Monday 16 May 2016

                         उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी
                   मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
                                     -  सुहास दिवसे
Ø उष्णतेची लाट दि. 17 ते 21 मेपर्यंत
       वर्धा, दिनांक 16 -  भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार दि. 17 मे ते 21 मे, 2016 या कालावधीत राज्यात उष्णतेची लाट मोठ्याप्रमाणात येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.
         उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत.  बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा. अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळणसाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.  तसेच बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
हे करू नये
         लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.  गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.  बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.  शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins)असलेले अन्न टाळावे, असेही श्री. दिवसे यांनी सांगितले आहे


         नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पदभार स्वीकारला
·        सेवाग्राम आश्रमाला भेट
   वर्धा, दिनांक 16 – वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्री. शैलेश नवाल हे यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
शैलेश नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2010 बॅचचे अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रशासकीय सेवेला सुरूवात केली आहे. डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून 4 फेब्रुवारी 2014 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. श्री. नवाल हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असून त्यांनी एम. (इकॉनॉमिक्स) ही पदवी प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे.
सेवाग्राम आश्रमाला भेट
         वर्धेचे जिल्हाधिकारी या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शैलेश नवाल यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट दिली. तसेच सामुहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव आदी उपस्थित होते.
        महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेला सेवाग्राम आश्रम परिसर हा प्रेरणा देणारे स्थळ असून वर्धा जिल्ह्यातल्या सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असल्याचे श्री.नवाल यांनी सेवाग्राम आश्रम भेटी प्रसंगी सांगितले.
          सेवाग्राम आश्रम परिसरात दैनंदिन उपक्रम तसेच येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाबाबतही शैलेश नवाल यांनी माहिती घेतली. प्रारंभी आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव यांनी सूतमाला पुस्तक भेट देऊन स्वागत केले.

*****
खरिपात कर्ज, शेतीविषयक कामासाठी
हस्तलिखित सातबारा उता-याची मुभा
Ø अडचणी आल्यास संबंधित तहसीलदारांना संपर्क साधण्याचे आवाहन
          वर्धा, दिनांक 13 -  आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी खातेदारांना कर्ज अन्य शेतीविषयक प्रयोजनासाठी सातबारा उतारे तत्काळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता लक्षात घेता विशेष बाब म्हणून 31 मेपर्यंत हस्तलिखित अधिकार अभिलेख सातबारा उतारे देण्याची शासनाने मुभा दिली आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी शेतक-यांना कर्ज अन्य शेतीविषयक कामासाठी हस्तलिखित सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी  दिल्यात , अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.
         -फेरफार प्रणालीतून संगणकीकृत सातबाराच्या उता-यांचे प्रिंट आऊट काढून अर्जदारास वितरीत करणे शक्य होत नसेल तर शेतकरी खातेदारांना कर्ज, अन्य शेतीविषयक प्रयोजनासाठी हस्तलिखित अधिकार अभिलेख सातबारा उतारे देण्याची मुभा शासनाने दिली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
         तसेच  जिल्ह्यातील ऑनलाईन सेलू, देवळी, हिंगणघाट आर्वी तालुक्यात शेतकरी खातेदारांना हस्तलिखित अधिकार अभिलेख सातबारा उपलब्धतेबाबत काही अडचण निर्माण झाल्यास सेलूचे तहसीलदार श्री. होळी (मो.क्र.94201 78539), देवळीच्या श्रीमती जाधव (मो. क्र. 9552135294), हिंगणघाटचे श्री. कांबळे (मो. क्र.86248 68523),  आर्वीचे श्री. मस्के (मो. क्र.7588169389) या तहसीलदारांशी संपर्क साधावा.  तसेच वर्धा तालुक्यासाठी श्रीमती परांजे (मो. क्र.99609 78439), समुद्रपूरसाठी श्री. यादव (मो.क्र.94212 09136), आष्टीच्या श्रीमती गजभिये (मो.क्र.96730 42690) तर कारंजासाठी श्री. मडावी (मो.क्र.99219 95992) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

*****