यशकथा


बिछायत व्यवसायाच्या माध्यमातून शिवाणी महिला बचत गटाची भरारी
सोमवार, २६ सप्टेंबर, २०११


ग्रामीण व शहरी लोकांकडे होणा-या समारंभात किंवा किरकोळ स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आकर्षण बिछायतीच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाच्या कार्यक्रमात बिछायतीचे साहित्य महत्वाची भूमिका पार पडत असते. शिवाणी महिला बचत गटाने चालविलेले बिछायत केंद्र परिसरात उत्तम सेवा देणारी ठरत असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देवळी तालुक्यातील पुलगाव शहरालगत गुंजखेडा येथील वल्लभनगर येथे शिवाणी महिला बचत गट १ फेब्रुवारी २००८ रोजी स्थापन झाला. या बचतगटाने परिश्रमपूर्वक उत्तम कामगिरी केल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने दखल घेवून बिछायतीचे साहित्य खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यासाठी या महिला बचत गटाला १ लाख २० रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान केली.

या बचत गटाविषयी माहिती जाणून घेतांना शिवाणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिला कडू म्हणाल्या की, गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये बचतगटाविषयी मार्गदर्शन तत्कालीन ग्रामसेवक यांनी दिली. या बैठकीला मी आणि गटातील महिला आग्रहपूर्वक उपस्थित होतो. शंका कुशंका दूर झाल्यानंतर आम्ही महिला ३० जानेवारी २००८ रोजी माझ्याच घरी बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीमध्ये बचतगटाचे नाव बचतीसाठी रकमेचे निर्धारण आणि भविष्यात करावयाचा व्यवसाय याविषयी चर्चा करुन बचत गटाला शिवाणी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मासिक ३० रुपये बचत करुन बिछायतीचा व्यवसाय सर्वानुमते निवडण्यात आला.

बचत गटातील प्रत्येक महिलेने ३० रुपये बचत करुन १२ महिलेची एकत्रीत रक्कम गोळा केल्यानंतर लगेच तिस-या महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचत गटाचे खाते उघडण्यात आले. प्रत्येक महिन्याला ३६० रुपये प्रामाणिकपणे भरण्यात येत होते. वर्षाला ४ हजार ३२० रुपये बँकेत जमा झाले. दुस-या वर्षाला मागील रकमेची जमा मिळून बचत गटाच्या खात्यावर ८ हजार ६४० रुपये जमा झाले. बचत गटातील महिला गरीब असल्यामुळे पदोपदी त्यांचे कुटूंबामध्ये पैशाची गरज भासत असते. ही गरज गटात जमा झालेल्या रकमेतून करण्यात येत असते. या बचतीच्या रकमेतून काही महिलांना आपला स्वत:चा वेगळा व्यवसाय उभारला तर काही महिलांनी कुटुंबातील सदस्याच्या पाठ्य पुस्तकासाठी तसेच औषधोपचारासाठी खर्च केला आहे.

बचत गटातील सदस्य अनुसया गवळी यांनी फेब्रुवारी २०१० रोजी ६ हजार रुपये अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजाने जुन्या ऑटोच्या रिपेअरींगसाठी घेतले. सदर्हू ऑटो त्याचे पती चालवित असून ऑटो पासून सर्व खर्च वजा जाता २०० रुपये प्रत्येक दिवसाला कमाई होते. आता पर्यंत ४ हजाराची परतफेड केली असून व्याज सुध्दा त्यांनी भरले आहे. 

वनिता चुबलवार या सदस्या महिलेने गटातून ८ हजाराचे अंतर्गत कर्ज डिसेंबर २००९ रोजी धान्य व्यवसायासाठी घेतले होते. बचत गटातील प्रत्येक महिला त्यांच्या धान्य दुकानातून धान्य व इतर वस्तू खरेदी करतात तसेच हा व्यवसाय सुध्दा चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे त्यांचे कुटूंब या व्यवसायावर उपजिवीका चालवित आहे. उचल रकमेची सर्व रक्कम परतफेड केली असून अजून दुकानामध्ये ५१ हजाराचा धान्य साठा उपलब्ध आहे.

सुशिला कडू या गटातील महिला सदस्यांनी ५ हजाराचे अंतर्गत कर्ज घेतले होते. त्यांनी महिला व पुरुषासाठी ब्युटीपार्लरचे दुकान उघडले. हे दुकान चांगले चालत असून त्यांचा मुलगा व मुलगी हे दुकान सांभाळतात. खर्च वजा जाता त्यांना ४ हजार रुपये सरासरी रक्कम प्राप्त होते. त्यांनी बचत गटाकडून घेतलेली कर्जाऊ संपूर्ण रक्कम दोन टक्के व्याजासह परत केली आहे.

वर्षा सालंकार यांनी जून ११ मध्ये शेतीसाठी व साधना धांगडे यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी ३ हजार रुपये कर्ज घेतले आहे. व्याजासह अद्यापही परतफेड सुरु आहे. बचतगटाच्या सदस्यांची अंतर्गत उलाढाल अद्यापही सुरु आहे.

शिवाणी महिला बचत गटाने आगस्ट २०१० मध्ये बिछायत केंद्र उघडण्याचा प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र पुलगांव येथे सादर केला. बँकेनी जानेवारी २०११ ला १ लाख १० हजाराचे कर्ज दिले. लग्न समारंभ, वाढदिवस किंवा अन्य समारंभासाठी बिछायात केंद्रातील साहित्याचा उपयोग होत असल्यामुळे या व्यवसायाला परीसरात झळाळी प्राप्त झाली त्यामुळे आतापर्यंत ३३ हजार ६०० रुपयाची परतफेड बँकेला केलेली आहे. तसेच बँकेच्या खात्यामध्ये महिला बचतगटाचे १६ हजार रुपये शिल्लक असून परतफेडीमुळे बँकेत बचत गटाचा लौकीक वाढलेला आहे. अद्याप १ लाखाचे कर्ज बँकेकडून मिळावयाचे असून सदर्हू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस अध्यक्ष सुशिला कडू व सचिव अनुसया गवळी यांनी बोलून दाखविला.

या बचत गटाला प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहयोगीका शेख बहिदा यांचा मोलाचा वाटा असून उन्नतीच्या पथावर चालून शिवाणी महिला बचत गटाने उंच भरारी मारली आहे एवढे मात्र निश्चितच.

·  मिलींद आवळे 
यशस्वी उद्योजिका
सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

एकदा मला माझ्या घरच्या कामाकरिता तीन हजार रुपयाची गरज पडली. तेव्हा वार्डातील एका महिलेकडे गेले, तेव्हा तिने मला पैसे दिले पण पाच टक्के व्याजानी, तिच्या जवळील पैसे बचत गटाचे होते तेव्हा कुठे माझ्या लक्षात आल की, बचत गट तयार केला तर आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात. मी बचत गट तयार करावा हा विचार घेऊन, वार्डातील काही महिलांकडे गेले आणि माझ्या मनामध्ये येणारा विचार त्यांना सांगितला .सर्वांच्यामते आपण सुध्दा आपल्या वार्डात महिला बचत गट तयार करायचा निर्णय घेतला.

आम्ही माविम सहयोगीनींनी वर्षाताईची भेट घेतली. त्यांनी आम्हाला बचत गटाचे फायदे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ याचे कार्य सांगितले व पटवून दिले. आम्ही महिलांनी त्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्ट २००८ ला बचत गटाची स्थापना केली, आणि इतर गटाची चौकशी केली. तेव्हा असे लक्षात आले की, महिला फक्त आपसात कर्ज व्यवहार करतात पण बँकेकडून जे कर्ज मिळते त्याचा वेगळा काही फायदा घेत नाही. आम्ही टी.व्ही रेडीओ वरील कार्यक्रम बघायचो, तेव्हा खेड्यातील महिला बचत गटाची शेती, दूध व्यवसाय, पोल्ट्रीफार्म, शेळी व्यवसाय अशी कितीतरी कामे करतात आणि संसाराला मदत करतात.

आम्ही दर महिन्याच्या दोन तारखेला बचत गटाची मिटींग घेत असतो.एका बैठकीच्या वेळी कोणता व्यवसाय सुरु करावा याविषयी आम्हा सदस्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात वर्षा या महिलेचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितले की, तुमच्या वार्डात उद्योजकता आणि उद्योग कसे करायचे याचे ४ दिवसाचे प्रशिक्षण आहे. तुम्हाला प्रशिक्षणाला यायचे आहे.

आमच्या गटातील ६ महिला प्रशिक्षणाला गेल्या, आम्हाला उद्योग उभारणीतील विविध टप्पे, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांची व्याख्या सांगितली. त्यात म म्हणजे महत्वाची, हि म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे न लाजता सामोर जाणारी ही संपूर्ण माहिती वर्षा आणि धवने यांनी चार दिवसाच्या प्रशिक्षणातुन दिली आणि प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवसापासून आमचा नविन जन्म झाला.

बचतगटाच्या माध्यमातून आपण खुप काही करु शकतो आणि त्याच आठवड्यात आम्ही तीन ते चार महिलांनी मिळून साबुदाना पापड, आलू पापड, मुंग पापड, गव्हाचे पापड, ज्वारीचे पापड अशा प्रकारचे पापड तयार केले. पुन्हा आम्ही वर्षाताईला भेटलो. त्यांनी विक्रीची माहिती दिली. आम्ही आफिस मध्ये गेलो. तिथे राठोड सर, देशमुख मॅडम, कांबळे मॅडम यांनी सुध्दा आम्हास प्रोत्साहन दिले. तयार केलेला माल घरोघरी, दुकानात, कार्यालयात जाऊन विक्री केली. तयार केलेला माल अगदी १५ दिवसात संपला. आम्हाला फार आनंद झाला. पाच हजार रुपये लावून तयार केलेला माल अगदी आठ हजार रुपयाला विकला. त्यातुन गटाला तीन हजार रुपयाचा नफा झाला. आम्हाला खुप आनंद झाला. जो माल ज्या ग्राहकांना दिला ते ग्राहकसुध्दा खुपच आनंदीत झाले.

राठोड सरांनी आम्हाला फोन करुन कळविले की, पुलगांव येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून पापडांचा माल तयार करा व प्रदर्शनात विक्रीस ठेवा. अगदी पाच दिवसात आम्ही शंभर किलो पापडांचा माल तयार केला. ६ दिवसांच्या प्रदर्शनामध्ये पंधरा हजार रुपयाचा माल विकला गेला. तिथे आम्हास सात हजार रुपयाचा नफा मिळाला.

सरांनी फोन करुन कळविले की, आता तीन-चार ठिकाणी प्रदर्शन आहेत. त्या करिता तुम्ही तयारीत रहा. माल तयार करण्याकरीता आम्ही बाहेरच्या महिला कामाला लावल्या व सगळया प्रदर्शनांमध्ये सहभागी झालो प्रत्येक व्यक्तींनी मालाची प्रशंसा केली आणि मालाची विक्री वाढली. आम्हाला बँकेकडून ५०,००० रुपयाचे कर्ज मिळाले.

आता आम्ही मशिन घेऊन कामाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला नागपूर वरुन मशिन आणली मशिन व्दारे दाळ, तीखट, मसाले, धनिया, हल्दी, सोजी सगळे साहित्य करु लागलो.

या वर्षी आम्ही पालक वडी, मेथी वडी, लौकी वडी, मसाला वडी, मुंग वडी, उडद वडी, आणखी बरेच पदार्थ तयार करुन दिल्लीला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या प्रदर्शनात सहभागी झालो. तिथे तर मला खरोखरच स्वर्ग बघायला मिळाला. भारतातील सर्व राज्यातील महिला आपआपल्या वस्तुची विक्री करत होत्या. त्यामध्ये माल विकायचा कसा ? त्यांनी बनविलेला मालाचा दर्जा, पॅकिंग इत्यादी त्यांच्या मधील कौशल्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले.

त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांनी तयार केलेला मालाचा दर्जा, विक्री कौशल्य, ग्राहकांशी प्रेमाने हसुन अगदी आत्मविश्वासपूर्पक माल कसा विकायचा सगळे शिकायला मिळाले. पुर्ण भारताचे दर्शन त्या ठिकाणी झाले.

पहिल्यांदाच इतका लांबचा प्रवास केला होता. १५ दिवसात दिल्लीला राहिल्यानंतर आम्ही तीन दिवस आगरा, मथुरा, वृंदावन, ताजमहल, संपूर्ण दिल्ली दर्शन केले. घराबाहेर पडल्यानंतर खरी माणसाची किंमत माहिती होते. आणि जगण्याचा नवीन मार्ग सापडतो. दिल्लीला पंचेचाळीस हजार रुपयाचा माल विकला गेला. फक्त ६ दिवसात नंतरचे दिवस मी बाकी महिलांचा माल विकुन दिला. आम्ही महिला घराच्या कधी बाहेर निघू शकलो नाही ते आज सर्व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामुळे घडू शकले.

दर्शना महिला बचत गटामुळे १५ ते २० महिलांना काम मिळाले. प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला ३ ते ४ हजार रुपयाचा नफा मिळतो आहे. त्यामुळे घरात आणि समाजात सुध्दा मानसन्मान मिळाला आहे

कहानी कल्पनाची
 कल्पना ही शहरामध्ये राहत होती. ती पाच भावंडामध्ये एकटी एकच बहीण होती. ती कुटुंबात खूप लाडाची होती. अभ्यासामध्ये खूप हुशार होती. तिला पुढे शाळा शिकायची होती. परंतु तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची फार चिंता लागलेली होती आणि शिकत असताना तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाकरीता स्थळ शोधने चालू केले होते. एक स्थळ जाम ते नागपूर ह्या रोडवर कानकाटी गाव आहे. त्या गावाची लोसंख्या ७४२ आहे. छोट्याशा गावात राहणारे सुभाष यांच्या कुटुंबाने कल्पनाला मागणी घातली होती. सुभाष स्वभावाने अतिशय चांगला व निर्व्यसनी होता. त्याच्याकडे स्वत:ची थोडी फार शेती होती. सुभाष बरोबर तिचे लग्न झाले. ती शहरातील खेड्यात आली. शहराच्या वातावरणात राहणारी कल्पना खेड्याच्या वातावरणात समरस झाली.ती खूप समजदार होती. तिला स्वत:वर आत्मविश्वास होता. तिच्यामध्ये खूप जिद्द होती. ती स्वत:च्या कल्पनेतुन स्वत:ला स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करित होती. तसेच ती इतर महिलांना स्वावलंबी होण्यासही माग्रदर्शन करीत होती. ती इतर महिलांशी खूप आपुलकीने प्रेमाणे वागायची तिच्या ममतेचा सागर होता. तिला वाट होती संधीची !
अशातच एक दिवस         माविम सहयोगीच्या माध्यमातून कानकाटी येथे संधी चालून आली. माविमचं काम म्हणजे आकाशात उंच भरारी मारुन प्रगतीच्या वाटेवर महिलांना उभं करणारी मावि सहयोगिनी ! आम्हा सर्व महिलांना बचत गआची संकल्पना, महत्व सांगून गावामध्ये बचत गटाची स्थापना केली. गआमध्ये कल्पनाला सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली. गटाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन मिळत होते. गट सुरळीत सुरु होता. त्यामध्ये गटातील सभासदांनी अंतर्गत कर्ज व्यवहारातुन आर्थिक स्त्रोत वाढविले. तसेच कल्पनाने सुध्दा गटातुन कर्ज घेतले. तिने घेतलेल्या कर्जातून फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय सुरु केला. कारण तिच्या मध्ये ह्या व्यवसायाची कला अवगत होती. तसेच तिने पेंटींग क्लास सुध्दा केला होता.
           कल्पना ही ख्ररोखरचं कल्पनावंत होती. तिने आपल्या कल्पनेतून नाविन्यपूर्ण पिंपळाच्या पानावर कोरीव काम करुन महान व्यक्तीची फोटो पिंपळाच्या पानात तयार केले. ते दिसायला अतिशय सुंदर व नाविन्यपूर्ण असल्यामुळे त्याची मागणी खूप वाढली. त्यामुळे व्यवसायातून कल्पनाच्या आर्थिक परिस्थितीत बरीच सुधारणा झाली. तसेच ह्या व्यवसायामध्ये तिचा नवरा सुध्दा तिला संपूर्ण सहकार्य करीत होता. हा व्यवसाय कल्पनेतून निवडण्यात आला. ती स्वत:चा व्यवसाय सांभाळून इतर सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या उत्साहने इतर महिलांना मदत करते. स्वत:च्या प्रेरणेतून इतरांना सुध्दा कार्य करण्यास प्रेरणा देते.