Saturday 17 September 2016

प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.17-जिल्‍हयातील सालोड (हिरापूर) व नेरी (पुनर्वसन ) या दोन ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.
20 सप्‍टेंबर पर्यंत महाराष्‍ट्र ग्रामपंचायत (सदस्‍यांची संख्‍या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीसाठी एकुण सदस्‍य संख्‍या ठरविणे व प्रारुप प्रभाग रचना करण्‍यात येईल. 23 सप्‍टेंबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकारी मान्‍यता देतील. 28 सप्‍टेंबर पर्यंत आरक्षणाची सोडत ठरविण्‍यात येईल. 29 सप्‍टेंबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्‍यासाठी जाहीर सुचना प्रसिध्‍द करण्‍यात येईल. 7 ऑक्‍टोंबर पर्यंत  हरकती स्विकारण्‍यात येतील. हरकती व सुचना प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यावर 18 ऑक्‍टोंबर पर्यंत निर्णय घेण्‍यात येईल. अंतिम प्रभाग रचना, आरक्षित जागा इत्‍यादी  तपशिल  24 ऑक्‍टोंबर रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी एन.के.लोणकर  यांनी कळविले आहे.
                                                

Thursday 15 September 2016

एस. टी. महामंडळाच्‍या बडतर्फ वाहकानी
पूर्नर्नेमणूकीसाठी संपर्क साधावा
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातील गैरहजेरीस्‍तव तसेच अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्‍या  वाहकास कुंटूंब सुरक्षा योजने अंतर्गत अटी व शर्तीनुसार पुर्नर्नेमणुक देण्‍यात येणार आहे. यासाठी बडतर्फ वाहकानी महामंडळाशी संपर्क साधण्‍याचे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
राज्‍य परिवहन सेवेतून गैरहजेरीस्‍तव तसेच अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्‍या वाहकांना त्‍यांच्‍या कुंटूंबाची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी यासाठी 45 वर्षापेक्षा जास्‍त वय नसलेल्‍या कर्मचा-यांना कुंटूंब सुरक्षा योजने अंतर्गत अटी शर्ती नुसार नेमणुक देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
पुर्नर्नेमणुक देतांना सदर कर्मचा-यांच्‍या पदातील त्‍याच्‍या विभागातील सामाजिक आरक्षणानुसार व सध्‍याच्‍या रिक्‍त जागांनुसार कार्यवाही करण्‍यात येणार आहे. या संदर्भात प्रसारित करण्‍यात आलेली परिपत्रके राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या msrtc.gov.inया अधिकृत संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करण्‍यात आलेली आहेत. तसेच विभागांच्‍या व आगारांच्‍या सुचना फलकावरही प्रदर्शित करण्‍यात आलेली आहे. या बाबत अधिक माहिती करिता संबंधित राज्‍य परिवहन विभागाशी त्‍वरीत संपर्क साधावा. तसेच या संदर्भात कोणत्‍याही भुलथापांना बळी पडू नये असे विभाग नियंत्रक , राज्‍य परिवहन महामंडळ यांनी कळविले आहे.
                                      0000


मेस्‍को करीअर अॅकॅडमी येथे युवकांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण
वर्धा,दि.15- यवतमाळ येथे 6 जानेवारी 17 पासुन सुरु होणा-या नागपूर ए.आर.ओ. च्‍या सैन्‍य भरतीसाठी महाराष्‍ट्र शासन अंगिकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्‍को ) संचालित सातारा जिल्‍हयातील मेस्‍को करीअर अॅकडमी येथे भरतीपुर्व प्रशिक्षण चालविण्‍यात येत आहे. इच्‍छुक उमेदवरांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी ध.य.सदाफळ यांनी केले आहे.
प्रशिक्षण समाजाच्‍या सर्व स्‍तरातील युवकांसाठी उपलब्‍ध असून प्रशिक्षणामध्‍ये मैदानी व लेखी परिक्षेच्‍या तयारीची तसेच राहण्‍याची आणि जेवणाची उत्‍तम सुविधा उपलब्‍ध आहे. यासाठी मासिक शुल्‍क 6 हजार 500 असून ते अॅकडमी मध्‍ये प्रवेश घेतांना भरावे लागेल. अधिक मा‍हितीसाठी अॅकडमीच्‍या सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळात 9168986864 व 7588624043 या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर तसेचwww.mescoltd.co.in या संकेत स्‍थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.
                                      00000

मतदार याद्याचा पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.15-भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्‍या कार्यक्रमानुसार जिल्‍हया‍तील 44-आर्वी, 45-देवळी, 46-हिंगणघाट व 47 वर्धा विधानसभा मतदार संघातील 1 जानेवारी 2017 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे मतदार संघानुसार विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.
16 सप्‍टेंबर रोजी प्रारुप याद्यांची प्रसिध्‍दी करुन, 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर दरम्‍यान दावे व हरकती स्विकारण्‍यात येतील. 16 सप्‍टेंबर व 30 सप्‍टेंबर ला मतदार यादी मधील संबंधित भागाचे/सेक्‍शनचे ग्रामसभा /स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था येथे वाचन करुन नावाची खातर जमा करण्‍यात येईल. 18 सप्‍टेंबर व 1 ऑक्‍टोंबर रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. 16 नोव्‍हेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्‍यात येईल. 15 डिसेंबर पर्यंत डाटाबेसचे अद्यावतीकरण  व 5 जानेवारी ला अंतिम मतदार यादीची प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे.
          ज्‍या भारताच्‍या नागरिकांनी 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पूर्ण केले असतील आणि त्‍या मतदार संघातील कायमचे रहिवाशी आहेत अशा नागरिकांनी आपले नांवे मतदार यादी मध्‍ये नोंदवावे.
          मतदार संघनिहाय मतदार नोंदणी अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.  44-आर्वीसाठी  उपविभागीय अधिकारी आर्वी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्‍हणुन तहसिलदार ,आर्वी, आष्‍टी कारंजा (घा.) ,45 – देवळीसाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी , वर्धा तर सहायक नोंदणी अधिकारी तहसिलदार देवळी , 46 –हिंगणघाटसाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय हिंगणघाट व सहायक नोंदणी अधिकारी ,तहसिलदार, हिंगणघाट व समुद्रपूर, 47 –वर्धासाठी मतदार नोंदणी अधिकारी  उपविभागीय अधिकारी , वर्धा तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी तहसिलदार वर्धा व सेलू यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
          सं‍बंधित मतदान केंद्रावर नियुक्‍त केलेल्‍या पदनिर्देशित अधिका-याकडे, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्व मतदान केंद्रावर दावे व हरकती दाखल करण्‍यासाठी व चुकीच्‍या नोंदीची दुरुस्‍ती करण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज विनामुल्‍य उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. मतदार याद्या जास्‍तीत जास्‍त अचुक व  अद्यावत बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने सक्रिय भाग घेवुन या कामामध्‍ये निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेआहे.
                 सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत पारदर्शकतेसाठी वाहनांना हिरवा रंग
Ø जिल्‍ह्यात एकाच कत्रांटदारामार्फत  वाहतूक
Ø धान्‍यवितरणासाठी 112 वाहनांची व्‍यवस्‍था
वर्धा,दि.16-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमध्‍ये सर्व टप्‍प्‍यांवर अधिक पारदर्शकता आणण्‍यासाठी सुधारित धान्‍य वितरण प्रणाली राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये जिल्‍ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना धान्‍य वितरणासोबतच धान्‍य वितरण करणा-या सर्व वाहनांना हिरव्‍या रंगाने रंगवण्‍यात आले आहे. या एकाच रंगामुळे आता सामान्‍य नागरिकांनाही असे वाहन ओळखणे शक्‍य झाले असुन धान्‍य वितरणामध्‍ये होणा-या गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे.
सार्वजनिक धान्‍य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी टाळण्‍यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्‍यांचे आधार लिंकींग करणे सुरु केले आहे. जिल्‍ह्यात  एकुण 13 लाख 57 हजार 45 शिधापत्रिका धारक आहे. यामध्‍ये 65 टक्‍के आधार लिकींग  झाले आहे.राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभ घेणा-या अंत्‍योदय व प्राधान्‍य गटामध्‍ये 8 लाख 82 हजार 367 लाभार्थी असून यातील   95 टक्‍के लाभार्थ्‍यांचे आधार कार्डाशी लिंकींग झाले आहे. याशिवाय राज्‍यशासनाने सर्व शेतक-यांना स्‍वस्‍त दराने धान्‍य वितरण सुरु केले असून अशा शेतक-यांची संख्‍या 2 लाख 49 हजार 916 ऐवढी आहे. या सर्व लाभार्थ्‍याना स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत  धान्‍य वितरण करण्‍यात येते. 
भारतीय खाद्य निगमचे गोदाम ते शासकीय गोदाम आणि शासकीय गोदाम ते स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार या प्रवासात होणारी धान्‍याची चोरी थांबविण्‍यासाठी जिल्‍ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत धान्‍य वितरण सुरु करण्‍यात आले आहे. भारतीय खाद्य निगम ते शासकीय गोदामात धान्‍य पोहचविण्‍यासाठी 34 वाहने वापरण्‍यात येत आहेत. तर राज्‍य शासनाचे गोदाम ते रास्‍तभाव दुकानांपर्यंत 78 वाहनांमार्फत धान्‍य पोहचविण्‍यात येत आहे. या सर्व वाहनांना ओळखण्‍यासाठी हिरव्‍या रंगाने रंगवण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर ‘सुधारित धान्‍य वितरण प्रणाली, महाराष्‍ट्र शासन’ असा फलक वाहनाच्‍या समोरील भागावर लावण्‍यात आला आहे. त्‍यामुळे ही वाहने सहज ओळखता येणार आहेत.
जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी अशा वाहनांमधील धान्‍य स्‍वस्‍त धान्‍य दुकानांच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर ठिकाणी उतरत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास तात्‍काळ संबंधित तहसिलदार आणि जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांना 243314 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेवर सामान्‍य नागरिकांचे लक्ष राहणार असून गैरप्रकारांना आळा बसण्‍यास निश्चितच मदत होईल.