Thursday 29 December 2016

शासकिय कामकाज हिंदीतून व्‍हावे
                                               -डॉ. महेंन्‍द्रनाथ पाण्‍डेय
Ø म.गां.अ.हिं.वि.स्‍थापना दिवस समारंभ
Ø हिंदी भाषा क्षेत्रात कार्य करणा-या साहित्यिकांचा सत्‍कार
वर्धा, दि.29- हिंदी ही राजभाषा आहे. ती देशात सर्वात जास्‍त बोलली जाणारी लोकभाषा आहे. तरीही हिंदी भाषा दैनावस्‍थेकडे जात आहे. हिंदी भाषेची ही अवस्‍था बदलण्‍यासाठी शासकिय कामकाज  हिंदी भाषेतून होण्‍याची गरज असल्‍याचे  प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास राज्‍यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पाण्‍डेय यांनी केले.
          महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍व विद्यापिठाच्‍या  19 व्‍या स्‍थापना दिवसाच्‍या उद्घाटन  समारंभा  प्रसंगी श्री. पांण्‍डेय  मुख्‍य अति‍थी म्‍हणुन बोलत होते. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी विद्यापिठाचे कुलगुरु प्राध्‍यापक गिरीश्‍वर मिश्र, तर मुख्‍यवक्‍ता म्‍हणुन इंद्रनाथ चौधरी होते. तसेच प्रतिकुलगुरु आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र तसेच हिंदी सेवी सन्‍मानप्राप्‍त प्राध्‍यापक रंजना अरगडे, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा.टी.आर. भट्ट उपस्थित होते.
          हिंदी भाषेला सामर्थ्‍यशाली बनविण्‍यासाठी साहित्‍य, कला, संगीत या विषयांसोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा आणि संशोधन सारख्‍या विषयांचे शिक्षण हिंदी भाषेतून देण्‍याइतके या भाषेला सक्षम करावे. हिंदी भाषीक नसलेल्‍या राज्‍यांमध्‍ये सुध्‍दा हिंदी भाषा शिक्षकाला उत्‍तम पगार मिळतो. त्‍यामुळे हिंदी भाषेला चांगले भविष्‍य आहे.म्‍हणुनच   हिंदी भाषेतून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांनी हे कमी पणाचे न मानता अभिमानाची बाब असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          वर्धा हे ऊर्जा आणि प्रेरणा देणारे तीर्थक्षेत्र आहे. भारतीय स्‍वातंत्र्याचा इतिहास वर्धेच्‍या उल्‍लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी आणि विनोबा भावे यांच्‍या कार्यांने पावन झालेल्‍या या भूमित विद्यार्थ्‍यांना शिक्षण घेण्‍याची संधी मिळते, ही गौरवाची बाब आहे. आजही विदेशात महात्‍मा गांधीनी अहिंसा आणि सत्‍याग्रहाच्‍या आंदोलनातून स्‍वातंत्र्य  कसे मिळविले  याचे संशोधन सुरु आहे. महात्‍मा गांधीच्‍या नावाने सुरु झालेल्‍या या हिंदी विश्‍व विद्यापिठाच्‍या विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्‍याची हमी त्‍यांनी यावेळी दिली.
          कुलगुरु गिरीश्‍वर मिश्र म्‍हणाले, हिंदी विश्‍वविद्यापिठामध्‍ये केवळ हिंदी साहित्‍याचेच अध्‍ययन होत नाही तर अनेक सॉफ्टवेअर सुध्‍दा हिंदी भाषेत  या विद्यापिठाने तयार केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान  हे  विषय हिंदीतून सुरु करण्‍यासाठी प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला आहे. हिंदीचे महत्‍व असणारे मंत्री या विद्यापिठाच्‍या स्‍थापना दिवस कार्यक्रमाला उपलब्‍ध होणे हे आमच्‍यासाठी अमुल्‍य भेट असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. हिंदी भाषेला समृध्‍द करण्‍यासाठी हे विद्यापिठ नेहमीच पुढाकार घेईल असे आश्‍वासन सुध्‍दा त्‍यांनी यावेळी दिले.
          या कार्यक्रमात प्राध्‍यापक रचना अरगडे यांच्‍याकडून संपादित आणि हिंदी विश्‍व विद्यापिठाकडून प्रकाशित हिंदीतील श्रेष्‍ठ कवी समशेर बहादूरसिंग यांच्‍या रचानावलीचे अतिथीच्‍या हस्‍ते विमोचन करण्‍यात आले. तसेच विद्यापिठाचे कॅलेंडर व दैनंदिनीचे सुध्‍दा प्रकाशन करण्‍यात आले. हिंदी भाषा क्षेत्रामध्‍ये सृजनात्‍मक कार्य करणा-या प्रा. रंजना अरगडे, डॉ. चंद्रकांत पाटील, अमिताभ शंकरराय चौधरी, प्रा. टी.आर. भट्ट, प्रा. इंद्रनाथ चौधरी यांचा शाल श्रीफळ आणि सन्‍मानपत्र देऊन मान्‍यवरांचे हस्ते  गौरव करण्‍यात आला.
          कार्यक्रमाचे स्‍वागतपर प्रास्‍ताविक  प्रतिकुलपती प्रा. आनंदवर्धन शर्मा यांनी केले तर संचालन प्रा. प्रिती सागर आणि आभार कुलसचिव डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र यांनी वयक्‍त केले. कार्यक्रमाला हिंदी साहित्‍य क्षेत्रातील मान्‍यवर साहित्‍यीक सुर्यबाला, कुमुद शर्मा, डॉ. उषा शर्मा तसेच शहरातील मान्‍यवर साहित्‍यीक आणि विद्यापिठातील प्राध्‍यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
                                                0000