Monday 18 October 2021

 


रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी - नितीन गडकरी

जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा आढावा

        वर्धा, दि. 18 : वर्धा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या रेल्वे मार्गाची कामे सुरु आहेत. या मार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव रेल्वेने सादर करावेत आणि संबंधित यंत्रणांनी भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

         श्री.गडकरी यांनी विश्राम भवन येथे रेल्वे मार्गांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला खासदार रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.दादाराव केचे, आ.पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार आदी उपस्थित होते.

         जिल्ह्यात वर्धा-नांदेड, वर्धा-बल्लारशहा (3 री लाईन), वर्धा-नागपूर (3 री लाईन), वर्धा-नागपूर (4 थी लाईन) या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनासाठी रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त होणे आवश्यक आहे, सदर प्रस्ताव रेल्वे सादर करावे. त्यानंतर महसूल विभाग, वन विभाग आणि रेल्वेने संयुक्तपणे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे श्री.गडकरी यांनी सांगितले.

          रेल्वेच्या चारही प्रकल्पाच्या भूसंपादनाची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जातील, असे महसूल अधिका-यांनी बैठकीत सांगितले.

0000

No comments:

Post a Comment