Tuesday 25 September 2012

29 युवती झाल्‍या स्‍वंयसिध्‍दा स्‍टार स्‍वंयरोजगार प्रशिक्षणाची यशस्‍वीता


       वर्धा, दिनांक – ग्रामीण भागातील  सुशिक्षित बेरोजगार  युवक व युवतींना स्‍वंय रोजगाराचे  प्रशिक्षण देऊन  त्‍यांना  रोजगाराच्‍या  संधी उपलब्‍ध  करुन देण्‍याच्‍या  महत्‍वकांक्षी  उपक्रमामुळे 29 युवतींनी तीन आठवड्याचे टेलरींग आणि ड्रेस डिझायनिंगचे  प्रशिक्षण घेऊन स्‍वःताचा व्‍यवसाय करण्‍यासाठी  सज्‍ज  झाल्‍या.
       जिल्‍हा अग्रणी  बँक असलेल्‍या  बँक ऑफ इंडिया, राष्‍ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक तसेच रोजगार व स्‍वंयरोजगार विभागा मार्फत  बेरोजगार  युवक व युवतींना  व्‍यवसायाभिमुख  प्रशिक्षण देऊन  त्‍यांना स्‍वंयरोजगारासाठी   प्रोत्‍साहीत  करण्‍यात येते.
      बँक ऑफ इंडिया च्‍या  स्‍टार स्‍वंयरोजगार  योजनेच्‍या प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये दोन ते चार आठवड्याचे  प्रशिक्षण  आयोजीत करुन  युवकांना  स्‍वंयरोजगारासाठी  मुलभूत  प्रशिक्षण  दिल्‍या जाते. यासाठी  निवास व भोजनाची व्‍यवस्‍था मोफत असून प्रशिक्षणासाठी कोणतेही  शुल्‍क आकारल्‍या  जात नाही. ग्रामीण भागातील 29  युवतींचे  टेलरींग व फॅशन ड्रेस डिझाईनचे प्रशिक्षण पूर्ण  झाले असून , प्रशिक्षणानंतर व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी  या तरुणी  सज्‍ज  झाल्‍या आहेत. विविध बँकातर्फे स्‍वंय रोजगारासाठी अर्थसहाय्यासाठी सुध्‍दा ही संस्‍था  सहाय्य  करणार आहे.
          तीन आठवड्याच्‍या टेलरींग व ड्रेस डिझायनिंग  प्रशिक्षणाचा समारोप राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्‍या जिल्‍हा विकास प्रबंधक  डॉ. स्‍नेहल  बन्‍सोड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्‍यात आला होता.यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, स्‍टार  स्‍वंयरोजगार प्रशिक्षण संस्‍थेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र काळे, विपनन अधिकारी मुरलीधर बेलखोडे  उपस्थित होते.
           प्रशिक्षण यशस्‍वीपणे  पूर्ण झाले असून, आम्‍ही  स्‍वःताचा व्‍यवसाय सुरु करुन आमच्‍या गावातील  इतर भगीनींना रोजगार उपलब्‍ध  करुन देणार असल्‍याची ग्‍वाही यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांनी   दिली. त्‍यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्‍याचे प्रमाणपत्रही यावेळी देण्‍यात आले. तज्ञ मार्गदर्शक असलेल्‍या  श्रीमती शिल्‍पा सायरे यांनी  प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीकडून विविध प्रकारचे  विशेषता महिलांसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या विविध तंयार कापडांचे  प्रदर्शनही यावेळी  लावण्‍यात आले होते.   
      सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी स्‍टार प्रशिक्षण संस्‍थेतर्फे 23 विषयांचे प्रशिक्षण मोफत देण्‍यात येत असून, प्रशिक्षणाचा संपूर्ण  खर्च नाबार्ड, बँक ऑफ इंडिया यांच्‍या मार्फत करण्‍यात येत असून,  राज्‍यातील  स्‍वंयरोजगार प्रशिक्षणाची  एकमेव संस्‍था आहे.  या संस्‍थेतर्फे यावर्षी  सात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आले असून, 187 युवकांना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्‍याची माहिती प्रभारी अधिकारी नरेंद्र काळे यांनी दिली.                                       
00000

No comments:

Post a Comment