Friday 14 December 2018



जिल्ह्यात एकही टँकर लागणार नाही असे नियोजन करा
                                                      - चंद्रकांतदादा पाटील
       - दुष्काळ आढावा बैठक

 
वर्धा दि 14 :-
  दुष्काळात अन्नधान्याची कमतरता अन्नधान्य दुसऱ्या राज्यातून किंवा  विदेशातून आयात करून पूर्ण करता येते. चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी चारा छावण्या  सुरू करता येतात. पण पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाणी आयात करू शकत नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये एकाही गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा  लागू नये यासाठी  पाण्याचे योग्य नियोजन करावे.किरकोळ  नादुरुस्त असलेल्या पाणी पुरवठा योजना दुरुस्त करून सुरू ठेवाव्यात असे निर्देश महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेत.
        आर्वी येथील नगर परिषद सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थतिचा  आढावा घेतला, यावेळी श्री पाटील बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने उपस्थित होते.

         राज्यात कुठेही पाण्यासाठी टँकर लावावा लागू नये यासाठी नियोजन करीत असल्याचे सांगून त्यांनी टँकर मुळे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आणि मिळालेले पाणी लोक शुद्ध करून पित नाहीत. तसेच टँकरमधील भ्रष्टाचार हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जिथे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत तिथे पाण्याचे नियोजन आतापासून करायला पाहिजे. पाऊस उशिरा सुरू झाला तरी पाणी पुरले पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
          दुष्काळी भागात शेतीची कामे लवकर संपली आहेत. त्यामुळे कामासाठी लोकांचे स्थलांतर होऊ नये यासाठी रोहयोची कामे लवकर सुरू करावीत. यामध्ये फळबागलागवड, विहीर आणि प्राथमिक शाळांचे आवार  भिंतीचे काम घेण्यात यावे. चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी गाळपेर जमिनीवर चारा लागवड करण्यात यावी असेही त्यांनी निर्देश दिलेत.

        शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेतक-यांना सुखी करण्यासाठी अधिकाऱयांनी शेतकरी हिताच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या पाहिजेत असेही ते यावेळीम्हणाले. यावर्षी कर्जाची गरज होती पण कर्ज मिळाले नाही किंवा मिळू शकले नाही अशा शेतकऱयांनी त्यांची गरज कशी भागवली याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना सांगितले. यावेळी त्यांनी तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी  गावातील परिस्थितीची माहिती करून घेतली.
        बैठकिच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात आष्टी आणि कारंजा तालुक्यात संपूर्ण मंडळात दुष्काळ आहे तर समुद्रपूर आणि देवळी मधील काही मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यात एकूण 26 मंडळामध्ये दुष्काळ असल्याचे श्री नवाल यांनी सांगितले. पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी केवळ 32 हेक्टर मध्ये रब्बीची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

          जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई नसून पुढेही चारा टंचाई भासू नये म्हणून 7 लक्ष 62 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. तसेच यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 लक्ष रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. सद्य स्थितीत एकाही गावात टँकर नाही. मात्र मार्च महिन्यानंतर मागील वर्षी ज्या 4 गावात टँकर लागला होता त्या गावात टँकर लागू शकतो. पण तो लागू नये यासाठी सुद्धा नियोजन केले आहे. शहरी भागात आतापासून पाणी कपात करण्यात येत असून दोन दिवस आड पाणी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोहयोमधून शेल्फवर कामे तयार आहेत. त्यासाठी 154 कोटीचे नियोजन केल्याचे श्री नवाल यांनी सांगितले
      या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ विद्या मानकर,  जिल्हा परिषद लघुसिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, इतर विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपास्थित होते.
                                                                        00000

Wednesday 21 November 2018



                                 बॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी.
                                                             -गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
    *सोनेगाव आबाजी येथील घटनास्थळी भेट.
वर्धा दि :-  सोनेगाव आबाजी येथील डिमोलेशन डेपो मध्ये झालेल्या स्फोटाच्या ठिकाणाचे पाहणी आज गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी केली. यावेळी खमरिया ऑडनन्स फॅक्टरी आणि पुलगाव दारुगोळा भांडार येथील अधिका-यांकडुन घटनेची  माहिती घेतली. जुने बॉम्ब नष्‌ट करतांना सुरक्षिततेच्या दृष्टिीकोनातुन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना श्री. अहिर यांनी संबंधित अधिका-यांना दिल्यात.
            बॉम्ब नष्ट करतांना आजुबाजुच्या गावांना हादरा बसतेा यासाठी एकावेळी नष्ट करण्यात येणा-या बॉम्बची संख्या कमी करावी. असे त्यांनी सागितले. परराज्यातुन बॉम्ब आणतांना काय काळजी घेतली जाते, वाहतुक कशाने केली जाते याबद्दल त्यांनी चौकशी केली. तसेच हे बॉम्ब त्याचठिकाणी का नष्ट केले जात नाहीत, अशी विचारणा केली असता खमरिया येथील अधिका-याने जबलपुर येथील जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच डिमोलेशन डेपोमध्ये प्रवेश देतांना गावक-यांची पडताळणी केली जात नाही का असा प्रश्नही यावेळी श्री. अहिर यांनी उपस्थित केला. तसेच बॉम्ब नष्ट करण्यासाठी सुरक्षिततेचे कोणते नियम पाळण्यात येतात. मजुरांना प्रशिक्षण दिले जाते किंवा नाही. आदी बाबींची चौकशी त्यांनी केली.
            या घटनेसंदर्भातील चौकशी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी पुलगाव आणि खमरिया येथील अधिका-यांना दिलेत.

00000








                                 चौकशीअंती दोषींवर  कारवाई करणार
                                                             -गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
*गावाच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्यात येईल.
केंद्र शासनाकडून मृत्यू आणि जखमी झालेल्यांना मदत देणार

वर्धा दि :-  पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारच्या डिमोलेशन कॅम्प मध्ये काल झालेल्या दुर्दैवी अपघातात   मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांच्या दुःखात केंद्र शासन सहभागी आहे. या सर्व घटनेची उच्चचस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सोनेगाव आबाजी येथील कुटुंबियांचे सांत्वन श्री अहिर यांनी आज सोनेगाव आबाजी येथील आबाजी महाराज मंदिरात केले. यावेळी खासदार रामदास तडस,  जिल्हा परिषद सदस्य वैशाली येरावार, प्रभारी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, राजेश बकाने उपस्थित होते.
ठेका मिळालेल्या कंत्राटदाराने मंजुरांचा विमा काढलेला होता का?  भविष्य निर्वाह निधी, मजुरांना बॉम्ब हाताळण्यासाठी देण्यात येणारे ट्रेनिग, सुरक्षितता साहित्य आदी बाबींचे नियमानुसार  पालन केले की नाही याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे श्री अहिर यांनी यावेळी सांगितले. माणसांचा जीव महत्वाचा असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलगाव दारुगोळा भांडारात अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी नियोजनपूर्वक उपाययोजना करण्यात येतील. यासाठी डीमोलेशन कॅम्प मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे, विनापरवानगी आतमध्ये येण्यावर बंदी घालणे,गावातील लोकांना पासेस देणे इत्यादी उपाययोजना  करण्यात येतील. विना परवानगी आतमध्ये येऊ देणाऱ्या डेपोच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमध्ये ठार झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना आणि जखमी व्यक्तींना केंद्र शासनाकडूनही मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री यांनी तात्काळ निर्णय घेऊन  राज्य शासनाकडून मयत आणि जखमी व्यक्तींसाठी तात्काळ मदत जाहीर केली यासाठी राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले. यावेळी जबलपुर येथील खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी कडुन या घटनेत ठार झालेल्या  पाच मजुरांच्या कुटुंबियांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे  वितरण श्री. अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या आणि गावकऱ्यांच्या  मागण्या श्री अहिर यांनी यावेळी  ऐकून घेतल्या.  डेपोमध्ये आजूबाजूच्या गावातील  बेरोजगारांची भरती करावी, गावाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच ठेकेदार आणि डेपोच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱयांनी  केली.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी पुलगाव येथील दारुगोळा भांडारमुळे सोनेगाव आणि आजूबाजूच्या गावांना मोठा धोका असून याचा त्रास गावकऱ्यांना होतो. त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि घटनेची सखोल चौकशीची मागणी केली.
गृहराज्यमंत्र्यांनी रुग्णालायत घेतली  जखमींची भेट
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी प्रथम शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घटनेतील जखमी व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली. तसेच रुग्णालयामार्फत करण्यात आलेल्या उपचाराची डॉक्टरांकडून माहिती घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सावंगी मेघे रुग्णालयात जखमी व्यक्तींवर तातडीने उपचार करण्यात आले.तसेच 5 व्यक्तींवर  छाती, पाय आणि पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली.तात्काळ, योग्य व चांगले उपचार  दिल्याबाबत त्यांनी रुग्णालयाचे आभार मानले .  पत्रकारांशी बोलताना त्यांनी संबंधित कंत्राटदाराने आणि अधिका-यांनी नियमांचे पालन केले की नाही याची तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय  चौकशीतून सर्व माहिती समोर येईल आणि चौकशीत दोषी आढळलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईलअसे सांगितले.

000000










         बॉम्ब हाताळताना झाला स्फोट
• 6 जण ठार , 11 जखमी
• जबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी.
• सावंगी मेघे रुग्नालयात जखमींवर उपचार


      वर्धा दि 20 :- पुलगाव दारुगोळा भांडार च्या बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानात मुदतबाह्य झालेले  बॉम्ब नेहमी निकामी करण्यात येतात. इथे जबलपूर (मध्यप्रदेश ) येथून आलेले बॉम्ब  निकामी करत असतांना मजुर बॉम्ब ची पेटी हाताळताना  बॉम्ब  खाली पडून त्याचा स्फोट झाला व त्यामुळे पेटीतील इतर बॉम्बचाही स्फोट  झाला.  यामध्ये 4 जणांचा  जागीच मृत्यू झाला. तर 2 व्यक्तींचा  सावंगी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला असून 11  जण जखमी झाले आहेत. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
         वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे लष्करी दारू गोळा भांडार आहे. या दारुगोळा भांडारात बनविण्यात आलेले मात्र  वापरण्यात न आलेले मुदतबाह्य झालेले बॉम्ब  तसेच इतर ठिकाणाहून आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी सोनेगाव आबाजी, केळापूर आणि जामणी या तीन गावांचा सुमारे 1 हजार एकर चा भूभाग  अधिग्रहित करण्यात आलेला आहे. आज  20 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 7 वाजता दरम्यान जबलपूर मधील खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी मधील  बॉम्ब निकामी करण्यासाठी आणण्यात आले होते.  यावेळी मजूर बॉम्बची पेटी वाहून नेताना  त्यातील बॉम्ब खाली पडून त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे पेटीतील इतर बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात 4 मजुरांचा जागीच मृत्यू झाला.  तर 2 व्यक्ती रुग्णालयात दाखल करताना रस्त्यातच  मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. मृत्यू झालेल्यांमध्ये  5 स्थानिक मजूर असून एक खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरीतील तंत्रज्ञ आहे.  या स्फोटात 11  व्यक्ती जखमी झाल्या  असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. सर्व जखमीवर शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनास्थळी मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये सोनेगाव आबाजी येथील विलास लक्ष्मणराव पचारे (40), नारायण श्यामराव  पचारे (55),  केळापूर येथील प्रवीण प्रकाश मुंजेवार (25),  जबलपूर येथील उदयपीर सिंग (27),
दवाखान्यात मृत्यू झालेल्या व्यक्ती
प्रभाकर रामराव वानखेडे (40) रा.  सोनेगाव (आ), संजयकुमार राहुल भोवते (23),रा केळापूर,

रुग्णालयात दाखल जखमी व्यक्ती 
1) विकास शेषराव बेलसरे रा. सोनेगाव (आ)
2) संदीप शंकर पचारे, रा.सोनेगाव( आ)
3) रुपराव सीताराम नैताम, रा. सोनेगाव (आ)
4) हनुमंत सराटे रा सोनेगाव (आ)
5) निलेश मुन सोनेगाव (आ)
6) दिलीप निमगरे, रा. केळापूर
7) मनोज मोरे, रा.केळापूर
8) मनोज सयाम, रा. जामणी
9) प्रवीण सिडम, रा. जामणी
10) प्रशांत मडावी, रा. जामणी
11) इस्माईल शहा, रा. जामणी

      या स्फोटात मृत्यू पावलेले  उदयविर सिंग हे मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील चंदोशी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेण्यात येत आहे.
 
       जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रुग्णालायत जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या स्फोटात मृत्यू झालेल्या मजुरांच्या वारसांना आणि जखमी झालेल्या मजुरांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी त्यांचे सविस्तर प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाला तात्काळ पाठविण्यात येतील असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
0000
पुलगांव ‍ केंद्रीय दारुगोळा भांडारातील स्फोट प्रकरणातील मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहिर
*गंभीररीत्या जखमीना 2 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार*
वर्धा जिल्हयातील पुलगांव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी  करताना झालेल्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहिर करण्यात आले असून या स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य जाहिर करण्यात आले आहे.
            अर्थमंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेत चर्चा केली. या चर्चेदरम्यान मृतकांच्या कुटुंबियांना व जखमीना वरीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
            या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी व समितीने एका महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व आयुध निर्माणी कारखान्यांच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षे संबंधीच्या व्यवस्थांचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही  देण्यात आले आहेत.
                                                            0000