Thursday 27 September 2012

सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत नोंदणी झालेल्‍या सर्व अपंग विद्यार्थ्‍यांना वैद्यकीय प्रमाणपत्र -संजय भागवत


        

* जिल्‍ह्यात 5 हजार 681 विद्यार्थ्‍यांचा समावेश
* विशेष शिबीर  आयोजीत करुन प्रमाणपत्र देणार

          वर्धा, दि. 27- शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या आरोग्‍य तपासणीमध्‍ये  नोंदणी झालेल्‍या जिल्‍ह्यातील 6 ते 18 वयोगटातील  सुमारे  5 हजार 681  विद्यार्थ्‍यांना  वैद्यकीय प्रमाणपत्र देण्‍यासाठी  तालुका तसेच जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामध्‍ये  विशेष शिबीराचे आयोजन करुन  सर्वांना  प्रमाणपत्र देण्‍याच्‍या सुचना अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत   यांनी  आज दिल्‍यात.
      जिल्‍हाधिकारी  कार्यालयाचे सभागृहात  जिल्‍हास्‍तरीय  अपंग कल्‍याण समितीची बैठक अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी   मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
         विद्यार्थ्‍यांमध्‍ये  असलेल्‍या  अपंगत्‍वाबाबत  वैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी  करुन   त्‍यानुसार   त्‍यांना प्रमाणपत्र देण्‍यासाठी विशेष शिबीर आयोजीत करावे, अशा सुचना करताना अपंग असलेल्‍या  विद्यार्थ्‍यांना  व सर्वसामान्‍य अपंगांना सायकलीचे वाटप , श्रवण यंत्र, अस्थिव्‍यंग  साहित्‍य तसेच लोव्हिजन साहित्‍यामध्‍ये मोठ्या अक्षरातील पुस्‍तके, दोन मॅग्‍नीफायर , बुकसिफ मॅग्‍नीफायर , वाचन करण्‍यासाठी असलेल्‍या सुविधा  आदी पुरविण्‍यात याव्‍यात  यासाठी  विशेष मोहीम राबवावी अशी सुचनाही संजय भागवत यांनी केली.
          शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या  तपासणी मध्‍ये  144 अस्थिव्‍यंग विद्यार्थ्‍यांपैकी 73 ट्रायसिकलचे  वाटप करण्‍यात आले असून, 77 श्रवणयंत्र साहित्‍य, 245 अस्थिव्‍यंग साहित्‍य तसेच 249 लोव्हिजन साहित्‍य वितरीत करण्‍यात आल्‍याचे यावेळी बैठकीत सांगण्‍यात आले.
           अपंग व्‍यक्‍ती –समान संधी , हक्‍काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 व अपंग कल्‍याण  कृती आराखडा 2001  तसेच  राष्‍ट्रीय विश्‍वस्‍त अधिनियम 1999 ची  प्रभावी  अंमलबजावानी करण्‍यासाठी  जिल्‍हा‍स्‍तरावर अपंग कल्‍याण समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  त्‍यानुसार अपंगांना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्‍त झालेल्‍या  व होणा-या  आवश्‍यक सुविधा अपंगांना स्‍वयंरोजगारासाठी  बिजभांडवल  योजने अंतर्गत कर्ज प्रकरणांची मंजूरी   व अपंगाचे  सर्व्‍हेक्षण , मुळातच अपंगत्‍व  येवू नये याकरीता  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आदींबाबत यावेळी  चर्चा करण्‍यात आली.
                           अपंग कल्‍याणासाठी   तीन टक्‍के निधी
          अपंग कल्‍याणाच्‍या  विविध योजना राबविण्‍यासाठी  वर्धा जिल्‍हा  परिषदेने  शेष फंडामधून तीन टक्‍के   निधी   14 लक्ष  90 हजार रुपये   उपलब्‍ध   करुन दिला आहे. या अंतर्गत    अपंग विवाहीत जोडप्‍यांना   प्रोत्‍साहन व आर्थिक सहाय्यासाठी तीन लक्ष रुपये , अपंगांना व्‍यवसायासाठी   पिकोफॉल शिलाई  मशीन , तीन चाकी  सायकल,  श्रवण यंत्रे यासाठी   प्रत्‍येकी    तीन लक्ष रुपये तसेच   रोगनिदान व शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी   3 लक्ष 90 हजार रुपयाचा निधी राखून ठेवण्‍यात आला असल्‍याची माहिती  समाज कल्‍याण अधिकारी श्रीमती  जया राऊत यांनी दिली.
         यावेळी   जिल्‍हास्‍तरीय अपंग कल्‍याण समितीचे सदस्‍य अमोल विजय चव्‍हाण , मधुकर टोनपे, दिनकर अंबुलकर, छाया अंबोरे, डॉ. एस.जी. निमगडे, डॉ. शबाना मोकाशी, जिल्‍हा समन्‍वयक अधिकारी  प्रविन गौतम , कमलेश पिसाळकर, जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे  आदी  विभागाचे  प्रतिनीधी तसेच अपंग पुनर्वसन केन्‍द्र, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार माहिती केन्‍द्र, अशासकीय सदस्‍य , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सहाय्यक सल्‍लागार  आदी बैठकीला उपस्थित होते.
                                                0000
       


No comments:

Post a Comment