहे.
     स्‍पर्धेसाठी  प्राथमिक गटात  माझे गाव माझी शेती  या विषयावर 35 बाय 28 सेंटीमीटर आकाराच्‍या ड्राईंग शिटवर तसेच माध्‍यमिक गटाकरीता  समस्‍या वाढत्‍या, पाणी टंचाईच्‍या या  विषयावर 35 बाय 28 सेंटीमीटर आकाराच्‍या ड्राईंग शिटवर वाटर कलर  व पोस्‍टर कलर  चित्र काढायचे आहेत. स्‍पर्धेमध्‍ये प्रथम आलेल्‍या  विद्यार्थ्‍यांस  अनुक्रमे दोन हजार, एक हजार व पाचशे रुपये  तसेच माध्‍यमिक गटातील  प्रथम क्रमांकास  चार हजार, व्दितीय दोन हजार पाचशे व तृतीय एक हजार पाचशे रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात येईल.  
     जिल्‍हा स्‍तरावरील दोन्‍ही गटातील प्राविण्‍यप्राप्‍त  विद्यार्थ्‍यांचे चित्र विभाग व राज्‍य स्‍तरावर पाठवून तयामधून त्‍या त्‍या स्‍तरावर निवड करण्‍यात येणार आहे. विद्यार्थ्‍यांना   या स्‍पर्धांमध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्‍हावे असे आवाहन  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
                                                   000000
       

Sunday 23 September 2012

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांची सेवाग्राम आश्रमाला भेट · नक्षल समस्‍या आणि विकासाची दिशा यावर विचार मंथन


          वर्धा, दि. 23 – केंद्रीय ग्राम विकास मंत्री जयराम रमेश  यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीस भेट देवून संपूर्ण आश्रम परिसराची पहाणी केली. तसेच सेवाग्राम परिसरात सुरु असलेल्‍या विविध उपक्रमाची माहिती घेतली.
          सेवाग्राम येथील बापू कुटीच्‍या परिसरात नक्षलवादी हिंसा थांबविण्‍यासाठी गांधीजींचा विचार याविषयावर आयोजित विचार मंथन बैठकीतही जयराम रमेश सहभागी झाले होते. या विचार मंथन बैठकीचे आयोजन गांधीवादी विचारवंत डॉ. सुगंध बरठ यांनी केले होते.
          सर्वसेवा संघाच्‍या अध्‍यक्ष श्रीमती राधाबेन भट यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नक्षलवादसे बढती हिंसा और गांधीजनकी भुमिका या विषयावर या बैठकीत जेष्‍ठ  गांधीवादी विचारवंत यांनी आपली भूमिका मांडली. दंडकारन्‍यांमध्‍ये शांतीचे कार्य पुढे सुरु ठेवण्‍यासाठी गांधी विचारांची बैठक तसेच या भागातील विकासाची दिशा ठरवून ती कशी पुढे सुरु ठेवता येईल या विषयावर प्रामुख्‍याने यावेळी  चर्चा करण्‍यात आली.
          नक्षलग्रस्‍त भागांचा विकास साधतांनाच संवेदन सुरक्षेच्‍या दृष्‍टीने पावले टाकणे , राजकीय प्रक्रियेतून स्‍थानिक नेतृत्‍व विकसित व्‍हावे तसेच विकासासंदर्भात लोकांमध्‍ये जागृती निर्माण करावी  आणि गांधीजींच्‍या विचारांनी अहिंसक, मानविय व विकासात्‍मक दृष्‍टीकोण ठेवून ग्रामीण भागांचा विकास आदि विषयावर यावेळी विचार मंथन करण्‍यात आले.  
          यावेळी डॉ. सुमंत बरठ यांच्‍यासह नारायणदास, शशिभाई, राधाबेन भट, डी.के.मनिष,आदित्‍य पटनायक, एम. तेजस्‍वानी, आशिशकुमार, के.एस.गोपाल, श्रीकांत बाराहाते, अविनाश काकडे, मोहन हिराभाई हिरालाल, शंकर दत्‍त, देवाजी तोफा, डॉ.सुरेश साहू, रजत अवसत, तेजस्‍ती, तसेच जेष्‍ट गांधीवादी विचारवंत यावेळी उपस्थित होते.
                             सेवाग्राम आश्रमाला भेट
       केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी आज सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. त्‍यावेळी सेवाग्राम आश्रम पतिष्‍टानचे अध्‍यक्ष मा.म. गडकरी, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय  भागवत, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक बी.एस.मोहन, उपविभागीय अधिकारी हरिश  धार्मिक, तहसीलदार सुशांत बनसोड आदि अधिकारी व पदाधिका-यांनी स्‍वागत केले.
0000