Friday 15 December 2017



कारागृहे हे शिक्षेचे नव्हे तर सुधार घडविण्याचे केंद्र
                                           - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
v तिमिरातून तेजाकडे सांस्कृतिक कार्यक्रम
v  बंदीजनांनी केली कला-गुणांची उधळण

नागपूर, दि. 15 : जीवनात चूक झाल्यानंतर तीचे परिमार्जन करण्यासाठी शिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृह हे कुणाला केवळ शिक्षा देण्यासाठी केलेली व्यवस्था नाही तर ते सुधार घडविण्याचे केंद्र आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            महाराष्ट्र कारागृह विभागाच्यावतीने स्व.वसंतराव देशपांडे सभागृहात दि. 15 डिसेंबर रोजी तिमिरातून तेजाकडे हा बंदिवानांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, अपर पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने गत तीन वर्षांपासून अतिशय चांगला उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बंदीवानांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आयुष्यात खुप सुंदर गोष्टी आहेत, हे त्यांना समजले पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांमधील मानवतेचे गुण व संवेदनशीलता जागृत ठेवण्याचे काम होत आहे.
कारागृहामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बंदीवानांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी योगासने शिकविण्यात येत आहे. तसेच विविध वस्तु बंदीवानांच्या माध्यमातून बनविण्यात येत असून त्या दर्जेदार आहेत. त्यांना चांगले मार्केटसुध्दा उपलब्ध झाले आहे. त्यातून एक रोजगाराची संधी देखील मिळाली आहे. एखादा व्यक्ती शिक्षा भोगून आल्यानंतर कारागृहात मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्याला स्वावलंबी जीवन जगता येण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून कारागृह संहितेमध्ये (जेल म्यॅनुअल) कुठलीही सुधारणा झाली नव्हती. ब्रिटीशकालीन गोष्टी या कारागृह संहितेमध्ये होत्या. गत दोन-तीन वर्षांत यात बदल करण्यात आला आहे. कारागृहामध्ये चांगली व्यवस्था असली पाहिजे. शिक्षा भोगायला आलेल्या कैद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. कारागृह प्रशासनाच्या काही अडचणी दूर झाल्या आहेत. कारागृहाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन निश्चित पुढाकार घेईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील विविध कारागृहात असलेल्या बंदीजणांनी गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. नृत्य, पोवाडे, लावणी, एकांकिका, नाटक आदी कला-अविष्कारही बंदीजनांनी सादर केले. तत्पूर्वी कलावंतांच्या वेशभुषा साकारणा-या सुवर्णा मानेकर, नृत्य दिग्दर्शक शंकर घोडेवार, रंगमंच व्यवस्था सांभाळणारे किशोर बत्तासे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी केले. उपस्थितांचे आभार योगेश देसाई यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरीक, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलिस विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
                                                000000