Monday 16 May 2016

                         उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी
                   मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
                                     -  सुहास दिवसे
Ø उष्णतेची लाट दि. 17 ते 21 मेपर्यंत
       वर्धा, दिनांक 16 -  भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार दि. 17 मे ते 21 मे, 2016 या कालावधीत राज्यात उष्णतेची लाट मोठ्याप्रमाणात येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.
         उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत.  बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा. अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळणसाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.  तसेच बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
हे करू नये
         लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.  गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.  बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.  शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins)असलेले अन्न टाळावे, असेही श्री. दिवसे यांनी सांगितले आहे


No comments:

Post a Comment